पण त्यांचा स्वभाव पाहता, सणासुदीच्या दिवसात उगीच भांडणाला कारण नको म्हणून त्या मूग गिळून बसत होत्या.
घरात गणपती बसून चार दिवस झाले. सगळं घर मंगलमय वातावरणाने सजलेलं, घरच्या धाकटा मुलगा, सून आणि नातवाच्या जोडीला, नोकरीनिमित्त वेगळा घरोबा केलेली दोन्ही मुले, सुना चार नातवांनी येऊन, घराला गोकुळाचे रूप लाभलेले. येणाऱ्या जाणाऱ्या पै पाहूण्यांनी गजबजलेलं, त्यात सुनांची चाललेली लगबग. नैवेद्य म्हणून रोजच्या गोडधोड पक्वानांचे, पूजेसाठी लागणारी फुले, धूप, अगरबत्तीचे मनाला प्रसन्न करणारे सुवास. तरीही मनाच्या चैतन्याचा झरा जरा आटलेलाच वाटत होता. उत्साह कुठे दडी मारून बसला होता.
तिची उणीव सर्वांनाच सतत जाणवत होती. कोणी उघड उघड बोलून दाखवत नव्हतं एवढंच. आज गौरी पूजन असून सुद्धा घरात, लाडक्या लेकीचा, माहेरवाशीणीचाचं पत्ता नाही म्हणून जानकीबाईंच्या चेहऱ्यावर नाराजीची लकेर स्पष्ट दिसत होती. सकाळी उठल्यापासून त्यांची विनाकारण चिडचीड होत होती.
त्याला कारणही तसेच होते. गौरी, त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीने, चार महिन्यांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून तिला, घरात प्रवेश करायला माधवरावांनी बंदी घातली होती.
घरातील इतर सर्वजण तिच्यावरल्या प्रेमाखातर, तिच्या निर्णयाला मनाविरुद्ध तयार जरी झाले असले तरी, तिला घरात प्रवेश न देण्याच्या माधवरावांच्या निर्णयविरोधात जायची कोणाची हिंमत होत नव्हती. नाही म्हंटले तरी तिचे भाऊ, माधवरावांच्या उपरोक्ष तिला अधून मधून बाहेर भेटत होते. तिच्या तिन्ही भावजया फोनवरून तिची विचारपूस करून तिची खुशाली आपल्या सासूबाई, जानकीबाईंना कळवत होत्या. तिला काय हवे नको ते पहात होत्या. नाईलाजाने तेवढ्यावरच त्या सर्वजणी समाधान मानत होत्या.
तसे पहायला गेले तर, माधवरावांचा तिच्या प्रेम विवाहाला विरोध असा नव्हता. त्यांचा विरोध होता तो, तिने निवड केलेल्या मुलासाठी होता, जो तिच्यापेक्षा कमी शिकलेला होता. त्याची मिळकतही जेमतेमच होती. अशा परिस्थितीत तो, त्यांच्या मुलीला कितपत सुखी ठेवेल, याची त्यांना शंका वाटत होती.
माधवराव तिच्या निर्णयामुळे खूप दुखावले गेले होते. ती तिचा निर्णय बदलेल, या आशेने काळजावर दगड ठेवून त्यांनी तिच्याशी संबंध तोडण्याची भाषा केली होती. ती आजतागायत त्यांनी पाळली होती. परंतु आजही त्यांना तिची आठवण मनातून सारखी पोखरून काढत होती.
गौरी, जानकीबाई आणि माधवराव यांना तीन मुलानंतर नवसाने झालेली एकुलती एक मुलगी होती. नेमका तिचा जन्म भाद्रपद महिन्यातला. त्यात रंगाने अगदी गोरीपान अन् दिसायला देखणी म्हणून तिचे नामकरण हौसेने गौरी करण्यात आले होते.
गणपतीला घातलेले साकडे, लेकीच्या जन्माने पूर्ण झाले होते म्हणून, तिच्या जन्मानंतरचं घरात गौरीपूजन करायला सुरुवात झाली होती. घरात लेकीच्या रूपात एक गौरी आहे म्हणून सुरुवातीपासूनच जानकीबाईं मुद्दाम एकाच गौरीची स्थापना करत होत्या.
माधवरावांची खूप इच्छा होती, घरात एक तरी मुलगी असावी. त्यांची ती इच्छा गणपतीच्या कृपेने चौथ्या खेपेस पूर्ण झाली होती. म्हणून गौरी गणपतीच्या सणाला घरात, इतर सणापेक्षा अनन्य महत्व प्राप्त झाले होते.
लहानणापासून बोलायला लाघवी आणि दिसायला देखणी असलेली गौरी सर्वांचीच लाडकी होती. घरात चार भावंडात एकटी मुलगी त्यातही शेंडेफळ. त्यामुळे ती म्हणेल ते हट्ट पुरवले जायचे. त्यातूनच तिचा हट्टी स्वभाव बळावला होता.
तिने पसंत केलेल्या मुलाला घरातून सर्वांचीच नापसंती होती. तिला सर्वांनी खूप समजावले होते. तिची राहणी आणि त्याच्या घरच्या राहणीमानात असलेली तफावत, त्यांनी तिला नीट समजावून सांगितली होती. परंतु त्याच्या प्रेमात आंधळी झालेली ती, कोणाच्याच समजावण्याला जुमानली नव्हती.
शेवटी तिने तिला हवे तेच केले होते. घरातून लग्नासाठी परवानगी मिळण्याची आशा मावळलेली पाहून, तिने सरळ कोर्टात जाऊन लग्न केले होते. कायद्याने सज्ञान असल्या कारणाने घरातले तिला कोणी अडवूही शकले नव्हते.
खरंतर आज माधवराव सुद्धा तिच्या आठवणीने व्याकुळ झाले होते. पण ते कोणाला तसे दर्शवत नव्हते. ती घरात असली की सतत वहिनींच्या गळ्यात हात घालून तिचं हसणं खिदळणं चालू असायचं. त्यामुळे सुनांना सुद्धा तिची उणीव भासत होती. मुलं सुद्धा बोलताना आडून आडून गौरीला घरी आणण्याविषयी सुचवू पहात होती.
जानकीबाईंना, आजच्या दिवशी तिच्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं घरात नसणं जास्तचं खटकत होतं. तिच्या वागण्या बोलण्यातून ते सतत जाणवत होतं. त्यात येणारे जाणारे गौरीबद्दल विचारून तिला अजून कोड्यात टाकत होते.
घरात छोट्या मुलांना गमती जमती सांगणारी, गौरीआतु नाही, म्हणून मुलंही थोडी हिरमुसली होती.
माधवराव हे सगळं उघड्या डोळ्याने पहात होते. काहीतरी चुकतेय याची जाणीव त्यांना होत होती. पण नक्की कुठे तेच त्यांना कळत नव्हते. \"मुलीच्या सुखाची आशा बाळगणं हे कसे चुकीेचे असू शकते?\", असाच प्रश्न त्यांना पडत होता.
त्यांच्या एका निर्णयामुळे, घरात जानकीला आपल्या लाडक्या लेकीचे माहेरपण करता येणार नाही याची बोच, माधवरावांना जास्त लागली होती. \" जिच्यामुळे आणि जिच्यासाठी, घरात गौरी स्थापना चालू झाली, तिचाचं घरात वावर नाही.\", विचार करून करून ते सैरभर झाले होते.
त्यांना वाटत होते की, कोणीतरी त्यांना गौरीला घरी घेऊन आणण्याविषयी विचारावे किंवा स्वतः तिला आणायला जावे. पण दोन्ही बाबत त्यांचा कठोर आणि रागीट स्वभावचं आडवा येत होता.
गॅलरीत येरझऱ्या घालता घालता ते थकून पाळण्यावर बसले. उलट सुलट विचारांचे काहूर त्यांच्या डोक्यात माजले होते. विचार करता करता त्यांना, दोन दिवसांपूर्वीचा जानकी आणि नातवांचा कानावर पडलेला संवाद आठवला.
ती मुलांना गणपती उत्सवाचे महत्व समजावून सांगत होती. \"पिढ्यानपिढ्या चालत आलेले आपले सण हे नात्यात ओलावा, प्रेम, आपुलकी जागृत करण्यासाठी असतात. एकमेकांची गरज ओळखून त्यांना मदत करण्यासाठी असतात. काही चुकून एकमेकांत हेवेदावे, रुसवा फुगवा असेल तर विसरून, पुन्हा सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र यावे म्हणून असतात. सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा केल्याने, रोजच्या जीवनात तेच तेच आयुष्य जगून आलेली मरगळ, दूर होऊन मनात एक नवीन ऊर्जा जागृत होते. नात्यातला गोडवा टिकून राहतो. म्हणूनच या सणांना, आपण उत्सव नात्यांचा असे म्हणतो.\" माधवरावांना जानकी बोलत होती ते सर्व काही आठवत होते.
\" काय चुकीचे बोलत होती ती? बरोबरच बोलत होती. पण माझ्या धाकामुळे, मुलांना जे ती सांगत होती, तसे तिला आणि इतरांनाही वागता येत नव्हते.
लहान मुलांना आदर्शाच्या गोष्टी नुसत्या सांगून काय उपयोग? आपल्या वागण्याने त्यांच्यावर संस्कार घडले पाहिजेत. गौरीने तिला हव्या असलेल्या मुलाशी लग्न केले. ती सज्ञान आहे. कायद्याने जर तिला परवानगी दिली, तर मी का तिला समजावून घेऊ शकत नाही? तिचा निर्णय चूक की बरोबर हे कालांतराने ठरेल. पण एक वडील म्हणून मी तिच्या पाठीशी असायला हवे होते. माझ्या खोट्या प्रतिष्ठेपायी, माझ्या लाडक्या गौरीला, तिच्या हक्काच्या माणसाच्या प्रेमापासून, वंचित ठेवून मीच तिच्या दुःखाचे कारण बनतोय.
