निराळी गुरुपौर्णिमा

Guru

" गुरु साक्षात परब्रह्म ... " , असे म्हटले गेले आहे.

लहानपणापासून आपण जे काही छोट्या- मोठ्या कडून शिकत आलेलो आहे , ते सगळेच आपले गुरु समान असतात.

जन्माला आल्यापासून आपण पहिल्यांदा आपल्या कुटुंबा‌मध्ये प्रत्येकाकडून काहींना काही शिकत असतो. 

आपले आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात. 

आजी- आजोबा, काका -काकी, मामा-मामी, मावशी- आत्या,  मोठे ताई- दादा हे सर्वच आपले गुरु समान आहेत.

जसे आपण शाळेत जायला लागलो तसे आपल्याला शिक्षणासाठी गुरु हे देवासारखेच लाभले. शिक्षणाचे ज्ञान गुरूनेच आपल्याला दान केले.

तसे तर प्राचीन काळापासून गुरु आणि शिष्या चं नातं सर्वोच्च मानले जाते. गुरुचे स्थान आपल्या आयुष्यामध्ये सर्वोच्च ठिकाणी आहे. 

मातीला जसा आकार नसतो पण कुंभार जेव्हा त्या मातीपासून सुंदर मडके, नवीन- नवीन वस्तू बनवायला घेतो तशा सुबक आकृती बनत जातात. तसेच आपले गुरुजन आपल्याला घडवत असतात.

सुरुवातीला आपण निराकार असतो पण जसे गुरुच्या छत्र छायेखाली येतो तसा आपल्या जिवनालाही आकार येत जातो.

शिक्षकांकडून ज्ञानरूपी झरा पिढी ने पिढी अखंड वाहत राहतो. जगात जर कोणी निस्वार्थीपणे ज्ञान देत असेल तर ते आपले गुरुच आहेत. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते सतत आपल्यासाठी तेवत राहतात. 

मेणबत्ती जशी शेवटच्या क्षणापर्यंत ती दुसऱ्यांना प्रकाश देत राहते. तसे आपले गुरू ही शेवटच्या क्षणापर्यंत दुसऱ्यांना ज्ञान देत राहतात. आपल्या आयुष्यात ही खरा ज्ञानाचा प्रकाश हा आपल्या गुरुने च दिलेला असतो.

मूकबधिर , आंधळा -बहिरा या लोकांसाठी तर त्यांचे गुरूच सर्वस्वी असतात. त्यांच्या खऱ्या आयुष्यात तर अंधारच असतो पण गुरुने त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानरूपी प्रकाश सतत भरलेला असतो. खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी गुरू हेच साक्षात परब्रह्म म्हणजे देवच आहेत.

' निसर्ग ' ही आपला खूप मोठा गुरु आहे.

आजूबाजूला जर आपण निरीक्षण केलं तर निसर्गाकडून ही शिकण्यासारखे खूप काही असते. 

पक्षी स्वतःचे घरटे स्वतः तयार करतात म्हणजे ते आपल्याला स्वावलंबी चे धडे देतात.

सकाळ झाली की पक्षी बाहेर पडतात व आपल्या पिलांच्या चाऱ्याची सोय करतात तसेच माणसाला सुद्धा नोकरी निमित्त बाहेर पडून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावे लागते.

लहानपणी आपण ' एकीचे बळ ' ही गोष्ट तर ऐकलीच असेल.

एका पारध्याने जाळे पसरून त्यामध्ये धान्य टाकून ठेवले होते व पक्षी अलगद त्याच्या जाळ्यात अडकले. पण त्या पक्षांचे पाय त्यामध्ये फसले. एका- एका पक्षाला उडता येईना तेव्हा त्यांनी सोबत उडायचे ठरवले व त्यामध्ये यशस्वी ही झाले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा एकीने राहायला हवे.

मुंग्यांची रांग पाहिली तर त्या आपल्याला शिस्तीचे धडे देतात.

रांगणारी लहान मुले सतत धडपडत उभे राहण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजेच ते आपल्याला शिकवत असतात की कितीही अपयश आले तरी आपले प्रयत्न करणे हेच आपल्या हातात असते.

सूर्य हा नित्याने उगवतो व मावळतो कसलाही आळस न करता म्हणजेच माणसाने सुद्धा आळस झटकून सतत आपले कार्य करत राहावे.

दिवसानंतर रात्र येते व रात्री नंतर दिवस येतो म्हणजेच आपल्याही आयुष्यामध्ये सुख आल्यानंतर दुःख येते व दुःखा नंतर सुख हे येणारच असते. त्यामुळे अति सुख आले तर हुरळून न जाता व दुःख आल्यानंतर निराश न होता आपण समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.

आयुष्यामध्ये रोज येणाऱ्या नव्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे. त्यामुळे आपण कधी हताश होऊन जरी बसलो तरी छोट्या -छोट्या गोष्टीतून ही आपण शिकून आपल्या मनाला उभारी देत असतो.

प्रत्येक मनुष्य हा आपल्या अनुभवातूनच शिकून पुढे जात असतो. त्यामुळे ' अनुभव ' ही आपला एक गुरु आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यामुळे लॅपटॉप, मोबाईल यांनाही आपण डिजिटल गुरू मानायला काही हरकत नाही.

आपल्या आयुष्यातील गुरुप्रती आपण नतमस्तक होतो पण निसर्ग हा ही आपला मोठा गुरु आहे. त्याच्यासाठी ही ‌आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

कळत - नकळत आपण छोट्या- मोठ्यांकडून सतत काही ना काही शिकत आलेलो आहोत, शिकत आहोत व शिकत राहणार आहोत. त्यामुळे सर्वांना मनापासून वंदन.

समाप्त.