गृहस्वामी भाग २

कथा वेगळ्या संसाराची

गृहस्वामी भाग २


मागील भागात आपण पाहिले कि नीरजला चांगली नोकरी नव्हती म्हणून संहिता दुसर्‍या शहरात बदली करून घेते.. आता पाहू पुढे काय होते ते..



" कसले मस्त घर आहे ना हे?" संहिता म्हणाली..

" हो.. अगदी तुला शोभेल तसे.." नीरज हसत म्हणाला..

" नीरज, आपले वैवाहिक आयुष्य सुरू व्हायच्या आधी मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे.. देशील?"

" देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही.. तरिही तू माग.. मी प्रयत्न करतो.."

" मला दोन गोष्टी हव्या आहेत.. एक म्हणजे तू आपल्या दोघांमध्ये पैसा आणायचा नाही.."

" अच्छा.. आणि दुसरी?"

" तू स्पर्धा परिक्षा द्यायला सुरुवात करायचीस.. तुझ्यात ते कॅलिबर आहे.. तू आधीच दिल्या असत्यास तर नक्कीच तुझी निवड झाली असती.."

" अग पण त्याचा काही भरवसा नसतो ग.."

"एक वर्ष प्रयत्न करशील? माझ्यासाठी.. प्लीज.."

" आता बायको समोरून अशी ऑफर देत असेल तर कोण नाही म्हणेल?" असे म्हणत नीरजने संहिताला जवळ घेतले..

    संहिता आणि नीरजचा संसार सुरू झाला.. संहिता सकाळी उठून स्वयंपाक करायला जायची.. तर त्याच्याआधीच नीरज सगळी तयारी करून द्यायचा.. कामवाल्या मावशी लादी, भांडी करून जाईपर्यंत थांबायचा.. त्यानंतर घरातली किरकोळ कामे करून अभ्यासाला बसायचा.. सगळे सुरळीत चालू होते.. एक दिवस संहिता ऑफिसमधून आली तोच थकलेली आणि आजारी अशी..

" काय ग, काय झाले? अशी का वाटते आहेस? सकाळी तर बरी होतीस.." 

" नीरज मला ना.." बोलता बोलताच संहिताला गरगरल्यासारखे झाले.. त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडले.. संहिता शुद्धीवर आली आणि रडायला लागली..

" काय झाले? सांगशील का आता?" नीरज थोडा चिडला होता..

" मला माफ कर.."

" पण कशासाठी? ते तर सांग.."

" नीरज मी गरोदर आहे.. गोळ्या घेण्यात बहुधा चूक झाली माझ्याकडून.."

" बस एवढेच ना? मी किती घाबरलो होतो.."

" पण आपले प्लॅनिंग?"

" अग आपले बाळ महत्वाचे कि आपले विचार? असाही माझा अभ्यास सुरूच आहे.. माझी खात्री आहे कि मी परिक्षा नक्की पास होईन.."

   संहिताच्या गरोदरपणात नीरजने तिची पुरेपूर काळजी घेतली.. दोघांच्याही घरचे तसे नाराजच होते त्यामुळे त्यांनी कोणी उत्साह दाखवला नाही.. मग नीरजनेच तिचे डोहाळजेवण वगैरे केले.. दोघांचेही नातेवाईक आले होते पण बाळंतपण आम्ही करतो असे कोणीच बोलले नाही.. संहिताला या गोष्टीचे खूपच वाईट वाटले.. ती नीरजच्या कुशीत शिरून रडायला लागली..

" का रडते आहेस? मी आहे ना? आपण करू सगळे मॅनेज.."

" अरे पण ते बाळाला सांभाळणे वगैरे.."

" तू का टेन्शन घेतेस? परदेशात नाही का आईबाबा आपल्या मुलांसाठी कोणावर अवलंबून नसतात. आपण हि तसेच व्हायचे.. आपले आईबाबा आपल्याशी बोलतात हेच भरपूर समजायचे.. कुणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवायची नाही.." संहिताने होकार दिला..

" नीरज उद्याच्या परीक्षेची तयारी झाली?"

" हो ग.. तू तर अशी बोलते आहेस जणू मी दहावीचा विद्यार्थी आहे.."

" काहिही.. पण तुझ्या आयुष्यातली हि महत्वाची परिक्षा आहे.. म्हणून थोडेसे टेन्शन रे.."

" नको टेन्शन घेउस.. मी आतापर्यंत जेवढे पेपर्स सोडवले आहेत मला चांगले गेले आहेत.. मला खात्री वाटते आहे मी पास होईन म्हणून.."

" हो रे.. नीरज.. माझ्या पोटात दुखते आहे रे.."

" अग पण डॉक्टरांनी पुढच्या आठवड्यात सांगितले होते ना?"

" हो.. पण ते काय माझ्या हातात आहे का? आई ग.. "

नीरज संहिताला घेऊन तसाच डॉक्टरांकडे धावला..

" त्यांना कळा सुरू झाल्या आहेत.. आपण आज रात्रभर वाट बघू .." हे ऐकून संहिताने नीरजला जवळ बोलावले..

" नीरज.. तू जा परीक्षेला.. इथे डॉक्टर, नर्स आहेत.."

" तू वेडी आहेस का? तुला अशा परिस्थितीत मी कसा सोडून जाईन?" रात्रभर नीरज संहिताजवळ बसून होता.. तिचे हात हातात धरून तिला आधार देण्याचा प्रयत्न करत होता.. सकाळी त्यांच्या जीवनात एका युवराजाचे आगमन झाले.. त्या बाळाला हातात घेताना नीरजला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.. शुद्धीवर आल्यावर संहिताने त्याला परीक्षेची आठवण करून दिली.. पण वेळ निघून गेली होती..

