गुज ओठांनी ओठांना सांगायचं...

Guj othani othanna sangayach

गुज ओठांनी ओठांना सांगायचं....

खोतांचा रोशन नुकताच बारावी पास झाला. 
सीइटीत भरपूर मार्क्स मिळाले व त्या जोरावर त्याला
पुण्यात विश्वकर्मा इन्स्टिट्यूटमध्ये आयटी शाखेत
प्रवेश मिळाला.

कोकणात गड नदीच्या काठावर त्याचं छोटसं नळ्यांच,लाल मातीनं लिपलेलं घर होतं.
रोशनच्या वडिलांचा पूर्वापार चालत आलेला मासेमारीचा धंदा होता. सकाळी उठून मित्रांसोबत गड नदीत मनसोक्त डुंबायचं, रानोमाळ भटकायचं, गुरं चरायला घेऊन जायचं,मोकळ्या रानावर पालथं पडून सुर्यास्ताचं दर्शन घ्यायचं,वडिलांसोबत शेतात नांगरणी करायची, झाडाच्या  डेळक्यात बसून वर्गात गुरुजींनी शिकवलेल्या कविता वाऱ्याच्या सुरात मनसोक्त गायच्या, असं मोकळंढाकळं जीवन रोशन व त्याचे सवंगडी जगत होते.

आईने रात्री जाळ्यात मिळालेले ठिगूर, म्हळवे
यांसारखे मासे रांदून चुलीच्या पाटणार ठेवलेले असायचे. त्याची आक्का गरमागरम टम्म फुगलेल्या भाकऱ्या करुन वाढी. असा पौष्टीक आहार खाऊन रोशनची तब्येत रांगडी झाली होती. 

पुढच्या शिक्षणाकरता रोशनच्या बाबांनी त्याला पुण्याला आणले. त्याच्या रहाण्याजेवणाची सोय केली. शांताक्का काकूंना अकाली वैधव्य आलं होतं. त्या मेस चालवून त्यांचा व त्यांच्या दोन लेकरांचा सांभाळ करत होत्या.
मुलं प्रेक्टीकल सुटेल तसं कधीही जेवायला जातं
निश्चित वेळ नसे. तरी शांताक्का ते येतील तसे त्यांना गरम गरम मऊसूत पोळ्या व भाजी वाढत.

पहिल्या दिवशी जेवणाच्या ताटावर रोशनला आईची फार आठवण आली. त्याचा गळा दाटून आला. शांताक्काच्या 
अनुभवी नजरेने हे टिपले व आईच्या मायेने त्याला पोळीचे दोन चास भरवले. रोशनला दुसरी माय मिळाली.

शांताक्काचा गोट्या यंदा दहावीत होता. तिने रोशनकडे त्याला शिकवण्याची विनंती केली. रोशन रोज रात्री  त्यांच्या अंगणात निजायला जाऊ लागला. तिथे त्याचा न्यानदानाचा कार्यक्रम सुरु झाला. झपाटल्यासारखा तो शिकवी. रोशनच्या शिकवणीमुळे गोट्याची अभ्यासात प्रगती झाली. शांताक्काला खूप बरं वाटलं.

शांत्ताकाच्या सईने दहावी झाल्यावर नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतला होता. ती शनिवार रविवार घरी जायची. 
उंच , देखणा, मर्दानी छातीचा रोशन तिच्या दिलात भरायला वेळ लागला नाही. दिवसाढवळ्या ती त्याची स्वप्न बघू लागली. सईने रोशनशी ओळख करुन घेतली.  रोशन व त्याचे मित्र त्यांच्या बाजुच्या इमारतीत भाड्याने रहात होते. सई सुट्टीला घरी आली की शांताक्काकडून रोहनच्या घराची चावी घेऊनर रोहनच्या रुमची साफसफाई करी. त्याचे कपडे धुवून वाळत घाली
व गुणगुणे,
सुहास्य तुझे मनासी मोही
जसी न मोही सुधा सुधा
मी मज हरपून बसले गं
सखी मी मज हरपून बसले ग..।

आजूबाजूच्या रूममधे रहाणाऱ्या मित्रांना
याची कुणकुण लागली. त्यांनी रोशनची खेचायला सुरवात केली. रोशन रडवेला झाला. एकदा सई तिथे रुम साफ करायला आली असता रोशन तिच्यावर फार भडकला. लालबुंद झाला. 'सई,मी न बोलवता माझ्या अनुपस्थितीत माझ्या रुमवर येऊन माझे कपडे धुणं,माझ्या रुमची साफसफाई करणं, हे सगळं तू का करतेस  एवढं न कळण्याइतका मी बावळट नाही. परत माझ्या रुमवर येत जाऊ नकोस. ध्यानात ठेव. हे आणि असं बरंच काही रोशन त्याच्या मित्रांसमक्ष सईला बोलला. 

