गृहिणी की बंदिनी ? ( भाग 3 , अंतिम भाग )

About Women


 
पैशाशिवाय काहीही होत नाही, जगण्यासाठी पैसा जरूरीचा असतो. पण कमावलेला पैसा जर जीवनात आनंद देत नसेल तर ...तो पैसा व्यर्थच ! 
असे रागिणीच्या डोक्यात विचार यायचे.

माहेरची परिस्थिती साधारण होती पण तरीही आपण सुखी होतो.  बाबा  आईला सर्व गोष्टी सांगायचे,घरातील   निर्णय घेताना तिचा सल्ला घ्यायचे. खाणे,पिणे,फिरणे अशी सर्व हौसमौज व्हायची. प्रत्येकाच्या आवडीनिवडी विचारात घेतल्या जायच्या.
किती आनंदाचे दिवस होते ते !

आताही वहिनीला सर्व स्वातंत्र्य आहे. ती तर आनंदी राहतेच पण घरालाही आनंदी ठेवते. सूनेपेक्षा ती मुलगीच जास्त शोभते ! खरचं माझी वहिनी खूप भाग्यवान आहे .

रागिनी आपल्या माहेरच्या विचारांनी आनंदीही व्हायची तर  कधी आपल्या सासरच्या वातावरणामुळे दुःखीही व्हायची.


लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असते. नवरा- बायको हे एका पवित्र बंधनात बांधले जातात.लग्नानंतर दोघानांही आपआपली जबाबदारी पार पाडायची असते.

मुलीचे लग्नाअगोदरचे जीवन व लग्नानंतरचे जीवन बदलून जाते. माहेरी मिळणारे स्वातंत्र्य सासरी मिळत नाही. 
अनेक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तिचे जीवन मर्यादांमध्ये अडकले जाते. लग्नाची बेडी ही तिच्यासाठी खरचं एखाद्या कैदीच्या बेडीसारखी होऊन जाते. 
काही करावेसे वाटले , घराच्या चौकटीबाहेर पाऊल टाकावेसे वाटले तरी, संस्कार, संस्कृती, रीतीरिवाज, चारित्र्य, शील,स्त्रीत्व अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकवून तिला  बंदिनी केले जाते. तिच्या कर्तृत्ववान हातात व लक्ष्मीच्या पावलांनी सासरी आलेल्या पायात बंधनाची बेडी अडकवली जाते.
ती  बेडी कोणाला  दिसत नसली तरी , तिला ती जाणवत असते.

आता अनेक कुटुंबातील स्त्रिया नोकरी करतात , त्यांचे करियर घडवतात. आपले विचार, आपले मत,आपल्या इच्छा व्यक्त करतात. घरातील व्यक्तिंनाही त्यांचे अस्तित्व, त्यांच्या भावना समजू लागले. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक स्त्री सुखी होऊ लागली.

आपल्या मैत्रीणीही किती आनंदी असतात ..हे सर्व रागिणीला कळत होते.

मग आपण का बंधनात राहयचे,बेडीत अडकून राहयचे..
आपणही आपल्या जीवनात बदल घडवून आणू शकतो ना ? 
या विचाराने रागिणीने उत्साहीत  होऊन घरात,तिच्या वागण्यात हळूहळू बदल करण्यास सुरुवात केली.
कधी पंजाबी तर कधी चुडीदार ड्रेस घालू लागली. बाहेर जाताना हलकासा मेकअप करू लागली. तिचे हे बदललेले रूप तिच्या नवऱ्यालाही आवडू लागले.मैत्रीणींबरोबर मूव्हीला,शॉपिंगला जाऊ लागली. 
मैत्रीणींसोबत फॅमिली पिकनिकला जाताना नवऱ्यालाही सोबत नेऊ लागली. तिचा नवराही हे सर्व एन्जॉय करू लागला.

सासूबाईंबद्दल आदर व प्रेम कायम राहणार होते पण त्यांचे काही  विचार पटत नव्हते. तेव्हा 
सासूबाईंना कधी समजावून तर कधी त्यांच्या त्याच त्याच बोलण्याकडे दुर्लक्ष करून रागिणी आपले जीवन आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करू लागली आणि नवऱ्यालाही तसे जगण्यास प्रवृत्त करू लागली. 
स्वच्छंद पक्ष्याप्रमाणे मोकळा श्वास घेऊन आयुष्याचा आनंद घेऊ लागली.


समाप्त

नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all