विषय:---....आणि ती हसली
फेरी:----राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा
"तिची एव्हढी हिम्मत, तुझ्याकडून काम करून घ्यायची? अगं समजते कोण ती स्वतःला ? चार महिने झाले नाही अजून लग्नाला तर हिचा मनमानी कारभार सुरू झाला. काय एवढं काम असतं ग? चार माणसांचं ? घरात तर असते, रिकामटेकडी बसलेली, तरी ही काम करायला लावते तुला? बघतेच तिच्याकडे आता, थांब दोन दिवस मी येतेच शनिवारी तुझ्याकडे.
चांगली खडसावून विचारते, हे काय नाटक सुरू केलयं ते?"
चांगली खडसावून विचारते, हे काय नाटक सुरू केलयं ते?"
"अग, रेवा नको असं काही करू, मी आणि माझी सुन बघून घेतो. तु ये शनिवार-रविवार पण मेघाला काही बोलू नको."
"बोलू नको काय? बोलू नको? डोक्यावर मि-या वाटेल ती अश्याने थोडे दिवसात. तिची आत्ताच चांगली कान उघडणी नाही केली तर जास्त जोर येईल तिला. चांगली दम देते तिला, आहे कुठे महाराणी? फोनवरून बोलले असते पण ते काही एवढं नीट सविस्तर बोलणं होणार नाही, प्रत्यक्षात चांगली जिरवते थांब तिची."
"अगं, रेवा एवढं काही नाही ग सिरीयस, तु उगाच बाऊ करतेय. अग केलं काम थोडं फार म्हणून कुठे बिघडलं? सवय रहाते शरीराला, तब्येत ही चांगली रहाते."
"थोडं काम? अग सगळं काम तुच करते, महाराणी ऐतं खाते. कशावर भाळून तुम्ही तिला सुन करून आणली काय माहीत? आणि आत्ता ही तिचंच ऐकून घेत आहात. थांब मी राकेशला पण बोलणार आहे या बद्दल."
"अग त्याला काय माहित? घरी काय चाललेलं असतं, तो बिचारा सकाळी आठ वाजता जातो ते रात्री आठ वाजता येतो. त्याच्या डोक्याला काय कमी व्याप आहेत म्हणून हे बोलून अजून घरातलं टेन्शन देते. तो घरी असल्यावर ती कशी छान छान वागते त्याच्यासमोर माझ्याशी आणि त्याचा पाय घराबाहेर पडला कि सुरू होत हिचं. तु नको बोलू याविषयी त्याच्याशी ही नको आणि तिच्याशी ही नको. आम्ही बघतो काय करायचं ते."
"इथेच तर चुकते ग आई तु, त्याला ही कळू देत ना, त्याची बायको त्याच्या माघारी घरी कशी वागते ते?"
"नको ग! चल ठेवते फोन, मेघा येईल इतक्यात. काम पुर्ण नाही झालं तर चिडेल ती. तु कुणाला काही बोलू नको बाई! ठिक आहे. चल ठेवते."
घाबरत घाबरत सुनिता काकू अर्थात रेवा व राकेश ची आई आणि मेघाच्या सासूने फोन ठेवला.
चार महिने झाले नव्या आलेल्या भावजयीने आईला कसा त्रास द्यायला सुरवात केली ते ऐकून रेवाची तळपायाची आग मस्तकात गेली होती. तिला काय करू आणि काय नको असं झालं होतं, रागाने नुसती तणतणत होती. कधी शनिवार येतोय, कधी मेघाला चांगलं जाऊन बोलते असं झालं होतं तिला.
शनिवार उजाडला रेवा अकरा वाजताच माहेरी हजर झाली. तेव्हा आई स्वयंपाक करत होती. मेघाने तिचं हसुन स्वागत केलं. "आज असं अचानक कसं काय येणं झालं?" म्हणून विचारताच तिच्यावर भडकली. "माझं माहेर आहे हे, माझ्या आईवडीलांना भेटायला मी कधी ही येऊ शकते, मला काय कुणाची परवानगी नाही लागत."
तिचा रागाचा सुर ऐकून आई लगेच विषय बदलला, तिला म्हणाली "अग, रेवांशला का नाही घेऊन आली किती दिवस झाले बघितले नाही त्याला, मागच्या वेळी ही एकटीच आली होती."
