गुड्डीचा मामा

Guddi's maternal uncle

गुड्डीचा मामा

मी आज तणतणत वर आले.लेकीलाही ओढत आणलं. हे म्हणाले,"अगं शरे काय झालं एवढं वैतागायला? लेकीने तोंडाचा भोंगा सुरु केला होता."

मी म्हंटलं,"मला नाही रहायच्या या चाळीत. ते खालचे ग्रुहस्थ सारखे गुड्डीला हात दाखवून बोलवून घेतात आणि ही गधडी..हिला कितींदा सांगितल नको जाऊ तरी माझा डोळा चुकवून पसार. तुमची तर काय नेहमीच ध्यानावस्था असते. आपली लेक कुठे गेली..काय करते..काही देणंघेणं नाही. मी घरात मरमर मरायचं..तोटीतलं पाणी तोंडाने ओढायचं नि मग कुठे थेंबथेंब पाणी येतं ते गोळा करायचं..त्यातचं स्वैंपाक,भांडीकपडे..नि तुम्ही आरामात बसणार काय देसाईसाहेब,कसं काय कदमसाहेब हाकारत."

"अगं बाई फक्त रविवारचाच असतो नं मी घरी. तेही बघवत नाही का तुला! मग बसतो जाऊन खालच्या न्हाव्याकडे नाहीतर मोच्याशेजारी."

"झालं..विषय काय नि नेताय कुठे! अगदी आईवर गेला अहात तुमच्या. भांडणात तुमचा हात कोणी धरु शकणार नाही."

"झालं आता माझ्या आईवर आलीस."

"हो येणार नाही तर काय. त्यांच्यामुळेच तर चाळीतलं ऐसपैस घर सोडावं लागलं. त्यांच्या धाकट्या चिरंजीवाला बिर्हाड थाटायचं आहे नं त्या घरात."

"अगं शरे,नाहीतरी वडीलोपार्जित घर ते."

"मग त्यावर आपला काहीच हक्क नाही?"

"असं म्हणाली का ती?"

"म्हणायला कशाला पाहिजे. भाडेकरुला बाहेर काढतात तसं बाहेर काढलन ना शेवटी. आमच्या लेकीचाही विचार नाही केला. त्या चाळीत चांगलं शेजारपाजार होतं. गुड्डी कुणाकडेही हक्काने जायची. हिंडतफिरत असायची. मला तिथे तिची मुळीच चिंता वाटत नव्हती पण इथं आल्यापासून पहातेय,पंधरवडा होत आला आता. गुड्डी दिसली की तो तळमजल्यावरच्या जिन्याजवळच्या खोलीतला माणूस खिडकीतून तिला हात दाखवतो. तिला बोलवतो. दिसतो कसा भयाण..तारठलेले डोळे,दाढीचे खुंट वाढलेले. 

रात्रपाळीला आहे वाटतं. दातात पिन घालून दात कोरत बसतो. त्याची बायको तुळशीला पाणी घालायला तेवढी घरातून बाहेर येते. मुलबाळ नाही वाटतं त्यांना. ते काही असो,माझ्या लेकीला कोणी असं बघितलेलं,हाकारलेलं मी खपवून घेणार नाही. तुम्ही दुसरीकडे जागा बघा.चार पैसे जास्त भाडं असेल,पाणी बाहेर असेल तरी चालेल."

एव्हाना गुड्डी तिच्या झग्याने डोळे पुसून बाजूच्या पिंकीच्या घरी रवाना झाली होती. ही पिंकी म्हणजे एक अजब रसायन. गुड्डीपेक्षा वर्षाने मोठी पण भारी चतुर. गुड्डीचीच भातुकली लागते तिला खेळायला. भातुकलीतली लाटणी,तवा गायब आहे. पिंकीला विचारलं तर पिंकीची आई भांडायलाच आली. असो. मला रहायचंच नाहीए या शेजाऱ्यांमधे. उगा थोडक्यासाठी वैर का घ्या!

