Feb 28, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा

Read Later
गुरूने दिला ज्ञानरुपी वसा


गुरूने दिला ज्ञानरुपी वसागुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः,
गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः


गुरू ब्रम्हा आहे, विष्णू आहे, गुरू महेश्वर आहे आणि तोच आपला परमेश्वरा समान आहे असे आपण सगळेच मानतो. जो आपल्याला ज्ञानाचे दान देतो तोच आपल्या पेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो.

गुरू म्हणजे आपला विश्वास, गुरू म्हणजे आपले भविष्य घडवणारे, गुरू म्हणजे जो प्रत्येक वेळी चुकतांना आपल्याला सुधारतो तो, गुरू म्हणजे विद्या शिकवणारे आणि ती योग्य मार्गाने आपल्याला समजावून सांगणारे.
गुरू म्हणजे प्रत्येक वेळी आपली पाठ कधीच सोडत नाही तो, गुरू कुणीही असू शकतो अगदी लहान मुलं सुद्धा. कारण प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकतच असतो.

सगळ्यात पहिले गुरू आपले आईवडील असतात, मग नंतर शाळेत गेल्यावर आपले शिक्षक गुरू.
त्यांच्यावर आपले भविष्य निर्भर असते, तसेच आपले सोबती सगळे मित्र, हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करतच असतात. आयुष्यात जो कोणी येईल तो काही ना काही आपल्याला शिकवून जाईल. त्यामुळे नेहमी घेत रहा आणि आपण मिळवलेले ज्ञान वाटत रहा.

मी महानगरपालिकेच्या शाळेत बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंत शिकले. तिथे आम्हांला एकच बाई असायच्या दिवसभर शिकवायला. अगदी इयत्ता चौथी पर्यंत त्याच होत्या शिकवायला.

"सूर्यवंशी बाई" इतक्या प्रेमळ स्वभावाच्या, कधीही कोणावर चिडल्या नाही की कधी कोणाला ओरडून बोलल्या नाही. त्या संपूर्ण वर्गालाच त्यांची मुलं म्हणून बोलायच्या. त्यांचं बोलणं एकदम शांत असायचं, प्रत्येक मुलाला आणि मुलीला अगदी त्यांचं बोट धरून गिरवायला शिकवले त्यांनी. काही चूक झालीच तर प्रेमाने समजावून पण सांगितलं.

चौथी नंतर मी मोठ्या शाळेत गेले तेव्हा कायम त्यांना भेटत राहीन असा नियम केला. पहिले थोडे दिवस आम्ही सगळ्या मैत्रिणी जायचो त्यांना भेटायला, कधी शाळेत कधी त्यांच्या घरी ही जायचो. पण काही महिन्यांत तो नियम मी हळूहळू विसरून गेलो आणि आम्ही सगळ्याच आमचं भविष्य घडवण्यात इतके गुरफटून गेलो की मला बाईंना भेटण्याचा विसर पडला.

पण त्या मात्र कधीही भेटल्या कुठे किंवा दिसल्या की आवर्जून आईला विचारायच्या,

"तृप्ती कशी आहे, अभ्यास करतेय ना चांगला."

खूप वर्षांनी एकदा आईला आमच्या सूर्यवंशी बाई दिसल्या, तिने त्यांना थांबवून हाक मारली. आईसोबत माझी मुलगी होती जेमतेम तीन चार वर्षांची असेल, तिला बघताच बाईंनी स्वतः ओळखले "ही तृप्तीची मुलगी दिसतेय, चेहरा अगदी तिचाच आहे."
त्यांनी न सांगताही ओळखले होते, हे ऐकून आईलाही आश्चर्य वाटले त्यांचे .
त्यानंतर त्यांचा फोन नंबर घेतला आणि मी स्वतः त्यांना भेटायला गेले त्यांच्या घरी. आजही त्या अगदी तशाच दिसत होत्या पण आता वयामानाने थोड्या थकल्या सारख्या वाटत होत्या. तेच घर जिथे मी लहानपणी क्लासला जायचे त्यांच्याकडे स्कॉलरशिपच्या. सगळं कसं अगदी एका क्षणात झरझर डोळ्यापुढे ते दिवस येऊन गेले.

मित्र मैत्रिणींसोबत हातात हात धरून आम्ही पायी पायी चालत जायचो, एका चॉकलेटचे चार तुकडे करून चौघे जण खायचो. गेले ते दिवस आणि मागे उरल्या त्या फक्त आठवणी .
तिथून निघतांना त्यांना वाकून नमस्कार केला, त्यांनी पटकन मला उठवून छातीशी घट्ट कवटाळले आणि म्हणाल्या," कायम अशीच सगळ्यांना धरून रहा."

आता आम्ही सगळे मित्र मैत्रिणी वेळ काढून आवर्जून त्यांना भेटायला जातो, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात चांगले काहीतरी काम करतोय हे ऐकून बाईंना खूप आनंद झाला. त्यांचा आशीर्वादाचा हात असाच कायम आमच्या पाठीशी राहो आणि त्यांना निरोगी आरोग्य लाभो हीच प्रार्थना.

त्या कधीच मला विसरल्या नाही, आजही कधी आठवण आली तर मी लगेच त्यांना फोन करून बोलून घेते त्यांच्याशी, आणि त्यांनाही लगेच समजून जाते .

त्यांच्यासाठी मी इतकंच म्हणेन,

ज्यांच्यामुळे आयुष्याचा पाया भक्कम झाला, ज्यांनी हाताला धरून पाटीवर गिरवायला शिकवले, ज्यांच्यामुळे आज मी इथवर आले, त्याच ह्या माझ्या आवडत्या सूर्यवंशी बाई. आज कित्येक वर्षांनी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.
त्यांच्यासाठी आज मी पुन्हा लहान झाले, त्यांची कौतुकाची थाप पाठीवर घेण्यासाठी मी पुन्हा त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.
आनंद गगनात मावेनासा झालाय.
खूप खूप खूप धन्यवाद बाई.
तुमच्यामुळे ... फक्त तुमच्यामुळेच बाई.

माझे हे बोल ऐकून त्यांनीही लगेच मला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या,

"तृप्ती मलाही तुझा खूप अभिमान आहे, माझ्या विद्यार्थ्यांची प्रगती हेच माझे खरे पारितोषिक आहे, व तु जे इतर मुलामुलींविषयी सांगितले त्यामुळे तर खुप समाधान मिळाले व आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटते. खुप खुप यशस्वी व्हा आणि प्रगती करा ."

गुरू, आपल्या आयुष्यात गुरू इतके महत्वाचे असतात की त्यांच्यामुळे यशाची पायरी चढायला आपल्याला खूप मदत होते.

माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वंदनीय गुरूला मी आदराने हात जोडून प्रणाम करते. ते कायम असेच आम्हांला चांगले चांगले शिकवत राहो आणि योग्य मार्गदर्शन करत राहो.सौं तृप्ती कोष्टी ©®

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Trupti Koshti

मांजर प्रेमी ? पुस्तक प्रेमी ? आणि लिहायला थोडंफार जमत ✍️

//