गूढ

लघुकथा


सुहासने वाड्याचा दरवाजा ढकलला आणि करर्रर्रर्रर्र आवाज होत तिथल्या शांततेचा भंग झाला.
"कोण?," राधाकाकूने बसल्या जागेवरूनच विचारले.
"राधा काकू, अगं, मी आलोय, सुहास."
"सुहास...," त्याला समोर बघून पुन्हा दुःखाचा उमाळा फुटला आणि काकू रडू लागल्या.
"फार उशीर केलास बाळा, संपलं सगळं."
सुहासलादेखील गलबलून आले होते. मोहनकाकांना जाऊन आज 15 दिवस झाले होते. राधाकाकू त्यांच्या फोटोसमोर बसून दुःख आवरण्याचा प्रयत्न करीत होत्या.

तेवढ्यात खाडकन दरवाजा उघडला आणि बंटी आत येऊन राधाकाकूंना धमकावू लागला.
"ए काकी, बऱ्याबोलानं सांग कुठं ठेवला हाय तो कागद बुढ्यानं?जास्त हुशारी नाय करायची आपल्यासंगं, नायतर तुला बी पाठवीन तुया बुढ्याजवळ."
" तुला सांगितलं ना, नाही माहिती मला कागद वगैरे काही. कसं पटवून देऊ तुला," राधाकाकू पुन्हा रडू लागल्या.
"बंद कर तुझी नाटकं. 2 दिवसाचा वेळ देतो, चुपचाप कागद द्यायचा नाहीतर...."
"नाहीतर काय रे...ही कुठली पद्धत आहे मोठ्यांशी बोलायची? काकूंच्या वयाचा तर मान ठेव बंटी," सुहास चिडला.
"तू आमच्यामधे पडायचं काही काम नाही बाबू," सुहासला धमकावत बंटी काकू कडे खुनशी नजरेने बघत निघून गेला.

डोक्यावर हात मारत काकू सुन्न होऊन बसल्या. ताण सहन न झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

"काकू, तुम्ही खोलीत जाऊन आराम करा बरं, मी आलोय आता, तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका. चला,मी नेतो खोलीत तुम्हाला." काकूंना खोलीत झोपवून सुहास बाहेर थांबला. त्याला कळत नव्हते की नेमकं काय सुरू आहे आणि काय झालंय.

इकडे काकू सुद्धा सुहासचाच विचार करीत होत्या,
"रक्ताचं नातं श्रेष्ठ असं म्हणतात, पण गंमत बघा. तो बंटी, रक्ताच्या नात्याचा पण जीवावर उठलाय आणि हा सुहास...कुठलं नातं म्हणून इतका काळजी घेत आहे?"

सुहास, मोहनकाकांच्या जिवलग मित्राचा मुलगा. शेजारीच राहायचे त्यामुळे सुहास त्याच्या घरापेक्षा मोहन काकांकडे जास्त रमायचा. काका त्याचे खूप लाड पुरवायचे. काका-काकूंना स्वतःचं मूल नव्हतं त्यामुळे सगळी माया सुहासवर रीती व्हायची. काकू त्याचे खाण्यापिण्याचे लाड पुरवायच्या. काकांचा तर तो मित्रच झाला होता. त्याला पार्टनर म्हणून ते हाक मारायचे.

मोहनकाका म्हणजे रसिक व्यक्तीमत्त्व. देशोदेशीच्या प्रसिद्ध पेंटींग्जचे दिवाने. फक्त चित्रच नाही तर त्याचा चित्रकार, त्याने काय विचार करून चित्र काढलं असेल असा सगळा अभ्यास त्यांचा असायचा. सुहासला ते ऐकवत आणि तोही उत्सुकतेने त्यांचा श्रोता बनायचा.

नंतर काही वर्षात ते हा शेजार सोडून दुसरीकडे राहायला गेले. सुहास मोठा होत होता, तसा बिझी राहू लागला आणि साहजिकच काका काकूंकडे येणे कमी झाले. आता तर काही वर्षांपासून तो अमेरिकेत स्थायिक झाला होता. सुट्टीत म्हणून आला आणि काकांबद्दल कळले तेव्हा न राहवून काकूंसाठी तो आला होता.