"हो ना! रेवा ताई त्याला आणायचं होतं, मला खुप खेळायचं असतं त्याच्याशी, किती गोड आहे तो, त्याचं ते बोबड्या बोलात मामी मामी ऐकायला खूप छान वाटतं."
"नाही आणलं, सासुबाई आहेत ना घरी, एक दिवसासाठी कशाला त्याची दगदग म्हणून."
मेघाने चहा करून आणलेला तिघींनी घेतला, तुम्ही बसा बोलत तो पर्यंत मी राहिलेला स्वयंपाक उरकते मग जेवण झालं कि निवांत गप्पा मारू आपण तिघीच घरी आज, राकेशच आज ही ऑफिस आहे आणि बाबा त्यांच्या सिनिअर सिटीझन बरोबर कुठल्यातरी मित्राच्या शेतावर गेले आहेत, हुरडा पार्टी करायला.
"गेली नुसती तळीला हात लावायला, तुच केलं असशील ना सारं? आता माझ्यापुढे आव आणते नुसता काम करण्याचा."
रेवानं लगेच कुजबुजायला सुरवात केली.
"नाही ग तिचं करत होती, मी आपली थोडीशी मदत."
"घे घे अजून तिचीच बाजू घे, जेवण होऊ दे बघते जरा तिच्याकडे. "
"अग नको बोलू तिला ,मी सांगितलं ना परवा, बघू ग आम्ही घेवू समजुतीने."
" रेवाताई, आई या मी पानं वाढायला घेतली. "
स्वयंपाक छान झाला होता पण त्याबद्दल रेवा काहीच बोलत नव्हती कारण तिला धावत होतं सर्व काही आईनं केलयं हिनं काय फक्त आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या.
जेवणं आटोपून तिघी गप्पा मारत बसल्या, गप्पा कसल्या रेवा संधीच शोधत होती मेघाला बोलायची. आई नको नको म्हणत असताना तिनं विषय काढलाचं. "काय ग मेघा तु आईकडून सर्व कामं करून घेते मग तु काय करते दिवसभर, नुसता मोबाईल, लॅपटॉप बघत बसते , फिरायला जाते बिनधास्त. तुला काहीच वाटत नाही? माझ्या आईला असं काम सांगून स्वतः खुशाल हिंडायचं. होतं का तिला आता या वयात? आणि सुन आल्यावर तिने निवांत बसून खावं, फिरावं तर तु तिला कामाला जुंपले?"
"कोणी सांगितलं तुम्हाला हे सारं? विचारा आईंना हवं तर, मी करते का असं काही?"
"कुणी सांगायला कशाला हवं, मला कळतं कि काय चाललयं इथे ते."
शब्दाने शब्द वाढत होता, रेवा तिचा हेका सोडायला तयार नव्हती. कित्येक वेळा तिने मेघाच्या आईवडीलांचा उद्धार केला तरी ती शांत होती पण शेवटी डोक्यावरून पाणी जायला लागले. तशी मेघाने बोलायला सुरवात केली.
"मी घरात काम करत नाही म्हणता, तुम्ही किती काम करता घरात आणि मी आईंना काम करायला लावते म्हणता तुम्ही काय करता? सारं काही तर तुमच्या सासुबाई करत असतात. सकाळी ऑफिसला उशीर होतो म्हणून आयता केलेला डबा ही भरून घेत नाही, रात्री कंटाळून, दमून आले म्हणून रात्रीची ही मदत नाही. घरातल्या सर्व कामाबरोबरच रेवांशला ही त्याच संभाळतात, त्यांचं ही वय झालयं, त्यांना ही होत नाही, याचा विचार कधी आलाय का डोक्यात? आज सुट्टी तरी देखील तुम्ही रेवांशला त्यांच्याकडे सोडून आलात, त्या ही दमत असतील ना, पण कधी एका चकार शब्दाने बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही ना मऊ लागले म्हणून कोपराने खणायचे?"
इतका वेळ खाडखाड मेघाला बोलत असलेली रेवा निशब्द झाली, तिच्या कडे मेघाच्या या प्रश्नावर काहीच उत्तर नव्हते.
