ग्रहण अंतिम भाग

कथा मायलेकींची
ग्रहण.. भाग ५
चॅम्पियन्स ट्रॉफी
प्रथम फेरी


मागील भागात आपण पाहिले की ईशा लग्न करून सासरी जाते. आता तरी तिचे शमाशी संबंध सुधारतील का? बघू काय होते ते.


" बाबा, एक गुड न्युज आहे." ईशा फोनवर उत्साहाने बोलत होती.

" पटकन सांग.."

" तू आजोबा होणार आहेस.."

" खरंच?? किती आनंदाची गोष्ट. थांब आईकडे देतो. तिलाही सांग." अश्विनला झालेला आनंद त्याच्या शब्दातून जाणवत होता.

"ईशा..." शमाने फोन हातात घेतला.

" हो आई.."

" तुला काय खावंसं वाटतं, सांग तसं. मी आणि बाबा लगेच करून आणतो. आणि जास्त धावपळ करू नकोस. कितवा महिना ग?"

" चौथा सुरू झाला."

" चौथा महिना लागला आणि तू आम्हाला आत्ता सांगते आहेस?" शमाचा सगळा आनंद विरून गेला.

" ते गौरांगची आई म्हणाली चोरओटी भरेपर्यंत कोणालाच सांगू नकोस."

" चोरओटी सुद्धा भरून झाली?" शमाला अजून एक धक्का बसला.

" हो.. ते घरातल्या घरातच भरतात ना?" निर्जीवपणे शमाने हातातला फोन अश्विनच्या हाती दिला आणि ती आत निघून गेली. काय झालं असावं याचा त्याला थोडा अंदाज आला.

" बाबा, आई बोलता बोलता का गेली?"

" ईशा, आई होणार आहेस तरी स्वतःच्या आईला दुखावण्याची एक संधी सोडू नकोस. असो काळजी घे. मी बघतो शमाला काय झाले ते. तुला नसली तरी मला तिची काळजी आहे." अश्विनने रागाने फोन ठेवला. पहिल्यांदाच अश्विनला आपल्याशी अश्या आवाजात बोललेलं ऐकून ईशाला आपलं परत काहीतरी चुकलं आहे याची जाणीव झाली. पण तरिही आपण आईला हे लवकर का सांगितलं नाही याची कारणं तिच्याकडे तयार होती आणि बाबाची समजूत कशी काढायची हे ही तिला माहीत होते. संध्याकाळी ती गौरांगला घेऊन माहेरी गेली. तिला अचानक आलेलं बघून अश्विनला धक्का बसला.

" या, या.. सकाळी बोलली नाहीस येणार आहेस ते."

" ते आमचं अचानक ठरलं. तुला आवडलं नाही का मी आलेले?" एवढंसं तोंड करत ईशाने विचारले.

" का नाही आवडणार? घर तुझंच, माणसं तुझीच कधीही ये कधीही जा.. तुझी मर्जी."

" बाबा, आई नाहीत का घरी?" विषय बदलण्यासाठी गौरांगने विचारले.

" आहे पण झोपली आहे. तिला जरा बरं नाहीये."

" सकाळी तर बरी होती." ईशा म्हणाली.

" हो.. पण काही मानसिक दुखणी अचानक उद्भवतात. असो. तुम्ही बसा.. मी काहीतरी खायचं प्यायचं बघतो."

" बाबा, नको.. आम्ही निघतोच. आम्ही फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो." ईशा उठत म्हणाली. गौरांगही निघाला. आज पहिल्यांदाच अश्विनला तिला थांबवावंस वाटलं नाही.

ईशाचे डोहाळजेवण झाले. ऑफिस जवळ आहे हे कारण सांगून ईशाने माहेरी यायचे टाळले. मग शमा आणि अश्विननेही तिला आग्रह केला नाही. शमाच्या डोळ्यातली कमी झालेली चमक मात्र सगळ्यांनाच जाणवत होती. पण ईशा आणि तिच्या आईच्या मध्ये बोलणं गौरांग आणि त्याच्या घरातले टाळत होते.

