Login

गृहिणी की बंदिनी ? ( भाग 2 )

About Women


 
\"लग्न झाल्यावर
बनले मी गृहीणी
आणि होऊन गेले
मी एक बंदीनी! \"

असे रागिनीच्या मनात नेहमी यायचे,आणि तिला वाईटही वाटायचे.
तिचे जीवन सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्यासारखे झाले होते.
तिचे कुटुंब, तिचे ऐश्वर्य ,तिच्या अंगावरील महागड्या साड्या,दागदागिने हे सर्व पाहून कोणालाही तिचा हेवा वाटावा.
पण ज्याप्रमाणे पिंजरा जरी सोन्याचा असला तरी पक्ष्याला तो नको वाटतो,त्याला त्या सोन्याचे महत्त्व नसून त्याला त्या पिंजऱ्यातून उडून स्वच्छंद पणे आकाशात विहार करण्याची इच्छा असते.तसेच रागिणीचेही जीवन होते. घरात सर्व सुखसुविधा होत्या. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण आपले स्थान म्हणजे  चांगले कपडे,दागदागिने घालणारी एक शोभेची वस्तू ! 
घरात सर्व कामे करणारी ,सर्वांच्या सेवेत हजर असणारी  पत्नी, सून व आई !

तिच्या मनाला, तिच्या इच्छांना घरात काही स्थान नव्हते. तिच्याही खुप साऱ्या इच्छा होत्या,तिनेही आयुष्याची खूप सारी स्वप्न पाहिली होती. 
तिला पर्यटनाची खूप आवड होती. छान छान ठिकाणी फिरायला जावे,मस्त एन्जॉय करावा. असे तिला वाटायचे. तिने नवऱ्याला आपल्या इच्छा, आपली स्वप्न सांगितली होती.आपल्या मनातल्या इच्छा अनेकदा व्यक्त केल्या होत्या. पण नवऱ्याला तिच्याप्रमाणे कोणत्याच गोष्टींची आवड नव्हती. तो फक्त आपला बिझनेस वाढवण्याच्या प्रयत्नात राहयचा. त्याच्या डोक्यात फक्त बिझनेसचे विचार असायचे. 
त्यामुळे तो घरातही जास्त वेळ देत नव्हता. घराची सर्व जबाबदारी रागिणीला पार पाडावी लागत असे. 
पैशाच्या मागे धावणाऱ्या रागिणीच्या नवऱ्याला रागिणीच्या इच्छा पूर्ण करण्यास वेळ नव्हता ...इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे रागिणीला नवऱ्याचा रागही यायचा.

घरात पैशांची काही कमी नव्हती, तरी घरकामाला  बाई 
लावण्यास सासूबाईंची परवानगी नव्हती. घरकाम,किराणा, भाजीपाला ,मुलांना शाळेत सोडणे व आणणे . अशी सर्व कामे रागिणीला करावी लागायची . आणि त्यात  नवऱ्याला सर्व वस्तू हातात देण्याची सवय सासूबाईंनी लावून ठेवलेली होती. 
\"पती हा परमेश्वर\" म्हणून त्याची सेवा करायची,हेचं पत्नीचे कर्तव्य असते.
असे सासूबाईंनी दोन्ही सूनांना,   
त्या लग्न करून सासरी येताच सांगून ठेवलेले होते.सासूबाईंप्रती असलेल्या आदराने जाऊबाई व रागिणी हे सर्व करत आयुष्य जगत होत्या.

सुरूवातीला रागिणीला या सर्व  गोष्टींचे काही वाटले नाही. तिला वाटले हळूहळू हे सर्व बदलून जाईल. पण काहीच बदल झालेला नव्हता. आता तिला हे वरवर सुखदायी वाटणारे जीवन नकोसे वाटत होते.

पैसा असूनही आपण काहीच हौसमौज करू शकत नाही. याचे तिला वाईट वाटायचे.

आपल्या मैत्रीणी आपल्या एवढ्या श्रीमंत नाही. तरीही त्यांच्याकडे कामांना बाई आहे, त्यांना  हवे तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्याला फक्त साडीच घालावी लागते.
आपल्या मैत्रीणी आपल्यापेक्षा  खरचं सुखी आहे. कारण त्या आपल्या परिवारासह नेहमीच कुठेतरी फिरायला जात असतात. कधी बाहेरचे खाऊ वाटले तर बाहेर जेवायला ही जातात. घरातले निर्णय घेताना त्यांना विचारले जाते. त्या सर्व खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेत आहेत ,आणि आपण फक्त आयुष्य जगत आहोत असे रागिणीला वाटायचे.

पैशानेच सर्व सुख विकत घेता येते, असे नाही.
ज्यांच्याकडे पैसा नाही, ते लोकही आपल्या जीवनाचा आनंद घेत असतातचं ना !
आपले मन प्रसन्न असायला हवे, आपल्या आवडीप्रमाणे जगण्याचा आनंद घेता येणे ..म्हणजेच खऱ्या अर्थाने जगणे होय!