गुरुची शिकवण

Guidance Of Teacher
गुरुची शिकवण


राजीव शिक्षकदिनाच्या निमित्ताने त्याच्या सर्वांत आवडत्या शिक्षकांना वाघ गुरुजींना भेटायला त्यांच्या घरी गेला.

"गुरुजी घरी आहेत का?" 

"हो आहेत ना, पण आपण कोण?" गुरुजींच्या सूनबाईने रेखाने विचारले.

"मी राजीव त्यांचा विद्यार्थी." राजीवने आपली ओळख करुन दिली.

"तुम्ही आत या, इथे बसा. मी बाबांना बोलावून आणते." रेखा राजीवला बसायला सांगून गुरुजींना बोलवायला आत निघून गेली.

राजीव घराचे निरीक्षण करत बसला होता. गुरुजींचे घर सुरुवातीला जसे साधे सरळ होते. आजही अगदी तसेच होते. घरावरुन गुरुजींची आर्थिक परिस्थिती अजूनही बेताचीच आहे, असे राजीवला वाटत होते. 

रेखाने गुरुजींना बोलावून आणले. गुरुजींना बघून राजीव म्हणाला,
"गुरुजी मला ओळखलं का? मी राजीव, पहिली ते चौथी तुमच्या वर्गात होतो."

राजीवने गुरुजींच्या पाया पडून त्यांना नमस्कार केला. गुरुजी खुर्चीत बसत म्हणाले,
"मागच्या महिन्यात तुझा फोटो पेपरमध्ये छापून आला होता ना. तुझ्या सारख्या विद्यार्थ्याला मी कसा ओळखणार नाही? आज माझी कशी काय आठवण काढली?"

रेखाने राजीवला चहा व पाणी दिले. 
" आज शिक्षकदिन आहे आणि इकडं जवळचं माझं एक काम होतं, तर म्हटलं चला गुरुजींची भेट तरी घेऊन येऊयात. गुरुजी तब्येत काय म्हणते? सगळं व्यवस्थित चालू आहे ना?" राजीवने विचारले.

गुरुजी म्हणाले,
"देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित सुरु आहे. दोन्ही मुलं नोकरीला आहेत. आमच्या मॅडम सहा महिन्यांपूर्वी आमची साथ सोडून गेल्या. आता एकेक दिवस मोजत जगायचं. आता वय झालं म्हटल्यावर तब्येत गरमनरम असते. बाकी तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? तुझ्या चेहऱ्यावरुन तू नाराज दिसत आहेस."

राजीव एक खोल श्वास घेऊन म्हणाला,
"खरंतर गुरुजी त्याचसाठी आज मी तुमच्याकडे आलो आहे. मला प्रत्येक क्षेत्रात यश पटकन मिळत गेलं. पैसेही भरपूर आहेत. लोक आदरही करतात. समाजात मान सन्मानही मिळतो. पण गुरुजी माझ्या आयुष्यात जवळची माणसे टिकत नाहीयेत. स्वतःचं असं म्हणावं असं कोणीच नाहीये. आई वडील मोठया भावाकडे निघून गेलेत. बहिणी रक्षाबंधन व भाऊबीजेला तिकडेच जातात. माझी बायको तीही मागच्या महिन्यात भांडून माहेरी निघून गेली. काल मुलाला भेटण्यासाठी गेलो होतो, तर तो म्हणाला की, "डॅड मला भेटण्यासाठी येऊ नका. तुमच्याकडे माझ्यासाठी वेळ नसतो, आता माझ्याकडेही तुम्हाला भेटायला वेळ नाहीये." 

गुरुजी मी जे पाहिजे ते आई वडील, बायको व मुलाला दिलं. कोणत्याच गोष्टींची कमी पडू दिली नाही. तरी माझ्या वाटेला हा एकटेपणा का? मी खरंच इतका वाईट माणूस आहे का? 

जवळच्या मित्रांना सुद्धा माझ्यासाठी वेळ नाहीये. मी कोणाशी जाऊन बोलावं हेच मला कळत नाहीये."

बोलताना राजीवच्या डोळयात पाणी आले होते. गुरुजी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
"राजीव तुझ्या आयुष्यातील लोकांना जेव्हा तुझी गरज होती, तेव्हा तू गेलास का? हा प्रश्न स्वतःला विचार.
आता समज की, तू एखाद्या मिटींगमध्ये आहेस आणि मी तुला फोन करुन सांगितलं की, राजीव पटकन माझ्या घरी ये. मला तुझी गरज आहे. तेव्हा तू येशील का? नाही येणार, कारण तू तुझ्या कामाला जास्त महत्व देतोस.
माणसाने काम करावं, पण आई वडील, बायको व मुलांना जो वेळ देणे गरजेचे आहे, तो वेळ त्यांना दिला गेलाच पाहिजे.
फक्त पैसे पुरवून आपलं कर्तव्य पूर्ण होत नाही, तर काही ठिकाणी आपली हजेरी महत्त्वाची असते. आपल्या लोकांच्या फार काही अपेक्षा नसतात, त्यांना फक्त थोडासा वेळ आणि प्रेम आवश्यक असतं.
तुझे आई वडील आजारी पडल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये तू घेऊन जातोस की ड्रायव्हरला सांगतोस? मुलाच्या शाळेत जाऊन कधी पालक शिक्षक मिटिंग अटेंड केली आहेस का? बायकोला घेऊन मूव्हीला किंवा जेवायला घेऊन गेला आहेस का? किंवा तिच्या हातचं जेवण तिच्या सोबत गप्पा मारता मारता केलं आहेस का? बहिणींना रक्षाबंधन व भाऊबीजेला घ्यायला गेला आहेस का?"

"गुरुजी यातील मी काहीच केलं नाही. मला हे कधी महत्त्वाचं वाटलंच नाही. मुलाच्या बर्थडेला जमलं तर ऐनवेळी केक कट करायला यायचो, नाही जमलं तर तेही नाही. बायकोला कधीच बाहेर घेऊन गेलो नाही, ती म्हटली सांगायचो की, मैत्रिणी सोबत जा म्हणून. जेव्हा हे सगळे माझ्याकडे वेळ मागायचे, तेव्हा मी चिडून बोलायचो. बिजनेसचा पूर्ण लोड बायकोवर किंवा मुलावर काढायचो. मी या सगळ्यांसाठी खूप काही करतो असा माझा गर्व होता, पण त्याचे खूप लवकर हरण झाले. 

मी माझ्या माणसांशिवाय अपूर्ण आहे. मी त्यांच्याशिवाय खुश राहू शकत नाही. गुरुजी माझं चुकलं." राजीवने हात जोडून सांगितले.

गुरुजी म्हणाले,
"देर आये दुरुस्त आये. आता हेच जर तुला तुझ्या बायकोने सांगितले असते, तर तुझा अहंकार दुखावला गेला असता आणि तू ते मान्य केलं नसतं. आता एक काम कर, आई वडील, बायको, बहीण, भाऊ आणि मुलासमोर जाऊन त्यांची क्षमा मग आणि त्यांना ठराविक वेळ द्यायला शिक. कोणालाच गृहीत धरायचे नाही, हे लक्षात ठेव. 

सोनारानेचं कान टोचावे, ही म्हण काही खोटी नाही. तुझी माणसे तुझ्याजवळ राहतील, हीच माझी गुरुदक्षिणा असेल. माझी ही शिकवण कायम लक्षात ठेव."

आपणंही आपल्या जवळच्या लोकांना अतिगृहीत धरतो आणि म्हणूनचं हिचं आपली माणसं आपल्यापासून दूर जात आहेत. हल्ली आपण माणसांपेक्षा पैश्यांना जास्त महत्त्व देत आहे आणि हेच पैसे कमावण्याच्या नादात आपल्या लोकांना वेळ देत नाही. राजीवच्या गुरुजींनी दिलेली शिकवण आपण सर्वांनी लक्षात घेऊन आचरणात आणायला हवी.

समाप्त

©®Dr Supriya Dighe