शिक्षक म्हणजे एक समुद्र
ज्ञानाचा, आदर्शाचा, पावित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढवणारा,
शिक्षक जगण्यातून जीवन घडवणारा,
तत्त्वातून मुल्ये फुलवणारा
भारत हा नेहमीच ज्ञान दानासाठी ओळखला जाणारा देश आहे. इथली गुरु-शिष्य परंपरा ही फार पुरातन आहे. आरुणी -धौम्य, परशुराम -भीष्म, द्रोणाचार्य -अर्जुन -एकलव्य, चाणक्य -चंद्रगुप्तआणि इतर अनेक उदाहरणे देता येतील.
पैकी एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून स्वतःचा उजव्या हाताचा अंगठा दिला तर, भीष्मानी परशुरामांना युद्धात हरविले, आरुणीने गुरूंची आज्ञा म्हणून आपला अंगठा रात्रभर शेताच्या बांधाऱ्याच्या छीद्रात टाकून शेतीचे पुरा पासून रक्षण केले.
इतिहासातली नालंदा, तक्षशिला विद्यापीठ असोत किंवा गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे शांतिनिकेतन. या मातीत अनेक ज्ञान- विज्ञान शाखा निर्माण झाल्या, विकास पावल्या आणि काळानुरूप विलयासही गेल्या, परंतु ज्ञानदान करणारे शिक्षक -वृंद , गुरुवर्य हे नेहमीच वंदनीय आणि आदरणीय होते आणि आहेत.
"विद्या हे धन आहे रे , श्रेष्ठ सार्या धना हून
तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन"
- म.फुले.
विद्ये विषयी महात्मा फुले यांचे हे विचार किती सार्थ आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या अथक परिश्रमातून आज माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आणि समाजातला बहुजन वर्ग शिकू लागला, बुद्धीचे दरवाजे उघडून जगाकडे जिज्ञासेने, कुतुहलाने बघू लागला. म्हणूनच फुले दांपत्याचे हे उपकार आम्ही आजन्म शिरोधार्य मानू.
नोबेल पारितोषिक विजेते आणि शांतिनिकेतन या विद्यापीठाचे संस्थापक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना चार भिंती मधलं बंदिस्त, पुस्तकातलं अपूर्ण ज्ञानदान मान्य नव्हतं. निसर्ग , आजूबाजूचा परिसर हेच आपले गुरू आहेत असे त्यांचे मत होते. पक्ष्यांना आकाशात उडायला, सुगरणीला घरटं बांधायला, कोकीळेला गाणं म्हणायला, माशाला पोहायला कोणी शिकवत नसतं तर निसर्गच त्यांचा पहिला गुरु असतो, म्हणूनच गुरुदेव टागोर विद्यार्थ्यांना निसर्ग सान्निध्यात ज्ञानदान करत.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी "न्यू इंग्लिश शाळेची" स्थापना केली. ते स्वतः गणित आणि संस्कृत हे विषय उत्कृष्टपणे शिकवीत. लोकमान्य टिळकांना वाटे की,\"जर समाज शिक्षित झाला तर त्याला पारतंत्र्याची आपसूकच जाणीव होईल आणि तो स्वातंत्र्यासाठी बंड करून उठेल आणि असा शिक्षित समाज एक समृद्ध राष्ट्र उभे करेल."
महात्मा गांधींनी "बुनियादी" शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे , ज्यात मुलांना आत्मनिर्भर बनवण्याकडे अधिक लक्ष दिले जात असे , ज्यामध्ये शेती , बागकाम, सुतारकाम ,विणकाम , पुस्तक बांधणी आणि इतर अनेक व्यवसायांचे शिक्षण प्रशिक्षण दिलं जायचं.
गिजुभाई बधेका यांचे शिक्षणावरचे प्रयोग ,अनुताईं वाघांची आदिवासी साठींची शाळा असे अनेक शैक्षणिक प्रयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनेकांनी केले.
कोरोना काळात जेव्हा शाळा बंद होत्या , तेव्हा मोबाईल, संगणकाद्वारे अनेक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही ज्ञानाची गंगा नेण्याचा प्रयत्न करत होते .
आजच्या डिजिटल जमान्यामध्ये जेव्हा प्रत्येक गोष्ट ,अगदी शाळा सुद्धा ऑनलाईन झाली आहे , तेव्हा "रणजीत डिसले " सरांनी शिक्षणासाठी केलेले अभिनव प्रयोग कौतुकास पात्र आहेत. जेव्हा डिसले सरांना "ग्लोबल टीचर अवॉर्ड " मिळालं तेव्हा उर अभिमानाने भरून आला.
टाळे बंदीच्या काळात,जेव्हा मुलं घराच्या चार भिंतीत अडकून पडले होते तेव्हा खरंच विद्यार्थ्यांना आणि प्राप्त परिस्थितीला भक्कम पणे तोंड देण्यासाठी सक्षम शिक्षकांची नितांत होती आणि आहे.
जेव्हा व्यक्ती परिस्थितीने हतबल होते, वर्तमानातल्या चटक्यांनी पोळून निघते , जीवन जगण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत असं वाटत असताना, एक गुरु किंवा शिक्षकच आपणाला योग्य मार्गदर्शन तर करू शकतो पण आपले मनोधैर्यही उंचावतो.
आपल्या "कणा" या कवितेमध्ये कुसुमाग्रज अशाच धैर्यवान विद्यार्थ्यांची गोष्ट आपल्याला सांगतात, पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थ्याचं घर पुर्णतः उध्वस्त झालेलं आहे. अशावेळी तो सरांकडे येतो आणि आपली कैफियत सांगतो, सरांना वाटतं की याला काही आर्थिक मदतीची गरज असावी पण तो विद्यार्थी म्हणतो.......
"मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा".
केवढा हा आशावाद आणि केवढी हींमत!
असेच प्रभावी शिक्षक आपल्या आयुष्यात येतात आणि जणू दिपस्तंभ म्हणून ते आपल्याला यशाच्या मार्गावर जाण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन करतात.
शिक्षक हे इतके महान असतात की, ते एखादं राष्ट्र निर्माण करू शकतात किंवा त्याचा संपूर्ण नायनाट ही करू शकतात, म्हणूनच ज्या नेत्यांना आपले राष्ट्र उभे करायचे आहे त्यांनी आधी आपल्या देशामध्ये उत्तमातील उत्तम आणि योग्य असे शिक्षक आधी निर्माण करावे कारण......
"मुझे चिंता या भीक की आवश्यकता नही धनानंद!
मै शिक्षक हूँ प्रलय और निर्माण मेरी गोद मे खिलता है,
यदि मेरी शिक्षा मे सामर्थ्य है, तो अपना पोषण
करनेवाले सम्राटों का निर्माण मै स्वयम् करलूंगा!"
-चाणक्य
राष्ट्र निर्माण करणाऱ्या वंदनीय, आदरणीय समस्त गुरुजनांना माझे विनम्र अभिवादन.
जय हिंद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा