लोभी आंधळा भिकारी

Greedy Blind Begger
लोभी आंधळा भिकारी.


बगदाद शहरात एक विचित्र आंधळा भिकारी राहत होता तो रस्त्याच्या एका कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना विनवणी करत असे-"खुदा के वास्ते या आंधळ्या भिकाऱ्याला मदत करा. तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. अल्ला तुमचे भले करील."

आंधळ्याची ही विनंती ऐकून एक दयाळू इसम त्याच्याजवळ गेला. त्याने त्या आंधळ्या भिकाऱ्याच्या हातावर एक सोन्याचे नाणे ठेवले.

आंधळा भिकारी लगेच म्हणाला, "मालिक अल्ला तुमचं भलं करो. आता आणखी एकच कृपा माझ्यावर करा. माझ्या एक थोबाडीत मारा."

तो माणूस गोंधळून गेला. तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष बगदादचा सुलतान हरून-अल्-रशीद होता. तो आपल्या प्रजेची खबरबात जाणून घेण्यासाठी वेश पालटून व्यापाऱ्याच्या वेशात निघाला होता.

मनात नसतानाही सुलतानाने त्या भिकाऱ्याच्या थोबाडीत मारली आणि तेथून तो पुढे निघाला. दुसऱ्या दिवशी सुलतानाने त्या आंधळ्या भिकाऱ्याला आपल्या दरबारात बोलावले.

सुलतान म्हणाला, "बाबा काल ज्याने आपल्याला सोन्याची मोहर दिली होती आणि थोबाडीतही मारली होती तो मीच होतो. मला एक सांगा, भिक देणाऱ्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या थोबाडीत मारायला का सांगता? न घाबरता, न अडखळता मला सारं काही सांगा पाहू. तुमची अडचण कितीही गंभीर असली तरी ती मी नक्की सोडवीन."

हे ऐकून त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली:

"जहांपना एकेकाळी मी या शहरातील सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांपैकी एक होतो. पण मी माझ्या लोभीपणामुळे आंधळा झालो आणि आज मला पोटापाण्यासाठी रस्त्यावर भीक मागावी लागत आहे. मला माझ्या वडिलांकडून वारसा हक्काने खूप संपत्ती मिळाली होती. मी माझ्या मेहनतीने आणि अक्कल हुशारीने अधिकाधिक पैसा कमावू लागलो. माझ्याजवळ ऐंशी उंट होते!

एके दिवशी मी उंटावर मला दोन व्यापारासाठी बसरा शहरात गेलो. बसरा मध्ये सारामाल विकून मी बगदादला परत येत होतो. वाटेमध्ये मला एक फकीर भेटला.

तो मला म्हणाला, "येथून जवळच असलेल्या डोंगरावर एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये फार मोठा खजिना पडून आहे. त्या खजिन्यात हिरे, मोती, पाचू, माणिक आणि अगणित मौल्यवान खडे आहेत. हा खजिना एवढा अफाट आहे की तो वाहून न्यायला आठशे उंट सुद्धा कमीच पडतील."

मी आणि फकीराने ठरवले की, माझ्याकडच्या ऐंशी उंटावर जेवढा खजिना लादता येईल तेवढा खजिना घ्यावा. त्याचबरोबर आम्ही हे सुद्धा ठरवले की, चाळीस उंटांवर लादलेला खजिना फकीराने घ्यायचा आणि चाळीस उंटांवरचा खजिना मी घ्यायचा.

आम्ही ८० उंट घेऊन डोंगरावर पोचलो. फकिराने थोडेसे सरपण गोळा केले आणि आग पेटवली. मग त्याने थोडी सुवासिक पूड त्या आगीत टाकली. त्या आगीतून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्याच वेळेला फकीर काही मंत्र पुटपुटू लागला आणि काय आश्चर्य! त्या क्षणाला धूर अचानक नाहीसा झाला आणि समोरच गुहेचे तोंड उघडले. त्या गुहेमध्ये खाली उतरायला पायऱ्या होत्या. आम्ही पायऱ्या उतरून गुहेत पोहोचलो. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्या गुहेत हिरे, माणके, मोती, पोवळे, पाचू, इतर मौल्यवान खडे आणि अगणित जडजवाहीर खचाखच भरलेले होते.

आम्ही आम्हाला शक्य होतील तेवढे हिरे, माणके, जडजवाहीर आणि सोन्याच्या मोहरा पोत्यांमध्ये भरल्या आणि ती पोती उंटांवर लादली. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. माझ्या वाट्याला आलेला खजिना हा जगातील मोठ्यात मोठ्या सुलतानाच्या खजिन्यापेक्षाही जास्त होता. आम्ही गुहेतून बाहेर येताना फकीराला एक छोटी डबी दिसली. त्याने ती डबी उचलली आणि अंगाख्याच्या खिशात ठेवली. पण एवढ्या मोठ्या संपत्ती पुढे त्या छोट्या डब्बी बद्दल त्याला विचारणे मला महत्त्वाचे वाटले नाही.

