गुंतता हृदय हे (भाग -४ टीम व्हॉट्स इन अ नेम)

Love story of singer girl. Ira championship trophy. Team work story.

गुंतता हृदय हे ( भाग ४ था )

© आर्या पाटील

( सदर कथा ही पूर्णतः काल्पनिक असून कथेतील नावे, घटना, स्थळे यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
**********************
             गावकऱ्यांच्या जीवनातील अशिक्षितपणा, गरिबी आणि रूढी परंपरांचा गुंता सोडवता सोडवता ते दोन जीव एकमेकांमध्ये गुंतत चालले होते. यासाऱ्यांत कीर्तीचे योगदान वाखाणण्याजोगे होते. आपल्या चंदेरी दुनियेतील चांदप्रकाश परोपकाराच्या रुपाने ती गावकऱ्यांच्या काळोख्या आयुष्यावर पसरवत होती आणि त्यासोबतच ही चंदेरी चांदणी कार्तिकच्या हृदयरूपी आभाळावरही चमकू लागली होती.

रेल्वेमध्ये झालेली पहिली भेट, त्यानंतरची अनोखी ओळख, ओळखीतून लाभलेला सहवास, सहवासातून फुललेली मैत्री, मैत्रीतील अनामिक ओढ, आणि ओढीतून जडत असलेली प्रीती..... एक सुंदर प्रवास. गावकऱ्यांच्या उत्कर्षासाठी एकत्र आलेल्या त्या दोघांच्या अनोख्या नात्याची नांदीच जणू...... आणि या प्रवासाचं  वैशिष्ट्य म्हणजे त्यांच गावाप्रती योगदान.

गावकऱ्यांच्या साऱ्या समस्यांचा एकमेव उपाय म्हणजे 'शिक्षण'. या शिक्षणाचाच आधार घेऊन त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा निश्चय दोघांनी केला. रात्री जेवणं झाल्यावर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेली कीर्ती कार्तिकला म्हणाली,

" कार्तिक आपण गावातील स्रियांसाठी साक्षरता वर्ग सुरु केला तर ? स्त्री शिकली की पूर्ण घराची प्रगती होते. समस्येच्या मुळावरच घाव घातला तर?"

" कल्पना चांगली आहे.पण गावातील महिला या साऱ्यासाठी तयार होतील?" प्रश्नार्थक स्वरात कार्तिक म्हणाला.

" Let's try it. प्रयत्न तर करुयात. आणि तु सोबत असल्यावर सर्व शक्य आहे."
त्याच्या नजरेला नजर देत ती म्हणाली. तिची ती नजर त्याच्या हृदयाला जाऊन भिडली. काहीही न बोलता कितीतरी वेळ त्या दोन नजरा एकमेकांत गुंतल्या होत्या.

गावकऱ्यांच्या प्रगतीचा वसा घेतलेल्या कीर्तीला कधी एकदा सकाळ होते आणि गावातल्या स्रियांना साक्षरता वर्गासाठी तयार करते असे झाले होते. पण जे काम तिला सहज, सोपे वाटत होते ते तेवढे सोपे नव्हते.

सकाळ झाली. डोंगरकपारीतुन उगवलेल्या सूर्याच्या तेजाचा अंश घेऊन दोघेही या स्तुत्य उपक्रमासाठी बाहेर पडले. गावातील प्रत्येक घरात जाऊन घरातील महिलांना पोटतिडिकीने ते शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगत होते. पण फक्त 'चुल आणि मुल' यांचा कित्ता गिरवणाऱ्या स्त्रिया या गोष्टीला कडाडून विरोध करत होत्या. त्यांच्या विरोधाने कीर्तीचा उत्साह पार धुळीस मिळत होता. कार्तिक मात्र हिंमत न हारता तिला साथ देत होता. यासाऱ्यांत त्यांना गवसलेला आशेचा किरण म्हणजे ७० वर्षांच्या 'सरू आजी'.

ज्या शिक्षणासाठी किर्तीचा अट्टाहास सुरु होता त्या साक्षरता वर्गाचा श्रीगणेशा 'सरु' आजींनी केला. पंधरा दिवसांतच कीर्तीच्या शिकवणीत 'सरु' आजी चांगल्याच तयार झाल्या. ज्या वेळेस काळ्या पाटीवर त्यांनी त्यांचे नाव लिहिले त्या वेळेस एखादा पुरस्कार मिळाल्याचा आनंद कीर्तीला झाला.

एके दिवशी गावातील महिला बचत गटाच्या मिटिंगमध्ये कागदावर अंगठा लावणाऱ्या स्रियांना 'सरु' आजी म्हणाल्या,
" अगं बयांनो, आता तरी शहाण्या व्हा. ऐका त्या पोरीचं... माझ्यासारखी म्हातारी सही करते नि तुम्ही अजून अंगठाच लावा...... तो सावकार तुमच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन लुबाडून खातोय. तुमचे नवरे त्याच्यापाशी हाजीहाजी करतात. जमिन तुम्ही कसता नि मोबदला त्याला देता. त्याच्याकडून घेतलेलं कर्ज वर्षानुवर्षे फेडता तरी फिटत नाही. तो कागद देतो तुम्ही अंगठा लावता.तुम्ही पिकवलेल्या धान्याने त्याची गोदामं भरता. तुमच्या शेतातला ताजा भाजीपाला त्याच्या स्वयंपाक घरात देता आणि स्वतःच्या लेकरांना शिळं खायला घालता. ती टिव्हीत दिसणारी पोर..... तिला काय गरज या सगळ्याची? पण तरीही ती झटते.... फक्त तुमच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी. साक्षात दुर्गा बनून आली आहे ती त्या सावकाराला संपवण्यासाठी. तिचं ऐका. तिला साथ द्या."

सरु आजींचे बोल त्या साऱ्या स्त्रियांच्या काळजाला भिडले. स्वत: च स्वत: वर लादलेलं अबलापणाच बंधन तोडून त्या साक्षरता वर्गाला येऊ लागल्या.७० वर्षांच्या 'सरु' आजी त्या दोघांच्या कार्यात नवसंजीवनी ठरल्या.

आता विजय त्यांचाच होता कारण सर्वात मोठी शक्ती 'नारीशक्ती' त्यांच्या सोबत होती. सावकारापासून लपून त्याची मुलगी ' दिव्याही' या कार्यात त्यांना मदत करत होती. दिव्याबरोबरच गावातील तरुण-तरुणीही त्यांच्या या कार्यात योगदान देत होते. NG0 मार्फत मिळालेल्या मदतीने कॉलजचे कामही जोऱ्यात सुरु होते. दलालाला धान्य, भाजीपाला न विकता कार्तिकने त्याच्या शहरातील मित्रांच्या मदतीने हा भाजीपाला सरळ शहरातील बाजारपेठेत नेला. व्यवहारात दलाल नसल्याने त्यांच्या मालालाही चांगला हमीभाव मिळू लागला. सावकाराकडून कर्ज न घेता बँकांमार्फत राबवल्या जाणाऱ्या शेतकी योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा या दृष्टीनेही कार्तिकने प्रयत्न केले.

कीर्ती आणि कार्तिकच्या या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या जीवावर सुरु असलेली सावकाराची  जाचक  'सावकारी' बंद पडू लागली होती. गावातील लोकांना सुगीचे दिवस येत होते. शिक्षणाचं महत्त्व पटलेल्या स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या विशेषकरून आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही बनल्या होत्या.

या चळवळीची उद्‌गाती असलेली कीर्ती सर्वांच्या काळजाचा तुकडा बनली होती. आपल्या मानसिक आनंदाची कवाडं कीर्तीने समाजकार्याच्या चावीने उघडली होती. हा आनंद तिच्या चेहर्‍याला आणखीनच खुलवत होता. साधा,सरळ कार्तिक मात्र तिच्या याच खुललेल्या चेहऱ्यात गुंतत होता. तिचा तरी कुठे स्वत: च्या मनावर ताबा राहिला होता..... कार्तिकची दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, गावातल्या लोकांविषयीची ओढ, नेहमीचा हसमुख चेहरा, परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे जायची प्रवृत्ती अश्या एक ना अनेक गुणांमुळे तो ही कीर्तीच्या हृदयाचा 'राजकुमार' बनला होता.

