गुरूविना कोण दाखवील वाट

Guru vina koan Dakhvil vat


"आशा मॅडम, ऊद्या गुरुपौर्णिमा त्या निमित्ताने समाजकल्याण मंडळात तुम्हांला प्रमुख पाहुणे म्हणून यायचे आहे. नाही, हो काही माहिती नाही. तुम्ही खूप व्यस्त असता हे देखिल माहीत आहे. तरी पण आमच्या छोट्या विनंतीला मान देऊन यावे ही आग्रहाची विनंती. शुभा फोनवर बोलत होती. 

 आशाला हो, नाहीचा काहीचं निर्णय  शुभाने घेऊ दिला नाही.आशा शेवटी हो म्हणाली .

 तसे दुसऱ्या दिवशी ती खूप बिझी होती. पण शुभाची प्रेमळ विनंतीही तिला डावलता आली नाही. 

  ठरल्याप्रमाणे आशा समाज कल्याण मंडळात प्रमुख पाहुणे म्हणून गेली. पण भाषणाची वेळ आली तेंव्हा मात्र पुरती बावरून गेली. 

  विषय तसा कठीणचं तिच्या वाट्याला आलेला "गुरू विना कोण दाखवील वाट." 

 काय बोलणार या विषयावर तिची तयारी पण नव्हती अनुभव म्हणावं तर, आईपण तिच्या वाट्याला आले नव्हते.

  काय बोलणार आपण तिच्या मनात विचार चालू असताना 
 संचालकांनी तिचे नाव पुकारले.

  आशाने स्पिकर हातात घेतला. तिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.  

   मी काय  बोलणार ? पण माझ्या आयुष्यात घडलेली माझीचं आत्मकथा मी तुमच्यासमोर मांडते. तिने बोलायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यात आलेले कठीण प्रसंगच मी तुमच्या समोर मांडते. तेंव्हा ऐकाच!.त्यावर मी कथानक बनवले आहे.

  यातून कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही आणि या कथेतील काही प्रसंग तुमच्या आयुष्यात मिळते जुळते असेल तर तो योगायोग समजावा. 

आता ही एक कथाचं मी तुमच्या समोर मांडते म्हणत आशाने बोलायला सुरुवात केली. 
  
  " आई निघते मी तुझा विचार झाल्यावर कळव मी वाट पहात आहे."

 " अग असा राग डोक्यात नको घालू आशा. या रागाने फायदा काय तो होणार. घर म्हणलं की भांड्याला भांडे ते लागणारचं."

   " हो भांड्याला भांडे लागणारचं. पण भांड्याला तडे चालले की वेळीचं भांड्याची जागा बदलावी आई." माय लेकींचा संवाद एक वेगळेचं वळण घेत होता.

  आशा आज वय वर्षे चाळीस अविवाहित. कोवळ्या वयात पूर्ण कुटुंबाची जबाबदारी कोवळ्या खांद्यावर तिनेचं पेलली.

  जबाबदारी पेलताना दुखले तिचे खांदे. पण होतील बरे, भक्कम आधार आहेत माझी भांवडे अशी मनाची समजूत घालत आज ती इथवर पोहचली होती.

  वयाच्या सोहळ्या वर्षीचं डोक्यावरचं छत्र हरवलेले. अचानक बाबांचे जाणं तिला एकदम मोठं करून गेले.

   सकाळी कामावर गेलेले बाबा घराचा कायमचा निरोप घेऊनचं गेले. आई निःशब्द.
दोन भांवडे भाऊ चौदा वर्षांचा तर त्याच्या पाठची बहिण अवघी नऊ वर्षांची.

  घरावर आकाश कोसळले. पहिले तीन - चार दिवस सगेसोयरे दु:खात सहभागी झाले. हळूहळू ते त्यांचे रंग दाखवायला लागले. फुकटचे सल्ले देऊ लागले.

   भाऊबंदकी इस्टेटीच्या गोष्टी करू लागले. तर नातेवाईक कोवळ्या वयाच्या आशाच्या लग्नावर पण पोहचले.

  एकाने तर बाबांच्या जागेवर मलाचं चिटकवून द्या याची पण गळ घातली कारण ती जागा फुकट जाईल म्हणून.

  आता हे आता हे सगळे अती होतयं याचे पडसाद आशाच्या बालमनावर उमटले..

  वय लहान पण उमेदीने ऊभी राहिली. नुकतीच तिची बारावीची परीक्षा पार पडली होती. खुप शिकायचे होते तिला.

