गुरुच खरे मार्गदर्शक

ईरा लेखणीचे उगमस्थान

शाळेतील प्रसन्न वातावरण मन मोहून टाकत होते.गुलाब छान फुलले होते.अबोली ,चमेली चमकत होत्या.अशोकची झाडे आभाळाशी स्पर्धा करत होती.प्रत्येक वर्गासमोर सुबक रांगोळी लक्ष वेधत होती. फळ्यावर सुंदर अक्षरात सुविचार झळकत होता.शाळेच्या समोरच सुंदर पटांगण शाळेचे मुख्य आकर्षण होते.अशी मुलांंनी गजबजलेली आमची शाळा सर्वांना फार आवडत होती.

आमच्या शाळेतील शिक्षकवृंद म्हणजे शिक्षणाचा खजाना होता.प्रत्येक शिक्षक खेळीमेळीने शाळेमध्ये राहत होते.वेळेवर शाळेत येणे , शाळेची स्वच्छता , शिकवण्याचे नियोजन , मुलांना मार्गदर्शन करणे , दररोजचा अभ्यास घेणे , खेळ घेणे , कसरत घेणे यासारख्या उपक्रमात सारे शिक्षक व्यस्त असायचे.मुलांच्यावर भारी प्रेम करायचे.मुले आनंदात नाचत , रमत व शाळेतील वातावरणात रमून जात.शिक्षकांचा एकच ध्यास होता " मुल शिकली पाहीजेत ."

गुरव गुरुजी , पाटील गुरुजी , लोहार गुरुजी , कागवाडे गुरुजी ,चिंचणे गुरुजी हे शिक्षक शाळेचे शान होते.पण खरे गुरु म्हणून लाभले ते म्हणजे आदरणीय रामचंद्र धोंडीबा पोवार गुरुजी..! पहिली पासून आम्हाला आम्हाला अक्षर गिरवण्याचे धडे दिले व नंतर त्यांनी सातवीपर्यंत ज्ञानदानाचे कार्य केले.लहान असताना त्यांनी मुलांना समजेल असे मार्गदर्शन केले.समजावून सांगण्याची त्यांची पद्धत फारच चांगली होती त्यामुळे - बघता - बघता आम्ही दुसरीत कधी पोहचलो समजले नाही.सर्वांना ते प्रेमाणे बोलायचे , सर्वांची विचारपूस करायचे त्यामुळे मुलांचा लळा त्यांना लागला होता.

पोवार गुरुजी आमच्या जवळच्या शेजारील कौलगे गावचे होते.दोन्ही गावच्या मध्ये हिरण्यकेशी नदी दुथडी भरुन वाहत असे.नदीवर आमच्या गावाला येण्यासाठी छोटी नाव होती.त्या नावेतून ते नेहमी ये जा करत होते.पावसाळ्यात पोवार गुरुजींना फार त्रास होत असे.पुराच्या प्रचंड पाण्यातून ते नावेतून येत असत.गुडगाभर चिखलातून ते शाळेपर्यंत चालत येत असत.धो पावसातही ते शाळेत वेळेवर येत असत.पावसाळ्यात बरीच मुले जास्त पाऊस आहे म्हणून शाळेला दांडी मारत असत अशा वेळी मुलांना ते घरी बोलावयला पाठवत होते.मुले भिऊन शाळेला येत होती परंतू त्यांना गोडीगुलाबीने शाळेला दररोज येण्याच्या सुचना देत.

आमचा वर्ग पुढे सरकत होता.आमचे वर्गशिक्षक म्हणून पोवार गुरुजी कायम होते.त्त्यांची शिकवण्याची पद्धत सुरेख होती.प्रत्येकाला समाजल्यानंतरच ते पुढे जात.गणितात त्यांना विशेष आवड होती.चांगली तयारी करुन घेण्यात ते कधीच कमी पडत नसत.मराठी व इतिहास शिकवताना मुलं मंत्रमुग्ध होत असत. शाळेच्या आवारात वडाच्या झाडाखाली पारावर आमचा शनिवारी वर्ग भरत होता.वडाच्या पारंब्या लोंबलेल्या असायच्या.गोणपाट घेऊन आम्ही मुल मुली तिथं बसत होतो.पोवार गुरुजी दररोज आम्हाला अभ्यास द्यायचे.झालेल्या अभ्यासावर ते प्रश्न विचारत असत.कुणाला उत्तर येत नसत त्याला बरोबर उत्तर देणारा पाटीत धपाटा देत असे. हा नियम मुलीनाही लागू होता त्यामुळे सर्व मुले अभ्यास वेळेत पूर्ण करत होती.

पोवार गुरुजी सातवीपर्यंत आम्हा उत्कृष्ट मार्गदर्शक व हाडाचे शिक्षक म्हणून लाभले.शिष्यवृत्तीचे ज्यादा तास घेण्यासाठी शाळेत लवकर येत असत.मुलांना शिस्त लागण्यासाठी ते नेहमी धडपडत असत.शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात ते मनापासून काम करत होते.मुलांना विविध कला यायला हव्यात , मनोरंजनही शिकायला हवे , मुले सर्व कलेत पारंगत आसायला हवी असे ते सतत मुलांना उपदेश करत होते.साधी राहणी , उच्च विचार , नियोजन व शिस्तप्रियत्तेचे भोक्ते , मनापासून शिकवण्याची तळमळ यामुळे पोवार गुरुजी जीवनात गुरु म्हणून महान आहेत.

सातवीपर्यंत आमचे गुरु म्हणून लाभलेले पोवार गुरुजी यांचा निरोप समारंभ होता.शाळा खचाखच भरली होती.सर्वजण उदास झाले होते.एक हाडाचा शिक्षकाला सोडून आम्ही जाणार होतो.अतिशय वाईट वाटत होते.जीवनात ज्यांनी सर्वस्व अपूर्ण आम्हाला घडवले त्यांना निरोप देताना अंतःकरण हेलावले होते.व्यासपिठावर सर्व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली सर्वगुणसंपन्नेची खाण असणारे पोवार गुरुजींच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव झाला.मुलांनी रडवेल्या चेह-याने भाषणे म्हटली.मला फार उचंबळून आले व्यासपीठावर गुरुजींना बघून अश्रु अनावर झाले नकळत माझ्या तोंडून शब्द आले " दोन ओंडक्यांची होते सागरात भेट , एक लाट तोडी पुन्हा नाही कधी भेट." सगळ्या मुलांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.गुरुजींच्या  गळ्यात पुष्पहार घातला , गुरुजींना सुंदर नजराना भेट दिला.गुरुजीही भाऊक झाले …!! मुलांनो खूप मोठे व्हा …!! असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

अशा महान गुरुना वंदन …!!

         ©®नामदेवपाटील