गुरुने दिला ज्ञानरुपी वसा

गुरु आयुष्याचा मार्गदर्शक असतो.

आपलं भल आपल्यापेक्षा आपल्या गुरुंना जास्त समजत असते. आपण कोणत्या क्षेत्रात चालू शकतो. याची दूरदृष्टीकोन आपल्या गुरुंना लाभलेला असतो. माझ्या आयुष्यात मला अनेक गुरु लाभले. सर्वांकडून मला ज्ञानाचे अमृत मिळाले. त्यापैकी मला चौथीत असताना मरळ सर होते. ते आमच्याकडून पाढे पाठ करुन घ्यायचे. ते केले नाहीत तर वर्गाबाहेर जोपर्यंत पाढे पाठ होत नाहीत तोपर्यंत उन्हात उभे राहून पाढे पाठ करायचे. ते पाठ झाल्यवर वर्गात आल्यावर म्हणून दाखवायचे. नंतर वर्गात बसण्याला परवानगी असायची. हि शिक्षा मला झाली होती. मला २३ चा पाढा पाठ करायला सांगितला. माझा तो पाठ नव्हता. शेवटी पाढा पाठ झाल्यावर वर्गात आले. यामुळे फायदा असा झाला गणिताची विशेष प्राविण्य परीक्षा असायची यात मी चांगल्या गुणांनी पास झाले. तेव्हा सोसाव लगलेल्या उन्हात जर असे यश मिळणार असेल तर त्याआधीच पाढे पाठ करायला हवे होते. हे जरा उशीराच समजले. 

नंतर पाचवी ते दहावी शाळा बदलावी लागली. दहावीतला एक अनुभव सांगते. मला इंग्रजी आणि बीजगणिताची थोडी भीती वाटायची. त्याकरता क्लास देखील लावले होते. पण खरी गंमत अशी असायची. क्लासमध्ये घेतल्या जाणा-या परीक्षेत मी पास होत असायचे. पण शाळेतल्या परीक्षेत नापास होत असायचे. घरी सगळ्यांना टेन्शन आले होते. कस होणार माझे. दहावीला प्रिलिम पेपरच्या वेळी तसच काहीस घडल. मी नापास झाले. माझ्यामुळे शाळेची गुणवत्ता ढासळता कामा नये. म्हणून आई- वडिलांना बोलवण्यात आले. दोघेही घाबरले होते. त्यांनी क्लास मध्ये येवून शाळेत घडलेली परीस्थिती सांगितली. जर मी पास होणार असेल तरच फाॅर्म भरायला लावला होता.
क्लासच्या पवार सरांना माझ्यावर विश्वास होता. त्यांनी आई- वडिलांना सांगितले. तुम्ही भरायला सांगा फाॅर्म मी हिच्याकडून बीजगणित आणि इंग्रजी च नाही तर सर्व विषयांची तयारी करुन घेतो. तुम्ही निश्चिंत रहा. माझी उत्तम तयारी करुन घेतली. आणि मी दहावीला पास झाले. आनंदी आनंद झाला. पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे हे देखील सरांनाच विचारले. सरांना मी बोलले, सर मला आर्ट साईडला जायचे. सर बोलले तू काॅमर्स साईडला चांगली चालशील.
आणि बघा सरांनी त्यावेळी घेतलेला निर्णय मोलाचा ठरला. माझ शिक्षण ऐकताच सर्वजण दोन मिनिट माझ्याकडे पाहत बसतात. तू खरच एवढी शिकली . कसे काय??? माझ्या या शिक्षणावर आई-वडिलांना देखील विश्वास बसत नाही. आणि खर सांगायच तर मला पण. कारण मी दहावीत असतानाच आपण नापास झालो तर...., लोक काय म्हणतील या विचाराने नैराश्यात झुकले होते. अखेर क्लासच्या सरांनी ते नैराश्य दूर करण्यात मोलाची कामगिरी बजवली.
माझ शिक्षण मी गर्व नाही पण अभिमान वाटतो खरच आपण कसे काय एवढो शिकलो याचा. मी एम. काॅम, एम. बी. ए ( फायनान्स), जी. डि.सी.ए, पी. जी. डि. बी. एम केले आहे.
मला आयुष्याच्या टप्प्यावर भेटलेल्या या गुरुवर्यांची मी अत्यंत ऋणी आहे. ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यातल्या मीला अचूक ओळखून योग्य मार्गदर्शन केले. खरच आयुष्याला लाभलेले हे सोनेरी कवच म्हणाव लागेल. ज्यांनी ज्ञान दिले आणि ते अमलात आणून त्या मार्गावर चालत राहिलो जीवनाचे इथेच सार्थक झाले.