गुरू एक कल्पतरू

About Guru


गुरू एक कल्पतरू


\"गुरू ब्रम्ह गुरू विष्णू ,गुरू देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रह्म , तस्मै श्री गुरूवे नमः\"

खरचं गुरू म्हणजे साक्षात परमेश्वरच!

\"गुरू\" या शब्दातचं किती सामर्थ्य आहे. जीवनातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखविणारा म्हणजे गुरू!
गुरू म्हणजे जीवनाला गती देणारे बळ ! जीवनाला आकार व आधार देणारा म्हणजे गुरूच!

आपल्या आयुष्यातील पहिला गुरू म्हणजे आपली आई. आई शिकलेली असो किंवा नसो, ती आपल्या मुलांना अनेक गोष्टी शिकवित असते. खाणेपिणे, बोलणे,चालणे या सर्व गोष्टींबरोबरच आपल्या मुलांना त्यांच्या चुका लक्षात आणून योग्य रस्ता दाखवित असते. म्हणूनच म्हटले जाते,

\" आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू . \"

आई नंतर आपले गुरू असतात ते आपले वडील. त्यांना आपल्या कामातून वेळ मिळेल तसा ते आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवित असतात. कधी अभ्यासाविषयी,कधी खेळांविषयी तर कधी जीवनातील छोट्या मोठ्या समस्येविषयी मार्गदर्शन करीत असतात.

शाळेतील शिक्षक आपल्याला शिक्षणाचे धडे देत असतात. आपल्याला लिहायला ,वाचायला शिकवतात. अनेक विषयांचे ज्ञान देत असतात. शिक्षणाबरोबरच चांगल्या गोष्टी सांगत असतात, मार्गदर्शन करत असतात, ज्यामुळे आपल्या आयुष्याला चांगला आकार व दिशा मिळत असते.

खरोखरचं
\" गुरूविन न मिळे ज्ञान , ज्ञानविण न होई जगी सन्मान.\"

असे म्हटले गेले ते योग्यच आहे.

आई- वडील, शिक्षक हे आपले गुरू असतातच पण जीवनात आपल्याला अनेक वेगवेगळ्या रूपात गुरू भेटत असतात.
छान छान आणि छोट्या छोट्या गोष्टीतून जीवनाचा अर्थ सांगणारे आजी- आजोबा. अभ्यास, खेळ तसेच अनेक गोष्टीत मदत करणारे आपले बहीण- भाऊ हे ही आपले गुरूच!

वेळोवेळी अडचणीत मदत करणारे, आपण चुकत असल्यास मार्गदर्शन करणारे, सुखाबरोबर दुःखाचेही वाटेकरी होणारे, सल्ला देणारे आपले मित्रमैत्रिणी हे ही गुरूचेच रूप!

आवश्यकता असेल तेव्हा सल्ला देणारे,मदत करणारे आपले काका,मामा,मावशी इ. नातेवाईक यांच्यातही आपल्याला गुरू भेटतो.

स्वयंपाकातील टिप्स देणाऱ्या, संसार कसा करावा हे समजून सांगणाऱ्या अनुभवी स्त्रिया या नववधूसाठी गुरूच ठरतात.

संसार,नाते कसे जपावे हे शिकवणारी बायको नवऱ्याची गुरू असते आणि बाहेरील जगाशी कसा सामना करायचा हे शिकविणारा नवरा हा बायकोचा गुरूच!

आईवडील मुलांचे जसे गुरू असतात तसेच मुलेही आईवडिलांना अनेक गोष्टी शिकवत असतात. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात तर आईवडिलांना मुलांकडून शिकायला मिळते.
आता तर गूगल वर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत असतात त्यामुळे गूगललाही गुरूचे स्थान मिळाले आहे.

नोकरीच्या ठिकाणी काम करता करता सहकाऱ्यांकडून खूप काही शिकायला मिळते.
व्यवसाय करताना देखील त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिंचे मार्गदर्शन घेणे जरूरीचे असते.

जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूची गरज असतेच.

\"गुरूविना कोण दाखवील वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगरघाट \"

आपल्या जवळ कितीही ज्ञान असले तरी गुरू मार्गदर्शनाची गरज असतेच.


गुरू म्हटले म्हणजे लोकांना प्रथम आठवते ते आध्यात्म. समाजात अनेक लोक दिसतात की जे गुरू करतात . म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तीकडून गुरूमंत्र घेतात, दीक्षा घेतात. त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आचरण करतात.

