#अपराधी
प्रशांत सहस्त्रबुद्धे, a last call for you..... विमानतळावर अशी हाक ऐकू आल्यावर तो भानावर आला. खरं तर विमान प्रवास हा त्याला मुळीच नवीन नव्हता उलट मागच्या पाच वर्षात जवळपास आठवड्यातुन कमीत कमी एकदा तरी तो विमाने प्रवास करत होता कारण आता तो केवळ सायंटिस्ट राहिला नसुन एका फार्मा कंपनीचा CEO झाला होता आणि मागची पाच वर्षे कंपनी साठी त्याने जीवतोड मेहनत घेतली होती, अगदी स्वतःला विसरून. पण आज त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं, कसंही करून आज रात्री पुण्यात मुक्कामी पोहचायचंच होतं. कारण उद्या त्याच्या बॅचच गेट टूगेदर होतं आणि मागची कित्येक वर्षे तो त्याच्या कॉलेज च्या मित्रांना नीटसा भेटलाच नव्हता. या वेळीही त्याने भेटणे कठीणच आहे म्हणून सांगितलं होतं, पण मित्रांनी केलेला आग्रह नव्हे हट्ट त्याला मोडता आलाच नाही. शेवटी हो नाही करत करत त्याने गेट टूगेदरला यायचं कबूल केलं.
आज खूप धावपळ करत त्याने त्याची दिल्लीतील सगळी कामं अटपली आणि रात्री उशिराच्या विमानाने तो पुण्याकडे रवाना झाला.
उद्या रेट्रो थीम होती ,तसं त्याने घरी आधीच सगळं सांगुन ठेवलं होतं आणि त्याच्या बायकोने त्याचे कपडे आणि इतर गोष्टींची सगळी तयारी करून ठेवली होती.त्यामुळे सकाळी कोणालाही डिस्टर्ब न करता, तयार होऊन तो लगेच लोणावळ्याला ठरल्या ठिकाणी रिसॉर्ट वर पोहचणार होता.
प्रशांत रिसॉर्ट वर पोचल्यावर मित्रांनी एकच कल्ला केला आणि प्रशांत देखील सगळी टेन्शन विसरून त्यांच्यात सामील झाला. तरी देखील मित्र मंडळ काही तरी शोधत होते पण प्रशांतला ते काय शोधतायत ते काही लक्षात आले नाही. शेवटी त्याने तिकडे दुर्लक्ष करत इतर सगळ्यांसोबत गप्पा मारत बसला.
आणि थोड्या वेळात परत एकच हल्ला उठला प्रशांतने मागे वळून पाहिलं तर त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, त्याच्या मागे आरती उभी होती, आरती त्याचं पहिलं आणि शेवटचं प्रेम. आणि आरतीला आत्ता इथं असे पाहणे त्याच्या कल्पनेच्या पार होते, कारण कामाच्या गडबडीत तो ठार विसरूनच गेला होता की ती देखील इथे येईल म्हणून. तो तिच्या कडे बघतच बसला, तितक्यात आरती त्याच्या जवळ आली आणि त्याला विचारलं : "प्रशांत कसा आहेस?" आरतीला उत्तर द्यायला प्रशांतकडे शब्दच नव्हते , नुसती मान हलवून ठीक आहे असा इशारा केला. पण तिला तू कशी आहेस हे मात्र विचारू शकलाच नाही. गपचुप तिच्या शेजारी जाऊन बसला.
इकडे मित्रांची हुल्लडबाजी सुरूच होती. सगळे जण आपलं वय विसरून अगदी कॉलेज बॉईज झाले होते पण प्रशांत मात्र आज खूप काणकोंडा होऊन बसला होता.
शेवटी आरतीनेच त्याला बोलतं केलं आणि त्याच्या जॉब वगैरे बद्दल चौकशी केली. तिचं इतकं बोलणं ऐकून झाल्यावर सगळं बळ एकवटून प्रशांतने आरतीला विचारलं "तु कशी आहेस आरती?" आणि त्याच्या या प्रश्नाने आरती एकदम विरघळून गेली. इतकावेळ खूप आनंदी असण्याचा आव आणणारी ती, डोळ्यातून ओघवणाऱ्या अश्रूंना लपवत लटकेच हसत, ठीक आहे म्हणाली!!
मग प्रशांतने तिला तिच्या बद्दल बरेच प्रश्न विचारले आणि तिनं त्याला दिलेल्या प्रत्येक उत्तराने प्रशांत खूपच खजील होत होता.
शेवटी प्रशांत तिच्यावर चिडून जाऊन तिला म्हणतो, "अग,
तुझा नवरा तुला काहीच वेळ देत नाही. स्वतःच्या कामात इतका व्यस्त असतो,सगळी जबाबदारी तुझ्या अंगावर ढकलून तो स्वतः स्वतःच्या करियर मध्ये इतका पुढे गेला ,तर तुला त्याला कधीही जाब विचारावासा नाही वाटला का ग?"
त्यावर अत्यंत शांतपणे आरती त्याला सांगते,"जाब विचारायला त्याला माझ्याशी बायको म्हणून वेळ तर हवा" प्रशांत तीला काही बोलणार इतक्यात स्टेजवरून कोणी तरी आवाज दिला "अहो मिस्टर अँड मिसेस सहस्त्रबुद्धे जरा इकडे या स्टेजवर." आणि या आवाजाने प्रशांत भानावर आला.
आरती !! कॉलेजमधली त्याची सगळ्यात जवळची आणि खास मैत्रीण, त्याचं पहिलं प्रेम, त्याच्या स्ट्रगलची एकमेव साक्षीदार, त्याचा भरभक्कम आधार, त्याच्या सगळ्या दुःखाची, कष्टाची भागिदार आणि त्याच्यासाठी खूप आणि खूप काही असणारी अशा ती त्याची "बायको,"यश मिळालं की मी इतका तिच्या पासून दूर गेलो की, एका परक्या ठिकाणी मी तिच्याशी मनमोकळं बोलु शकलो.
आता प्रशांत स्वतःवरच खूप खजील झाला आणि त्याला त्याची चूक उमगली होती .
कार्यक्रम संपल्यावर आरती आणि प्रशांत गाडीत बसून पुण्याकडे रवाना झाले त्यावेळी आरतीने गाणं लावलं..
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गात आहे.....
सौ सुषमा दडके
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा