Login

गुंतवणूक नात्यांमधली भाग २

एका वडिलाना आयुष्याच्या तिन्हीसांजेला झालेला पश्चाताप

गुंतवणूक नात्यांमधली भाग २

रियाच्या बोलण्याने दुखावलेला श्रीधर त्याच्या आयुष्याचा लेखा जोखा मांडू लागला.
श्रीधरचे बालपण मुंबईतील त्याच्या आताच्या राहत्या घरी म्हणजे कांदिवली उपनगरात गेले होते.  श्रीधरच्या बाबांचा सतीशरावांचा छोटासा उद्योगधंदा होता.  श्रीधरची आई हेमा एक गृहिणी होती.  श्रीधरचे आजी आजोबा कोकणात रहायचे.  त्यांची मोठी आंब्याची वाडी होती.  त्यामुळे श्रीधर शाळेच्या प्रत्येक सुट्टीत कोकणात आजी आजोबांकडे राहायला जायचा.  त्याचे बाबा प्रत्येक सुट्टीत त्याला आणि त्याच्या आईला कोकणात सोडून यायचे.  श्रीधर जवळजवळ बारा तेरा वर्षांचा होईपर्यंत त्याला कोकणात खूपच मजा यायची.

कोकणात उन्हाळ्याच्या सुट्टीत तर आंबे खाण्याची चंगळच असायची.  तिथे दिवसभर वाड्यात खेळायला सवंगडी पण भरपूर होते.  संध्याकाळी त्याची आई आणि इतर मुलांच्या आया त्यांना सुद्रावर फिरायला घेऊन जायच्या. जाताना कधी घरून खाऊ घेऊन जायचे तर कधी समुद्रावरील भेळेचा आस्वाद घेतला जायचा.  घरी आल्यावर हातपाय धुवून शुभम करोति, परवचा म्हणून झाल्यावर आजीच्या हातच्या मऊसूत तांदळाच्या भाकऱ्या, लोणी ह्यांचा समाचार घेतला जायचा.  आजी श्रीधरला खूप प्रेमाने भरवायची.  त्यावेळी आजी आजोबांचे प्रेम एखाद्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीच्या पात्राप्रमाणे असायचं.  श्रीधरला अगदी लहान असताना गावच्या मातीत खेळणे, कोंबड्यांच्या मागे लागणं सगळंच खूप आवडायचं. आजीच्या कुशीत तिच्या प्रेमाच्या मायेच्या गोधडीत त्याला खूप आश्वासक झोप लागायची.  आजोबा त्याला नवीन खेळ शिकवायचे. त्याच्यासाठी आमरस करणं म्हणजे आजोबांसाठी खूपच आवडीचं काम होतं.

आजीच्या हातची उकड, पुरणपोळ्या, बेसनाचे लाडू श्रीधरसाठी पर्वणीच होती.  एकंदरीतच आजोळची ओढ श्रीधरला बारा वर्षांचा होईपर्यंत कायम होती.  हळूहळू तो मोठा होऊ लागला आणि त्याचा गावी जाण्यातला रस कमी होऊ लागला.  आजी आजोबा श्रीधरच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे.  आधी वर्षातून तीन चार वेळा गावी जाणारा श्रीधर जेमतेम वर्षातून एकदाच गावी जाऊ लागला.  तो बारा वर्षाचा झाल्यानंतर त्याला गावी जाणे नकोसे वाटू लागलं.

त्याच वर्षी श्रीधरच्या आजोबांचं निधन झालं.  आजी खूपच एकटी पडली.  सतीशरावांनी तिथल्या मालमत्तेची निगराणी राखण्यासाठी गावातीलच एका जोडप्याला ठेवलं आणि आईला त्यांच्या मुंबईच्या घरी आणलं.  त्यांना वाटलं आजी आल्यामुळे श्रीधरला आनंद होईल.  आईला मुंबई नवीन असल्यामुळे स्वतंत्र खोलीत झोपायला भीती वाटेल म्हणून त्यांनी आईची झोपण्याची व्यवस्था श्रीधरच्या खोलीत केली.

श्रीधर आता मोठा होऊ लागला होता त्यामुळे त्याला आजीचं असं आगंतुकासारखं त्याच्या खोलीत येणं रुचलं नाही.  त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती.  बाबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.  आजी श्रीधरच्या खोलीत आल्यावर त्याच्यावर माया करू लागली की त्याचा श्रीधरला राग येऊ लागला.  आता त्याचं विश्व स्वतंत्र झालं होतं.  त्याला कोणाची मध्ये मध्ये लुडबुड नको होती.  तो आता अशा अडनिड्या वयात होता की त्याला स्वातंत्र्य हवे होते. आणि म्हणूनच अगदी लहान असताना आजीच्या कुशीत झोपणारा श्रीधर आता आजीपासून लांब लांब राहत होता.  आजी प्रेमाने त्याचे पाय दाबायला लागली की हा पाय झटकून निषेध व्यक्त करत होता.  एकदा तर कहरच झाला.  त्याने आजीची गोधडी खाली फेकून दिली आणि म्हणाला,

" शी किती घाण स्मेल येतोय तुझ्या गोधडीला.  तू उद्यापासून दुसऱ्या खोलीत झोपत जा.  तुझे सर्व सामान पण तिथेच ने. " असं बोलताना श्रीधरने क्षणभरही विचार केला नाही की ह्या गोधडीतच तो आजीच्या कुशीत किती आश्वस्त झोपत होता.  आज रिया असं बोलल्यावर त्याला ते सर्व आठवलं.  आपण आपल्या आजीशी किती वाईट वागलो ह्या भावनेने त्याला खूप अपराधीपण जाणवलं.

(आयुष्याच्या तिन्हीसांजेला झालेल्या उपरती मधून श्रीधरच्या जीवनात काही बदल घडेल का पाहूया पुढील भागात)