भारतात आध्यात्माचे खूप महत्त्व आहे आणि लोकांची त्यात खूप श्रद्धा, भक्ती असते.त्यामुळे अनेक आध्यात्मिक गुरू आणि त्यांचा शिष्यवर्ग ही असतो.
सर्व शिष्यवर्गाची धारणा असते की, गुरूंमुळे त्यांच्या जीवनात सुख समाधान मिळते.
म्हणूनच त्यांना वाटत असते.

\" सबसे बडा गुरू
गुरूसे बडा गुरू का ध्यास.\"

भारतीय संस्कृतीत गुरूंना खूप महत्त्वाचे स्थान आहे. गुरू म्हणजे देवस्वरूप हीच सर्वांची भावना असते.

देवादिकांनी, ऋषीमुनींनी, साधुसंतांनी ,थोर महापुरूषांनी गुरू केले आणि त्यांनी आपल्या कार्यातून जीवन सफल केले.
गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठी \"गुरूपौर्णिमा\" व \"शिक्षक दिन\" साजरा केला जातो.

कोणतेही क्षेत्र असो - साहित्य, क्रीडा, कला ,विज्ञान, राजकारण इ. आपले करिअर घडविण्यासाठी प्रत्येकाला गुरूची ,मार्गदर्शकाची गरज असतेच.
गुरूच्या छत्रछायेत शिष्य सर्व गुणसंपन्न बनत असतो. गुरू आपल्या पाठीशी आहे या भावनेने देखील शिष्याला लढण्याचे,शिकण्याचे आणि यशस्वी होण्याचे बळ मिळत राहते.
म्हणूनच शिष्याला वाटत असते,

\"गुरू तू जगाची माऊली,जणू सुखाची सावली.\"

सकारात्मक भावनेतून गुरू भेटत असतो ,आपण गुरू करत असतो ,मानत असतो पण कधी नकारात्मक भावना असते तेथेही गुरू मिळत असतो.
स्पर्धेतील आपला प्रतिस्पर्धीही कळत नकळत आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो. आपल्यावर टिका करणारे, आपली निंदा करणारे लोकही अप्रत्यक्षपणे आपल्याला शिकवतातच ना !
आपल्या कामांना चांगला प्रतिसाद देणारे आपल्याला आनंद देतातच पण नकारात्मक प्रतिसाद देणारेही आपल्याला आपले काम अजून जोमाने,अजून चांगल्या पद्धतीने करण्याचे बळ देतात.फक्त आपण त्यांच्या प्रतिसादामुळे निराश न होता त्यातून काही तरी चांगले शिकले पाहिजे. तेव्हाच \"निंदकाचे घर असावे शेजारी\" ही म्हण सार्थक ठरते.
\"ग्रंथ हेचं गुरू \" असेही म्हटले जाते. कारण ग्रंथ वाचून ,पुस्तक वाचूनही जगण्याला दिशा मिळत असते.
\"अनुभव हा मोठा गुरू असतो.\" हे ही खरेचं आहे म्हणा. कारण जीवन जगत असताना आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात. त्यातून जे अनुभव येत असतात त्यातून काहीतरी शिकूनच आपण पुढचे निर्णय घेत असतो.

\"गुरू म्हणजे कोणी एक व्यक्ती\" असे सर्वांना वाटत असते. फक्त एखादी व्यक्तीच गुरू असू शकते असे नाही. तर आपल्या आजूबाजूचा निसर्ग, झाडेझुडपे,डोंगरदऱ्या,
नद्या, पर्वत, समुद्र, पशुपक्षी, आकाशातील सूर्य ,तारे ही सर्व जीवसृष्टी आपल्याला काहीतरी शिकवित असते.
नित्यनेमाने उगवणारा,मावळणारा सूर्य, अविरत फिरणारी आपली पृथ्वी, सतत वाहणाऱ्या नद्या, मानवाने आपले कितीही नुकसान केले तरी मानवाला ऑक्सिजन, फळ,फुले,अन्न देवून मानवाला जिंवत ठेवणारी झाडे झुडपे, मानवाला विविध कामांमध्ये मदत करणारे पशुपक्षी हे ही सर्व गुरूसमानच!
दत्तगुरुंनी केलेल्या 24 गुरुंमुळे हे सिद्ध होते.

दत्तगुरू म्हणजे साक्षात परमेश्वर! पण त्यांनीही गुरू केले. म्हणूनच गुरूचा महिमा अगाध आहे.
जीवन चांगले जगण्यासाठी व आयुष्यरुपी भवसिंधू पार करण्यासाठी सर्वांच्या आयुष्यात गुरू पाहिजेच.

गुरू हा प्रेमाचा आगर,सुखाचा सागर ।
गुरू हा जीवनाचा आधार, करतो जीवनाचा उद्धार ।।