Login

गुरुपौर्णिमा विशेष

Guru Poornima

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः

दोन ओळींतून किती सुरेख वर्णन केलं आहे गुरुचं. ब्रम्हा,  विष्णू आणि महेश...  यांचा त्रिवेणी संगमच जणु....  त्रिगुणात्मक रुप.. दत्तगुरु... आणि या त्रिगुणात्मक रूपापलिकडेही जे तत्व आहे.. ते म्हणजे परब्रम्ह...  गुरु म्हणजे साक्षात परब्रम्ह.. थोडक्यात.. गुरूंना देवापेक्षाही उच्च स्थान देण्यात आलं आहे. गुरु म्हणजे 'अंधःकार दूर करणारा'...'तिमिरातून तेजाकडे नेणारा'... 

आपल्या भारतवर्षाला कितीतरी महान गुरु-शिष्यांची परंपरा लाभलेली आहे.  रामायण - महाभारत काळापासून या परंपरेने,  वेगवेगळ्या रूपात.. वेगवेगळ्या युगात आपलं अस्तित्व दाखवलं आहे.. जपलं आहे. आणि आजमितीपर्यंत ही प्रथा आपल्या भारतवर्षानं जोपासली आहे.  सांदिपनी-कृष्ण, द्रोणाचार्य-अर्जुन, विश्वामित्र-राम लक्ष्मण या महान गुरुशिष्य जोड्यांपासून ते अगदी आतापर्यंतचे रमाकांत आचरेकर-सचिन तेंडुलकर. 

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे  गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मंगलमय दिवस साजरा केला जातो. पौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा दिवस. गुरु शिष्याला ज्ञानरूपी प्रकाश दावतात,  म्हणून या दिवसाला खास महत्व. गुरुपौर्णिमा म्हणजे अंधश्रद्धा नक्कीच नाही... गुरुविषयीच्या डोळस श्रद्धेचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा.. 

एके ठिकाणी वाचलं होतं,  'गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही.'

किती समर्पक उपमा...  म्हणतात ना 'अहं बाजुला केल्याशिवाय सोहं अवस्था प्राप्त होत नाही'.

कबीर म्हणतात तसं.. 

‘गुरुबिन कौन बतायें बाँट'

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर गुरूशिवाय पर्याय नाही.  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गुरु हवाच... आणि त्यासाठी तुम्ही त्यांना शोधत बसण्याची गरज नाही...  'गुरु'..  मग ते कोणत्याही रुपात असो..  तुम्हाला तुमच्या आयुष्याची  योग्य दिशा दाखवण्यासाठी मार्गदर्शक बनून तुमच्यासोबत कायम राहतात. आई... वडील... शिक्षक अशा सगळ्या रुपात ते तुम्हाला दर्शन देतात. गुरूंच्या सहवासात सगळ्याच गोष्टी सहज होऊन जातात. प्रत्येक गोष्ट समजू लागते.. उमजू लागते.. आयुष्याची एकेक घडी सहजपणे उलगडू लागते.. गुरु म्हणजे आपल्या जीवनरूपी रथाचा सारथी.... भावसागरातल्या नावेचा नावाडी.. आपल्याला सुरक्षित  पैलतीरी नेणारे.. 

महाभारताबद्दल एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते.  व्यास महाभारत सांगत असताना गणपतीने व्यासांना न थांबता कथा कथनाची अट घातली. त्यावर व्यासांनी  गणपतीला प्रत्येक श्लोक समजल्याशिवाय पुढे जायचं नाही अशी प्रतिअट घातली. आणि त्यातूनच महाभारतासारखं महाकाव्य जन्माला आलं.  थोडक्यात,  आकलनाशिवाय संकलन करता येत नाही. मग ते संकलन कुठल्याही रुपात असो. आणि त्यासाठी गुरूशिवाय पर्याय नाही. 

लहान असताना आपले आई-वडील आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात.... ते आपले पहिले गुरु. 