       बाबांचे पण तेचं स्वप्न होतं. पण आता आपण शिकत बसलो तर मागच्यांचे काय ?घर कसं चालणार ? आता छोटी मोठी नोकरी करणे हिताचे म्हणून तिने शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पत्करली.

   कदाचित आपले शिक्षण आपण पुढे पाहू आशाच्या आशा पल्लवित होण्याआधीच तिनेचं खुंटून टाकल्या.

 ती  नोकरी मिळवण्यासाठी एकदा बाबांच्या आॉफीसमध्ये गेली.तिथे बारावीच्या बेसिसवर नकार मिळाला.

मग तिने ठरवलं आपले राहूदे, आपण छोटी , मोठी नोकरी करू आपल्या भावंडांचे शिक्षण पूर्ण करूया. जर शिरीष चांगला शिकला तर बाबांच्या आॉफीस मध्ये चांगल्या हुद्द्यावर लागेल. ही आशा तिच्या मनात पल्लवीत झाली. 

   बघता, बघता धाकटा शिरीष पण बारावी झाला. धाकटी स्नेहा दहावीत पाठोपाठ आलीच.

  आशा नोकरी करत घर सांभाळत होती. दोघांचे शिक्षण, फी, क्लास, त्यांची हौसमौज सगळे कसे व्यवस्थित करत होती.

    सगळ्यांचे सगळे व्यवस्थित चालले होते. "कालाय तस्मै" दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले. शिरीषला बाबांच्या आॉफीसमध्ये नोकरी मिळाली.

  छोटी स्नेहा पण वाणिज्य शाखेची पदवीधर झाली. बॅंकेच्या परीक्षा देऊन बॅकेंत चांगल्या पगारावर लागली. सगळे हळूहळू मार्गस्थ झाले.

     ताई - ताई  करणे आता दोघांचेही थोडे कमी झाले. आशाचे वय वाढले तर दोघे वयात आले.
.
   आता आईच्या डोक्यात दोघांच्या लग्नाचे वारे फिरू लागले. आशा आईच्या खिजगणतीतही नव्हती. ती फक्त घरात पैसे आणणारी मशीन झाली होती.

   आवड निवड तिलाही होती. पण ताईला काय काहीही चालते. हे लेबल तिच्या कपाळावर चिकटलेले त्यामुळे तिची आवड पण अडगळीत पडली होती.

    तिलाही एका ठराविक वयात लग्न करावे वाटले. पण जबाबदारीने तिचे पाय मागे खेचले. आईने एकदा दोनदा विषय काढला पण. आशा आपल्या मतावर ठाम होती.

      आशाचे वय वाढले. स्नेहा लग्नाची झाली. ती हुशार होती बॅंक बॅलन्स चांगली सांभाळून होती. बॅंकतल्या कलीग बरोबर तिने सुत जुळवले. एके दिवशी आईच्या पाया पडायला जावयालाचं घेऊन आली.

   परवानगी देणं भागच होते. मोजक्याचं लोकात स्नेहाच्या लग्नाचा बार उडवून दिला.

   लग्नात आडून ऐकायला आलेचं. आशामुळे स्नेहाच्या लग्नाला उशीर झाला. शेवटी तिला हा मार्ग पत्करावा लागला. शेवटी खापर आशावरचं फुटले.

    नंतर शिरीषची डाळ वेगळीच शिजत होती. आॉफीस मधील मुलीबरोबर चिरंजीव मौजमजा मारत होते. पैसा सगळा संपत होता.

महिन्याच्या शेवटी आईकडे पैसे मागायचा. आई मागच्या हाताचे साठवलेले देत होती. उद्या परत करतो म्हणायचा पण ऊद्या काही त्याचा उगवायचा नाही.

   अचानक एके दिवशी चिरंजीव रात्री घरी आलेच नाहीत. आशाने फोन केला. आवाज जरा वेगळा वाटला. प्रकरण जरा गंभीर वाटले.

   आईला त्रास नको म्हणून आशाने तिला खोटे कारण सांगितले. शिरिषला  आॉफीस मध्ये काम आहे. थांबेल नाईटलाही.

  दुसऱ्या दिवशी जोडीला पार्सल घेऊन चिरंजीव घरी आले. कोणी काही न सांगता सगळे समजले.

    पदरी पडले पवित्र झाले. सामावून घेणे क्रमप्राप्त होते. आशाची जबाबदारी कमी न होता वाढलीच. कारण ' नाका पेक्षा मोती जड ' होऊ लागला.

