गृहस्वामी

कथा आधुनिक नवर्‍याची


गृहस्वामी..


" कधी करायचे आपण लग्न? मी अजून माझ्या घरातल्यांना नाही थांबवू शकत.." संहिता नीरजला विचारत होती..
"अग पण माझ्या नोकरीचे अजून काही होत नाहीये.. तुला नोकरी लागली.. पण माझी दोन मार्कांनी गेली ग.." नीरज निराश झाला होता..
" अरे पण अजून किती वर्ष थांबू मी? काहीतरी तर निर्णय घेतलाच पाहिजे ना?" संहिता काकुळतीला आली होती..
" मग तू कर लग्न दुसर्‍या कोणाशीही. मला चालेल.." चेहरा कठोर करत नीरज म्हणाला..
" पण मला नाही ना चालणार.. माझे खूप प्रेम आहे रे तुझ्यावर.." संहिता रडत म्हणाली..
" मग थांब मला नोकरी लागेपर्यंत.."
" याच्यावर दुसरा काही उपाय नाही का शोधता येणार?"
" काय आणि कसला उपाय? गेली तीन वर्ष नोकरी शोधतो आहे चांगली.. पण काम होत नाहीये.. काय सांगू तुझ्या आणि माझ्या आईवडिलांना?" नीरज हताश झाला होता..
" अरे पण मला चांगली नोकरी आहे ना? आपण घेऊ ना चालवून.." संहिता नीरजची समजूत काढत होती.
" काय आणि कसे चालवणार?"
" आपण पळून जाऊन लग्न करू.. तुझे माझ्यावर प्रेम आहे का? ते फक्त सांग.."
" माझे तुझ्यावर प्रेम आहे, हे सांगायला पाहिजे?"
" मग तेच म्हणते मी.. तुला नोकरी असती आणि मला नसती तर आपण लग्न केलेच असते ना? मग आता का नको?"
" कारण समाजाला ते चालणार नाही."
" मग तू करत बस समाजाची आणि बाकीच्यांची पर्वा.. मी जाते निघून. करते कोणासोबत तरी लग्न.. आणि जगते जिंवतपणीच मरण.."
" नको ग असं बोलूस.. नोकरी नाही म्हणून सगळ्यांची बोलणी ऐकतो आहे.. तू जर सोडून गेलीस तर आयुष्यात काय राहील?"
" मग ऐक ना माझे.. आपण सध्या लग्न करू.. तू नोकरी शोधत रहा.. कमीत कमी आपण एकत्र तर राहू.."
" मला थोडा विचार तर करू दे.."
" आता नाही.. खूप वेळ दिला तुला विचार करायला.. आता इस पार या उस पार.. तुला रहायचे असेल माझ्या सोबत तर तसा मॅसेज कर.. नाहीतर मी बघते काय करायचे ते.."
नीरजला बोलण्याची संधीही न देता संहिता निघून गेली.. नीरज बागेत एकटाच विचार करत बसला.. नीरज आणि संहिता.. कॉलेजपासून एकमेकांसोबत असलेली मैत्री.. कॉलेज संपले.. मैत्री कमी होण्याऐवजी दोघांच्याही मनात प्रेमाची भावना फुलू लागली.. नंतर एकत्र केलेले पोस्ट ग्रॅज्युएशन.. त्यानंतर केलेली नोकरीची खटपट.. त्यात संहिताच्या प्रयत्नांना यश आले पण नीरजच्या येत नव्हते.. प्रत्येक वेळेस काही ना काही कारणाने त्याला चांगली नोकरी मिळत नव्हती.. आहे त्या नोकरीत अभिमानास्पद काहीच नव्हते.. म्हणून तो सध्या लग्नाला नाही म्हणत होता.. संहिताच्या घरच्यांचेही बरोबर होते.. तिचे शिक्षण पूर्ण झाले होते, चांगली नोकरी लागली होती.. त्यामुळे ते लग्नासाठी तिच्यापाठी लागले होते.. काय करावे हे नीरजलाही सुचत नव्हते.. त्याचा स्वतःवर विश्वास होता.. आज ना उद्या चांगली नोकरी मिळेल याची खात्री होती.. त्यासाठीच जिच्यावर खूप प्रेम आहे अशा संहिताला त्याला गमवायचे नव्हते.. त्याने तिला लग्नासाठी होकार द्यायचे ठरवले.. त्याला माहित होते कि हे सोपे नसणार आहे पण तरिही प्रेमासाठी त्याने हे करायचे ठरवले.. अपेक्षेप्रमाणेच त्याच्या घरातून नकार आला..
" म्हणजे आता तुम्ही आमच्या जीवावर लग्न करणार का?" वडिलांनी विचारले..
