Login

गुरू आणि शिष्य

About Gurupournima


गुरू आणि शिष्य


" डॉ. संजय, या आठवड्यात ज्या पेशंटची सर्जरी होणार आहे. त्यांची लिस्ट दाखवा. "

डॉ. संजय - " यस् सर , देतो मी लिस्ट ."

लिस्ट हातात येताच पेशंटची नाव बघता बघता एका नावावर डॉ. रामची नजर बराच वेळ टिकून होती . ते नाव डोळ्यासमोर येताच त्यांना एक विलक्षण आनंद झाला. त्या नावाचा आपल्या आयुष्याशी खूप जवळचा संबंध आहे . असे त्यांना वाटत होते.या नावाचे आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे आणि हे नाव वाचताच त्या व्यक्तीची आठवण येते. आज आपण जे काही आहोत त्या व्यक्तीमुळेच!

पण एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात. कदाचीत ती व्यक्ती नसावी. असे ही त्यांच्या मनात आले.

लिस्ट डॉ. संजयला देवून ते जाण्यास निघाले होते. पण त्यांच्या मनात काहीतरी आले आणि डॉ. संजयला म्हणाले " मला या पेशंटला भेटायचे आहे ."

डॉ. संजय त्यांना त्या रूममध्ये घेऊन गेले जिथे त्या पेशंटला ऍडमिट केले होते.

समोरची व्यक्ती पाहून डॉ. रामचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
काय करावे? काय बोलावे? हेच सूचत नव्हते.
फक्त डोळ्यातून अश्रू येत होते.
त्या व्यक्तीला पाहताच डॉ. रामला आपला भूतकाळ आठवला.


वडिलांना चांगल्या पगाराची नोकरी असल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती चांगली होती. चार भावातील सर्वात लहान भाऊ ... राम. शेंडेंफळ असल्याने जरा जास्तच लाडावलेला! बुद्धीनेही हुशार त्यामुळे वर्गात नेहमी पहिला ..
राम हुशार होता पण वागण्या बोलण्यात आपल्या इतर भावांसारखा नव्हता. बोलण्यात उद्वट, कोणाचेही न ऐकणारा,मनाप्रमाणे वागणारा. वर्गात इतर मुलांच्या खोड्या काढणारा.

आई वडील आणि भावांनी त्याला अनेकदा समजावून सांगितले. पण त्याच्यात काहीही फरक पडत नव्हता. रामचे वागणे घरात कोणालाही आवडत नव्हते. वर्गातही इतर विद्यार्थी शिक्षकांकडे त्याची तक्रार करायचे.

राममध्ये सुधारणा होण्याऐवजी त्याला अजून वाईट सवयी लागल्या. त्याला वाटायचे \"आपण हुशार आहोत त्यामुळे आपल्याला जास्त अभ्यास करायची गरज नाही. आपण आयुष्यात फक्त मजा करू. आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगू.\"

आणि तो तसाच वागत राहिला.

त्याच्या जास्तीच्या आत्मविश्वासामुळे आणि नको त्या गोष्टींत जास्त वेळ दिल्याने अभ्यासात दुर्लक्ष होऊ लागले. परिक्षेत कमी गुण मिळाले. वर्गात पहिला येणारा विद्यार्थी पहिल्या 10 नंबरमध्येही आला नव्हता.

आईवडिलांना, भावांना त्याची काळजी वाटू लागली.सर्वांनी त्याला आपआपल्या परीने समजावून सांगितले पण त्याच्यात काहीच फरक पडत नव्हता.

\" राम हा हुशार विद्यार्थी आहे. त्याची हुशारी, त्याचे आयुष्य त्याच्या वाईट सवयींमुळे वाया जात आहे.\" हे रामच्या वर्गशिक्षक असलेल्या प्रकाश वाघ सरांनी ओळखले होते. ते त्याला अधूनमधून समजावितही होते ,जाणीव करून देत होते.पण सर्व प्रयत्न निष्फळच!

शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी एक मार्ग शोधला.

त्यांनी रामला गावातील गरीबवस्ती दाखवली. तेथील लोकांची परिस्थिती दाखवली. ते लोक कसे आयुष्य जगतात? ते दाखवले.

ते सर्व दाखवताना सांगत ही होते.

"राम, या लोकांना तुझ्यासारख्या सर्व सुखसुविधा नाही. त्यांच्या मुलांना तुझ्या प्रमाणे सर्व गोष्टी भेटत नाही.

तुझ्या आयुष्यात आणि यांच्या आयुष्यात किती फरक आहे ?

देवाच्या कृपेने किंवा तुझे भाग्य म्हणं तुला आई वडील, भाऊ सर्व चांगले भेटले आहेत. तुला हवे ते सर्व भेटत आहे. पण तुला त्याची जाणीव नाही.

या लोकांसारखा तुझ्या आयुष्यात संघर्ष नाही. या लोकांना तर प्राथमिक गरजांसाठी ही संघर्ष करावा लागतो.

तू हुशार आहे. त्या हुशारीचा काहीतरी चांगला उपयोग कर. चांगले शिक्षण घे आणि आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखव जेणेकरून आईवडिलांना, भावांना आणि आम्हां सर्वांना देखील तुझा अभिमान वाटेल .

