गोष्ट एका संक्रांतीची अंतिम भाग

सर्जा आणि मंडळींना काय धडा मिळणार?



गोष्ट एका संक्रांतीची अंतिम भाग

मागील भागात आपण पाहिले की दोन कार्यक्रम घ्यायला दोन्ही गट तयार झाले. आता कोणाचा कार्यक्रम उपयोगी आणि सरस होईल. पाहूया.


दुसऱ्या दिवशी गावात कार्यक्रमाची जाहिरात झाली. अगदी साध्या पद्धतीने आयोजित केलेला कार्यक्रम पाहून काहींनी नाके मुरडली.

त्यात सर्जा आणि मंडळी आगीत तेल ओतत होतीच.

"पारू,आस जाणार व्हय हळदी कुकाला?"
सर्जा तिला चिडवत म्हणाला.

"आस म्हंजी? आव मस्त नऊवारी घातली हाय. ठरल हाय तस आमचं."
पारूने उत्तर दिले.

"पर दागिन न्हाई, नटन न्हाई. लंकेची पार्वती दिसतीया."
सर्जा स्वतः च्या विनोदावर हसला.

" काय हाय ना कारभारी कारेकरमात गरीब घरच्या लेकी बाळी बी येत्यात. त्यासनी कानकोंड वाटायला नग म्हणून."
पारू ठसक्यात म्हणाली.

"काय नाय त्या संगीला भिकच डवाळ लागल्यात."
सर्जा पुटपुटला.

संगीता आणि तिच्या बचत गटाने गावातील मंदिराच्या आवारात कार्यक्रम आयोजित केला होता. प्रत्येक स्त्रीला एक फळझाड वाण म्हणून देत होते.

घरी बनवलेले तिळगुळ आणि पोळ्या असा पौष्टिक खाऊ होता. त्याबरोबर काही मार्गदर्शन होते. अगदी हसत खेळत छान कार्यक्रम झाला.


संध्याकाळी गावात हॅण्डल वाटत माणसे फिरत होती,"आईका हो आईका ! समाजसेविका चंपाताई आणि कार्यसम्राट कार्यकर्ते सोसायटीच चेरमन सर्जेराव ह्यांनी गावातील बाया बापड्यांसाठी भव्य कारेकरम भरवला हाये हो! परतेक बाईला एक साडी आन खायला भरपूर चंगळ. याल तर खाल आन न याल तर पस्तवाल."


पारूने ते ऐकले आणि संगीताचे घर गाठले.

" म्या म्हणल व्हत ना,आमचं कारबारी आन त्यांचं दोस्त मंडळ काय तरी उद्येग करणार."
पारू फणफणत म्हणाली.

" व्हय ना. कायतर म्हण समाजसेविका चंपाताई!"
सुमन धुसफूसत घरात आली.

"शांत रहा. आपण पाहूया काय होतेय ते."
संगीताने त्यांना समजावले.

दुसऱ्या दिवशी चौकात मंडप टाकलेला होता. स्वतः चंपा स्वागताला हजर होती.

मोफत साडी आणि जेवण. गर्दीची नुसती झुंबड उडाली. जो तो कार्यक्रमाचे कौतुक करत होता. रात्रीपर्यंत लोक जेवत होते. संध्याकाळी कार्यक्रम संपला आणि सगळे घरी आले.

" याला म्हणत्यात कारेकरम."

सर्जाने मिशीला पिळ दिला.

आता दोन दिवसांनी ठरणार होते की कोणाचा कार्यक्रम सरस झाला.


दुसऱ्या दिवशी पहाटेच गुडगुड गुडगुड आवाज येऊन सर्जा जागा झाला.

"पारे, गुडगुड काय करतीस झोपत."

सर्जाने पारुला हलवले.

तेवढ्यात परत मोठ्याने आवाज झाला आणि पारू म्हणाली,"पॉट वाजतय तुमचं. काल आबारचबार चरला ना."


सर्जा ते ऐकायला जागेवर नव्हताच. सकाळ होईपर्यंत चार वेळा जाऊन आला. पोटात पाणी ठरेना.

तेवढ्यात सुमन आली."पारू वाईच लाह्या आसल्या तर दे. सकाळपासून पार..."


सुमन सर्जाकडे पाहून हसत म्हणाली. प्रचंड मसाले आणि सोडा असलेले जेवण बाधले होते. पैसे वाचवायचा नादात स्वस्त आचारी आणि समान आणले होते गणपाने.


संगीताच्या गटावर जळणारी आणखी एकजण म्हणजे रंगी. सकाळी उठल्यावर काल मोफत आणि भांडून मिळवलेली अंजिरी साडी घातली आणि छान तयार व्हायचा विचार केलेली रंगी पाच वेळा परसाकडे जाऊन आली.


कशीबशी हट्टाने तीच साडी नेसून रंगी दवाखान्यात निघाली. बाहेर भली मोठी रांग होती. बऱ्याच बायका कालच्या साड्या नेसून आलेल्या.

तेवढ्यात देसायाची तुळसा म्हणाली,"सकाळपासून नुसत पॉट वाजतय. आग लागली त्या जेवणाला. संगीन वाटलेल लाडू बेस त्यापरिस."


दुसरी एक बोलली,"खर हाये बया. नुसती चमक धमक काय कामाची."


तेवढ्यात जाधवाची जनी रंगीला म्हणाली,"अय रंगे अग हातावर आंजिरी रंग कसला ग?"

"जने तुझ्या मानवर बी लाल रंग हाये बघ."

तर ते ऐकून रांगेत उभ्या बाळूने हळूच पळ काढला. त्याने अगदी स्वस्त साड्या खरेदी केल्या होत्या. भरपूर खळ असल्याने लांबून छान दिसणाऱ्या साड्यांचे रंग पार हाताला लागत होते.

बाळू पळत येताना पाहून पोट धरून दवाखान्यात जाणाऱ्या सर्जाने त्याला हाक मारली,"अय बाळासाब कूट पाळताय?"


बाळू जवळ आला आणि म्हणाला,"तुमच्या सक्रात यायला नको आसल तर माझ्या बर पळा आन बाकीच्यांना बी फोन लावून बोलवा."


सगळ्या गावाला निकाल आधीच समजला होता. दोन दिवस जत्रेला कुस्ती बघायला जातो असा निरोप ठेऊन सर्जेराव आणि दोस्त गायब झाले होते.

तर गावात एकच चर्चा होती. दिखाऊ तेच टिकाऊ असत नाही. सगळा गाव सर्जेराव आणि चंपाला हसत होता.

पारूने फोन लावला आणि म्हणाली,"कारबारी जत्रत हारवू नगासा."


मागून लावणी ऐकू येत होती,"कसं काय पाटील बरं हाय का? सांगा काल काय ऐकल ते खर हाय का?"

©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all