"काकू, चहा घेता का थोडा, बरं वाटेल तुम्हाला," गरम चहा घेऊन सुहास खोलीत गेला. चहाने काकूंना तरतरी वाटू लागली.

हळूच सुहासने विषय काढला,"काकू, काय झाले आहे नेमके? कोणता कागद मागत होता बंटी?"

"तुला तर माहीतच आहे,बंटी म्हणजे तुझ्या काकांच्या मोठ्याभावाचा मुलगा. वडलांसारखाचं हा सुद्धा गुंड प्रवृत्तीचा. आमच्या भाऊजीचं आणि त्यांच्या वडिलांचं म्हणजे माझ्या सासरेबुवांचं कधीच पटलं नाही. सासरे पापभिरू आणि भाऊजी वाईट संगतीला लागून बनलेले कुख्यात गुंड. त्यांच्या वडिलांशी कधीच चांगले वागले नाहीत.     

इथं या राहत्या वाड्यात जुगाराचा अड्डा सुरू करायचा होता त्यांना आणि ते मनसुबे ओळखून माझ्या सासऱ्यानी हा वाडा बक्षिस पत्र करून तुझ्या काकांना देऊन टाकला. "

सुहास एकाग्रतेने ऐकत होता.

"कायद्याची भीती म्हणा किंवा तुझ्या काकांचा दरारा, भाऊजींचे कुटुंब दुसरीकडे गेले. अचानक गेल्या वर्षापासून हा उपटसुम्भ पुन्हा त्रास द्यायला लागला. याला आता इथे गैरधंदे करण्यासाठी ही जागा बळकवायची आहे. बक्षीसपत्र हडप करून, नाहीसं करून, वारसाहक्क दाखल करायचा आणि वाड्यातली जागा मिळवायची असा याचा कट आहे."

"काकांना पण खूप त्रास दिला याने. पण त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितले की बक्षीसपत्र कुठे लपवले आहे ते. अगदी मला सुद्धा माहीत नाही."

"तुम्हालाही माहिती नाही? मग तर फावलंच समजा बंटीचं. तो सरळ दावा सांगेल आणि जागा बळकावेल. तो कागद सापडायलाच हवा काकू," सुहास म्हणाला.

"माझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन बंटी माझ्याकडून तो कागद मिळवेल असे काकांना वाटायचे म्हणून मला सुद्धा काही सांगितले नाही. वेळ आली की सांगेन, एवढंच म्हणायचे. आणि बघ, या दुष्टानेचं वेळ साधली. इतका त्रास दिला काकांना की ताण सहन न होऊन ते एकाएकी कोसळले आणि...." हुंदके देत त्या रडू लागल्या.

"शांत व्हा काकू, रडू नका. शेवटच्या क्षणी काका काही बोलले होते का? कागदासंदर्भात?"

"नाही, काय बोलणार ते. इतकं अचानक झालं सगळं. आणि इतका ताण होता मनावर की ते असंबद्ध बोलू आणि वागू लागले. बंटी सतत होताच इथे. काकांकडून काही माहिती मिळते का ते ऐकायला. काका मात्र पेन आणि कागद मागत होते. कागदावर चार ओळी खरडल्या आणि...आणि ती हसली, आणि ती हसली....असं काहीसं बडबडत त्यांनी कायमचा निरोप घेतला.त्यांनी लिहिलेला कागद, कवितेच्या ओळी होत्या, बंटीने खदाखदा हसत चुरगळून फेकला, म्हातारा वेडा होऊन गेला म्हणत, हसत निघून गेला."

"काकू तो कागद आहे का?"

"हो, थांब देते. त्यांची शेवटची निशाणी म्हणून जपून ठेवला आहे मी," काकूंनी ड्रावरमधून कागद काढून दिला.


