गोट्या

एक खोडकर मुलगा नेहमी खोड्या काढणारा आपल्या मित्रांना मदत करतो तेव्हा त्याच्या आजी आजोबांना त्याचा गर्व वाटतो


गोट्या

हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या डोंगरमाथा घेऊन रचलेल्या छोट्या छोट्या कौलारू घरांनी सजलेल्या घराच्या अंगणात तुळस आणि रातराणी मोगऱ्याच्या झाडांची कमान असलेल्या अशा कोकणातील एका छोट्याशा गावात एक छोटे कुटुंब राहत होते. आजी आजोबा, आई-बाबा आणि छोटा ऋषिकेश या पाच जणांचे छोटे अन् आनंदी कुटुंब. ऋषिकेश हे नाव ऋषिकेशच्या आजोबांनी दिले होते.

ऋषिकेश हा गुटगुटीत गोरा होता. म्हणून त्याला आजोबा प्रेमाने गोट्या म्हणायचे. आणि हे ऐकून सगळेजण त्याला गोट्या या नावाने बोलवू लागले. त्याच्या गोबऱ्या गालाचा गालगुच्चे घेऊ वाटणारा असा गोट्या दिसायला जितका सुंदर तितकाच खोडकर ही होता बरे का. दिवसभर घरात दंगामस्ती करायचा. इकडच्या वस्तू तिकडे अन् तिकडच्या वस्तू इकडे. कधी आजीचा चष्मा लपव तर कधी आजोबांची काठी लपव ‌. आणि मग ती वस्तू आजी आजोबा शोधायला लागले की हळूच हसत हसत आणून द्यायचा.

गावात पण तो खोड्या काढत होता. दुपारी शेजारच्या आजी झोपल्या की हळूच त्यांच्या घराच्या दारावर जोरात थाप देऊन पळायचा. तर समोरच्या काकूंच्या झाडावरचे पेरु आजीला हवं असे सांगून काढायला लावायचा.शाळेमध्ये शाळेचे वर्ग सुरू असताना शाळेची घंटा वाजवून यायचा. अशा नानातर्हेच्या खोड्या करणारा हा गोट्या.पण होता मात्र सगळ्यांच्या गळ्यातील ताईत. सर्वांचा लाडका. तो घरी नसेल तर आजी आजोबांना करमायचे नाही. मित्र पण तो नसेल तर खेळात रमायचे नाही.

त्यावर्षी गावात खुप जोराचा पाऊस झाला आणि त्यामध्ये होती नव्हती ती पीके वाहून गेली. ओला दुष्काळ पडला. गावात पण लोकांना हव्या त्या वस्तू मिळणे कठीण झाले. तसे गोट्याच्या घरी कशाचीही कमतरता नव्हती. त्याचे आजोबा सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांची पेन्शन येत होती आणि गोट्याचे बाबा जवळच्या शहरात एका कंपनीत काम करत होते. म्हणून यांना या ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत नव्हता. गोट्याला आवडतात म्हणून त्याच्या आजोबांनी आणि वडिलांनी बिस्किटे डबे भरून ठेवली होती.चाॅकलेट्स ,चिरमुरे, टोस्ट, आणि केक या सर्व खाऊंचे डबे भरलेले होते.

त्यादिवशी नेहमीप्रमाणेच गोट्या बाहेर खेळायला गेला आणि लगेचच परत आला. पळतच तो आपल्या आजोबांच्या खोलीत गेला आणि त्यांना ," आजोबा.. आजोबा.. ऐका न. मला एक मोठी पिशवी हवीय ." म्हणाला." का रे? कशाला हवी तुला पिशवी? काय करणार आहेस तू? " आजोबांनी विचारले.
" काही नाही तुम्ही या जरा माझ्या बरोबर स्वैपाकघरात आजोबा." असे म्हणत गोट्या आपल्या आजोबांना हात धरून ओढू लागला. आजोबा पण " अरे थांब थांब ओढू नकोस मला.पडेन मी. अरे येतोय रे. अरे बाळा" म्हणत त्याच्या बरोबर आत स्वैपाकघरात गेले. तिथे गेल्यावर गोट्याने आजोबांना मोठी पिशवी घेऊन उभारायला सांगितले आणि त्या पिशवीत डब्यातून बिस्किटे,केक, वेफर्स,चाॅकलेट्स , टोस्ट जे काही आणि जेवढे मावेल तेवढे भरले." अरे हे काय गोट्या. एवढे खायचे जिन्नस का भरतोस या पिशवीत? " आजोबांच्या या प्रश्नाचे उत्तर न देता गोट्या पिशवी ओढत ओढत बाहेर नेऊ लागला. हे बघून आजोबांना काहीच समजेना. ते पण त्याच्या मागे मागे निघाले. गोट्याने पिशवी आपल्या घराबाहेर नेली आणि आपल्या छोट्याशा हाताने हलकीशी टाळी वाजवली आणि," या रे " म्हणाला. त्याच्या आवाजाने समोरुन लहान लहान मुले पळत पळत आली आणि एका रांगेत उभी राहिली. हे काय चाललंय हे आजोबांना कळतच नव्हते आता तर आजोबांच्या मागे आजीपण उभी होती. गोट्या एका छोट्या दगडावर बसला आणि पिशवीतून एक एक करून बिस्कीट पुडा,चाॅकलेट,केक एकेका मुलाच्या हातात देऊ लागला. सगळी मुले आनंदाने खाऊ घेत होती. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद झळकत होता. जेव्हा गोट्याने सर्व मुलांना सर्व खाऊच्या वस्तू दिल्या तेव्हा तो त्यांना म्हणाला," माझ्या मित्रांनो उद्या पुन्हा या इथे मी तुम्हाला आणखी खाऊ देतो. पण असे भुकेले राहू नका रे. अरे आपण सगळे मित्र आहोत. माझे आजोबा ते तुमचे पण नाही का.मग मला जे खाऊ ते आणतात ते मी तुम्हाला पण वाटून खाणार. आजी माझी मला हेच शिकवते की कोणताही खाऊ मित्रांबरोबर वाटून खावा. आपण शाळेत डबा वाटून खातोच न. मग काय." गोट्याचे हे बोलणे ऐकून आजी आजोबांना एकदम भरून आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आपला हा खोडकर गोट्या इतका समंजस आहे हे त्यांना कळून चुकले. ओल्या दुष्काळामुळे याचे मित्र उपाशी पोटी झोपतात हे या छोट्या जीवाला कसे कळले याचे आश्चर्य वाटले. पण त्यांना आपल्या संस्कारांचा अनमोल ठेवा कायम जतन करणार आपला नातू याची खात्री मात्र झाली.

©® परवीन कौसर
बेंगलोर