गुंता.. भाग १ जलद कथा लेखन स्पर्धा. विषय... नातीगोती

नात्यांची कथा


जलद कथा मालिका स्पर्धा
विषय…नातीगोती
गुंता… भाग एक

नमीता डायनिंग टेबलवर चहा घेत पेपर वाचत होती.नमीताला पेपर वाचताना बघून विहंगचा चेहरा दु:खाने विदीर्ण झाला कारण नमीता गेल्या वर्षीचा पेपर वाचत होती.

आजचा पेपर वाचत असल्यासारखी तेवढ्याच तन्मयतेने नमीता पेपर वाचत होती. हा पेपर नमीता उठायच्या आधी विहंग नीट घडी करुन समोरच्या हाॅलमध्ये ठेवायचा.


रोजच्याप्रमाणे नमीता उठली आणि वाॅकरने हळूहळू चालत चहा पिण्यासाठी टेबल पाशी आली आणि विचारालं,

"आजचा पेपर कुठे आहे?" नमीताच्या आवाजात कणखरपणा होता.

"आला आहे. आणतो" असं म्हणत विहंगने तो नीट घडी केलेला पेपर टेबलवर आणून ठेवला.

पेपर मिळाल्यावर नमीता त्याच टणक आवाजात विहंगला म्हणाली.

" तुकाराम मी कितीदा सांगितलं तुला. मी शाळेत येण्यापूर्वी माझ्या टेबलवर पेपर असायला हवा. किती वर्ष झाली रे तुझ्या नोकरीला?"

" झाले बारा वर्ष" तुकाराम ऊर्फ विहंगने

विहंगने मुद्दाम चाचरत घाबरत उत्तर दिलं.

" बारा वर्ष काय केलंस? कंचे खेळलास का? जा माझ्यासाठी चहा आण. त्या रेणुकाला सांग ढुळूक पाणी चहा करू नको. दुधाचे पैसे शाळा देते."

नमीता रागाने विहंग कडे बघत म्हणाली. विहंगही गडबडीने आत गेला.


नमीता आपण अजूनही शाळेच्या मुख्याध्यापिका आहोत या कल्पनेत होती. त्यामुळे नमीता मनाने सतत शाळेतच असते. तिचा घरातील वावर शाळेत असल्या सारखा असतो. त्यामुळे तिला विहंग कधी तुकाराम वाटायचा कधी उपमुख्याध्यापक बापट सर वाटायचा.

विहंगला ती ज्या व्यक्तीचं नाव घेऊन बोलवत असे ती व्यक्ती म्हणून विहंग तिच्यासमोर उभा राहत असे. हळुहळू त्याला एकेक व्यक्ती कशी आहे हे समजायला लागलं.

या सगळ्या भूमिका निभावतांना विहंग मनात दु:खाचे कढ महत्प्रयासाने दाबून टाकत असे. आपली बायको आपल्याला कधी ओळखेल? या प्रश्नाचं त्याला उत्तर सापडलं नव्हतं.

विहंग मागच्या वर्षी निवृत्त झाला असता पण नमीताच्या तब्येतीमुळे त्याने दोन वर्ष आधीच निवृत्ती घेतली.

विहंगपण नामंकीत कंपनीत मार्केटिंग साइडला होता आणि असीस्टंट जनरल मॅनेजर होता.

नमीताच्या वागणूकीत अचानक बदल दिसायला लागला. शाळेतील कामामध्ये ताण निर्माण झाला. मुख्याध्यापक म्हणून नमीताची कामगीरी अचानक ढासळली.


नमीता रायझिंग कीडस् या मोठ्या शाळेत नोकरीला होती. मुख्याध्यापक म्हणून छान नाव कमावलं होतं. विद्यार्थांमधे चांगली लोकप्रिय होती.पण…

पण आता सगळंच बदललं…


नमीताची शाळेतली वर्तणूक बदलली होती त्यामुळे मॅनेजमेंट ने विचार केला की नमीताने शाळेतील नोकरी सोडावी. विहंग यावर काहीच बोलला नाही.

शाळेचं काही चुकलं नाही हे विहंगला कळत होतं. सगळी प्रोसीजर पार पडली की त्यानंतर दुस-या दिवशी पासून नमीता घरीच राहणार होती.

आता काय करायचं हा प्रश्न विहंगच्या समोर आ वासून उभा होता.

विहंगला तर ऑफीसमध्ये जाणं भाग होतं. त्याने नमीताच्या वहिनीला फोन लावला. ती पुण्यातच असल्याने तिला एक दोन दिवस आपल्या घरी राह्यला बोलवावं असा विचार विहंग ने केला.

पलीकडे फोनची रींग जात होती.

" हॅलो…बोला विहंग कसे आहात?"

"वहिनी मी एका कामासाठी तुम्हाला फोन केला होता."

" बोला नं?" वहिनींच्या आश्वासक स्वर ऐकून विहंगला बरं वाटलं.

" तुम्हाला एकदोन दिवस आमच्या घरी येऊन राहणं जमेल का? हे विचारायला फोन केला होता."

" का?"

" आज नमीताने शाळेतून व्हीआरएस घेतली आहे. तिला एकटं ठेऊन मी ऑफीसमध्ये जाऊ शकत नाही म्हणून मी पण व्ही आर एस घेणार आहे.त्यासाठी दोन दिवस ऑफीसमध्ये जावं लागेल.आज मी फोनवरच ऑफीसमध्ये कल्पना देणारं आहे. दोन दिवस तुम्ही आलात तर मी सगळी प्रोसीजर पूर्ण करू शकेन."

एवढं बोलतानाही विहंगची छाती दडपली. पलीकडून काय उत्तर येईल यावर त्याचं पुढचं काम अवलंबून होतं. नमीताच्या वहिनी म्हणाल्या,

" काही हरकत नाही मी येईन. घरची व्यवस्था लावून संध्याकाळ पर्यंत येईन.म्हणजे दोन दिवस मला घरची काळजी राहणार नाही राहता येईल."

नमीताची वहिनी येणार म्हटल्यावर विहंगला निर्धास्त वाटलं.
______________________________

क्रमशः गुंता
© मीनाक्षी वैद्य.
असं काय झालं ज्यामुळे नमीताची अवस्था अशी झाली.बघू पुढील भागात.

🎭 Series Post

View all