अगोदरच ठरवल्याप्रमाणे चाळीस उंट फकीराने घेतले आणि चाळीस उंट मला मिळाले. फकीर त्याच्या वाटणीचे चाळीस उंट घेऊन बसराच्या दिशेने निघाला. मी माझे चाळीस उंट घेऊन बगदादकडे निघालो.

मी थोडा पुढे गेलो असेल इतक्यात माझ्या मनात विचाराला, "माझे चाळीस उंट घेऊन या फकीराने मला फसवलंच आहे. अर्थात त्या उंटांच्या बदल्यात मला जरी अफाट संपत्ती मिळाली असली तरी त्या फकीराकडे अगोदर काहीच नव्हते पण माझ्याकडे माझे स्वतःचे ऐंशी उंट होते."

मला त्या फकिराचा हेवा वाटू लागला माझा लोभीपणा उफाळून आला. मी धावतच फकीरा जवळ पोहोचलो.

मी त्याला थांबत म्हणालो,"बाबा आपण तर खुदाचे भक्त आहात. एवढ्या साऱ्या उंटांची देखभाल करता करता तुमची मनाची शांती नष्ट होईल, म्हणूनच यापैकी किमान दहा तरी उंट आपण मला परत दिले तर ते चांगलं नाही का होणार?"

फकीराने मंद स्मित हास्य करत मला दहा उंट परत दिले. आता माझ्याकडे पन्नास उंट झाले होते आणि फकीराकडे तीस उंट राहिले होते.

मी थोडा पुढे जातो न जातो तोच मला वाटू लागलं, "फकिराने त्याच्या वाटणीचे दहा उंट तर मला आनंदाने दिले, तर मीच किती भोळा आहे! मी त्याच्याकडून वीस उंट का मागितले नाहीत?"

मी पुन्हा एकदा धावत फकीराकडे गेलो आणि त्याला म्हणालो, "बाबा माफ करा पण मी विचार केला की, तुम्ही तर एकटेच आहात. तुम्हाला एवढ्या साऱ्या संपत्तीची गरजच नाही, नाही का? शिवाय एवढ्या साऱ्या संपत्तीची देखभाल करायची म्हणजे अल्लाच्या सेवेतही व्यत्यय येईल. माझ्याकडे या समस्येवर उपाय आहे. तुम्ही जर आणखी दहा उंट मला दिले तर तेवढीच तुमची त्रासातून मुक्तता होईल नाही का?"

फकीर शांतपणे म्हणाला, "मित्रा तुझं म्हणणं बरोबरच आहे तू माझा आणखी दहा उंट घेऊ शकतोस."

मी फकीराकडून आणखी दहा उंट घेतले आता माझ्याकडे साठ उंट झाले होते आणि फकीराकडे केवळ वीस उंट राहिले होते. मला तर साठ उंटांवर लादलेली संपत्ती मिळाली होती; तरीसुद्धा माझा लोभ सुटत नव्हता. आपण फकीराकडून उरलेले वीस उंटही मागून घ्यायला हवे होते असे मला वाटू लागले.

मी पुन्हा एकदा घाई घाईने फकीराकडे गेलो आणि म्हणालो, "बाबा तुम्ही केलेल्या त्यागामुळे मला आपल्याबद्दल अपार आदर वाटू लागलाय. मला तर असं वाटतंय की, तुमच्या सारख्या धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीला सुखाच्या मोह जाला पासून दूरच ठेवले पाहिजे. तुम्ही जर मला तुमचे उरलेले सर्व उंट दिले तर या ऐहीक आकर्षणापासून तुम्ही मुक्त व्हाल अशी मला खात्री आहे."

फकीराने पुन्हा एकदा अस्मिता हास्य करत मला त्याचे उरलेले वीस ही उंट देऊन टाकले.

मला जे हवे होते ते मला न मागताच मिळाले. आता मी पुन्हा एकदा ऐंशी उंटांचा मालक झालो. मी मनापासून मुक्त कंठाने फकीराचे आभार मानले आणि बगदादच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला.

अचानक माझ्या मनात एक शंका आली. त्या फकीराने आपल्याला फसवले तर नाही ना? कारण त्या फकिराने खिशात टाकलेली छोटी डबी मी विसरू शकत नव्हतो. माझ्याकडील सर्व संपत्ती पेक्षाही अधिक मौल्यवान असे काहीतरी त्या डबीत असावे असे मला राहून राहून वाटू लागले, म्हणूनच तर ती डबी फकीराने त्याच्याजवळ ठेवली असावी या शंकेने माझ्या मनात काहूर माजले.

मला राहावले नाही मी पुन्हा एकदा फकीराकडे गेलो आणि त्याला त्या डबीचे रहस्य सांगण्याची विनंती केली.

फकीर म्हणाला, "एवढी सारी संपत्ती मिळूनही जर तुझे समाधान झाले नसेल, तर तु ही डबी सुद्धा घेऊन जाऊ शकतोस. या डबीमध्ये जादूचे मलम आहे. हे मलम जर डाव्या डोळ्यात लावले तर जमिनीखाली दडलेली सारी दौलत दिसू लागते, पण लक्षात ठेव जर का हे मलम उजव्या डोळ्यात लावले तर माणूस दोन्ही डोळ्यांनी आयुष्यभराचा आंधळा होतो."

मला त्या मलमाची जादू पाहण्याची अनिवार इच्छा झाली.

मी म्हटले, "बाबा तुम्ही मला या जादूच्या मलमाचा चमत्कार दाखवू शकाल का?"

"का नाही? अवश्य!" असे म्हणून फकीराने ते मलम माझ्या डाव्या डोळ्यात लावले आणि काय चमत्कार मला डोंगरदर्‍यांखाली दडलेली सारी संपत्ती दिसू लागली. माझा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला. मग मी फकिराला ते मलम माझ्या उजव्या डोळ्यात लावायला सांगितले.

फकीर मला धोक्याचा इशारा देत म्हणाला, "मित्रा जर हे मलम उजव्या डोळ्यात लावले तर तू दोन्ही डोळ्यांनी कायमचा आंधळा होशील."

परंतु फकिराच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला माझे मन तयार नव्हते, मला वाटू लागले, "हा फकीर माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवून ठेवत आहे. जर मी हे मलम माझ्या उजव्या डोळ्यात लावलं तर मी उजव्या डोळ्यांना आंधळा होईल माझ्या डाव्या डोळ्याला त्यापासून कशी काय इजा होईल?"

मी फकीराला म्हटले, "बाबा मला खात्री आहे की, तुम्ही माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवून ठेवत आहात. तुम्ही खोटं तर बोलत नाही ना?"

फकीर म्हणाला, "अरे बेटा मी कधीही खोटं बोलत नाही. मी फकीर माणूस खोटं बोलून मला काय मिळणार? जर मी स्वार्थी असतो तर माझ्या वाटणीचे चाळीस उंट तुला दिले असते का?"

फकीराच्या बोलण्याचा मला राग आला. मी म्हणालो, "मला काही एक ऐकायची इच्छा नाही. तुम्ही माझ्या उजव्या डोळ्यात हे मलम लावा, नाहीतर ती डबी मला द्या."

मी जिद्दीला पेटलो. बिचारा फकीर काय करणार! त्याची इच्छा नसतानाही त्याने ते मलम माझ्या उजव्या डोळ्यात लावले. क्षणभर काय होत आहे हे मला कळेना. माझ्या डोळ्यांपुढे अंधारी आली. आणि……. आणि मी दोन्ही डोळ्यांनी पूर्णतः आंधळा झालो.

मी पार घाबरून गेलो. भीतीने माझे हात पाय थंडगार पडले. माझ्या घशाला कोरड पडली.

मी अजिजीने म्हटले, "बाबा मी पूर्णपणे आंधळा झालोय. तुम्ही अल्लाचे अवतार आहात; दयाळू आहात; परोपकारी आहात. माझ्यावर दया करा आणि माझी दृष्टी मला परत मिळवून द्या."

फकीर म्हणाला, "मित्रा हे तुझ्या अति लोभाचे फळ आहे. आपल्या लोभीपणामुळेच तू आंधळा झाला आहेस. तुझे आंधळेपण दूर करण्याचा आता कोणताही इलाज माझ्याकडे नाही."

मीला अक्षरशः रडू कोसळले. मी रडत रडत म्हणालो, "आता माझ्या संपत्तीचे काय होईल? माझ्या उंटांचे काय होईल?"

"तुझी संपत्ती आणि तुझे उंट आता ज्याच्या नशिबात असतील त्याला मिळतील पण तुझ्या नशिबात मात्र आता आयुष्यभर पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही नाही."

एवढे बोलून फकीर निघून गेला. धनदौलत लादलेले माझे ऐंशी उंट कुठे गेले याचा मला स्थान पत्ता लागला नाही.

मी धडपडत चालत होतो. चालता चालता मी जंगलात पोचलो. मी तहान भुकेने व्याकुळ झालो होतो. तेव्हा मला एक व्यापारी भेटला. त्याने मला त्याच्या उंटावर बसून बगदाद शहरात आणून सोडले. तेव्हापासून मी माझे पोट भरण्यासाठी भीक मागत आहे.

मी अति लोभ करण्याचा अपराध केला होता. मला तो कधीही विसरण्याची इच्छा नाही; म्हणून भीक देणाऱ्या प्रत्येक माणसाला मी माझ्या थोबाडीत मारायला सांगतो. त्यामुळे लोक मला थोबाडीत खाणारा भिकारी म्हणून ओळखतात."

आंधळ्या भिकाऱ्याची ती दुखद कहाणी ऐकून सुलतानाला अतिशय वाईट वाटले. त्याला आंधळ्या भिकाऱ्याची दया आली. त्याने त्या भिकाऱ्याची राहण्याची आणि जेवणाची सोय केली.


लोककथांवर आधारित

©® राखी भावसार भांडेकर