त्या दिवशी साक्षरता वर्ग आणि कॉलेजचं काम आटोपल्यावर दोघेजण निवांत नदीकिनारी पोहचले. आज कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता त्यांना. बकुळीच्या झाडाखाली विसावत कीर्तीने केसांचा गुंडाळा केला आणि क्लिपने वर बांधला. खळखळून वाहणारी नदी, हिरवीगार शाल ल्यालेली वनराई तिच्या मनाला भुरळ घालत होती. कलाकाराच ती निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाणारच. बकुळीच्या सुगंधात तिच्यामनाने शब्दसुमनांच्या माळा गुंफल्या....

    "असेही प्रेम असावे धरणी अन् आभाळासारखे
      रोज क्षितिजावर भेटूनही एकमेकांसाठी परके,

     अमाप अन् अनंत त्यांच्या प्रेमाची व्याप्ती
     बनून पाऊस त्याची तिला भेटण्याची युक्ती,

     व्याप्ती तव प्रेमाची  नव्याने डोळ्यांत भरते
     त्याच्या हृदयात कडाडणारी विज तिच्या काळजात        
     खोल शिरते,
    
    प्रेम तयांचे निरागस सुखावून जाई वेड्या मना
    क्षितिजावरचा सांजप्रकाश देई भेटीच्या पाऊलखुणा,
  
    तशीच चाहुल तुझ्या प्रेमाची घेऊन नवा प्रहर आला
    जीवनाच्या गुलमोहराला बघ प्रीतीचा बहर आला,

    मग गुंतता हृदय दोघांचे अवतरे स्वर्गच जमिनीवरती
    अमर्याद सागर तु, मी सागरातली आनंदाची भरती..."
     
  

नकळत ती शब्दफुले त्याच्यावर उधळत होती आणि तिच्याकडे एकटक बघत तो बकुळीच्या फुलांनी तिची ओंजळ भरत होता. क्षणभर तो थांबला आणि आपल्या हाताने त्याने क्लिप मध्ये अडकवलेले तिचे रंगांच्या छटा ल्यालेले केस मोकळे केले.

" कीर्ती, केस नेहमी मोकळे सोडत जा. खूप सुंदर दिसतेस तु मोकळ्या केसांत...." आपल्या तंद्रीतच तो म्हणाला.

मघापासून कवितेत अडकलेली कीर्ती पटकन भानावर आली. आपल्याकडे एकटक बघणाऱ्या कार्तिकवर हातातल्या बकुळीच्या फुलांची उधळण करत ती म्हणाली,
" खरंच..... मग बोलना मनात आहे ते."

तिच्या त्या शब्दांनी कार्तिकने स्वत: ला सावरले.

" काही नाही गं.... सहजच बोललो." नजर चोरत कार्तिक म्हणाला.

रिकाम्या झालेल्या ओंजळीत त्याचा चेहरा पकडत कीर्ती म्हणाली,
" मनातल्या भावना व्यक्त कराव्यात. मनातच ठेवल्या तर समोरच्याला कश्या कळतील?" 

तिच्या अनाहूत स्पर्शाने शहारलेल्या कार्तिकने डोळे मिटले.

" मला भलत्या मोहात नको पाडूस कीर्ती.... प्लिज." एवढं बोलून तो उठला.

कीर्तीने हात खेचत त्याला खाली बसवले.

" नाही बोलत काही. आतातरी बसशील थोडावेळ?" लडिवाळपणे ती म्हणाली.

आपल्या भावना लपवत कार्तिकने विषय बदलला.

" कीर्ती,दिव्याच्या बाबतीत काहीतरी ठोस पावले उचलावी लागतील. नाहीतर आयुष्य उद्धवस्त होईल तिच." तो म्हणाला.

" कार्तिक आपण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला जाऊन भेटलो तर? बघुया तो तरी ऐकतो का." पर्याय सुचवत ती उत्तरली.

