Feb 29, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

गौराईचं माहेरपण

Read Later
गौराईचं माहेरपण


आटोपलं बाई माझ्या गौराईंचं ⁩माहेरपण. अडीच दिवसांचा तो सहवास पण वर्षभर पुरेल एवढे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो या भेटीत. अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी, कुंकवाच्या छाप्यांवर हळदीची बोट उमटवून, टाळ, चिपळ्या,टिपऱ्यांच्या, सान थोरांच्या गजरात येतात ग माझ्या गौराई! मोठ्या जाऊबाईनी त्यांना दिवाणखाना, माजघर, स्वयंपाकघर, भांडारघर, अभ्यासिका सारं दाखवून आणलं.
या गौराई येणार म्हणजे केवढी धामधूम आणि तयारी!हार,फुलं,पत्री,दुर्वा,विड्याची पानं,ओटीचं सामान, सुपाऱ्या, हळकंड, बदाम,ओली सुकी नारळ,हिरवा चुडा,सुवासिनींना आमंत्रण,फुलोरा,साड्या,दागिने…. आणि नैवेद्याचं तर विचारूच नका!! सोळा भाज्या, आंबील, कथिल, सांजोऱ्या, पुरणपोळ्या, वडे,मुठठे,दिवे पात्या,आळूची वडी, पंचामृत, कवठाची, तिळाची चटणी, कोशिंबिरी……नुसती लगबग आणि उत्साह असतो घरभर पसरलेला.

गौराईंनो⁩ बसा ग जरा माझ्याजवळ! तुम्ही येणार म्हणून काल हळदीकुंकवासाठी जया मामी, सुरेखा काकू, रेखा आत्या, सई वहिनी, मीना ताई, विमल मावशी, विष्णुपंत, सदा मामा, नंदू काका, राजू भाऊ,शेखर दादा, नाना आजोबा, दामले अण्णा आले होते, त्यांच्याच गराड्यात ग तुम्ही! सगळे निघेपर्यंत तुमची पण जाण्याची वेळ कधी झाली ते कळलेच नाही.

 गौराई निघाली का थांब जरा! करंज्या घेतल्या का? मोदक घे हो गणूल्यासाठी, अनारसे विसरलीस म्हणते! आणि चिवडा, लाडू,वेणी-फणी घेतली का? काय बाई आम्ही एवढे हौसेने, मायेनं करायचं आणि तुमचं आपलं नाही, नको, पुरे- पुरे,अगं आई एवढं प्रेम आणि माहेरची माया जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाही हो! काय म्हणतेस कालचचं वडे-पुरण घशापर्यंत आलाय! छान म्हणजे गोविंद विडा खाल्लाच नाही अजून तो घे आधी! अगं ही अमृत फळं,मोदक, पापडी, करंजी माझ्या नातवंडांसाठी, सुधा काकी आली होती फुलोरा करु लागायला, चॉकलेट मोदक माझ्या गणुल्या साठी बरं का! जेष्ठेचा गणू आणि कनिष्ठेची पोर किती गोड आणि लोभस! दामल्यांची रमा तर म्हणते \"या दोघांनाही कडेवर उचलून घ्यावसं वाटतं!\"
 कनिष्ठे तुझ्या पुतळीसाठी बाबांनी काजळ, बांगड्या, टिकल्या, कटकीच्या खाणाचं नव परकर पोलकं आणलय तेवढे आठवणीने घे! नाहीतर मग फोन करून सांगशील माझ्या नातीचं गऱ्हाणं,होऊ दे जास्त सामान झालं तर आता वर्षभर कुठे जमणार आहे तुम्हाला परत यायला? तुला सांगते गौराई यावर्षीची मखर सजावट तुझ्या नव्या वहिनीने केली आहे बरं का! फारच हौशी आहे बाई ती!! तुमच्यासाठी तन्मणी, चिंचपेटी, मोत्याचा कंठा, पोहेहार, बकुळ हार,राणी हार, बाजूबंद,गहू तोडे, पाटल्या,बांगड्या, हस्ती मुखी कंकण, मोत्याच्या कुड्या, कानवेल, बिलोरी झुमके, पैंजण,जोडवे, कोल्हापुरी साज, पुणेरी नथ, तीनेच आणलाय ग हौसेने! पुढल्या वर्षी तुमच्या छोटू रामांसोबत खेळायला एखादा बाळगोपाळ, नाहीतर तिच्यासारखीच घार्‍या डोळ्यांची परी आण म्हणावं… असाच आशीर्वाद द्या तिला!!!जेष्ठे मागल्या वर्षीची गंमत सांगते तुला, मला हव्या होत्या म्हणून मी तुमच्यासाठी डिझायनर वर्कच्या साड्या घेतल्या तर मीरा जिजी रागावलीच माझ्यावर म्हणाली \"अग हे काय? असल्या नव्या फॅशनच्या साड्या नको आणूस, आणि त्या दोघींना सारख्याच साड्या घ्यायच्या ना! आणि या वर्षी तिने स्वतः जरतारी मोर विणलेल्या डाळिंबी, मोरपंखी पैठणी घेतल्या हो तुम्हा दोघीसाठी!! म्हातारी फार हौशी आहे हो!!! म्हणते कशी \"आता त्या पोरीबाळी नाहीत, लेकुरवाळ्या घरंदाज सुना आहेत सुना!\"कनिष्ठे, यावर्षीची नवी भांडी बघितलीस का ग? हो तुपाची बुधली, कुंकवाचा करंडा, अत्तरदाणी, चांदीचा चमचा, सारं चांदीचं घेतलं हो! तुला आवडतं ना म्हणून!!

गौराईंनो माहेरपणासाठी आलेल्या मोठ्या घरच्या सुना तुम्ही, पण आपल्या माहेरचं कौतुक गोड मानून घ्या ग!बरं बाई आता निघतांना खाण्याचा आग्रह नाही करत,फक्त तेवढा दही भात खाऊन घ्या- तुम्हाला आवडतं म्हणून पणजी आजीने कालच मातीभांड्यात दही विरजवलय हो!! तेवढी भातावर खवल्या दह्याची कवड मोडून देते ते खाऊन मग निघा हो!!! कनिष्ठा फोन करत जा गं, गेली की तिकडचीच होते तू! तुम्ही गेल्या की करमत नाही ग अजिबात!! ज्येष्ठा काळजी घे स्वतःची, सारखं काम काम करत बसू नको,हो ग बाई मी पण घेईन काळजी स्वतःची, तब्येतीकडे लक्ष देईन, कुटुंबासह मी पण ताजा , सकस आहार घेईन,आरोग्याचा, कलात्मकतेचा, नवसृजनाचा जागर करीन, विचारांचं सोवळं पाळीन,आणि काहीही अनहेल्दी ऐकणार नाही आणि बघणारही नाही!! गौराई तुझ्या निमित्ताने सगळे आप्तस्वकीय, पै -पाहूणे घरी येतात.घराचं मंदिर होतं,तुला निघतांना एकच मागण आहे, माझ्या मुला-सुना -नातवंडाना आनंदाचं वाण दे. तुझ्या आशीर्वादाने माझं भांडार घर येणाऱ्या-जाणाऱ्या, अडल्या-नडल्या साठी भरू दे! तुझ्या कृपेने माझी मुलं-नातवंडं कर्तृत्व गाजवु दे आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते असु दे पण तुझ्या स्वागताला ते घरी परत येऊ दे!!!समाप्त.


*************************************************

कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या


जय हिंद 
  


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//