" नाही.. माझी आहे ती नोकरी करतोच आहे. संहिताची चालू आहेच."
" अच्छा.. म्हणजे आता बायकोच्या जीवावर जगणार का?"
" अहो, असे का बोलताय?" आईने मध्ये बोलायचा प्रयत्न केला..
" तुमच्यामुळेच हे झाले आहे.. आधीपासूनच लाडावून ठेवले नसते तर आज ही वेळच आली नसती.."
" पण मुले म्हणताहेत तर द्या ना परवानगी.."
"हो बरोबर आहे.. पळून जाऊन लग्न केले असते तर काय बोलू शकलो असतो आपण.. घाला.. जो घालायचाय तो गोंधळ घाला.." चिडून बाबा आत निघून गेले..
"आई, तुलाही माझे चुकते आहे, असे वाटते आहे?" नीरजने पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले..
" नाही रे.. तुझे हि लग्नाचे वय झाले आहे.. मुलगी चांगली आहे.. फक्त तुझी नोकरी बरी असती तर सगळे किती छान झाले असते.. जाऊ दे.. आपण लग्नाची तयारी करू.."
" आमचे रजिस्टर लग्न करायचे ठरले आहे.."
" बरे.. मग तिच्या घरी बोलणी?"
" आधी मी जाऊन बोलतो.. मग तुम्ही भेटा.."
ठरल्याप्रमाणे नीरज संहिताच्या घरी गेला.. तिने आधीच घरच्यांना कल्पना दिली होती.. तिथेही त्याचे स्वागत थंडेच झाले..
" बाबा, हा नीरज.. नीरज माझे आईबाबा.." संहिताने ओळख करून दिली.. तिच्या वडिलांनी बसा सांगायचेही कष्ट घेतले नाही..
" तुम्ही बसा.. मी चहा करून आणते." असे म्हणत संहिताची आई आत गेली.. काय बोलावे हे नीरजला सुचत नव्हते.. खूपच अवघडल्यासारखी त्याची परिस्थिती झाली होती.. त्याने संहिताकडे पाहिले.. तिने बोलायला सुरुवात केली..
" बाबा, मला नीरजशी लग्न करायचे आहे.."
" हे तु मला कालही सांगितले होतेस.."
" हो.. म्हणूनच आज त्याला मी तुम्हाला भेटायला बोलावले आहे.. तुम्हाला काही बोलायचे असेल तर."
" मला जे काही बोलायचे होते ते काल बोलून झाले आहे.. बायकोच्या जीवावर जगू इच्छिणाऱ्या माणसाशी संबंध जोडलेले मला आवडणार नाही." तिच्या वडिलांनी नीरजकडे जळजळीत कटाक्ष टाकला..
" सर.. एक मिनिट.. मी सुद्धा संहिता एवढाच शिकलो आहे.. छोटी का होईना नोकरी आहे.. यापेक्षा चांगली नोकरी मी सुद्धा शोधत आहेच.. त्यामुळे तुम्हाला जर असे वाटत असेल कि मी तिच्या जीवावर जगणार आहे तर तो तुमचा गैरसमज आहे.. माझे तिच्यावर प्रेम आहे म्हणून इथे तुमच्याशी बोलायला आलो होतो. याउप्पर तुमची मर्जी. जातो मी."
" थांबा जरा.. जाऊ नका.." संहिताची आई आतून चहा घेऊन आली..
" नको काकू. "
" थोडासाच आहे.. बसा जरा.. अहो मी काय म्हणते.. संहिताने काल सगळे मला सांगितले.. बाकी सगळे चांगले आहे.. आणि नोकरी काय आज ना उद्या मिळेल चांगली. काय हरकत आहे मग लग्न लावून द्यायला?"
" तुमच्या जे मनात आहे ते ठरवा.. मग मला बोलू नका.."
नाईलाजाने का होईना दोघांच्याही घरातून लग्नासाठी परवानगी मिळाली.
" नीरज.. मी एक निर्णय घ्यायचा ठरवला आहे.." संहिता नीरजच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली..
" बोल.. मी सध्या फक्त सगळ्यांचे ऐकतो आहे.."
" आपण दुसर्‍या शहरात रहायला जाऊया? मला बदली मिळू शकते.. इथे राहिलो तर सगळे टोचून बोलतील. जे मला नाही सहन होणार.."
" पण माझी नोकरी?"
" तू तिथे पण शोधू शकशील ना.. निर्णय तू घे.. मी माझे मत सांगितले."
" तू म्हणतेस ते हि आहेच.. जाऊ आपण लग्नानंतर नवीन शहरात.. नवीन आयुष्याची सुरुवात करायला.." नीरजने होकार दिला..