गोविंदा आणि माझ लग्न

माझ्या लग्नात गोविंदा येणार म्हणून मी जाम खोटं बोललो होतो
लग्नाआधी हिच्या गुलाबी साडी नेसलेल्या मामे  बहिणीशी  बोलताना मी जास्तच वाया गेलो होतो. तिच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी वाट्टेल त्या थापा मारत सुटलो. मी फेसबुकवर गोविंदाचा डीपी ठेवलेला होता त्यामुळे मी गोविंदाचा फॅन असावा अशी दिला खात्री झाली होती. तिला सुद्धा गोविंदा खूप आवडायचा. मी तिच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणालो,  मी नुसता गोविंदाचा फॅनच नाही तर आम्ही दोघ खूप जवळचे  मित्र देखील आहोतं.

त्याबरोबर तिने त्या आनंदाने आणि आश्चर्याने जोरदार किंकाळी मारली. एकदम उड्या मारत माझ्याजवळ आली माझा हात हातात घेऊन काकुळतीने म्हणाली जिज्जू,  प्लीज प्लीज प्लीज मला पण गोविंदाला भेटायचंय.भेटवा ना.

मी मुंबईला राहातं होतो.  त्याच्यामुळे तिला ते खरं वाटलं.ती जसजशी आश्चर्यचकित होतं होती तसतसा मला थापा मारायला चेव येत होता. माझ्या गोष्टी ऐकून आजूबाजूला सासू, सासरे, साले, साल्या आणि हिच्या काही बऱ्या दिसणाऱ्या मैत्रिणी पण जमा झाल्या आणि कानात पंचप्राण गोळाकरून माझ्या गोष्टी ऐकायला लागल्या. मग मी अजूनच चेव येवून तिला या मागच्या रविवारी, मी आणि गोविंदा कसा पिक्चर ला गेलो होतो आणि चौपाटीवर पाणीपुरी खातांना तो पैशाचे पाकीट कसा घरी विसरला होता. मग मी त्याचे पैसे कसे भरले. त्याचं त्याला कसं वाईट वाटलं होतं. नंतर मग  त्यांने  दहा हजार रुपये खिशात कसे जबरदस्तीने देऊन टाकले होते.त्यानंतर  यावेळच्या धुळवडीला त्याचा शर्ट रंगाने कसा पूर्ण भिजून गेला होता. आणि मग तो  माझा एखादा जुना शर्ट कसा काकुळतीला येऊन मागत होता हे मी सांगितलं. सगळे आश्चर्याने थक्क होवून माझ्या कडे कौतुकाने पाहात होते.मग मी चेव येवून अजून एक गोष्ट सांगितली. एकदा त्याने त्याचा बूट पुसण्यासाठी पांढरा सुती कपडा मागितला होता. मी माझं बनियन दिलं. त्यावेळी त्या  बनियानचा रंग पाहून त्याला बूटाचा काळा रंग कसा जास्त चांगला वाटला. त्या वेळी मग हातानेच  साभार नकार देतं तो कसा काकुळतीने हताशपणे मान हलवत होता,  हे मी तिला रंगवून रंगवून  सांगितलं.

माझे आणि गोविंदाचे इतके  जवळचे संबंध असतील अशी  तिला बिलकुल कल्पना नव्हती. त्यामुळे ते ऐकल्यानंतर हिच्या मामे बहिणीचे डोळे विस्तारलेले आणि तोंड आ वासलेले पंधरा मिनिट तसेच राहिले.

अहो, तिला कशाला गोविंदाच्या गोष्टी सांगीतल्या. गोविंदा साठी पार वेडी होऊन जाते.ही पहिल्यांदा मला म्हणाली .

एका क्षणात माझ्या आणि गोविंदाच्या मैत्रीची गोष्ट सगळ्या सासुरवाडीला पसरली. सगळे माझ्या भोवती जमा झाले. सगळ्यांच्या मनात अपार आश्चर्याचे भाव होते. प्रत्येक जण प्रश्न विचारून आपले कुतूहल पूर्ण करत होता.