आमच्या कुंडीत छान गावठी गुलाबाची फुलं फुलतात पण पहाटेच कोणीतरी फुलं खुडून नेतं. रात्रीचं ड्रमच्या बाजूला खिळ्याला लटकवलेलं टमरेल खाली आलेलं असतं आपोआप. कधी मी बाहेर गेले तर ड्रमातलं अर्धअधिक पाणीही गायब होतं. वाटतं सरळ उठून माहेरी जावं पण माहेरी आता पुर्वीसारखी माझी बडदास्त होत नाही. सगळं वहिनीच्या इशाऱ्यावर चालतं. माझ्या आईवडिलांना सांभाळते हेच नशीब. 

इथल्या बाजारात संध्याकाळी गेलो होतो तिघंही,चालतच. गाडीबिडी नाही आमच्याकडे. मी यांच्या आवडीची लेमन कलरची साडी नेसले होते. गुड्डीला गुलाबी फ्रॉक घातला होता. गुड्डी तिच्या हातातली बाहुली घेऊनच आली होती. काय ह्या बाजारात गर्दी! फक्त पैसे पाहिजे. डोळे दिपवतील असे नेकलेस,मोत्यांचे झुबे,कर्णवेली,पैंजण,आणि बांगड्या अहो किती नक्षीदार,खड्यांवाल्या वेगळ्या. 

मी गुड्डीसाठी नेलपेंट घेतलं. माझ्यासाठी लिपस्टिक घेतली. बांगड्या घ्यायच्या होत्या मनात पण म्हंटलं पुढच्या महिन्यात बघू. एक कोबीचा गड्डा, भेंडी,मिरच्या,कोथिंबीर, नारळ,लसूण असं सगळं घेतलं. मी भाजी घेत होते.  हे पैसे देत होते इतक्यात मी आजुबाजूला पाहिलं गुड्डी..गुड्डी गेली कुठे! माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. 

हे गुड्डीला शोधत होते. मी तिथेच फुटपाथवर बसून हाकारत होते. गुड्डी गं..ए गुड्ड्या..इतक्यात माझं लक्ष समोरच्या बसस्टॉपवर गेलं. तिथल्या फुगेलाल्यासमोर गुड्डी उभी होती. वरती आकाशात उडणारे रंगीत फुगे बघत होती. फुगेवाला बासरी वाजवण्यात मग्न होता. मी धावत जाऊन तिला पकडलं. मी रडत होते..बराच वेळ रडत होते.

 गुड्डीला काहीच कळत नव्हतं. तिला तो काठीवाला गोल फुगा हवा होता. यांनी तिला तो घेऊन दिला..निळा फुगा..त्यावर लाल पिवळे ठिपके होते. आत वाळू घातलेली जिचा आवाज येत होता. रस्ता क्रॉस केला नि आम्ही घरी आलो. आता येतानाही गुड्डीने त्या खिडकीतल्या माणसाला फुगा दाखवला.

घरी आलो. यांनीच खिचडी बनवली. पापड भाजले. रात्री मला म्हणालेही,"किती त्रागा करुन घेशील? थोडी उसंत दे मला निदान एक वर्षभराची. मी बघतो थोडं मोठं घर. आता विकतच घेऊ,भाड्याचं नको." यांच बोलणं ऐकून मी थोड्या वेळाकरता का होईना खूष झाले व यांच्या कुशीत शिरले. 

देव्हाऱ्यातल्या दिव्याचा मंद प्रकाश खोलीभर पखरला होता. मोरीच्या कठड्यावरली टाकी,हंडे,कळशा सगळं उठून दिसत होतं. गोधडीवर आम्ही तिघं. बाजूला कठडा..त्याखाली काही डबे नीट लावलेले वरती गेस शेगडी,तेलाची बुधली,भिंतीला अडकवलेलं कपबशीचं स्टँड,ताटवाट्यांच स्टँड,कोपऱ्यात कपाट हँडलवालं,एका फळीवर रेडिओ.

