गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा..
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता-बंधु –स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेळीवरी ही फुले
फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा !
शिकू धीरता , शूरता , वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !
तुझी त्याग सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
या ओळी मला खूप आवडतात आणि माझ्या डोळ्यांसमोर उभे राहतात आणि मला आठवतात माझे बालपणीचे शिक्षक.
मला माझ्या सर्व शिक्षकांचे स्मरण होते. अगदी माझ्या बालवाडीच्या बाईपासून. लहानपणापासूनच मला शिक्षणाची आवड असल्यामुळे गुरुबद्दल माझ्या मनात आजही तेवढाच आदर आहे.
प्रत्येक इयत्तेत माझे विशिष्ट आवडते सर किंवा मॅडम होत्या आणि त्यांचा शब्द मला प्रमाण वाटायचा. मला माझे पहिले इंग्लिशचे शिक्षक खूप भावले होते. खूप छान शिकवायचे ते, आणि त्याचमुळे की काय मला पाचवीत 99 मार्क मिळाले होते. ते शिक्षक माझे आवडते शिक्षक होते. त्यांना मी आदराने माझ्या घरी बोलावत असे. माझे आईवडीलही त्यांना घरी येण्याचा आग्रह करत आणि ते कधी तरी काही निमित्ताने आमच्या आग्रहाचा मानही ठेवत. असे माझे शालान्त परीक्षेपर्यंत सुरू होते.
पुढे शिक्षण झालं, लग्न झालं. लग्नानंतर मात्र परिस्थिती बदलली; परंतु त्या काळात लेखनाकडे माझा मूड लागला. तसेच मी लिहित होते ते माझ्या पुरतच होतं. पण बाहेर कोठे द्यायचे तर ते योग्य आहे का? माझ्या लिखाणात अजून काही त्रुटी, उणिवा आहेत का? कोणाला विचारावे? कोणाचे मार्गदर्शन घ्यावे, अशा संभ्रमावस्थेत मी होते आणि एकेदिवशी सहज मला ईरा बद्दल कळलं. आणि मी तिथे माझा एक लेख टाकला.
खूप छान प्रतिसाद मिळाला होता. ईराच्या सर्वेसर्वा संजना इंगळे मॅडमने नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रोत्साहनाने मी पुन्हा लिहू लागले. आणि लिहिलेले पोस्ट करत गेले. मग हळूहळू मॅडमने मला सूचना देत मार्गदर्शन केले. माझ्या विचारांना चालना मिळावी तसेच माझी शब्दसंपत्ती वाढावी, दर्जेदार लेखन माझ्या हातून व्हावे यासाठी मी कोणत्या लेखकांची, कोणती पुस्तके वाचावीत, याबद्दलही मला मार्गदर्शन मिळाले. लेखन छान व्हावं म्हणून मी वाचन वाढवलं, शब्दसंपत्ती वाढवली.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला शिक्षकरुपी कुणीतरी भेटत असतं. आणि आपण त्यांच्याकडून काहिनाकाही शिकत जातो.
गुरु जगाची माऊली, सुखाची सुंदर सावली,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा