गुरूवंदना

गुरूसंबंधी मनोगत


सगळ्या गुरूंना त्रीवार वंदन करून माझा प्राथमिक शाळेतील अनुभव सांगते.

मी तेव्हा म्हणजे ( १९६९साली) चवथ्या वर्गात होते. आमचे वर्गशिक्षक होते उपरे सर. एकदम हाडांचे शिक्षक होते.

ते शिकवायचे खूप छान पद्धतीने की कितीही मठ्ठ विद्यार्थी असला तरी त्याला कळलंच पाहिजे.

शिस्तीचे भोक्ते होते…

वर्गात शिकवताना ते त्यांच्या टेबलवर एक काळा रूळ ठेवायचे. लाकडाचा चांगला जाड होता. त्यांची शिस्त मोडल्या गेली की विद्यार्थ्यांच्या हातावर सटकन रूळ वळ ऊमटवायचा. विद्यार्थी कळवळायचा पण सरांचा चेहरा निर्विकार असायचा.

शिस्त मोडली, गृहपाठ केला नाही,चुकीची उत्तर दिली तर दुसरी शिक्षा असायची ती म्हणजे विद्यार्थ्याच्या एका पायाला दोरी बांधून ती दोरी खिडकीला बांधायची. एकपाय वर आणि एक पाय खाली अश्या स्थितीत तास संपेपर्यंत उभं राहावं लागायचं. विद्यार्थ्याची वाट लागायची. पण तोंडातून शब्द निघायचा नाही.


ही शिक्षा सगळ्यांसाठी सारखीच असायची. त्यांचा मुलगा आमच्या वर्गात होता.त्यालाही ते हीच शिक्षा करत.

एवढे शिस्तप्रिय आणि कडक असलेल्या सरांची दुसरी बाजू हळवी होती.


दर शनिवारी सकाळी शाळा असायची. दुपारी बारा नंतर सर आमच्या वर्गाचा स्काॅलरशिपचा क्लास घ्यायचे. क्लास घेण्यापूर्वी पूर्ण वर्गासाठी ते नाश्ता बोलवायचे. मधल्या सुट्टीत डबा खाल्ला तरी मुलं भुकेली असतात हे लक्षात घेऊन ते आधी आम्हाला खायला घालायचे मग क्लास घ्यायचे. आता कळत शिस्तप्रिय माणसाच्या मनात एक माऊली पण दडली होती.

आई सगळ्या स्त्रिया होतात. माऊली होणं सगळ्यांच स्त्रियांना जमत नाही. पण काही पुरूषांना जमतं. कारण माऊली भावना आहे. म्हणून तर ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. त्यांनी अवघ्या जगासाठी पसायदान मागीतलं.

कै.राम शेवाळकर पसायदानाचे निरूपण करताना म्हणून गेलेत,

" आपल्या मुलाचं हित बघणारी स्त्री ही आई असते. पण आपल्या मुलाबरोबर इतर मुलांचंही हीत बघणारी स्त्री माऊली असते."

आमचे उपरे सर माऊली होते. विद्यार्थ्याच्या प्रती इतकी त्यांची भावनिक गुंतवणूक होती की जर एखादा मुलगा किंवा मुलगी शाळेत आले नाहीत तर त्याच घर ज्याला माहिती आहे त्याला बरोबर घेऊन सायकलने त्या विद्यार्थ्याच्या घरी जात. त्याला बरं नसेल तर विचारपूस करीत.तो जर आई वडिलांबरोबर लग्नाला किंवा फिरायला जाणार असेल तर सरळ त्याचं बखोट़ धरून सायकलवर बसवत आणि शाळेत आणत.

विद्यर्थ्यासाठी महत्वाची गोष्ट शिक्षण. लग्न, बाहेर भटकणं नंतर. यावर ते ठाम होते.

पुढे मी फक्त चार वर्षच काॅलेजला शिकवलं पण तेव्हा सरांची शिस्त आणि माऊलीपण या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि विद्यार्थ्यांशी वागले.

उपरे सरांना शतशः वंदन.

### मीनाक्षी वैद्य.