गृहलक्ष्मी भाग २

घराची गृहलक्ष्मी होण्यासाठी तरसणार्या स्त्रीची कथा
गृहलक्ष्मी भाग २


" मीरा, अग काल रात्री अजयचा अपघात झाला.. म्हणून सगळे तिथे गेले आहेत.." शेखरने सांगितले.
" काही गंभीर आहे का?"
" नाही.. मिळेल त्याला एक दोन दिवसात डिस्चार्ज.. पोलिसकेस होणार होती म्हणून बाबा तिथे होते. सावी अजयसोबत हॉस्पिटलमध्ये होती.. आणि आई काव्यासोबत घरी.. खरेतर मी सुद्धा तिथेच जायला हवे होते.. पण मला बाळाला पहायचे होते.." शेखरच्या बोलण्याने मीराला वाईट वाटत होते. पण ते त्याला कळतही नव्हते..
" तुला जायचे असेल तर जा तू.." मीरा म्हणाली..
" खरेच जाऊ? अग ती सावी दवाखान्यात एकटी पडली आहे.. नुसती रडते आहे.. तिला गरज आहे माझी.."
\"आणि मला?\" मीराचे शब्द ओठातच राहिले.. शेखर न थांबता तिथून निघाला.. तो गेल्यावर थोड्या वेळाने मीराची आई आली.. "अग, काय हे? शेखर गेला सुद्धा? तो होता म्हणून मी जरा घरी गेले होते.. तुला एकटीला टाकून गेला?"
" आई जाऊ दे.. तू आहेस ना सोबत?" मीरा आपले दुःख आईला न दाखवण्याचा प्रयत्न करत होती.. आईला ते पटले नाहीच.. न बोलता तिने मीरासाठी आणलेला डब्बा काढायला सुरुवात केली.. पण मीराच्या सासरचे कोणीच बाळाला बघायला आलेच नाही.. दोन दिवसातून एकदा शेखर फेरी मारायचा.. पण विषय सावीचाच असायचा.. अपघातानंतर कसे सावी आणि अजय इथे रहायला आले आहेत.. आईचा कसा सगळे करण्यात वेळ जातो.. त्याचे तेच चालू असायचे.
" आई एवढ्या कामात आहेत कि त्यांना स्वतःच्या नातवाला पहावेसे वाटत नाही? साधा एक फोनही करता आला नाही तू कशी आहेस म्हणून?" मीराने दुखावलेल्या स्वरात विचारले..
" असे नाही ग.. " शेखरने गुळमुळीत उत्तर देऊन विषय टाळला. त्या संध्याकाळी शेखरच्या आईने फोन केला.. " अग मीरा.. कशी आहेस? अग मी नाही फोन केला म्हणून काय झाले, तू करायचा ना? एवढे काय चिडायचे? हा शेखर बघ इथे येऊन आम्हाला बडबड करतो आहे.."
" आई बाळ रडते आहे, मी नंतर बोलते.."
बारशाचीही तीच गत.. एक उपचार म्हणून सगळे आल्यासारखे वाटत होते. सासूबाईंनी फक्त एकदाच बाळाला घेतले.. आणि सुरू केले, "अंगाने भरला नाही अजून.. काव्या आठव.. कशी होती ते.." मग तेच सुरू झाले.. काव्याच्या बारशाच्या वेळेस मीराला आपण केलेली धावपळ आठवत होती.. किती उत्साहाने सगळे तो सोहळा साजरा करत होते.. आणि आज? निघताना शेखरच्या आईने आवर्जून सांगितले.. "बघ हा तुला अजून माहेरी रहायचे असेल तर माझी ना नाही.. खुश्शाल रहा बरे.."
जमलेल्या नातेवाईकांना याचे कौतुक वाटले.. पण फक्त मीरालाच आतली बात माहित होती.. ती काहीच बोलली नाही. पण शेखरला मात्र तिने थांबवून घेतले.. "शेखर पटले तुम्हाला हे?"
" काय ग? " शेखर नजर चोरत म्हणाला..
" आई इकडेच रहा म्हणाल्या ते.."
" मी तुझ्याशी बोलणारच होतो.. पण तूझे नुकतेच बाळंतपण झाले होते. म्हणून मी काही बोललो नाही.. थोडा प्रॉब्लेम झाला आहे.. अजयने बिझनेससाठी लोन घेतले होते.."
" त्याचा आपल्याशी काय संबंध?" मीराने आश्चर्याने विचारले.
" अग त्याने घर गहाण ठेवून कर्ज उभारले. ते पैसे त्याने दारूत उडवले. आणि आता ते घर जप्त होण्याइतपत परिस्थिती आली आहे.. तू इथे आल्यापासून तेच चालू आहे..शेवटी बाबांनी खटपट करून कसेतरी ते घर विकले आणि पैसे भरले.. आता ते दोघेही आपल्याच घरात राहतात.."
" त्याचा मी इथेच राहण्याशी काय संबंध शेखर?" मीराला काहीच सुचत नव्हते..
" आईबाबांचे असे म्हणणे आहे कि तुला आणि मला चांगला पगार आहे तर आपण आपले वेगळे घर घ्यावे आणि त्या दोघांना तिथे राहू द्यावे.." शेखर मान खाली घालून बोलला.
" काय?"
" आईबाबा थोडे पैसे द्यायला तयार आहेत.. पण मीच नको म्हटलं.. माझे सेव्हिंग आहे.. तुझेही काहीतरी असेलच ना? वर लोन काढू.. मी तर एक घरही पाहिले आहे.. आपल्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.. कधी जायचे बघायला?" शेखरने एकदाचे बोलून टाकले..
