गृहिणी की बंदिनी ? ( भाग 1 )

About Women


 
"अगं, रागिणी ,उद्या येते का मूव्हीला , आम्ही सर्व चाललो आहोत. मी आपल्या ग्रुपवर मेसेज टाकला आहे. सर्वांनी हो चा रिप्लाय पण केला आहे. फक्त तुझाचं काही रिप्लाय नाही आणि तू अजून मेसेज वाचलाही नाही. म्हणून तुला फोन केला."

रागिणीच्या मैत्रीणीने, सुवर्णाने रागिणीला फोन करून विचारले.

" सॉरी गं, अगं आताच किराणा  सामान,भाजीपाला घेऊन घरी आली आणि घरातही इतकी कामे होती की मेसेज पाहयला वेळच मिळाला नाही. उद्या सासूसासरे येत आहेत, त्यामुळे मला नाही येता येणार मूव्हीला. तुम्ही जा सर्व आणि मस्त एन्जॉय करा."
रागिणी सुवर्णाला म्हणाली.

रागिणीचे हे उत्तर ऐकून सुवर्णाला काही विशेष वाटले नाही. कारण रागिणीचे हे नेहमीचे होते.

तिला आपल्या सर्वांसोबत येऊन मूव्ही पाहण्याची इच्छा ही असेल पण ती घरात कोणाला सांगू शकत नव्हती. हे सुवर्णाला चांगले माहित होते.

रागिणी ,सुवर्णा व अजून त्यांच्या तीन मैत्रीणी. अशा पाच जणींचा छान ग्रुप झालेला होता.
सर्व एकाच सोसायटीत राहत होत्या. जवळपास एकाच वयाच्या होत्या. त्यांची मुले एकमेकांचे चांगले फ्रेंड्स झालेले होते व यांचेही त्यामुळे चांगले जमत होते. ओळखीचे रूपांतर छान अशा मैत्रीत झाले होते.

रागिणीचे घरचे वातावरण इतर चार मैत्रीणींपेक्षा थोडे वेगळे होते.

रागिणी ही दिसायला सुंदर, पदवीपर्यंतचे शिक्षण झालेली,संस्कारी, घरकामात चपळ,मितभाषी. आदर्श पत्नी, आदर्श सून अशा सर्व जबाबदाऱ्या पेलणारी रणरागिणी!

तिचे माहेर व सासर गावाकडे होते.पण नवरा मुंबईत बिझनेस करत असल्याने,तिने आपला  संसार मुंबईला थाटला होता. 

गावाकडे भरपूर शेती व इतर उद्योग होते. ते सर्व सासरे व मोठे दीर पाहत होते. सासूसासरे गावी राहयचे पण अधूनमधून मुंबईलाही यायचे.

रागिणीच्या सासरी तिच्या सासूबाई येण्यापूर्वी गरीबी होती. पण सासूबाई लग्न करून घरी आल्या,तशी सासरची प्रगती झाली. गरीबी जाऊन सुखाचे दिवस सुरू झाले. त्यांच्या रूपाने जणू लक्ष्मीचं घरी आली होती.
सासूबाईंनी सुरूवातीला खूप कष्टाचे दिवस काढले होते. पण आपल्या हुशारीने, गुणांनी त्यांनी संसार करत आपल्या कुटुंबाला सुखाचे दिवस आणले होते.त्यामुळे घरात सर्वांना त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर होता.त्यांच्या वर सर्वांचे खूप प्रेम होते. त्यांची दोन्ही मुले व दोन्ही मुली त्यांच्या आज्ञेत होती. लहाणपणापासूनच त्यांना शिस्तित वाढवलेले होते.
दोन्ही मुलींचे  पदवीपर्यंत शिक्षण झालेले होते व त्या  लग्न करून सासरी सुखाने राहत होत्या.दोन्ही मुलांनीही उच्च शिक्षण घेऊन स्वतः चा व्यवसाय सुरू केलेला होता. 
मोठा मुलगा गावी राहत होता आणि लहान मुलाने मुंबईत आपला बिझनेस वाढवलेला होता.
मुलीही चांगल्या मोठ्या घरात दिलेल्या होत्या .त्यामुळे त्यांचेही काही टेंशन नव्हते. 
आईने केलेल्या संस्कारांमुळे,  दोन्ही मुलेही आपल्या व्यवसायात व संसारात सुखी होते. दोन्ही सूना ह्या सासूबाईंच्या पसंतीच्या होत्या.घरात सुख, शांती, प्रसन्नता सर्व काही होते. यांच्या कुटुंबाला पाहून, सर्वांनाच वाटायचे की, कुटुंब असावे तर असे!


क्रमशः

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all