Feb 24, 2024
ऐतिहासिक

गुप्तहेर जना - उपसंहार

Read Later
गुप्तहेर जना - उपसंहार

~ उपसंहार ~

         पुरंदरच्या पायथ्याला नानांनी सुंदऱ्याला गडावर खबर देण्यासाठी पाठवलं. त्यानुसार, रात्री फतेहखानाचा मराठा सरदार बाळाजी हैबतराव सुभानमंगळवर (शिरवळचा भुईकोट किल्ला) हल्ला करणार होता. राजांनी सुभानमंगळवर हारकारा पाठवून सावध राहण्यासाठी सांगितलं. आणि जास्त प्रतिकार न करता गड सोडून देऊन पुरंदरावर येण्यासाठी बजावलं. नानांच्या माहितीनुसार बालाजी हैबतरावाने सुभानमंगळवर हल्ला केला. मावळ्यांनी काहीसा प्रतिकार केला आणि नंतर माघार घेऊन राजांच्या सांगाव्याप्रमाणे पुरंदर गाठला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या प्रहरी कावजी मल्हार (हे बाजी पासलकर यांचेकडे खाकणीस या पदावर काम पाहत होते.) यांनी दीड हजार मावळ्यांसमवेत सुभानमंगळवर हल्ला चढवला. बालाजी हैबतरावास भाला फेकून मारले आणि सुभानमंगळ सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

      मराठ्यांचा पाठलाग करत फत्तेखानचा सरदार मुसेखान पुरंदरच्या पायथ्याला पोहोचला. त्याने पुरंदरावर हल्ला केला. मागून फतेहखानाही पाच हजारांचे सैन्य घेऊन आला. पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. गोदाजी जगताप, भिकाजी चोर, वाघ, घाटगे, इंगळे यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला.

        मुसेखान आणि इतर सरदार पडताच. त्याचं उरलं सुरलं सैन्य माघारी पळत सुटलं. गडावरून बाजी पासलकर, बाजी जेधे त्यांच्या पथकासमवेत पळणाऱ्या सैनिकांच्या पाठलागावर गेलं. ते पाहताच खाली छावणी टाकून बसलेला फतेहखानही पळू लागला. सासवडनजीक फतेहखानाची आणि बाजी पासलकरांची गाठ पडली.

        पासलकरांच्या पथकाने गनिमांचा कत्तल चालवली. बाजी दोन्ही हातात तलवार घेऊन गनिमांची मुंडकी उडवत फेतहखानच्या दिशेने जात होते. खानाने अंबारीतून बाजींना येताना पाहिलं. त्याने बाजींवर बाण मारले.एक बाण बाजींच्या खांद्यात घुसला. बाजींनी तो उपसून काढला. पण तोच मागून त्यांच्या हातावर वार झाला. मागे वळणार तोच खानाचे बाण बाजींच्या छाताडात घुसले. पासष्ट वर्षांचे बाजी पडले. बाजींना पडलेलं पाहताच फत्तेखान सैन्यासह परत मागे वळून पळून गेला.

        मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी पडला. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. वीर बाजी पासलकर (देशमुख) हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर होते.

          मित्रांनो, शिवरायांच्या गुप्तहेर पथकामध्ये एक ना अनेक ज्ञात अज्ञात मावळे होते. त्यात तुळसा, मंजुळा, जना सारख्या कित्येक स्त्रिया होत्या. ज्यांची नावं इतिहासाच्या पानांत कुठं हरवली कुणालाही माहिती नाही. गुप्तहेरांची नाव माहिती नसणं हेच तर शिवरायांच्या गुप्तहेर पथकाचं यश होतं. आणि त्याच्या जोरावरच शिवरायांनी स्वराज्याचं सुराज्य केलं. शत्रूंचा नायनाट केला. स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात गुप्तहेरांना माझा त्रिवार मनाचा मुजरा. त्यांच्या शौर्याला, धाडसाला आणि बलिदानाला या कथेद्वारे मानवंदना देण्याचा हा छोटासा प्रयत्न. जय शिवराय.

शब्दसूची 

प्रहर - तीन तास (साडे सात घटका / घटिका )
एक घटका / घटिका - २४ मिनिटं
एक पळ - चौवीस सेकंद
सकाळचा पहिला प्रहर - सकाळचे ६ ते ९ चा वेळ.
सकाळचा दुसरा प्रहर - सकाळचे ९ ते १२ चा वेळ.
मध्यरात्रीचा प्रहर - रात्री १२ ते ३ वेळ.
पहाटेचा प्रहर - पहाटे ३ ते ९ चा वेळ.
मध्यान्हीचा प्रहर / दिवसाचा पहिला प्रहर - दुपारी १२ ते ३ चा वेळ
एक पाऊल अंतर - चालताना दोन्ही पावलांतलं अंतर 
पुरुषभर उंच - साधारण उंचीचा पुरुष हात व करून उभा राहिल्यावर तेवढी उंची.
वितभर - करंगळी आणि अंगठा ताणल्यावर दोघांच्या टोकांमधलं अंतर 

संदर्भ ग्रंथ

छ. शिवाजी महाराज - वा. सी. बेंद्रे
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
इतिहासाच्या पाऊलखुणा - कौस्तुभ कस्तुरे
ऐतिहासिक कथा - साने गुरुजी
शिवराय - नामदेवराव जाधव
शिवकाल - गो. नी. दांडेकर
श्रीमानयोगी - रणजित देसाई
रणनिपुण छ. शिवराय - गुरुनाथ नाईक
साद सह्याद्रीची भटकंती गड किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
चला ट्रेकिंगला - पांडुरंग पाटणकर
डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
गड किल्ले - भगवान चिले
दुर्गभ्रमण गाथा - गो. नी. दांडेकर
महाराष्ट्राची धारातीर्थे - पं. महादेवशास्त्री जोशी
गुप्तहेर बहिर्जी नाईक - मीनाक्षी वैद्य

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

History Lover

Reader and Writer

The Reader

//