ग्रहण.. भाग १

कथा मायलेकींची
ग्रहण..

चॅम्पियन्स ट्रॉफी
प्रथम फेरी" ईशा, आला की ग तुझा वाढदिवस जवळ. मी काय म्हणते तुझ्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावतेस का? मस्त पावभाजी करते. केक तर असेलच, आईस्क्रीम पण आणू. काय वाटतं तुला?" शमाने उत्साहाने विचारले. शेवटी तिच्या एकुलत्या एका लेकीचा सोळावा वाढदिवस होता. तिच्यापेक्षा हिचाच उत्साह उतू जात होता. जिचा वाढदिवस आहे ती मात्र मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसली होती.

" ईशा, ऐकलंस का? मी म्हटलं तुझ्या वाढदिवसाची पार्टी घरीच देऊयात. त्या निमित्ताने मला तुझ्या मित्रमैत्रिणींनाही भेटता येईल. "

" काही गरज नाही." ईशा रुक्षपणे म्हणाली.

" गरज कशी नाही? माझ्या राजकुमारीचा वाढदिवस आहे. तो ही सोळावा. मी तर म्हणते आपल्या नातेवाईकांनाही बोलावून घेऊ. तसंही खूप दिवसात कोणी भेटलंही नाहीये." शमा बोलतच होती.

" तुला प्रत्येक वेळेस माझा अपमान झालेला बघून आनंद होतो का?" चिडून ईशाने विचारले.

" ईशा..." शमा तिच्याकडे बघतच राहिली. " माझ्या पोटचा गोळा आहेस तू. तुझा अपमान झालेला मला आवडेल? आणि घरात सगळ्यांना बोलावलं तर तुझा अपमान होईल?" शमा हतबुद्ध होऊन बघतच राहिली.

" हो.. होईल.. कारण जो येईल तो तुझीच स्तुती करणार. तू या वयातही किती सुंदर दिसतेस आणि मी? मी कशी मुलगी म्हणून तुला शोभत नाही. हे सगळं ऐकून तुझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना? तुला म्हणूनच माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं, की बघा हिची आई किती छान दिसते आणि ही बघा." ईशा रागारागाने बोलत होती.

" ईशा, अग मी सहजच त्यांच्याशी बोलते. तुला ते ही आवडत नाही?" दुखावलेल्या आवाजात शमाने विचारले.

" हो.. नाही आवडत मला. कारण तू शाळेत किंवा क्लासमध्ये येऊन गेल्यावर फक्त एकच चर्चा सुरू असते. ईशाची आई बघा किती छान दिसते. आणि ईशा? त्यांना तर वाटतं की मी तुझी मुलगीच नाही. मलाही तेच वाटू लागलं आहे. मी बहुतेक तुझी सावत्र मुलगी आहे. म्हणूनच तुझ्या आणि माझ्या रूपात एवढा फरक आहे." रडवेल्या आवाजात ईशा बोलत होती.

" ईशा, अग माझ्या गरोदरपणाचे, बाळ झालेल्याचे फोटो बघितलेस ना तू? तरीही तुला माझ्याबद्दल असं वाटतं?"

" हो.. तरिही मला असंच वाटतं.. तू माझी आई नाहीस. असूच शकत नाहीस. असतीस तर तुझ्या रूपातला काहीतरी अंश माझ्यामध्ये दिसला असता. आय जस्ट हेट यू." हातातला मोबाईल फेकत रडत ईशा तिथून निघून गेली. शमा तिथेच बसली. आपल्या मुलीचे आपल्या बद्दलचे मत ऐकून खरंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. गेले काही दिवस ईशाचं बदललेलं वागणं तिला समजत होतं. पण वयात आलेली पोर आहे. बदलणाऱ्या हार्मोन्समुळे होत असेल असं, शमा स्वतःचीच समजूत काढत असायची. मात्र आज तिने जे बोलून दाखवलं होतं त्याने ती खूपच दुखावली गेली होती. तिला रडू आवरेना. तिला खूप भरून येत होतं. तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला. तिने वर बघितले. दरवाजात अश्विन उभा होता. ती उठत जाऊन त्याच्या गळ्यात पडणार तोच आतून ईशा आली आणि बाबा करत रडू लागली.

" काय ग, काय झालं माझ्या बछड्याला?" त्याने हातातली बॅग खाली ठेवत एका हाताने ईशाला धरले. ती काही बोलत नाही म्हणून शमाला डोळ्याने विचारले.

" बाबा, खरं सांग मी हिची मुलगी नाही ना रे?" ईशाचं रडणं अजूनही थांबलं नव्हतं. आणि रागात का होईना ईशाने आई न म्हणणं शमाच्या ह्रदयाला जखम करून गेलं. ती डोळे पुसत आत गेली. काय झालं असावं याचा अश्विनला अंदाज आला.

" असं का वाटतं माझ्या बाळाला?" त्याने प्रेमाने विचारले.

" ती बघ ना किती सुंदर. आणि मी? मी ही अशी. तिच्यामुळे कोणाला म्हणजे कोणालाच मी आवडत नाही. आई अशी असते का?" ईशाचे रडणे थांबले होते पण हुंदके नाही.

" तू तुझे डोळे बघितलेस?" अश्विनने विचारले.

" नेहमीच बघते. " नाक पुसत ईशा म्हणाली.

" कधीतरी तुझ्या आईचे डोळेही बघ. आणि मग मला सांग की ती तुझी आई आहे की नाही? मला तुमचं काय झालं ते माहित नाही पण एवढा अंदाज येतो आहे की तू आईला खूप दुखावले आहेस. कमीत कमी तिची माफी मागून घे." अश्विनने ईशाची समजूत काढली. ईशाने नाईलाजाने का होईना शमाची माफी मागितली आणि ती तिथून निघून गेली.ईशाच्या मनात असलेला आईबद्दलचा राग चुकीचा आहे की बरोबर? ही अढी जाईल तिच्या मनातून? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all