तिनं लवकर आवरतं घेतलं आणि म्हणाली "मी जाते आजच परत. "
"अग तु रहाणार होती ना आजच्या दिवस, मग अशी अचानक का?"
"नाही मला एक महत्वाचं काम आठवलं, मला गेलं पाहिजे. "
मेघाने टाकलेला वाग्बाण तिच्या वर्मी लागला होता म्हणून तिने तिथून काढता पाय घेतला.
घरी पोहोचल्यावर तिने फक्त मी घरी पोहचले एवढेच सांगून आईचा फोन ठेवला.
आठ-दहा दिवसाने रेवाच्या सासुबाईंचा फोन आला रेवाच्या आईला" मागच्या आठवड्यात तुमच्याकडून आल्यापासून रेवा मध्ये खुप बदल झालाय, काय जादू केली तुम्ही? संध्याकाळी येताना भाजी घेऊन येते, रात्रीचा सर्व स्वयंपाक करते, रविवारी आम्हाला फिरायला घेऊन गेली, काय हवं नको ते विचारते, बोलणं पण बदललयं, सकाळचा करते मी स्वयंपाक पण स्वतःचा, रेवांशचा डबा भरून घेते, रेवांशचं शाळेसाठी ही आवरून देते. आता संध्याकाळी मला ही वेळ मिळतो थोडा मग येते मंदिरात आरतीला जाऊन, फिरून ही होतं. तिच्यातला हा बदल बघून खूप आनंद झाला आणि महत्वाचं म्हणजे ती हे सगळं नाईलाजाने करते असं वाटत नाही, अगदी मनापासून करते असं वाटतं, thank you! तुमचे खूप खूप आभार!"
"अहो आभार कसले, माझं कर्तव्य होतं ते? लेकीच्या अशा वागण्याचं मला ही फार वाईट होतं, खरं तर ती अशी नाही पण म्हणतात ना उस गोड लागला कि लोक मुळापासून खायला लागतात तसं काहीसं झालं तिचं आणि तुम्ही करता म्हणून करून घेतचं राहिली ती. तशी समजुतदार आहे लेक माझी, शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा झालं म्हणायचं. हे सारं पहिल्यापासूनच करायला हवं होतं पण थोडा उशीरच झाला. कारण त्या वेळी माझी हुशार सुन नव्हती ना सोबतीला. "
सासूबाईंच्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकून मेघा गालातल्या गालात हसत होती.
त्यांनी फोन ठेवला. "आई इतकं काही मी नाही केलं हं, एवढं कौतुक करायला. "
"अग इतक्या वर्षात मला जे जमलं नाही ते तु एका दिवसात केलं."
"पण आई मला सारखं वाईट वाटतंय मी ताईंना असं बोलले ते. "
"अग वेडाबाई, काही वाईट नाही बोलली तू, फक्त तिची कान उघडणी केली योग्य शब्दात, जी खूप गरजेची होती आणि महत्वाचं म्हणजे मला कधीच जमली नव्हती. मी तिला नेहमी समजवायचा प्रयत्न करायचे पण तिनं ऐकूनच घेतलं नाही कधी. तु केलेला उपाय मात्र रामबाण ठरला. मला ही थोडं नाटक करावं लागलं पण ते जाऊ दे. आपली ही जमाडी-जम्मत मात्र कोणालाच सांगायची नाही." असं म्हणत दोघींनी एकमेकींना टाळ्या दिल्या.
"इस खुशी के मौके पर हो जाए आइस्क्रीम!"
"हो!" म्हणत दोघी ही मनमुराद हसत होत्या.
@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार
©️®️स्वाती सासवडकर कुंभार
वाचकहो! सगळ्याच सुना किंवा सासू वाटत नसतात. दरवेळी लेकीच्या संसारात ढवळाढवळ करणारी आई ही नसते. रेवा च्या आई सारखी ही एखादी आई असते तिला माहित असतं आपली लेक चुकते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न ही करत असते साप भी मर जाए और लाठी भी ना तुटे अश्या वृत्तीची आणि मेघा सारख्या हुशार सुनेच्या मदतीची.
लघुकथा आवडल्यास नक्की लाइक आणि कमेंट्स करा.
समाप्त!
धन्यवाद!
समाप्त!
धन्यवाद!