ग्रेस एक किमयागार..

वाचन संस्कृती अंगी भिनवतांना निसर्गाचे सोहळे अनुभवणं त्या सोनसळी केतकी गर्भातून उजवणाऱ्या शब्दमारव्यांचे कीत्येक खळे पापण्यांत साठवावेत...

मी महाकवी दुःखाचा
एकच संज्ञा पुरेशी असावी .. दुःखातिरेक झाल्या शिवाय कविता उद्भवतच नाही मला हे अगदी सहज सांगणारे ग्रेस .पण याचा अर्थ असा की तुम्ही रुजवता कविता तेंव्हा तुमच्या अनुभवाचं रसरसशीत पण कींवा अगदीचं कोमेजून जाणं हे तुमच्या सिद्धतेतलं असावं .
आत्मदाहातून मिळालेली ग्लानी ही विचारांच्या भोगसमाधीतला एखादाच कवडसा असावा .
उलगडूच शकत नाही कवितेला जोपर्यंत भृणावस्थेतल्या तीला मरण यातनांचे संधी कोपरे तुम्ही दाखवत नाही ..ते पराकोटीच्या दुःखाचे अर्घ्यही मी निवांतपणाने अर्पत रहातो ... असं कवीनंच म्हणावं एखाद्या ..
मग माझी अवस्था अशी...
भूकंप कीती जाहले तरि अंतराळी न झरा ...

शब्दमाधवीची रानभूल ,तळपायाच्या सालीचे पैंजण फुल होणाऱ्या चिमुकल्या निर्झराला ही वास्तवातला तीच्या- माझ्यातला अंतराय होणं मान्य होईल का ...?
आसक्ती आणि विरक्तीतला भावमग्नतेचा माझा कोणता कीनारा...?
शरीर विटके तरी पदर तारकांचा चुरा ..

कवितेच्या ओळी स्फुरणं, हे ही ईतकं उकलून दाखवणं ग्रेसांशिवाय कुणाला जमावं..?
वास्तवात वावरतांना अतिशय हळवं जगणं असायचं त्याचं .सजीवतेच्या व्याख्या जोपासतांना नकळत आपल्या हातून कीती प्रमाद घडताहेत यानंही विद्ध होणं त्यांना रुचत नसावं ..सृजनसूक्तातलं बहरणं हे ही कवितेतला वांझोटेपणा उर्ध्वृत करतो का ..?
इंद्रीयांच्या प्रारंभात
क्षितिज
संवादीपणाने
नाद माझे हळुवार
पैंजणी रात्रींना
दुःख आभिजात
स्पर्शमय वर्तुळात
क्षणाक्षणाने....
कविता निर्मितीच्या वेणा या एखाद्या भावोत्कट कविला कीती आत्मक्लेशाच्या ग्लानीतून नेत असतील..
ग्रेस आकलना पलीकडचे .बुद्धीभ्रष्टतेची कोणतीही संज्ञा ईथे लागू नाही ...
तुम्ही निर्विकार,अनासक्त, अभोगी असता तेंव्हाच या शब्द लालित्याचा खरा अनुराग भिनवू शकता ..नाहीतर रीकाम्या ओंजळीतली शब्द फुले वहायला ही ती शब्दमाधवी तुमच्यावर अनुरक्त होणार नाही ...
वाचकांनी अतृप्तच रहावं ही एक बेजमी मग कुसुमाग्रज,शांता बाई ,दुर्गा भागवत ,वि.वा.शिरवाडकर,गो.नी.दांडेकर,पु.ल. ए .पी. जे.अब्दुल कलाम जी... करतात..वाचन संस्कृतींचा वसा घ्यायला लावणारे हे देवदूतच... यांत अब्दुल कलाम जींचा विशेष उल्लेख करावांसा वाटतो.. राखेतूंन झेपावणारा फिनीक्स त्याचे अग्निपंख आजही ज्ञानरुपी आकाश भेदायची प्रेरणा देतच रहातात...
यांच्यासारखे पुण्यात्मे आमच्या वाट्याला यावेत कसे..???
ग्रेस म्हणतात तसं संध्या छायेतला घुंगुरवाळा वाजवत जाणारा तो महापुरुष अलख म्हणत दैवी अनुभुतींचा साक्षात्कार देतच असेल तर आम्हा लेखकांनी रीकामी झोळी घेऊन उभं रहावं.. आशिर्वादाचं ,शब्दफुलांचं ,निसर्गदत्त लावण्य एका सृजन स्पर्शात त्यानं मस्तकावर उधळावं...
वाचन संस्कृती अंगी भिनवतांना निसर्गाचे सोहळे अनुभवणं त्या सोनसळी केतकी गर्भातून उजवणाऱ्या शब्दमारव्यांचे कीत्येक खळे पापण्यांत साठवावेत...
गर्भश्रीमंती चं दान मागत या पुण्यवंतांच्या घरची चाकरी करावी..
रोंरावत येणाऱ्या जाणिवांच्या तूफानाला शांत करण्याचं कसबही यांच्या कडून शिकावं...
मी केंव्हा वाचायला सुरुवात केली आठवतही नाही पण समृद्धीचा परीस स्पर्श होणारच होता ...माझ्या संवेदनांना जागृत ठेवणं या पुस्तकांनी केलं .. शब्द,अलंकार,विशेषणं,रुपकं यांचं गारुड उतरवणं सोपं नाही...एकदा भिनलं की सुसाटपणाच्या असतील नसतील तेवढ्या रुजवाती त्यांनी घालून द्याव्यात...
मंत्रचळाची शाश्वती हे देखणे कवी,कवियत्री देतात मंगेश पांडगांवकर,गुलजार अमृता प्रीतम, ही थोडकीच यादी नव्हे....साहीत्य भिनवावं लागतं मंत्र जागर असावा लागतो.
हा अखंडतेचा नंदादीप शब्दांच्या फुलवातींनी
एकेका मोगरकळ्यासम शांत तेवत रहावा...
हृदयस्थ गाभाऱ्यातल्या त्या वाग्विलासीनीचा
वावर अहोरात्र असावा...
ज्ञानाच्या शुभ्रवलयांकीत आराशित वाचन समृद्धी चा एकेक सांदी कोपरा निखालस उजळून निघावा...
©लीना राजीव.