"मनामनांवर राज्य करुनी
अनेक हृदयी वसली
इटलीवाली जगभर फिरली
आणि गूढ हसली
....आणि... ती गुढ हसली।"

या ओळी कागदावर लिहिलेल्या होत्या.

"मानसिक संतुलन बिघडेल इतके कमजोर काका कधीच नव्हते. काहीतरी लपलंय या शब्दांत. पण काय? बक्षीसपत्रा संबंधी तर नसेल ना? नक्कीच, काकांनी त्याचबाबतीत काहीतरी हिंट दिली आहे," सुहास विचार करत होता.

"आणि ती हसली म्हणजे नेमकं कोण हसलं? आणि इटलीवाली कोण?," विचार करता करता त्याला काहीतरी सुचले आणि "ओहह, येस.... काका इज जिनियस काकू," असे म्हणत धावतच तो दिवाणखान्यात गेला.

तिथे इटलीवाल्या लिओ नार्दो दा विंची चे जगप्रसिद्ध चित्र मोनालीसा दिमाखात वाड्याची शोभा वाढवत होते. त्याने ती फ्रेम उघडली आणि कागद मिळतो का ते शोधू लागला. काकू पाठोपाठ आल्याचं होत्या.

"काही फायदा नाही सुहास, काही नाही सापडायचं तिथे. बंटीने गेल्या 8 दिवसात वाडा पिंजून काढला त्यातून हे चित्र पण सुटले नव्हते. काही नाही मिळालं त्याला."

"असं कसं होईल? काहीच नसेल तर मग 'आणि ती हसली' चा काय अर्थ?" सुहासचे विचारचक्र सुरू होते.

काका लिओ नार्दो द विंची चे खूप मोठे फॅन होते. त्याच्याबद्दल सगळंकाही त्यांनी अभ्यासलं होतं. त्याच्यावर लिहिलेलं प्रत्येक पुस्तक त्यांच्या संग्रही होतं. त्याच्या, त्याच्या चित्राच्या कहाण्या कितीतरीदा सुहासला त्यांनी ऐकवल्या होत्या. आणि त्यामुळेच नक्कीच हा क्लू दिला आहे काकांनी असे सुहासला वाटू लागले होते.

"काय बरं म्हणत होते काका?...आणि ती हसली, आणि ती हसली," असे पुटपुटत तो मोनालीसाच्या चित्रासमोर उभा राहिला. बारकाईने बघताच त्याच्या लक्षात आले की या चित्रातली मोनालीसा थोडी जास्तच रुंद हसते आहे आणि त्यामुळे गूढ वाटते आहे.

त्याने चित्र बाहेर काढले आणि तो बघतच राहिला. काकांनी अगदी बेमालूमपणे तिच्या ओठांत एक छोटीशी खोबण करून त्यांत एक छोटीशी चावी ठेवून तिला पूर्ववत पेंट करून घेतले होते पण या सगळ्यांत तिचे हास्य जरासे रुंद आणि गूढ बनले होते.

सुहास आनंदाने ती चावी घेऊन धावत गेला. त्याला माहिती होते ती कशाची आहे कारण ती चावी लहानपणापासून त्याच्या ओळखीची होती.

तो धावतच बुकशेल्फ कडे गेला. त्यातून त्याने लिओ नार्दो द विंची असं लिहिलेलं एक मोठ्ठं विश्वकोशासारखं पुस्तक काढलं आणि त्याला चावी लावली.

होय, पुस्तकाला चावी लावली. कारण ते पुस्तक नाही तर पुस्तक वाटेल अशी एक पेटी होती. अर्थातच, त्यातच ते बक्षीसपत्र सापडलं.

"काकू आता या वाड्याला कुणी धक्काही लावू शकत नाही. याचं पावित्र्य अबाधित राहणार,"
सुहासने म्हणताच कितीतरी दिवसांनी काकूंच्या चेहऱ्यावर हास्य आले होते आणि त्या दोघांकडे बघून ती मोनालीसाही जणू पुन्हा रुंद हसली.

© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती

कथा: गूढ

विषय: आणि ती हसली

राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

टीम: अमरावती