पण तू तुझ्याच पद्धतीने वागत राहिलास तर तुझे आयुष्य वाया जाणार . घरातील व्यक्तींना तर वाईट वाटणार पण पुढे जाऊन तू समाजासाठी देखील त्रासदायक ठरशील.

आता तूच ठरव तुला काय करायचे ? आम्ही सर्व तुला फक्त मार्ग दाखवित आहोत .
आता तुझी इच्छा तुला कोणत्या मार्गावर चालायचे ते ? "

सरांचे बोलणे आणि त्यांनी दाखवलेली परिस्थिती यामुळे राम गोंधळून गेला. आतापर्यंत त्याने आयुष्याकडे एवढे सिरियसली पाहिलेच नव्हते.
गरिबी काय असते? हे त्याला माहित नव्हते. काय बोलावे? हे सूचत नसल्याने तो काहीही न बोलता सरांचा निरोप घेऊन घरी गेला.

घरी आल्यानंतर त्याला सरांचे बोलणे आठवत होते.

मन सांगायचे आपल्या पद्धतीने जीवन जग .
तर लगेच सरांचे बोलणे आठवून काहीतरी चांगले करून दाखवायचे असे ही वाटायचे.

दोन दिवसांनी गुरूपौर्णिमा होती. वर्गात सर्व विद्यार्थ्यांनी सरांना नमस्कार केला. कोणी फुले ,कोणी शुभेच्छापत्रे,तर कोणी भेटवस्तू दिली. सरांनीही सर्वांना आशिर्वाद देत शुभेच्छा दिल्या.

रामनेही सरांना आपल्या बागेतील गुलाबाचे फूल दिले आणि एक चिट्ठी दिली. सरांनी रामलाही आशिर्वाद दिला.

त्याने दिलेली चिट्ठी वाचून सरांना इतका आनंद झाला की त्यांच्या डोळ्यात पाणी आले.



डॉ. रामच्या डोळ्यातील अश्रू पाहून डॉ. संजयने विचारले " सर, काय झाले? तुमच्या डोळ्यात पाणी? आणि या पेशंटशी आपला काय संबंध? "

डॉ. राम - " ज्या व्यक्तीमुळे माझ्या जीवनाला दिशा मिळाली, एक वाया जात असलेला मुलगा नामांकित डॉक्टर झाला तो या व्यक्तीमुळेच ...हे माझे गुरू ....हे माझे सर... प्रकाश वाघ सर.

सरांमुळेच मी वाईट मार्गाला जाण्यापासून थांबलो आणि चांगल्या मार्गाला लागलो.

शाळा सोडल्यानंतर इतक्या वर्षांनी सर मला भेटत आहे.

वडिलांची बदली झाल्याने आम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी गेलो आणि पुढील शिक्षणासाठी मीही मोठ्या शहरात जात राहिलो.त्यामुळे सरांशी कधी संपर्क झालाच नाही.

मी त्यांचा पत्ता, फोन नंबर मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांची ही बदली होऊन ते दुसऱ्या गावी गेले त्यामुळे आमची भेट कधी झालीच नाही.

पण मला त्यांची नेहमी आठवण येत राहिली. प्रत्येक गुरूपौर्णिमेच्या दिवशी मी मनाने त्यांना नमस्कार करतो. वंदन करतो. "


सरांना झोपेतून उठवावे आणि त्यांच्याशी खूप बोलावे असे डॉ. रामला वाटत होते. पण आता त्यांना आपली ओळख द्यायची नाही. त्यांचे ऑपरेशन झाले की मग सांगू

या विचाराने सरांना न उठवताच रूममधून दोघेही बाहेर गेले.


डॉ. रामने आपल्या सरांचे ऑपरेशन व्यवस्थित केले आणि सरांना त्यांच्या रूममध्ये भेटायला गेल्यानंतर आपली ओळख सांगितली.

तेव्हाचा राम आणि आताचा राम यात खूप फरक होता त्यामुळे सर ओळखू शकले नव्हते.

सरांना भेटून रामला जसा आनंद झाला तसाच सरांनाही रामला भेटून खूप आनंद झाला.

त्या दिवशी गुरूपौर्णिमेच्या दिवशी चिट्ठीत लिहील्याप्रमाणे रामने करून दाखविले होते. तो एक उत्तम हार्ट सर्जन झाला होता आणि स्वतः च्या हॉस्पिटलमध्ये गरीबांसाठी माफक दरात तर कधी फ्री मध्ये सर्जरी करीत होता तसेच गरीब लोकांसाठी संस्थाही चालवित होता.

आपण समजावून सांगितले आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला होता यामुळे सरांना खूप समाधान वाटले.

आश्चर्य म्हणजे गुरूशिष्य पुन्हा भेटले तो दिवस होता गुरूपौर्णिमेचा!
दर गुरूपौर्णिमेला मनाने आपल्या सरांचे ,आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांचे पूजन करणारा त्यांचा शिष्य राम प्रत्यक्षात आपल्या गुरुंचे वंदन करत होता. पूजन करत होता.

गुरू आणि शिष्य दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान होते व डोळ्यात आनंदाचे अश्रू होते.