गोविंदा कसा खातो, कसा चालतो, कसा बोलतो या बद्दल मी मनाला येईल तशी उत्तर देतं होतो. दुपारी जेवणा नंतर लग्नाची बैठक बसली. त्या वेळी अर्धा गावं जमा झाला होता. सगळे मन लावून ऐकत होते. अचानक सरपंच उभा राहिला आणि म्हणाला, बापू आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत फक्त आमची एकच विनंती आहे की तुम्ही लग्नाला गोविंदाला घेऊन या. त्याच बोलणं झाल्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. मी काय बोललो ते कोणी ऐकूनच घेतलं नाही. म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांनी माझ्या कानावरून बोटं मोडली, तर काही शाळेतल्या मुलींनी माझ्या सह्या घेतल्या. काही शाळेतल्या मुलांनी मला हात लावून बघितला. बरेच जण पायावर डोकं ठेवून गेले. मला उगाचच संत झाल्याचा भास झाला.

शेवटी मी मुंबईला परत आलो. त्या नंतर मला सासुरवाडीहुन बरीच पत्र यायला लागली. ही पण पत्र पाठवायची. पण सगळ्या पत्रात गोविंदाची चौकशी असायची.

गोविंदा भाऊजी कसे आहेत. त्यांना म्हणावं लग्नाला यायचं आहे. नवीन कपडे वगैरे शिवून घ्या. तब्येतीची पण काळजी घ्या... सगळी चौकशी गोविंदाची असायची. माझी कोणी साधी विचारपूस पण करत नसे. फक्त माझ्या साठी सूचना असे, गोविंदाची नीट काळजी घ्या आणि त्याला आणायला विसरू नका.

आता हे एक नवीनच टेन्शन निर्माण झालं होतं की गोविंदाला आणायचं कसं. अती खोटं बोलण्याचा मला खूप पश्चाताप होतं होता. काय करावं काही समजत नव्हतं. जसजसे दिवस जवळ यायला लागले तसतशी माझी काळजी वाढायला लागली. मी दिवसेंदिवस अशक्त दिसायला लागलो. आमच्या ऑफिस मधला एक प्युन म्हणाला देखील, साहेब तुमचा काही प्रॉब्लेम वगैरे आहे का. माझ्या ओळखीचा एक हकीम आहे. त्याने असे बरेच आजार बरे केले आहे. त्याच्या बोलण्याचा रोख पाहून माझं डोकंच फिरलं. मी म्हटलं, अरे बाबा मला काही आजार वगैरे नाही. अडचण तर दुसरीच आहे. मग मी त्याला माझा प्रॉब्लेम सांगितला, की मला लग्नाला गोविंदा हवा आहे. तो एकदम खो खो हसायला लागला. बस एव्हढीच गोष्ट ना. झालंच समजा तुमचं काम. कधी आणून घालायचं गोविंदाला. पत्ता आणि वेळ देवून ठेवा साहेब. मी त्याच्या कडे आश्चर्याने आ वासून बघायला लागलो. साहेब काळजी करू नका. गोविंदाचा पीए माझ्या एकदम जवळचा मित्र आहे. तुम्हाला काय येण्याशी मतलब ना. बस झालं तर मग. नाही आला तर मग मला बोला साहेब. हे बोलतांना त्याच्या तोंडाला आंबूस वास येत होता आणि मी विश्वास ठेवत नसल्याने त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो म्हणाला, साहेब थोडा खर्च करावा लागेल मात्र. मला थोडा संशय यायला लागला. पण तो म्हणाला, राहू दया साहेब तुमचा विश्वास नसेल तर. मी जातो. मला इतरही भरपूर काम आहेत.
शेवटी त्याला बरंच समजावलं तेंव्हा तो मोठ्या मुश्किलीने तयार झाला.

एक दिवस तो आनंदाने धावत आला. म्हणाला झालं साहेब तुमचं काम. आता बिनघोर जावा लग्नाला. मी येतोच गोविंदा साहेबांना घेऊन.