त्याचा तो राग प्रेमवेड्या सईच्या जिव्हारी लागला.
ती धावत आपल्या घरी निघून गेली व उशीत तोंड खुपसून ओक्साबोक्शी रडू लागली. शांताक्का तिला विचारुन दमली. सई कुणाकुणाला काही सांगेना. 
रोशन जेवायला गेला , बघतो तर काय
शांताक्कासकट सर्वांचे डोळे रडून सुजले होते.
रोशनला फार वाईट वाटलं. विखारी शब्द हे बाणासारखे असतात. एकदा सुटले की परत घेता येत नाहीत.

सई आता सुट्टीलाही घरी जाईनाशी झाली.  ती  रोशनला
मनातून घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करु लागली. एकतर्फी प्रेमाचा शेवट हा निराशेतच होतो हे कथाकादंबऱ्यांतून वाचलेलं तिला प्रत्यक्षात पटलं. ती जेवढं रोशनपासून,त्याच्या विचारांपासून दूर जायचा प्रयत्न करत होती तितक्याच वेगाने परत त्याच्याकडे ओढली जात होती. तिचं मन तिचं राहिलं कुठे होतं!
डबडबल्या डोळ्यांनी अन् दाटलेल्या घशाने 
ती गुणगुणायची,
साधी भोळी मीरा तुला कळली नाही.
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही.
अरे मनमोहना रे मोहना रे मोहना...

न्हायला लागली की तिचं अवखळ,
अल्लड, खट्याळ मन गुणगुणे.
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला
लाजणाऱ्या फुलातला...

दिवस,महिने,वर्षे फुलपाखरासारखे उडून जात होते.
रोशनची लास्ट सेमिस्टर सुरू होती. त्याच्याही दिलात आत्ता साधीभोळी सई विराजमान झाली होती. सईला टोचून बोलल्याचा त्याला पश्चाताप होत होता. आपल्यामुळे सई तिच्या स्वतःच्या घरीही यायची बंद झाली याचं त्याला दु:ख वाटे. 
रात्री सई त्याच्या स्वप्नात येई, त्याचे केस हलकेच कुरवाळी व गाणे गाई,
तरुण आहे रात्र अजुनी
राजसा निजलास का रे
एवढ्यातच त्या कुशीवर
तू असा वळलास का रे...।

रोशन चांगल्या मार्कांनी पास झाला. गावी जाऊन त्याने त्याचं मन त्याच्या आईबाबांकडे उघडं केलं.
आई म्हणाली, जा आधी माझ्या सुनेला
घेऊन ये , खूप त्रास दिलास तिला..
रोशन के दिलमें प्यारवाली घंटी बजने लगी
टणटणाटणटणटणटारा....

रोशन शांताक्काकडे गेला. सईही तिथे आली होती.
विहिरीवर पाणी शेंदत होती. रोशन तिथे गेला.
विहिरीच्या कडेला छान गुलाबी गावठी गुलाब फुलले होते. त्यातलं एक गुलाबाचं फूल त्याने तोडून सईपुढे धरलं,व गाऊ लागला,
का रे अबोला, का रे दुरावा
अपराध माझा,असा काय झाला?

सई पाघळली. तिचा बांध फुटला.
रोशनने तिला कवेत घेतले.
आकाशातून पर्जन्यराजा 
हे प्रणयाराधन पहात होता.
तो खुदकन हसला व
त्याने बरसायला सुरवात केली.

चिम्म झिम्माड पाऊस
त्यात ते तरुण युगल भिजून चिंब झालं.
आजूबाजूचा हिरवा निसर्ग गाऊ लागला,
गुज ओठांनी ओठांना सांगायचं
एका पावसात दोघांनी भिजायचं.....

-----सौ.गीता गजानन गरुड.