नववा महिना लागला आणि ईशा माहेरी आली. तिच्या बाळंतपणासाठी अश्विन नको म्हणत असताना सुद्धा शमा घरी राहिली. ईशा मात्र ऑफिसला जात होती. शेवटी तो दिवस उगवला. सकाळपासूनच ईशाच्या पोटात दुखायला लागले. शमाने लक्षणे ओळखून अश्विन आणि गौरांगला बोलावून घेतलं. ईशाला अनावर वेदना होत होत्या. त्याही परिस्थितीत शमा तिला धीर देत होती. गौरांग, अश्विन धावत आले. दोघांनी ईशाला कारमध्ये बसवले. शमा पुढे बसायला जात असताना ईशाने तिचा हात धरला. तिच्या भावना समजून शमा ईशाशेजारी बसली. तिच्या कंबरेवरून हात फिरवत.


" अभिनंदन.. तुमच्याकडे एक परी आली आहे." डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले. बाळाची वाट बघत असलेल्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलला.

" पण एक प्रॉब्लेम झाला आहे."

" काय झालं?" गौरांगने विचारले. तोपर्यंत नर्स बाळाला घेऊन बाहेर आली. सगळे बाळाला बघायला खूपच उत्सुक होते. गौरांगने बाळाला हातात घेतले. बाळाचा ओठ फाटलेला होता. त्याने आश्चर्याने डॉक्टरांकडे पाहिले.

" बाळ मोठं झाल्यावर तुम्ही ऑपरेट करू शकता पण सध्या तरी ते तसंच राहील."

" तुम्ही बाळ ईशाला दाखवले?" शमाने विचारले.

" नाही.. त्या अजून बेशुद्ध आहेत. शुद्धीवर आल्यावर देऊ बाळ त्यांच्याकडे."

शमाने गौरांगकडून बाळाला हातात घेतले. अश्विन तिच्याशेजारी उभा राहिला.

" गोडुली आहे ना? ईशाही अशीच होती ना?" अश्विन म्हणाला.

" ह्म्म.." शमाला फक्त तो दुधावरच्या सायीचा मऊ स्पर्श अनुभवायचा होता. ईशा शुद्धीवर आली. शमा तिथेच बसून होती.

" बाळ?" ईशाने विचारले.

" नर्सला सांगते आणायला." शमा म्हणाली. बेल वाजवताच नर्स बाळाला घेऊन आली. नर्सने बाळाला ईशाजवळ ठेवले. शमा ईशाच्या चेहर्‍याकडे बघत होती. ईशाने बाळाला बघितले. त्याच्या ओठांवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून पाणी आलं.

" काळजी करू नकोस.. थोडी मोठी झाली की ऑपरेशन करून होईल नीट." शमा पटकन म्हणाली.

" आई, मी आजपर्यंत तुला खूप दुखावलं आहे.. माझ्या दिसण्यासाठी, सगळ्या वाईट गोष्टींसाठी तुला कारणीभूत ठरवलं. खूप राग राग केला तुझा. बाबा खूप समजवायचा पण नाहीच. आज या बाळाला जन्म देताना मला समजलं. आई फक्त जन्म देते बाळाला. त्याला रंगरूप तिच्या मनासारखे देता आले असते ना तर जगातलं प्रत्येक बाळ सुंदरच झालं असतं.. हो ना? माझ्या चुका दुरूस्त करण्यासारख्या नाहीत, पण करशील मला माफ?"


" ज्याक्षणी ही गोड भेट तू मला दिलीस त्या क्षणीच तुझ्या सगळ्या चुका माफ झाल्या.." हसत शमा बोलत होती.

दरवाजात उभा असलेल्या अश्विनने डोळे पुसले.. मायलेकींच्या नात्याचे ग्रहण आज सुटले होते.. त्याची लेक आई झाल्यावर..कथा कशी वाटली ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all