गुणगौरव सोहळा : आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

ईरा : शब्दांचे प्रेरणास्थान
गुणगौरव सोहळा : आयुष्यातील अविस्मरणीय  प्रसंग


        मुलांना शिकवण , मोठं करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य असते.पण मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार करणे हे सुद्धा महत्वाचे कार्य आहे.लहान असतानाच त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना उचित मार्गदर्शन केल्यास मुलांची सर्वांगीण प्रगती होते.लहान असतानाच कठोर शिस्त लावणे , वेळच्यावेळी अभ्यास करणे , आदर करणे , स्वच्छता , नियोजनबद्धता या गोष्टींची वेळीच दक्षता घेतली असता मुले सर्व बाबतीत तयार होतात.शाळेतही त्यांचे वागणे ,बोलणे कसे आहे , इतर कोणत्या गोष्टी ती करत असतात याकडे नेहमी पालकांचे लक्ष असणे गरजे आहे.जेंव्हा सर्वच बाबतीत मुले अग्रेसर असतात तेंव्हा अशी मुले आईवडिलांची व शाळेची शान ठरतात.वरील गोष्टी सांगण्याचा हेतू हा की आमच्या मुलांवर आम्ही असे सुसंस्कार केले आहेत आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दैदीप्यमान यश मिळवले आहे , असाच मुलीचा बारावीतील गुणगौरव सोहळा हा जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे.

प्रिती हुशार आहे याची प्रचिती तिने लहानपणापासूनच दिली होती.शाळेत ती पहिलीपासून वर्गात आघाडीवर होती.प्राथमिक शाळेत तीने अभ्यासाबरोबरच इतर छंदही जपले होते.रांगोळी , सुंदर हस्ताक्षर आणि वक्तृत्व यामध्ये अनेकवेळेला यशही मिळवले होते.खासकरुन वक्तृत्व कलेत तीने छाप पाडली होती.प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा प्रभाव तीने माध्यमिक शाळेत चालू ठेवला.शाळेतील गुरुजनांनी तिची हुशारी पाहून विशेष मार्गदर्शनही केले.दहावीमध्ये वेळेवर अभ्यास, वेळेचे नियोजन , जिद्द , चिकाटीने ९३ टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्वल केले.सर्वांनी खूप अभिनंदन केले.पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन केले त्यामुळे प्रितीला आणखी प्रेरणा मिळाली.बराच विचारविनिमय केल्यानंतर कला शाखेत प्रितीला प्रवेश घेतला.स्पर्धापरिक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ आणि सखोल अभ्यासासाठी कला शाखा निवडली आणि अभ्यासाला सुरवातही केली.पुढच्या ध्येयाची जिद्द तिच्यात दिसली त्यादृष्टीने अभ्यासाचे नियोजन करुन सातत्य राखले आहे.कला शाखेचा अभ्यासाकडे तीने दुर्लक्ष केले नाही.बारावीत अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करुन यश मिळवायचे हे उदिष्ट ठेऊन अभ्यास केला.जेंव्हा निकाल लागला तेंव्हा बारावीत तिला ८७.५० टक्के गुण मिळवून ती कला शाखेत कॉलेजमध्ये पहिली आली.इतकेच नव्हे तर गडहिंग्लज , आजरा व चंदगड यया तीन तालुक्यात ती प्रथम आली.तरीही ती या गुणावर समाधान नव्हती आणखी गुण मिळायला हवे अशी तिची इच्छा होती कारण आपल्या मेहनतीवर आणि अभ्यासावर तिचा विश्वास होता.आम्ही प्रचंड आनंदीत झालो.कॉलेजमध्ये बॕनर झळकले.गावात भावेश्वरी परिवाराने सत्कार केला.वैयक्तिक येवून अनेकजणांनी सन्मान केला.मी साखर कारखान्यात असलेमुळे कामगार मुलांच्यातून पहिली आलेमुळे तेथे आदरपुर्वक सत्कार झाला.पण सगळ्यात हृदयपूर्वक सत्कारसोहळा झाला तो म्हणजे घाळी कॉलेजवरील गुणगौरव समारंभात ..!!

बारावीत धवल यश मिळवलेल्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजन केला होता.पालकांननाही याचे खास आमंत्रण होते.विशेष म्हणजे भारती विद्यापिठाच्या प्राध्यापिका किर्ती महाजन उपस्थित होत्या.घाळी कॉलेजचे सर्वेसर्वा मा.सतिश घाळी , प्राचार्य , हरहुन्नरी शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.अतिशय उत्हावर्धक वातावरण या सोहळ्यात होते.पालकांचे चेहरे आनंदले होते.मुले या प्रेरणादायक क्षणाची वाट पाहत होती.यशस्वी विद्यार्थी या सोनेरी क्षणासाठी आसुरले होते.सुरवातीला या कार्यक्रमात मान्यवरांचे सत्कार झाले.कांही शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.यश कसे मिळवाचे व टिकवून ठेवायचे याविषयी सखोल मार्गदर्शन झाले.आणि मग यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सुरु झाले.अनेकांना बक्षीसे मिळू लागली.टाळ्यांचा कडकडाट होवू लागला.मुलांना प्रेरणा मिळू लागली.ज्यावेळी आमच्या मुलीचे नाव पुकारले गेले प्रचंड आनंद झाला होता.व्यासपिठावर मान्यवर मंडळीनी यशस्वी विद्यार्यांचे कौतुक केले. डॉ.सतिश घाळी साहेबांंच्याहस्ते प्रितिला बक्षीस प्रदान केले गेले.तिचे खास कौतुक केले , आमचाही पालक म्हणून गौरव केला.प्राध्यापिका किर्ती महाजन यांनी आमचे खास अभिनंदन केले.खरोखरच या सोहळ्याचे साक्षिदार होताना ऊर भरुन आला.मुलांंनी मेहनतीने मिळवलेल्या यशात पालाकांचा वाटाही मोलाचा असतो. त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मुलांना यश मिळवण्यास कारणीभूत ठरतो.मुलांचे झालेले कौतुक आणि पालकांचा सन्मान त्यामुळे हा अविस्मरणीय गुणगौरव सोहाळा जीवनात दिर्घकाळ स्मरणात राहील.

               ©®नामदेवपाटील