शेवटी मी त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नाला गावी जावून पोहोचलो. सगळे जण भेटायला येवून एकच प्रश्न विचारत होते. गोविंदा केंव्हा येणार आहे. मी म्हटलं येईल बघा उद्या.

सकाळी बाराला मुहूर्त होता. पाच वाजता कार्यालय खाली करायचं होतं.

सगळं वऱ्हाड सकाळ पासून जमा झालं होतं. एक गोष्ट ठळक पणे लक्षात येत होती की गावातल्या प्रत्येक आजोबा आजीचे केसं काळेशार झालेले होते. खरं म्हणजे एकही जणांचे केसं पांढरे नसलेले गावं म्हणून त्या गावाची नोंद गिनीज बुकात व्हायला पाहिजे होती. आमचे सकाळ पासून कार्यक्रम सुरु होते. पण कोणाचंच लक्ष लग्नाच्या विधींमध्ये नव्हतं. सगळ्यांचं लक्ष रस्त्याकडे होतं.

मला हळद लावणं सुरु असतांना, गुलाबी साडीवाली हिची मामेबहीण माझ्या कानाजवळ येवून विचारायला लागली, जिज्जू ताईने विचारलंय की गोविंदा कधी येणार आहे. पिवळ्या धम्मक चेहऱ्याने मी तिच्या कडे रागारागात पाहिलं. पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे.

तेव्हढ्यात बँड वाजला. फटाके फुटले आणि कोणीतरी ओरडत आलं, गोविंदा आला... गोविंदा आला.... सगळ्या हळद लावणाऱ्या बायका मला तसंच टाकून पळाल्या. मी एकटाच हॉल मध्ये राहिलो.

खरोखरच गोविंदा आला होता. सगळ्या पाहुण्यांमध्ये वेगळा दिसत होता. माझा तर डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कोणीतरी लग्न लागल्यावर घालायला आणलेले हार गोविंदाच्या गळ्यात घालून दिले. मी आपला हताश पणे पाहात राहिलो. लगेच पाच सवाष्णी आरतीचं ताट घेऊन गोविंदाला औक्षण करायला उभ्या राहिल्या. भटजीच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा सुरु झाला. त्यांनी आधी त्याच्यावर  मंत्र म्हणतं फुलांनी पाणी शिंपडलं. बायकांनी त्याला ओवाळलं, पेढे खाऊ घातले. मग फोटोग्राफर एक एक बाईला पोज घेऊन फोटो काढायला लागला. गोविंदा सोबत फोटो काढायच्या कल्पनेने सगळ्या मांडवातल्या दीड दोनशे बायका रांगेत उभ्या राहिल्या. त्यात सगळ्या वयाच्या बाया होत्या. तारण्याताठ्या, मध्यम वयीन आणि वयस्कर सगळ्या रांगेत उभ्या राहिल्या. त्यात एका आजीने सिनिअर सिटीझन म्हणून आम्हाला सगळ्यांच्या आधी ओवाळायला मिळालं पाहिजे, नाहीतर तक्रार करेन अशी धमकी दिली. तेंव्हा मांडवात गोंधळ उडाला. लोटालोटीत धक्का लागून आजींचा चष्मा पडून फुटून गेला. त्यांना दिसेनासं झालं पण त्या पूजेचं ताट हातातून काही सोडत नव्हत्या. गोविंदा समजून त्यांनी गुरुजींच्याच गळ्यात हार घातला. त्यांना ओवाळलं आणि पेढा  खाऊ घातला. नंतर फोटोग्राफरला बोलावून त्यांच्या सोबत फोटो काढायला लावला.