" सगळेच जर तुम्ही ठरवले आहे तर मी काय बोलणार? आणि माझे ऐकणार तरी कोण? पण मला सांग शेखर तुला पटते हे?"
"अग पण सावी?"
" तिने तिच्या मर्जीने लग्न केले होते ना? मग तिने घ्यावी ना जबाबदारी. मी का हे भोगायचे? इतके दिवस मी सहन केलेही. पण माझ्या बाळाचा काय दोष? त्यांना माझ्याबद्दल सोडा, या बाळाबद्दलही काही वाटत नाही?"
" असे नाही ग.."
"शेखर, तू प्लीज तुझे वाक्य बदल.. असे नाही मग कसे? तुला दिसत नाही का कि मुलीच्या संसाराची घडी बसवताना त्या आपल्यालाच घराबाहेर काढता आहेत.."
" म्हणजे तुला घरीच रहायचे आहे? इथे सुना घराबाहेर पडतात स्वतःच्या इच्छेने आणि माझी आई तुला स्वतः वेगळे घर थाटून देते आहे ते तुला नको?"
" तुम्ही सगळे फक्त स्वतःचा स्वार्थ बघता.. या बाळाचा विचार कर ना.. आजी आजोबा असूनही त्याने आईबाबा ऑफिसला गेल्यावर पोरक्यासारखे पाळणाघरात रहायचे.. आपले घर असताना दुसर्‍यांच्या घरात रहायचे.."
" काहिही काय मीरा? आई सांभाळेल ग आपल्या बाळाला.."
" अजूनही गैरसमजात आहेस का तू? तुझ्या बहिणीचे आणि आईचे आधीच ठरले होते.. आपल्या बाळाला नाही सांभाळायचे म्हणून.. पण तुझा विश्वास बसणार नाही म्हणून नाही सांगितले.. पण आतातरी जागा हो.. सावीचा संसार सुखाचा व्हावा असे मलाही वाटते.. पण तिने तिच्या सासूसासर्यांची मदत घ्यावी ना.. ती तिथे अजयला त्याच्या घरापासून तोडणार आणि इथे आपल्याला.. तिला सांग ना.."
" मीरा मी नाही बोलू शकणार घरी या विषयावर.. तुला तुझे पैसे द्यायचे असतील तर दे नाहीतर मी माझे वापरीन.. सोडून दे विषय. तू घर बघायला येणार असशील तर ये.. नाहीतर मी बघतो.."
        मीराने परत शेखरच्या हो ला हो केले.. दोघे नवीन घरी रहायला गेले. मीराने शेवटी बाळाला सांभाळायला एक बाई ठेवली. शेखरच्या आईने त्या बाईवर लक्ष ठेवायचे कबूल केले.. अट एकच तिने त्यांच्या घरी यायचे.. मग रोज सकाळी मीरा बाळाचे सगळे करून त्याला त्या घरी सोडायची.. ती बाई तोपर्यंत यायचीच.. हळूहळू सासूबाई बाळ झोपला कि घरची कामे करायलाही लावायला लागल्या. त्या बाईंनी मीराकडे तक्रार केल्यावर मीराने शेवटी घरकामाचेही पैसे द्यायला सुरूवात केली.. 
         थोडे स्थिरस्थावर झाले असे वाटेपर्यंत अजयचे दारू पिणे वाढले होते. त्याने सावीवर हात उगारला.. घरातील वस्तूंची तोडफोड केली.. त्याचा तो अवतार पाहून शेखरच्या बाबांना धक्काच बसला.. त्यातच त्यांची ह्रदयक्रिया बंद पडली आणि ते गेले.. सगळ्यांसाठीच हे धक्कादायक होते. बाबांचे दिवस झाल्यावर मात्र सावीने अजयला घटस्फोट दिला.. त्याच्याकडून हिला काही मिळण्याची शक्यता नव्हतीच.. उलट शेखरलाच त्याने घरी तोडफोड केलेल्या वस्तूंचा खर्च करावा लागला.. शेखरचे वडील गेल्यापासून तर शेखरच्या आईने नवीनच सुरुवात केली.. शेखर त्यांना भेटायला गेला कि पैशाचे रडगाणे गायच्या..मग शेखरने तिथेही पैसे द्यायला सुरुवात केली. दोन दोन घरे सांभाळताना शेखरच्या नाकी नऊ यायला लागले.. मीराचा आधार होता म्हणून हे सगळे सुरळीत सुरू होते. पण ती जाणीव कोणालाच नव्हती.. दिवस जात होते. मुले मोठी होत होती. शेखरला बढती मिळाली होती. घराचे लोन फिटले होते. पण सावीचे वागणे मात्र खूप बदलले होते. ती शेखर आणि मीराला एकत्र पाहूच शकत नव्हती. ते दोघे एकत्र दिसले कि काहीतरी खुसपट काढून चिडचिड करायची. ते पाहून मीराने तिथे जाणे बंद केले. त्यात मीराला अजून एका जीवाची चाहूल लागली.. पण तो आनंद व्यक्त करायची सुद्धा तिला भिती वाटायला लागली.. ना जाणे सावी त्यातून काय अर्थ काढेल.. शेखरची आई मात्र येणाऱ्या जाणाऱ्याला शेखर कसा सुखी आणि सावी कशी दुःखी हे सांगून सतत रडत असायची.
        


पुढील भागात पाहू, मीराच्या घरच्यांना मीराची किंमत कळेल कि हे असेच चालू राहिल..

कथा आवडली तर नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 
दादर मुंबई

🎭 Series Post

View all