ग्रहण.. भाग ४

कथा मायलेकींची
ग्रहण.. भाग ४

चॅम्पियन्स ट्रॉफी
प्रथम फेरी


मागील भागात आपण पाहिले की ईशाच्या मनात आईविषयी फार राग आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" पिलू, तुझं औक्षण केलं तर चालेल का?" शमाने विचारले.

" आई..." ईशाच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

" त्या दिवसानंतर आज हाक मारलीस मला आई म्हणून. काय वाटतं आहे ते तुला नाही सांगू शकत. पण एक सांगेन माझ्या मनात तुझ्याबद्दल जे आहे ना, ते तुला तू आई झालीस की समजेल." डोळ्यातलं पाणी पुसत शमा म्हणाली.
काहीच न बोलता ईशाने आईला मिठी मारली. शमाने ईशाचे औक्षण केले.

" वाढदिवसाच्या दिवशी नको रडूस. जा तुझा ग्रुप तुझी वाट बघत असेल." शमा ईशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

" हो.."

" हे पैसे पण घेऊन जा. छान मजा कर."

" थॅंक यू सो मच.. लव्ह यू ममा.." हसत ईशा बाहेर पडली आणि आज कितीतरी दिवसांनी हसणार्‍या लेकीला बघून शमाचीही कळी खुलली.

दिवस जात होते. ईशा शमाशी तुटकपणे बोलत नव्हती पण मोकळेपणानेही बोलत नव्हती. दोघींमध्ये एक अदृश्य भिंत होती. शमा मात्र ईशा तिच्याशी बोलते आहे यातच समाधानी होती. तिने स्वतःला एका एनजीओमध्ये गुंतवून घेतलं होतं. त्यामुळे तिघेही घरात एकमेकांसोबत फार कमी वेळ असायचे. उरलेल्या वेळात वाद नको म्हणून एकमेकांचे मन जपायचा प्रयत्न व्हायचा. ईशाचे शिक्षण पूर्ण झाले. तिला छानशी नोकरीही लागली. आता शमाला वेध लागले होते तिच्या लग्नाचे. घरात लग्नाचा विषय सुरू झाल्यावर ईशा आधी थोडी गडबडली पण नंतर ती या दोघांशी बोलायला गेली.

" बाबा, मला थोडं बोलायचं आहे."

" बोल ना.. मी तुला बोलावणारच होतो. या दोनतीन विवाहमंडळांच्या साईट्स आहेत. तुझा कोणता फोटो वापरू ते सांग."

" बाबा, मला या मंडळात नाव नोंदवायचे नाही."

" का??" शमा आणि अश्विन दोघेही एकदम म्हणाले.

" चिल ! मला गौरांगशी लग्न करायचे आहे. गेले तीनचार वर्ष तो माझ्यासोबत आहे. सो.."

" तो काय करतो? त्याच्या घरी कोण? काहीतरी सांगशील की नाही? आणि त्याहीपेक्षा महत्वाचे फोटो दाखवशील का आधी?" अश्विनने विचारले.

" छानच आहे दिसायला.." फोटो बघून अश्विन खुश झाला. " आता लग्न एकदम धडाक्यात करूयात.

" बाबा, मला लग्न एकदम साधेपणाने करायचे आहे. रजिस्टर लग्न पण चालेल."

" अग पण ते विधी, सप्तपदी वगैरे?" शमाने विचारले.

" आई, माझा आणि गौरांगचा यावर विश्वास नाही. तरिही तुमची इच्छा असेल तर आम्ही विचार करू. पण मला माझ्या लग्नाला कोणालाही बोलवायचे नाही."

" लग्न म्हणजे नटणं, मुरडणं आणि फक्त धमाल असते. त्या निमित्ताने तरी नातेवाईकांची भेट होते." शमा म्हणाली.

" म्हणूनच मला लग्न साध्या पद्धतीने करायचे आहे. मुलीची आई मुलीपेक्षा जास्त सुंदर दिसते असं कमीतकमी माझ्या लग्नात तरी कोणी मला ऐकवायला नको." शमाकडे बघत ईशा म्हणाली. अश्विन काही बोलणार तोच शमाने त्याच्या हातावर हात ठेवला.

" तुझं बरोबर आहे. त्याच्या आईवडिलांना भेटायचं की कसं काय ते त्याच्याशी बोलून सांग." ईशा गौरांगला फोन करायला गेली आणि मगाशी समजूतदारपणाचा आव आणलेली शमा डोक्याला हात लावून बसली. तिची मनस्थिती समजून घेत अश्विनने तिच्या खांद्यावर हात ठेवला.

" मला वाटलं होतं इतक्या वर्षांनंतर तिच्या मनातला राग कमी झाला असेल. पण नाही रे तो तसाच आहे.. अगदी जाणवण्याइतका. अश्विन, मला माझ्या लेकीची हौसमौज करायची होती, तिला भरभरून खूप काही द्यायचं होतं. पण बहुतेक माझं नशीबच फुटकं बघ. सगळं वाहून गेलं." शमा बोलत होती आणि अश्विन ऐकत होता. त्याच्याकडे शब्दच नव्हते बोलायला.

" शमा, तसेही काही महिन्यात ईशा लग्न करून जाईल. नको मनाला त्रास देऊस."

" बरोबर आहे तुझे. इतके दिवस मनाने दूर होती. आता शरिरानेही जाईल. का आणि कशाला त्रास करून घ्यायचा? चला तयारीला लागू. एकुलत्या एका मुलीचे लग्न आहे."


ईशाने सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने तिचे लग्न झाले. गौरांग आणि त्याचे आईवडील खूपच समजूतदारपणे घेतल्यामुळे लग्न छान प्रकारे पार पडलं. शमा जाणूनबुजून पाठी पाठीच रहात होती. थोडक्यात सर्व विधी आटपले आणि ईशा सासरी जायला निघाली. बाबाच्या गळ्यात पडणारी ईशा आपल्या जवळ तरी येईल का, असेच शमाला वाटत होते. ईशा शमाजवळ आली आणि मिठी मारून म्हणाली,

" आई, मला माफ कर.. मी भरपूर चुकीचं वागले आहे.. मला समजून घेण्यासाठी खूप थँक्स." शमाने फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

" आता जुनं सगळेच विसरून जा. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. कितीही काहिही झालं तरी आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे."


ईशाच्या लग्नानंतर तरी ईशाचे आणि शमाचे संबंध सुधारतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all