शालेय जीवनात आपल्याला विविध विषयांचे सर्वांगीण ज्ञान देऊन आपल्याला परिपूर्ण करणारे शिक्षक... आपले दुसरे गुरु. 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक नविन शिकवण देणारे.. आपले नातेवाईक... शेजारी... आजूबाजूचा प्रत्येकजण... आपले तिसरे गुरु.  जीवनातलं व्यावहारिक ज्ञान खऱ्या अर्थाने हेच देतात. 'प्रॅक्टिकल' होणं हेच शिकवतात. 

म्हणून हे सगळेच आपले गुरु.. कारण... 

जो जो जयाचा घेतला गुण....

तो म्यां गुरु केला जाण...

म्हणजे,  ज्यानं ज्यानं तुम्हाला या ना त्या कारणानं... काही ना काही शिकवलं... तो प्रत्येक जण तुमचा गुरु.. मग त्यात हे महत्वाचं नसतं की तो लहान आहे की मोठा.. अगदी लहान मुल सुद्धा आपल्या वागण्यातून काहीतरी शिकवून जातं.. प्राणी -पक्षी हे सुद्धा काही ना काही शिकवतच असतात.  लहानशी मुंगी सुद्धा तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलून हेच शिकवत असते की,  कठिण.. अशक्य असं काहीच नसतं. करण्याची धमक हवी. म्हणजे ती लहानशी मुंगी सुद्धा तुमच्या गुरुंच्या पंक्तीत बसते.  फक्त चोचीच्या जोरावर खोपा विणणाऱ्या सुगरणीचं कौतुक खुद्द बहिणाबाई करतात..  आणि सोबतच माणसाला सांगतात.. 'तुला दिलं रं देवानं,  दोन हात दहा बोटं'... हे सांगत बहिणाबाई सुद्धा आपल्या गुरुंच्या रांगेत जाऊन बसतात. असे असंख्य गुरु आपल्याला पावलोपावली लाभतात.  

संत तुकाराम महाराज म्हणतात तसं... 

'गुरु कृपेचा आगारु,

गुरु प्रेमाचा सागरु,

तुका म्हणे देव माझा

गुरुविण नाही दुजा'

चंद्र जरी रात्रीचा अंधार दूर करत असला तरी तो स्वयंप्रकाशित नाही,  त्याचं तेज सूर्याचं देणं आहे.  त्याचप्रमाणे तुम्ही कितीही उंच शिखरावर पोचलात तरी ते यश तुमच्या एकट्याचं नाही हे विसरु  नका.  ज्या ज्ञानाच्या जोरावर तुम्ही इथपर्यंत मजल मारली आहे,  जे यश संपादन केले आहे,  ते ज्ञान तुम्हाला तुमच्या गुरुमुळंच मिळालं आहे याची जण सदैव ठेवा. 

गुरु म्हणजे सूर्य... ग्रहांना प्रकाशमान करणारा.. 

शिष्य म्हणजे चंद्र... सूर्यतेजाने प्रकाशणारा.. 

म्हणून ज्ञानाची अपेक्षा ठेवताना नतमस्तक व्हायला शिका.  गुरूंचा मान राखायला शिका. याहून 'गुरुपूजन' काही वेगळं नसतं. त्यासाठी हार तुरे,  मिठाई कशाचीही गरज नाही. तर आपल्या गुरुंनी आपल्याला ज्ञानाचा वसा दिला आहे... तो जपणे.. जोपासणे... आणि त्याचा वारसा असाच अविरत पुढे चालू ठेवणे.  

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा... 

आम्ही चालवू हा पुढे वारसा... 

©®रत्ना 

हा लेख माझा असला...माझ्या शब्दांत तो मी मांडला असला तरी या लेखातील काही संदर्भ हे माझ्या वाचनात आलेले आहेत...शालेय जीवनापासून ते आजतागायत..... पुस्तकं किंवा इंटरनेट... अशा माध्यमातून.  काहींना मी माझ्या शब्दांत मांडले आहे तर काही तंतोतंत घेतले आहेत.  या संदर्भांचे मूळ लेखक कोण हे निश्चित आता सांगता येणार नाही... पण त्यांना सुद्धा मी 'गुरु' मानून त्यांना वंदन करेल.... कारण... जो जो जयाचा घेतला गुण.... तो म्यां गुरु केला जाण.. 

सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!