एकीकडे माझी लाडकी लेक सुखात रहावी, अशी मी अपेक्षा करत असताना मीच तिला दुःखाच्या खाईत लोटले. आज तिला तिचा माहेरवाशीन म्हणून हक्क मी देवू शकलो नाही तर, हा घरातला सण फक्त दिखावाचं ठरेल.
प्रमुख कर्ती व्यक्ती म्हणून, घरातील प्रत्येकजण माझ्या शब्दाला मान देतात. मग मलाही त्यांच्या सुखाचा आनंदाचा विचार करायला नको का? घराला घरपण देणारी, लक्ष्मी स्वरूप माझी पत्नी जानकीला, सुनांना, लेकीबाळींना नाराज करून माझ्या घरात लक्ष्मी कशी वास करेल?
गणराया माफ करा मला. मीच स्वतः जाऊन माझ्या लाडक्या लेकीला घेऊन येतो. तिला तिचा माहेरचा हक्क मिळालाच पाहिजे. वेळेत तुम्ही मला सद्बुद्धी दिलीत. तुमचे आभार कसे मानावेत समजत नाही. असेच कायम आम्हाला सद्बुद्धी देत रहा. घरातल्या सर्वांचा एकोपा कायम ठेवायला मदत करा.\"
विचार करून थकलेल्या माधवरावांना, धोतराचा सोगा हातात धरून पाळण्यावरून उठताना, डोळ्यातले पाणी हातावर पडलेले दिसले. त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटले. डोळे पुसायला त्यांनी हात डोळ्यांकडे नेला आणि समोर पाहतात तर त्यांची लाडकी लेक गौरी त्यांच्या समोर उभी होती.
तिने पुढे येऊन त्यांचे डोळे पुसले. "सणासुदीच्या दिवशी असे डोळयात पाणी आणायचे नसते. घरात लक्ष्मीच्या जागी अवदसा येते. असे मी नाही, आई सांगते.", गौरी आईकडे बघून तिच्या बाबांना बोलली.
माधवराव अजूनही तिच्याकडे आश्चर्याने बघत होते. तिन्ही मुले कान धरुन पुढे आली, तसा त्यांना वस्तुस्थितीचा उलगडा झाला.
" बाबा, मला तुमची काळजी समजते. तुमचा जावई गरीब जरी असला तरी खूप प्रेमळ आहे. माझ्या प्रेमाखातर त्याने त्याचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आहे. मी ही नोकरी करते आता. आमची आर्थिक परिस्थिती आज न उद्या लवकरच सुधारेल. पण आम्हाला आमचा संसार आमच्या हिंमतीवर करण्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. द्याल न तुम्ही?", गौरीला गहिवरून आले होते.
" गौरी माझी लाडाची! किती मोठी झालीस बाळा ! माझा कायम आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. मला माफ कर.", म्हणतं त्यांनी तिला जवळ घेतले.
" आतातरी मोदक खाणार नं सासूबाई ! " थोरली सून मोदकाचे ताट घेऊन आली होती.
" हो ग बाई. माझी लाडकी गौरी आली आता. तिला मोदक खूप आवडतात. तिचं, ते खायला नव्हती, म्हणून मला खायची इच्छाचं होत नव्हती. आता ती पहिल्यांदा माहेराला आली आहे. आधी तिचे लाड मला करू द्या. तिला भरवू दे मोदक आधी.", जानकीबाई हसून ताटातला मोदक घेऊन, गौरीला भरवत म्हणाल्या.
" आता दोघी माया लेकी मोदक खायला लागल्या तर, आमच्या वाट्याला मोदक उरतील की नाही शंकाच आहे?" मधल्या भावाने गौरीकडे पहात थट्टामस्करी सुरू केली.
" चार दिवस खूप मोदक खाल्लेत तुम्ही. आता हे तरी सगळे मी खाणार.", असे म्हणत तिने वहिनीच्या हातातले मोदकाचे ताट घेतले आणि त्यातला एक मोदक आईच्या तोंडात भरवू लागली.
जानकीने तो हातात घेऊन पुन्हा तिच्या तोंडात भरवत तिला जवळ घेतले आणि म्हणाली, "गौराई माझी लाडाची, तिच्याशिवाय चैन मला नाही पडायची."
" चला ग आटपा लवकर. अजून किती कामे करायची बाकी आहेत. पुरणपोळया झाल्यात नं. तू अळूवडी कोशिंबीरचे बघ जरा. अग उर्मी गौराईला नथ राहिलीय घालायची. केतकी तू लक्ष ठेव जरा, कोणत्याही क्षणी बायका येतील हळदी कुंकवाला. अगं वसुधा गौरीची ओटी भरायची आहे. ताट करतेयस नं! तिच्यासाठी पैठणी आणलीय. कपाटात समोरच ठेवलीय बघ.", जानकीबाई, सुनांना उत्साहाने एक एक सूचना देत म्हणाल्या.
सर्वांचा उत्साह आणि आनंदाला आलेले उधाण पाहून, गौरी खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या रूपात माहेरी आल्याचे माधवरावांना भासत होते.
कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.