" आय ॲम सॉरी नीरज.."

" आता कशासाठी?"

" आमच्यामुळे तुझी संधी गेली. तू जायला हवे होतेस परीक्षेला.."

"तुला एकटीला सोडून? तुला तसे सोडून गेलो असतो तर आयुष्यभर तुझ्या नजरेला नजर देऊ शकलो नसतो.. आणि खरं खरं सांग.. तुला मी जवळ नको होतो?"

" असे नाही रे.. पण.."

" आता पण बीण सोड आणि आपल्या बाळाकडे बघ.. परीक्षा आज ना उद्या परत देता येईल पण त्याचा जन्म हि एकदाच होणारी गोष्ट आहे ना.."

   पण नीरजला परत परीक्षा देताच आली नाही.. संहिताला प्रमोशन मिळत होते.. पण त्यासाठी तिला बाळंतपणाच्या रजेनंतर लगेच कामाला जाणे गरजेचे होते.. नीरजने प्रेमाने त्यांच्या बाळाची ध्रुवची जबाबदारी घेतली.. ध्रुवपण नीरजशी खूपच जोडला गेला होता.. त्याचे खाणेपिणे, शीशू यातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास सुरूच होता.. पण नंतरच्या परीक्षेच्या वेळेस ध्रुव खूप आजारी पडला आणि तो नीरजशिवाय राहिनाच.. परत एकदा परीक्षेला जाणे नीरजला जमलेच नाही..

" संहिता एक बोलू.." नीरजने शून्यात बघत विचारले..

" मला असे वाटते कि मी परीक्षेचा नाद सोडावा.."

" का रे?"

" बघ ना.. प्रत्येक वेळेस काहीतरी अडचण येते आहे.. आणि तसेही ध्रुवही माझ्याशिवाय रहात नाही.. मी तर पार्ट टाईम काहीतरी करायचा विचार करतो.."

" अरे पण तो कायमचा लहान राहणार आहे का?"

" तो कायमचा जरी लहान राहणार नसला तरी आता त्याला आपली गरज आहे हि गोष्ट विसरता येत नाही ना.. तुझे सध्या प्रमोशन झाले आहे.. तुला घरी वेळ देता येणार नाही.. मग आईबाबांपैकी कोणीतरी नको का त्याच्यासोबत? शेवटी पैसा हा आपण मुलांसाठीच कमावतो ना? मग त्यांच्याकडेच लक्ष देता येत नसेल तर पैसा काय कामाचा?"

" बरोबर आहे तुझे.. शेवटी दोघांपैकी कोणीतरी पैसा कमावणे आणि मुलांकडे बघणे गरजेचे आहेच ना.."

   आणि अशा रितीने दोघांचाही असा जगावेगळा संसार सुरू झाला.. नीरज ध्रुवला सांभाळून घरीच ट्युशन्स घ्यायला लागला.. त्याचे शिकवणे चांगले असल्यामुळेच त्याला खूप विद्यार्थीही मिळाले.. कालांतराने ध्रुवला उल्का नावाची बहिणही आली.. चौघांचे चौकोनी कुटुंब अगदी सुखी होते.. एका बाजूला नीरजच्या सहकार्याने संहिता मोठ्या पदावर पोहचत होती.. दुसरीकडे नीरज मुलांना सांभाळून त्याचे क्लासेस नीट चालवत होता.. बघता बघता दिवस सरत गेले.. आदर्श अधिकारी म्हणून संहिताचा सत्कार होता.. त्यासाठी सर्व कुटुंबाला बोलावण्यात आले होते.. नीरज संहिताच्या घरातल्यांनाही आमंत्रण होते.. सत्कार झाल्यानंतर संहिताला दोन शब्द बोलण्याची विनंती झाली.. तिने बोलायला सुरुवात केली..

" मी या सत्काराबद्दल तुमच्या सगळ्यांची ऋणी आहे.. पण खरे सांगायचे तर या पारितोषिकाचा खरा अधिकारी आहे माझा नवरा नीरज.. ज्याने पदोपदी मला सहकार्य केले.. स्वतःची प्रगती सोडून कुटुंबाला महत्त्व दिले.. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर पुरुषार्थाला धक्का लागतो म्हणून मला तरी सोडून गेला असता किंवा मला नोकरी तरी सोडायला लावली असती.. पण फक्त आणि फक्त त्याच्या सहकार्यानेच मी हे पद गाठू शकले आहे.. कारण ज्या पद्धतीने त्याने घराची सर्व जबाबदारी घेतली आणि यशस्वीरित्या पेलली आहे.. मला शक्यच झाले नसते.. आजही माझी मुले आईपेक्षा त्यांच्या बाबाला जास्त अटॅच आहेत.. आपली आई कामाला जाते.. काहीतरी महत्वाचे काम करते याची जाणीव त्याने मुलांना करून दिली.. या गोष्टींमुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होऊ नये अशी त्याने काळजी घेतली.. एखादी स्त्री घरच्या विवंचना नसतील तर काहिही साध्य करू शकते हे त्याने मुलांना शिकवलेच पण जगालाही दाखवून दिले.. हि गोष्ट सोपी नव्हतीच.. खूप जणांनी त्याला मला नावे ठेवली.. मुलांना चिडवले.. पण त्यातूनही आम्ही इथपर्यंत आलो आहोत.. पुढेही राहू.. म्हणूनच ह्या पारितोषिकाचा खरा मानकरी तोच आहे.."

संहिताचे दोन शब्द ऐकून बऱ्याच महिला अधिकाऱ्यांना तिचा हेवा वाटला.. दोघांच्याही वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली.. या सगळ्यापासून वेगळे ते चौघे एकमेकांच्या मिठीत विसावले होते..



कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई