गोष्ट एका संक्रांतीची भाग 1

संक्रांत म्हणजे आनंदाचा सण. त्याचा मिरवण्याचा इव्हेंट होऊ नये हे सांगणारी गोष्ट

गोष्ट एका संक्रांतीची भाग 1

संक्रांत झाली आणि हळदी कुंकू समारंभाचे वारे वाहू लागले. ह्याला आपले येडे पिपळगाव सुद्धा अपवाद नव्हते.

तर संगीताने सगळ्या बचतगट सदस्यांना संध्याकाळी मीटिंगसाठी बोलावले होते.

रखमा शेतावरून आली आणि पटपट स्वयंपाक उरकु लागली तसा शिरपाचा संशय बळावला आणि तो तंबाखू मळत म्हणालाच,"येवढं घाईन उरकून जायचं कुठं हाय? जरा मस्त चिकन कर की आज रखमे."

रखमाने फक्त एकदा डोळे फिरवले आणि शिरपाने पुढचे शब्द गिळून टाकले. का? ते नवरे मंडळींना समजले असेलच.

तरीही नक्की शिजते काय? हे समजायला हवे. त्याने बाहेर येऊन सर्जाला फोन लावला,"काय र, वैनीन सैपाक लवकर उरकला काय?"

तसा पलीकडून सर्जा हळूच म्हणाला,"व्हय, कायतरी शिजतंय बघ. पण समजायचं कसं?"

तसा शिरपा म्हणाला,"तू याक काम कर, बाळ्याला फोन लाव. त्याच लगीन नवीन हाय."

सर्जा हसला आणि त्याने बाळूला फोन लावून सांगितले की आज बायका कुठे जमणार आहेत ते काढून घे.

एवढ्यात पारूने हाक मारली,"आव बास झालं की! दिसभर कुटाळ करीत असताच की समदी."

सर्जा चिडला,"पारे,कायबी बोलू नग. म्या आपल ते बाजाराला जायचं इचारीत व्हतो बाळ्याला."

तोवर चिंगीला सूचना देवून पारू घराबाहेर पडलीसुद्धा.


बरोबर अर्ध्या तासात सगळे सर्जाच्या अंगणात जमले. सर्जा,रामा,शिरपा,तुका,गणपा आणि बाळू.

सर्जा तंबाखू मळून सगळ्यांना देत म्हणाला,"बोल बाळ्या काय खबर हाय?"

बाळू म्हणाला,"काय नाही र. संगीन मीटिंग बोलावली हाय."

आता सर्जा सावरून बसला,"कसली मीटिंग हाय? काय म्हणली का वैनी?"

"ते काय समाजल नाय बा."बाळू म्हणाला.

"शिरपा,काय तरी युगत लढीव. आपल्याला समजायला पायजे काय चाललं हाय." सर्जा रागाने बोलत होता.

"बाळू,चल. संगीच्या घराच्या माग एक बोळ हाय तिकड हुब राहू. समद कळलं." शिरपा म्हणाला.


तेवढ्यात सदा येताना दिसला. सदा ग्रामपंचायत शिपाई होता. त्याला सगळ्या गावच्या बातम्या आधी समजत. त्यात संगीता सरपंच.

"सदाभाव, आवो सदाभाव!" सर्जाने हाक मारली.

सदाने इकडे तिकडे पाहिले आणि ये सद्या अशी हाक देणारा सर्जा आज भाऊ वगैरे म्हणतोय. सदा सावध होऊन तिकडे गेला.

"काय सदाभाव काय म्हणाती पंचायत?" तुका त्याला तंबाखू देत म्हणाला.

" कशाला गरीबाची उडीवता. आव म्या सादा शिपाय माणूस." सदा तोंडात बार भरत म्हणाला.

"पर पंचायत कारबार तुमाला जास माहीत." शिरपाने त्याच्या गळ्यात हात टाकला.

तसा सदाने पुढील सगळा इतिवृत्तांत सांगून टाकला आणि निघून गेला.


"अस हाय का? काय तर म्हण कमी खर्चात आन सात्विक सक्रात." सर्जा हसून टाळी मागत असताना शिरपाने खुणावले.

पारू मागे येऊन उभी राहिलेली होती."वाटलच मला,आजुन तुमची सभा कशी भरली न्हाई? कुणी काय चांगल कराया गेलं की नुसती आपली नाव ठीवायची. तुमि आन तुमच्या दोस्तानी कदी केला का असा इचार?" पारू चिडून बोलत होती.

"वैनी, आमाला चॅलेंज करू नगा. सांगून ठीवतो." गणपा बोलला.

"हा मंग? दिलं चॅलेंज. तुमि करून दाखवा सरस कारेकरम."

रामा,सर्जा,शिरपा,बाळू सगळे नको असे खुणावत होते.

तरीही गणपा जोशात म्हणाला,"घेतल चॅलेंज,तुमच्या परीस भारी आन कमी खर्चात करून दावतो का नाय बगा."

ते ऐकून सर्जाने डोक्याला हात लावला.

"कारबारी बगा,इचार करा आजुन बी. येळ गेली न्हाय."

सर्जाला आता मित्रांची बाजू सोडून चालणार नव्हते." पारे,घेतल चॅलेंज. उद्या मीटिंग लावा. तिथं ठरलं समद."

"बर,मला काय?" पारू हसून आत गेली.

काय होईल पुढील भागात. कसे असेल चॅलेंज?

©® प्रशांत कुंजीर

🎭 Series Post

View all