ग्रहण.. भाग २

कथा मायलेकींची
ग्रहण.. भाग २

चॅम्पियन्स ट्रॉफी
प्रथम फेरी


मागील भागात आपण पाहिले की ईशाला तिची आई शमा आवडत नाही. काय असेल त्याचे कारण.. बघू आजच्या भागात.


" आता तरी सांगणार का काय झालं ते?" झोपायच्या तयारीत असलेल्या शमाला अश्विनने विचारले.

" अश्विन, मी वाईट आहे का रे?" डबडबलेल्या डोळ्यांनी शमाने विचारले.

" कोण म्हणेल असं? रस्त्यावरच्या कुत्र्याचीही काळजी करणारी तू. तुला कोण वाईट म्हणेल?" मस्करीच्या सुरात अश्विन म्हणाला.

" तुला मस्करी सुचते आहे? इथे काळजीने माझा जीव जातो आहे." शमाच्या डोळ्यात परत पाणी आले.

" काय झाले ते नीट सांगशील?"

" मला ना इतके दिवस वाटत होतं की ईशा वयात येत आहे म्हणून तिची चिडचिड होते आहे. पण नाही रे.. तिच्या मनात फक्त आणि फक्त तिरस्कार भरला आहे माझ्याबद्दल. तो ही..." बोलता बोलता शमा थांबली आणि तिने अश्विनकडे बघितले.

" तो ही तिच्या रूपामुळे." सुस्कारा सोडत अश्विन बोलला. " मग यात तुझ्यावर चिडण्यासारखं काय आहे? चूक तर माझी आहे. माझेच रूप घेऊन ती जन्माला आली आहे."

" अश्विन.."

" शमा.. तू खरंच माझ्याशी लग्न करायला नको होतं. इतकी सुंदर तू आणि मी असा. लग्न झाल्यावर आपण बाहेर जायचो तेव्हा लोकं वळून वळून आपल्या विजोड जोड्याकडे बघत असायची. मला तर माझे मित्र चिडवायचे सुद्धा की कसली एवढी जादू केलीस की तुझ्या सारख्या काळ्याला ही अशी छान बायको मिळाली."

" तुलाही वाईट वाटते आहे याचे?"

" तेव्हा खूप वाटायचे. राग यायचा तुझा, स्वतःचा, या जगाचा.. पण नंतर समजलं आपण चिडचिड का करायची? कोणासाठी? तुझं माझ्यावर असलेलं प्रेम मला दिसत होतं, माझंही तुझ्यावर प्रेम होतं. संसार आपला होता मग इतरांना महत्त्व का द्यायचे? ही जाणीव झाली आणि मग आयुष्य सुखावह झाले." अश्विन बोलत होता.

" बाह्य रूप म्हणजेच सौंदर्य या सगळ्यातून कधी बाहेर पडणार रे माणसं? मला आवडला होता तुझा स्वभाव. इतरांना मदत करायची तुझी सवय. तुझी बुद्धीमत्ता. माझ्याकडे काय आहे? फक्त गोरा रंग.. बस्स. आणि याचाही ईशाला राग यावा?"

" शमा, थोडा विचार कर ना तिच्या बाजूने. मी जर एवढा मोठा असून मला या सगळ्याचा त्रास होत होता. ती तर लहान आहे या सगळ्यासाठी. त्यातून तिचं अडनीडं वय." अश्विन शमाला समजावत होता.

" मला समजत नाही असं वाटतं का तुला? तू कधीतरी मला मेकअप केलेला बघतोस की वेगवेगळे कपडे घातलेले? साडी किंवा साधा ड्रेसच घालते ना मी? तिचं मन जपण्यासाठी मी अजून काय करू?"

" तू सध्या तिच्यापासून लांब जा. मला असं वाटतं तू उगाच तिच्यासाठी जॉब सोडून घरी राहिलीस. तुझ्या सतत जवळ असल्याने ईशा आणि तिच्या आसपासची लोकं सतत तुमची तुलना करतात आणि हीच गोष्ट तिला जास्त दुखावून जाते."

" ईशा झाली तेव्हा ती किती नाजूक होती. त्या एवढ्याश्या पिल्लाला सोडून मी कशी जाणार होते तेव्हा कामाला?"

" मग आता जा ना? तेवढंच तुझंही मन रमेल."

" पण या चाळिशीत कोण नोकरी देईल मला? आणि काम तरी काय जमणार?"

" जमेल.. तू सुरुवात तर कर. मी आहे तुझ्या पाठीशी." अश्विन धीर देत होता.

" आणि ईशा?" शमाने काळजीने विचारले.

" तिच्याशी काय आणि कसं बोलायचं ते मी बघतो. तू काळजी नको करूस."

" अश्विन, वागेल ना रे ईशा माझ्याशी नीट? मी नाही बघू शकत तिच्या डोळ्यात माझ्याविषयी हा दुस्वास. ती आयुष्य आहे रे माझं. तिच्यासाठी आणि फक्त तिच्याचसाठी आपण दुसर्‍या बाळाचा विचारही केला नाही. कसं समजवू मी तिला माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते?" शमा रडत अश्विनच्या कुशीत शिरली.

" ए वेडाबाई, का रडतेस? मी आहे ना? मी करतो सगळं नीट. फक्त थोडा वेळ दे मला." अश्विन शमाला थोपटत म्हणाला.


खरंच अश्विन आणू शकेल शमा आणि ईशाला जवळ? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all