गोष्ट एका संक्रांतीची भाग 2

कोणाचा संक्रांतीचा कार्यक्रम छान होईल?

गोष्ट एका संक्रांतीची भाग 2

मागील भागात आपण पाहिले की संगीता आणि तिच्या मैत्रिणी ह्यांच्या कार्यक्रमात खोडा घालयचा ह्या परंपरेला जागून सर्जा आणि मंडळींनी आव्हान स्वीकारले. आता पाहूया पुढे.


आता मात्र सगळे गणपावर चिडले.

" गणपा आर,आपून काय करणार. सक्रात बायकांचा कारेकरम असतो." सर्जा दात ओठ खाऊन म्हणाला.

"आर पर आदी आईकुन तरी घ्या. आपून चंपीची मदत घिऊ. त्यांनी फकस्त बायकांना बोलिवल. आपून समद्याना बोलवू. ते काय समानता का काय ते." गणपा समजावत होता.

हे ऐकल्यावर बाळूने गणपाचा मुकाच घेतला.

तसा गणपा चिडला,"बाळ्या,वात्रटपणा करू नको."

"तू आयड्याच आसली भारी दिली. म्हणून हे कवतिक र."
बाळू हसून म्हणाला.


सगळेजण आपापल्या घरी गेले. इकडे महिला वर्गाला यांनी घेतलेल्या चॅलेंजबद्दल माहिती समजली.

"पिंट्या,आर झेपत नसल आशी काम करू नाही. किती वेळा तोंडाव पडायचं."
रखमा शिरपा घरात शिरताच बोलली.

"पिंट्या,आर मोठी काम करायला मर्दाच काळीज लागतय. उगा घाबरून चालत नाय."
शिरपाने उत्तर दिले.

"आव, तुमी कशाला सर्जा भावजीच्या नादी लागून चॅलेंज घेतल."
बाळूचे लग्न नवीन असल्याने सूरही लाडिक होता.

बाकीच्या मित्रांना असेच टोमणे बसले होते. पण आता प्रश्न इज्जतीचा होता.एकदा चॅलेंज घेतले. आता माघार नाही.


दुसऱ्या दिवशी पारूच्या घरी मीटिंग सुरू झाली.
महिपतराव दोन्ही बाजूंना शांत करत म्हणाले,"तर आता हे ठरल. सक्रातीच दोन कारेकरम गावात हुतील. एक सरपंच बाईंच्या बचत गटाचा आन दुसरा सर्जेराव आन दोस्त मंडळींचा."

"पर आण्णा कारेकरम एकाच दिशी नको हुयाला. लोकांना जायला बर."
पारू म्हणाली.


"बराबर हाय,आदी संगीताच्या गटाचा कारेकरम व्हणार. दोन दिसानी तुमचा. काय सर्जेराव कबूल हाये का?"
महिपतराव सर्जाला म्हणाले.

"त्यानंतर दोन दिसानी ठरल कुणाचा कारेकरम बेस व्हता."


संगीताने नियम स्पष्ट केले. सगळ्यांनी ठरलेले मुद्दे मान्य केले.

संगीता जाताना म्हणाली,"सगळ्यांनी घरी या. आपला कार्यक्रम ठरवू."


"आव,आईका मागच्या येळला फजिती झाली. आता परत कशाला करता हे समद?"
सुमनने रामाला विचारले.

" कशाला म्हंजी? आता दोस्तांना साथ दिवू नग व्हय?"
रामा रागाने बोलला.


"व्हय तर,लई गुणाचे पुतळे हायेत ना समदे."
सुमन रागात आत निघून गेली.


"रखमा, अय रखमा. आज सैपाक लवकर बनव. मीटिंग हाय आमची."
शिरपाने आवाज दिला.

"आता,आन म्या काय तिकड हजमती कराया जाणार हाय?" रखमा हात ओवाळून बोलली.

पारू मात्र बैचेन होती. सर्जेराव आणि त्यांच्या मित्रांना ती चांगलेच ओळखून होती. संध्याकाळी मीटिंगला बघू असा विचार करून ती कामे उरकु लागली.


संध्याकाळी सर्जेराव आणि मंडळींनी आधी चंपाला गाठले.

" राम राम चंपाबाई, कसं हाय बेस ना?"
सर्जा हसून बोलू लागला.

चंपा पक्की धूर्त होती.

" काय काम काडल माझ्याकड?"
तिने हसत विचारले.
"आव, सक्रात झाली. आता हळदी कुकाच कारेकरम सुरू झालं. संगी लई मोठं हळदी कुकू करणार हाय."
तुका भोळेपणाचा आव आणत बोलला.

संगीता हे नाव ऐकताच चंपा बिथरली,"आस व्हय? म्या करते की तीच्याहून भारी हळदी कुकु."

चंपा चिडून म्हणाली.


"चंपाबाय संगीन आमचीबी फजिती केली हाय."
सर्जेरावने हळूच मुद्दा मांडला.

पुढे शिरपाने चंपाला सगळे सामावले. आपल्याला संगीता बरोबर स्पर्धा करून तिला हरवायचे आहे. हे तिला नीट समजले.

"चंपाबाय आमी पुरुष मंडळींची सोय करतो. तुमी बायकांचे सांभाळा."
सर्जा हसत बोलला.

"काळजीच सोडा सर्जेराव,मस्त शे पाचशे साड्या वाटू दणक्यात करू समद."

सर्जेराव आणि त्याच्या मित्रांनी शत्रूचा शत्रू तो मित्र ह्या उक्तीला जगात चंपाची मदत घेतली.

इकडे संगीताच्या घरी मीटिंग सुरू झाली." आपल्याला साध्या पद्धतीने आणि पर्यावरण जपून कार्यक्रम करायचा आहे. तुमच्या काही कल्पना असतील तर सुचवा."

संगीताने सुरुवात केली."आपून एकेक फळाच झाड दिऊ."


पारूने मुद्दा मांडला." व्हय म्या घरी जुन्या साड्यांचे बटवे शिवते. तेबी दिऊ."
सुमन म्हणाली.

"म्या तिळगुळ बनवते." दुसरी एकजण म्हणाली.

अशा प्रकारे कमीत कमी खर्चात बायकांनी कार्यक्रम आखणी केली.

आता दोन्ही कार्यक्रम कसे होतील? कोणाचा कार्यक्रम सरस होईल?

पाहूया अंतिम भागात.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all