लाईन संपत नव्हती. मी आपला एकटाच तोंडाला हळद लावून, बनियन पायजमा घालून बसलो होतो. कोणाचंच माझ्या कडे लक्ष नव्हतं. तेव्हढयात कोणीतरी गोविंदाला ज्यूस आणून दिला. पुन्हा ओवाळण्याचा कार्यक्रम सुरु झाला. आचाऱ्यानी जेवण तयार झालं असल्याच निरोप दिला. मग लगेच पंगती सुरु झाल्या. सगळे गोविंदाच्या सोबतीने जेवायला बसले. जेवणं झाल्यावर पुरुष मंडळींचा गोविंदा भेटीचा कार्यक्रम सुरु झाला. एकाने सूचना दिली की गोविंदाला स्टेजवर बसवावे म्हणजे मस्त बॅग्राऊंड मिळेल. लगेच गोविंदाला स्टेजवर असलेल्या खुर्चीवर बसवलं गेलं. पुरुष मंडळी आपल्या मंडळी सोबत स्टेजवर जायला लागली. आता एव्हढया मोठ्या कलाकाराला खाली हात कसं भेटणार ना. मग मला द्यायला आणलेली पाकिटं त्यांनी त्याला द्यायला सुरुवात केली. हा कार्यक्रम एकदम शिस्तीत सुरु झाला. एक एक कुटुंब स्टेजवर यायचं. गोविंदाच्या हातात पाकिटं द्यायच. फोटोग्राफर त्यांचा फोटो काढायचा. लाईन थांबायचं काही नावच घेत नव्हती. इकडे मला काय करावं हे समजत नव्हतं. ही भानगड माझ्या मुळेच झाली होती.

नंतर भाषण, सत्कार हा कार्यक्रम सुरु झाला. अनेक मान्यवर बोलायला उभे राहिले. मुलांनी मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम करून दाखवले. सगळ्यांच्या आग्रहावरून गोविंदाने डान्स करून दाखवला. शिट्ट्या वाजल्या लोकं धुंद होवून तालावर नाचायला लागले. एका मागोमाग गाण्यांची फर्माईश व्हायला लागली आणि बहारदार नृत्याचा एकच गोंधळ सुरु झाला.

तेवढ्यात हॉल वाल्याची वेळ संपत आल्याची वार्निंग बेल वाजली. माझे सासरे धावत आले. म्हणाले जावाई बापू तुम्ही पण गोविंदा सोबत जोडीने फोटो काढून घ्या ना.

अहो पण माझे कपडे... अजून लग्न लागायचं आहे... मी रडकुंडीला येवून म्हटलं.

तेव्हढयात ही नटून थटून आली, मला म्हणाली चला हो, आपण एक फोटो काढून घेवू भावोजींसोबत.

मी आपला पिवळ्या तोंडाने, बनियन, पायजम्यावर स्टेजवर जायला निघालो. तेव्हढयात हॉल च्या गेट मधून लोकं, बाजू हटो, बाजू हटो असं म्हणत स्टेजवर आले आणि म्हणाले चलो साब शूटिंग की तयारी हो गयी है l  लगेच गोविंदा ताड्कन उभा राहिला आणि सगळ्यांना हात जोडून म्हणाला, अच्छा मै चलतां हू.

मी त्याला हात जोडून म्हणालो, साब एक फोटो प्लीज.

माझ्या कडे खालपासून वरपर्यंत पाहात तो एकदम ओरडला, चलो बाजू हटो आणि मला बाजूला ढकलून निघून पण गेला. त्याच वेळी कोणीतरी खी खी करत हसतं आहे असं मला वाटलं. बघतो तर हिची गुलाबी साडी नेसलेली मामेबहीण उपहासाने हसतं होती.

काय जिज्जू, तुम्ही तर त्याच्या सोबत पाणीपुरी खाल्ली होती ना, तिने खवचट पणे विचारलं.

हॉल मधले सगळे गोविंदाच्या मागे पाळल्याने हॉल पूर्ण खाली झाला होता. त्याच वेळी हॉल खाली करायची वार्निंग देणारी अजून एक बेल वाजली. मी घाई घाईने गोविंदाच्या गळ्यातून काढून ठेवलेले हार घेतले आणि एकमेकांच्या गळ्यात घातले आणि लग्न लावून घेतलं. नवरी नटलेली आणि नवरदेव मात्र पायजमा आणि बनियन वर असा तो फोटो लग्नाची एकमेव आठवण आहे.