गुरुपौर्णिमा - अलक

A Guru takes a hand, opens a mind, and touches a heart. Happy Guru Purnima! *On the auspicious occasion of Guru Purnima, I hope and pray that you are always there to guide me, shower me with your unconditional love.

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा! शाळेत असताना शिक्षकांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच आज मी लिखाण करू शकले, याचा मला खूप अभिमान वाटतो. माझ्या सर्व गुरुजनांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त छोटीशी भेट देता यावी म्हणून हा अलक लिहिण्याचा एक प्रयत्न... 

गुरुपौर्णिमा - अलक 

सगळंच ऑनलाईन झाल्यापासून तिची शाळाही ऑनलाईन झाली होती. 
आज गुरुपौर्णिमा, तिला आठवले, कसा तिच्याभोवती विदयार्थ्यांचा गराडा पडत असे 
फुलं देण्यासाठी नुसती चढाओढ 
पण घरात अडकल्यामुळे आज सगळंच कसं परकं झालं होतं 
संध्याकाळी दारावरची बेल वाजली 
पाहते तर तिचे आवडते विद्यार्थी तिच्या पालकांसोबत आले होते, 
कुणी फुल, तर कुणी गजरे घेऊन. 
मास्क लावून अगदी सोशल डिस्टन्स पळत उभे होते सगळे 
तिला समजताच नव्हते, डोळ्यात पाणी 
आज खऱ्या अर्थानी तिच्या कष्टाचे चीज झाले होते. 


तो शाळेतला सगळ्यात नावडता शिक्षक.
पण एका होतकरू हुशार विद्यार्थ्यांची फी त्याचाही नकळत भरत असे. 
तो विद्यार्थी दहावी झाला आणि पुढील शिक्षणासाठी बाहेर निघून गेला 
खूप शोधले त्याने, पण नाही भेटला तो. 
एकदा त्याला ऍटॅक आला, अँजिओप्लास्टी करावी लागेल सांगितले. 
घरचे म्हणाले पुढच्या आठवड्यात करा, तोपर्यंत पैशाची जुळवाजुळव होईल 
आणि दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी सांगितले की, 
एक निष्णात हार्ट सर्जन तुमच्या पेशंटचे ओप्रेशन फ्री मध्ये करत आहेत. 
सर्जरी नंतर शुद्धीवर येताच त्याच्यासमोर एक डॉक्टर बसलेले त्याने पाहिले 
"सर ओळखलंत का? अशोक चव्हाण, तोच ज्याची तुम्ही फी भरत होतात. 
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडून तुम्हाला हि गुरुदक्षिणा!"
त्याच्या मेहनतीचे सार्थक झाले होते. 


गालात पान आणि तोंडात शिव्या अशा अवतारात वावरणारी ती. 
आणि तिच्यासोबतच्या त्या मुली. 
आज सकाळीच सगळ्या एका खोलीत दार लावून काहीतरी करत होत्या. 
तिने दोन तीनदा विचारलेही, पण कोणीच काही बोलेना. 
आणि अचानक सगळ्या बाहेर आल्या फुलांचे गुच्छ, आणि एक मोठा केक घेऊन. 
सगळ्या एकसाथ ओरडल्या, "हैप्पी गुरुपौर्णिमा"!
कसेही असले तरी तिने त्यांना आयुष्य जगायला शिकवले होते 
आज तिच्या तोंडात शिव्या नाही, अनेक आशीर्वाद होते 


वयाच्या चाळीसाव्या वर्षी एसएससी पास झाली ती. 
केवळ मुलाच्या इच्छेसाठी. 
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही ठरवले तिने आपसूकच. 
संध्याकाळी मुलगा कॉलेज वरून येताच त्याला पाटावर बसवून ओवाळले तिने 
खीर भरवली आणि त्याचा पायाशी हात ठेवून म्हणाली,
"तुझ्यासारखा गुरु लाभला, तर कोणत्याच आईची इच्छा अपुरी राहणार नाही."
एक आगळीवेगळी गुरुपौर्णिमा तिने साजरी केली. 

--मनाली.