   नव्याचे नऊ दिवस संपले. आशाची अडचण आता दोघांनाही म्हणजेचं भाऊ भावजयीला जाणवू लागली. कारण आता तिची गरज आता संपली होती.

 या न् त्या कारणाने आता घरात खटके उडत होते. तशी ती आणि आई  त्यांच्यावर अवलंबून नव्हते.

 आजपर्यंतचा आशाचा त्याग कोणाच्याच खिजगणतीतही नव्हता. तिच्या आशा आशाचं राहिल्या.आज जरा घरात भांडी जास्तचं खणखणली. शब्दांने शब्द वाढला.

   शिरीष पटकन आशाला बोलून गेला. तू घरात असतेस त्यामुळे आम्हाला अडचण होते.  

  आई आज पहिल्यांदाच बोलली, " काय बोलतोस? जिभेला काही हाड आहे का तुझ्या ?अरे वयाच्या सोळाव्या वर्षीचं या पोरीनं तुमच्यासाठी स्वतःहाच्या आयुष्याचं बलिदान दिले.

  आपले सगळे सुख, चैन बंदिस्त करून टाकली. फक्त तुमचं सुख बघितले. तिची आता तुम्हाला अडचण होते ? आज तिने तिचं सुखचं बघितले असते तर ,कळले असते तुम्हाला.

   पदोपदी ठेचा लागायला हव्या होत्या तुम्हाला पण जपलं तिने तुम्हाला.जीभ कशी चाचरत नाही बोलताना. दोन दिवस झाले. बायको आली.लागला तिच्या ओंजळीने पाणी प्यायला.

   अडचण होते ना मग दुसरं घर बघा.ते ही स्वतःच्या हिमतीवर. आशा इथून कोठेही जाणार नाही. हे घर माझे आहे आणि शेवटपर्यंत माझेचं राहणार. दोघेही आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर व्हा."

    आईने आशा अडवले. "आशा मला माफ कर, मी खरंच चांगली आई नाही का ग ? माझेचं दु:ख मी कुरवाळत बसले. त्या आगीत फक्त तू एकटीचं होरपळीस. हे माझ्या लक्षात आलेचं नाही. तू कुठेही जाणार नाहीस."

   " नाही आई आता जिथे आपली गरज संपलेली असते. तिथे जास्त  थांबणे हिताचे नसते आणि हो तू चांगली आई नाहीस हे तू कसे ठरवलेस? आशा म्हणाली.

   तू चांगली आई होतीस तुझे संस्कार चांगले होते. म्हणून तर  माझा धोक्याच्या वयात पाय न घसरता जबाबदारीने मजबूत झाला. आशाने आईचा हात धरून आईच्या संस्काराचा पाया मजबूत आहे दाखवून दिले.

    शेवटी आई कोणतीच आई वाईट नसते ग फक्त तिचं प्रेम आंधळे असते." असे म्हणत आशाने आईला घट्ट मिठी मारली.

   आई परत  परत म्हणत होती." मी चांगली आई नाही ग. तुझ्या सुखाचा मी कधी विचारचं नाही केला ग." आशा मात्र परत परत आईची समजूत घालत होती.

  शेवटी आई आपला पहिला गुरू असते, ती अगदी गर्भातचं आपल्या गर्भावर चांगले संस्कार करत असते.
चांगल्या संस्काराचे बीज आपल्या शिष्यात रूजवते. पण काही शिष्य गर्भातचं झालेले संस्काराचे बीज शरीरात रूजून घेतात.

 तर काही त्याचं गर्भातून जन्मलेले शिष्य, त्या संस्काराचे स्तोम माजवून, भांडवल करून, तापत्या तव्यावर आपली भाकरी भाजून घेतात आणि संस्काराचे बीज रूजवण्यापेक्षा कुजवून टाकतात.जसे शिरीष आणि स्नेहा!..

 आई किंवा वडील कोणाचेचं वाईट नसतात. फक्त बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे. उगाचं नाही म्हटलं आई आपला पहिला गुरू असतो. शेवटी गुरूविना कोण दाखविल वाट व त्याची गुरूदक्षिणा देणं आपले आद्य कर्तव्य मी केले यात माझं काय चुकलं?.. 
  
  श्रोत्यांचे डोळे देखील  पाणावले. हुंदका घेत आशाने आपले भाषण संपवले आणि ती आसनस्थ झाली. 
   

© ® सौ. ऊज्वला रवींद्र राहणे