ग्रहण.. भाग ३

कथा मायलेकींची
ग्रहण.. भाग ३

चॅम्पियन्स ट्रॉफी
प्रथम फेरी


मागील भागात आपण पाहिले की ईशाच्या वागण्याने दुखावलेली शमा अश्विनजवळ मन मोकळं करते. आता बघू पुढे काय होते ते.


" ए वॉव.. ही तुझी मोठी बहिण?" श्रावणीने ईशाला विचारले.

" माझी आई आहे ती.." ईशा दुसरीकडे बघत म्हणाली.

" वॉव, वाटत नाही ग. कसल्या सुंदर आहेत काकू. आणि तू?" बोलता बोलता श्रावणीने जीभ चावली. ईशाने बघितले. पालकसभेसाठी आलेली तिची आई सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. सगळ्यांशी हसून खेळून बोलत होती. सगळेच तिच्याशी बोलायला उत्सुक होते. आणि ईशा? तिच्याशी बोलायला जास्त कोणीच तयार नसायचे. वर्गात तर तिला काळे, जाडे अश्याच नावांनी चिडवलं जायचे. त्यामुळे तिला कोणाशीही मैत्री करायला आवडायचे नाही. एखाद दुसरी मैत्रिण असायची पण ती ही शमाला भेटली की सतत तिचेच गुणगान करायची. मग ईशाच तिच्याशी बोलणं कमी करायची. श्रावणी शाळेत नवीन आली होती. त्यामुळे तिने शमाला पहिल्यांदा पाहिले होते आणि ती तिच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेली होती. त्यात तिचे ते वाक्य. ही ही मैत्रिण गेली. विचार करून ईशाच्या डोळ्यात पाणी आले. पण तिने ते निर्धाराने परतवले. तिच्यासाठी हे नवीन नव्हते.
लहानपणापासून तिला हाच अनुभव येत होता. खूप लहान असताना तिला समजायचे नाही पण बरेच नातेवाईक तिला घ्यायला अनुत्सुक असायचे. अगदी जवळचे घ्यायचे पण तात्पुरतेच. मग शमा किंवा अश्विनच तिला घेऊन इथे तिथे फिरायचे. जसजशी ती मोठी होऊ लागली तसतशी तिला जाण येऊ लागली. शमासोबत असताना लोकांची जाणवणारी नजर तिला अश्विनसोबत असताना जाणवायची नाही. उलट तिथे सगळेच म्हणायचे की बापलेक सारखेच दिसतात. त्यातूनच मग त्याच्याशी तिचं जास्त जमू लागले. ती शमासोबत जाणं टाळू लागली. अगदीच गरजेचं असेल तरच ती तिच्यासोबत जायची. शाळेच्या मिटिंगला पण तिला बाबाच हवा असायचा. तो कामाला जात असल्यामुळे आणि शमा घरी असल्याने नाईलाजाने तिला तिचं येणं चालवून घ्यायला लागायचे. मग त्यातून हे असे प्रकार व्हायचे. शाळेत जे झाले ते झाले. तेच आता तिला कॉलेजमध्ये होऊ द्यायचे नव्हते.

ईशा जुन्या आठवणीतून बाहेर आली. तिने मनाशी ठाम निश्चय केला होता की काही झाले तरी कॉलेजच्या मित्रमैत्रिणींबरोबर आईची ओळख करून द्यायची नाही. कारण या सगळ्यांमध्ये एकजण खूपच खास होता. गौरांग.. त्याने आजपर्यंत तिला कधीच दुखावले नव्हते. खरंतर हा मित्रपरिवारही त्याच्यामुळेच तिला मिळाला होता. त्यांच्यामुळे ती हसू लागली होती, मजा करू लागली होती. वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेऊ लागली होती. तिला पहिल्यांदा बाहेरचे जग आवडू लागले होते. नाहीतर नेहमी ती, घर आणि टिव्ही हेच तिचं जग असायचं. तिला या नवीन जगाला हातातून निसटून द्यायचं नव्हतं.. त्यातूनही गौरांगला.


" पिलू, अभ्यास चालू आहे का?" ईशाच्या खोलीत येत अश्विनने विचारले.

" नाही बाबा," डोळ्यासमोरचं पुस्तक बंद करत ईशा म्हणाली.

"बाहेर जायचं मग?" त्याने विचारले.

" बाबा, नको ना.." ईशाला माहित होतं की जेव्हा त्याला तिची चूक दाखवून द्यायची असायची अश्विन नेहमीच तिला बाहेर घेऊन जायचा. पण आज तिला काहीच ऐकायचं नव्हतं.

" बरं.. नाही तर नाही. इथे बसू ना?"

" त्यात काय विचारायचे?"

" विचारावे लागते. तू आता मोठी झालीस ना?" अश्विन ईशाकडे बघत म्हणाला. ईशा काहीच बोलत नाही हे बघून त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. " आता बघ ना, तू आईशी जे वागतेस, त्याने आई दुखावली जाते हा विचार तू कधी करतेस का?"

" आणि माझं दुखावणे बाबा? मला किती वाईट वाटतं याचा कोणालाच विचार करावासा वाटत नाही."

" त्यात तुझ्या आईचा काही दोष आहे? तिने तर नेहमीच तुझ्यासाठी सगळं केलं आहे. तरिही तिच दोषी? लहानपणी तू खूप नाजूक होतीस, सतत रडायचीस, कोणाकडेच रहायची नाहीस. आपल्या करिअरवर पाणी सोडून ती फक्त तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी घरी राहिली. तरिही तिच दोषी?"

" बाबा, मला नको वाटतं लोकांकडून सतत तुलना ऐकून."

" लोकं रूपाची तुलना करतात. तू तुझ्या चांगल्या वागण्याने दाखवून दे ना? रूप आपल्या हातात नसतं पण वागणं तर असतं ना? त्याहीपेक्षा पिल्लू माझ्याकडे बघ. माझी आणि तुझ्या आईची तुलना होत होतीच की. पण मला एक गोष्ट माहित होती की आईचं माझ्यावर आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना का आणि कोणासाठी दुखवायचे हे आपण ठरवायचे." अश्विन बोलून बाहेर गेला ईशाला विचारात सोडून.


जाईल का ईशाच्या मनातला आईबद्दलचा राग? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all