या पाच वर्षात एवढंच काय ते जमवलेलं..काड्या काड्या जमा करुन चिमणाचिमणी घरटं बनवते तसाच हा आमचा संसार. फरक इतकाच की हे घर भाड्याचं होतं. केव्हातरी सोडावं लागणार होतं त्यामुळे मला ते आपलंसही वाटत नव्हतं. 

सासूचं घर वडिलोपार्जित होतं. ते भाड्याचं नव्हतं त्यामुळे पाच वर्ष का होईना मी माझं समजून वावरत होते त्या घरात. धाकट्या दिरांची बदली झाली. ते पुण्याहून इथे येणार म्हंटल्यावर सासूने आम्हाला टाटा केला. एवढं सोप्पं का असतं आपलं मानलेलं घर सोडून जाणं? मी काय चुकीचं बोलते? वाईट आहे का मी? एखाद्या वास्तुला जीव लावणं वाईट आहे का? बरं राहिलो असतो थोडे दिवस एकत्र तर.. असे अनंत विचार करत माझा डोळा लागला.

******

आज मी त्या दाढीवाल्या बाबाशी भांडले. माझ्या गुड्डीला जिलबी दिली त्याने खायला. अहो,आजकाल कोणाचं काय खरं! रेडिओवर एवढं ऐकतो आपण. हा मनुष्य गुड्डीलाच का देतो जिलबी. पिंकीला का नाही साद घालत..तिला का नाही देत?

जेव्हा बघावं तेव्हा माझ्या गुड्डीला भुलवत असतो. तिला तरी रोज किती मारु? बरं याची बायको एकदम शांत. काहीच बोलत नाही. घरी आले नि कपडे पिळून वाळत घालत होते इतक्यात गुड्डीने तिच्या हातातला रुपया गिळला. ती घाबरीघुबरी झाली. मला काहीच कळेना. मी जोरात रडू लागले,ओरडू लागले. आजुबाजूची लोकं गोळा झाली. 

इतक्यात तो माणूस..हो तोच तो दाढीची खुंटवाला, गंजीफ्रॉक व पटेऱ्या चड्डीवर आला. त्याने गुड्डीच्या फोंडकीत मारलं नि तो रुपया खाली पडला.

 गुड्डीच्या त्याने पाप्या घेतल्या. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मला काहीच कळत नव्हतं. त्याने रागाने माझ्याकडे पाहिलं,डोळ्यातलं पाणी पुसलं नि आला तसा गेलासुद्धा. मी गुड्डीला कुशीत घेतलं. शेजारी ओरडले मला. तिच्या हाताला मिळतील असे पैसे,धारदार वस्तू ठेवू नको म्हणाले.

रात्री यांना गुड्डीची करामत नि त्या माणसाने केलेली मदत सांगितली. यांनी गुड्डीला नि मला अगदी जवळ घेतलं नि देवाचे आभार मानले.

*****

आज दुपारी मी नुकतेच लादी पुसून मोकळी झाले होते. टिचभर लादी पण पुसली की किती बरं वाटतं! घर आपल्याकडे पाहून समाधानाने हसतय असं जाणवतं. गेलरीत वाळत टाकलेलं टॉवेल घेऊन घरात येत होते. इतक्यात शु शु.. म्हंटलं कोण बोलवतय कोणाला? परत तसंच आता सोबत ताई अशी मंजुळ हाक. मी हाकेच्या दिशेने पाहिलं. तीच..तीच जिन्यालगतची तळमजल्यावरची खोली. तिथल्या गेलरीतून ती दाढीवाल्याची बायको मला बोलवत होती. मी बोटं छातीला लावून खुणेनेच विचारलं,"मी का?"

तीही खुणेनेच या म्हणाली. गुड्डी पावडरच्या पफसोबत खेळत होती. तिला कडेवर घेतली. डांबरट आहे पक्की. तो पफ खाली ठेव म्हंटल तर ऐकेना. पावडरीने माखायला भारी आवडतं हिला. घराला कुलुप लावलं नि गेले खाली. जिना उतरताना मनात विचार येत होते,"का बरं बोलवलं असेल? भांडतेय की काय माझ्याशी? मी काय केलं? अशा प्रश्नांच्या भोवऱ्यात असतानाच तिच्या दारापाशी आले. त्या बाईने आत बोलावलं मला. 

अगदी टापटीप घर. एका बाजूला खाट,कपाट,वरती पोटमाळा..हो शोकेसपण होती त्यांच्याकडे. तिने मला पाणी दिलं. मी लुकलुकत्या डोळ्यांनी तिने बनवलेल्या मण्यांच्या समया,बाहुल्या,ससे,चिमण्या पहात होते. किती सुंदर! माझ्या तोंडातून आपसूक तिच्या कलेचं कौतुक निघालं. 

ती तोंड भरुन हसली. मला म्हणाली,"मला वहिनी म्हणशील?"

मी हो म्हंटलं. आजुबाजूला पाहिलं. वर माळ्यावर तो माणूस घोरत होता..संथ लयीत.

ती म्हणाली,"घाबरु नकोस गं. इतक्यात नाही उठायचे हे." मला अपराध्यासारखं वाटलं.

"थांब तुला एक फोटो दाखवते" म्हणत तिने कपाटातली एक फोटोफ्रेम बाहेर काढली. क्रुष्णधवल फोटो होता तो. त्यात तो किती रुबाबदार दिसत होता आणि डाव्याबाजुला इरकली नेसलेली ती आणि कडेवर ..कडेवरची मुलगी..अगदी..अगदी माझ्या गुड्डीसारखीच..नव्हे गुड्डीच आहे असं क्षणभर कुणालाही वाटावं अशी..डोळ्यात काजळ भरलेलं,केसांचा पोनी,कानात मुदी,खणाचा परकरपोलका नि पायात पैंजण. 

मला काय बोलायचे ते सुधरेना. तीच म्हणाली,"ही मुलगी आमची. सात वर्ष झाली त्या घटनेला.

 आम्ही गावी गेलो होतो. तिथे जवळच असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलो होतो. वैशालीला किल्ला बनवायला फार आवडायचं. तिचे बाबा तिला किल्ला बनवून द्यायचे. दोघंही खूप खेळायचे. असंच एकदा ते किल्ला बनवण्यात गर्क होते. मी वैशालीसोबत लाटा पायांवर घेत होते. इतक्यात एक जोराची लाट आली.

 पापणी मिटायच्या आत वैशाली लाटेसोबत दूर निघून गेली. तिच्या वडलांनी पोहत जाऊन पकडलं तिला पण ती निष्प्राण होती. चुकी माझीच पण शिक्षा हे भोगताहेत. वैशू गेल्यापासून असे झाले आहेत.

 केसांच,दाढीचं,खाण्यापिण्याचं कशाचं भान नाही त्यांना. तुम्ही आल्यापासनं तुमच्या गुड्डीला पाहून थोडे तरतरीत दिसताहेत. तुमच्या गुड्डीत ते आमच्या वैशूला शोधतात. वाईट नाहीत गं हे. खूप चांगले आहेत मनाने. तू मुळीच त्यांची भिती बाळगू नको." 

******

माझी गुड्डी आता पंचवीस वर्षाची झाली. ती चाळ आम्ही सोडली नाही. दुसरं घर घेतलं पण ते भाड्याला लावलं. तो तळमजल्यावरचा गुड्डीचा मामा आता हक्काने येतो आमच्याघरी. मी राखी बांधते त्याला. आता दाढी वगैरे करुन टापटीप रहातो. गुड्डीशिवाय पान हलत नाही त्या दोघांच. या घरात आले तेव्हा या माणसाबद्दल मी काय विचार करत होते? आता मागे वळून पाहिलं की माझं मलाच हसू येतं. 

-----सौ.गीता गजानन गरुड.