" प्रयत्न करायला हरकत नाही. उद्या सकाळीच जाऊया त्यांच्याकडे." त्यानेही आश्वासक साथ दिली.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते दोघे दिव्याच्या होणाऱ्या सासरी जाऊन पोहचले. तिच्या सासू- सासऱ्यांना, भावी नवऱ्याला हात जोडून लग्न न करण्याची विनंती केली. पण त्यांनीही या दोघांना थारा लागू दिला नाही.

वाऱ्यासारखी ही बातमी सावकारापर्यंत पोहचली. आधीच त्यांच्या समाजकार्यामुळे पुरता गोत्यात आलेला सावकार चांगलाच खवळला. आपल्या आडदांड अंगरक्षकांना घेऊन त्याने गाडी काढली आणि कार्तिकचं घर गाठलं. कीर्ती आणि कार्तिक दोघेही घरात नव्हते. गाडीतून उतरत सावकार जोऱ्यात बरसला,

" कार्तिकची आई बाहेर ये आधी..."

"गावात दहशत असलेला सावकार आपल्या अंगणात येऊन ओरडतो म्हणजे नक्कीच कीर्ती आणि कार्तिकने काही केले असेल." कार्तिकची आई स्वगत झाली. पदर खोचत धावतच बाहेर आली.

" मायबाप काय झालं? का एवढा कांगावा करता? काही चुकलं का आमचं?" हात जोडत ती म्हणाली.

" तुमचं कसं चुकेल तुम्ही तर जग सुधारायला निघालेली समाजसेवक माणसं... चुकलं माझंच.... नवरा मेल्यावर तुला मदत केली... पोराच्या शिक्षणासाठी पैसे दिले... माझं खाता नि माझ्यावरच उलटता... लांडग्याची जात आहे तुमची" असे म्हणत त्याने तिथेच अंगणात तोंडातल्या गुटख्याची पिचकारी मारली.

" आहो... सावकार सांगा तरी काय झालं?" गयावया करत ती म्हणाली.

" काय झालं..... तुझ्या पोरालाच विचार ना... शहरातले पंख लावून जाम उडतोय... नटीच्या जोरावर जाम माज करतोय.... नाय त्याचे पंख छाटले तर नावाचा सावकार नाय." डोळ्यांतली आग शब्दांत ओकत तो म्हणाला.

" अल्लड आहेत पोरं.. माफ करा त्यांना" समजावत ती म्हणाली.

" अख्ख्या गावाला माझ्या विरोधात उभं केलय.माझ्या पोरीचं जमलेलं लग्न मोडायला निघालेत नि म्हणतेस अल्लड आहेत. वेळीच आवर घाल. अकाळी नवरा गेला..... पुत्रशोक नको करून घेऊस." अशी धमकी देऊन तो निघून गेला.

कार्तिकची आई उभ्याजागी शहारली. त्याची धमकी तिच्या कानात अजूनही तशीच घुमत होती. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. कधी एकदा कार्तिकला डोळ्यांत बघते असे झाले. जेमतेम डगमगणाऱ्या शरिराचा भार सावरत दारापुढच्या ओटीवर तशीच बसून राहिली नजर कार्तिकच्या वाटेवर लावून.....

एवढं करूनही सावकार थांबला नाही. वाड्यावर पोहचताच त्याची गुलामगिरी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना त्याने  बोलावून घेतले. कीर्ती आणि कार्तिकच्या नावाने फर्मान काढण्याचा हुकूम दिला. त्याने पैशांनी विकत घेतलेले पंच त्यासाठी लगेच तयार झाले. लागलीच त्यांच्या नावाचं फर्मान निघालं. गावातील एका मुलाकरवी ते त्यांना देण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी गावाच्या पंचायतीत उपस्थित राहण्याचे हुकुम देण्यात आले.....

क्रमश:

--------------------------------------------------------------------

सावकाराने दिव्याच्या बेकायदेशीर लग्नाचा घातलेला घाट उधळून लावायला कीर्ती आणि कार्तिकला यश येईल ?.......कि सावकाराने विणलेल्या जाळ्यात दोघेही अडकतील ?..... हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा आणि भाग ५ वा नक्की वाचा. आपल्या प्रतिक्रिया comments करून जरूर कळवा. धन्यवाद