गोष्ट एका वृद्धाश्रमाची

गोष्ट एका वृद्धाश्रम भेटीची

लघुकथा
                       गोष्ट एका वृद्धाश्रमाची 

“अशी पण मुलं असतात का गं? स्वतःच्या आई वडिलांसोबत असं कोण वागतं?” दिशा मुसमुसतच बोलत होती.

“अगं वाईट तर मला पण वाटतंय हे बघून. पण आता आपण वेगळं असं काय करू शकतो तूच सांग ना? सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही ना.” प्रिया

स्नेहांगण वृद्धाश्रमाच्या आवारात दिशा आणि तिची खास मैत्रीण प्रिया बोलत होत्या. निमित्त होतं वृद्धाश्रमाला दिलेल्या भेटीचं!


आज अभिनव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आश्रमात भेट देण्यासाठी घेऊन आले होते. बरेच जण या आधीही अनाथाश्रमात जाऊन आले होते. पण आज मात्र बऱ्याच जणांच्या मनात वेगळीच उत्सुकता होती. याचं कारण होतं आजची वृद्धाश्रमाला भेट! कधी न पाहिलेलं हे वृद्धाश्रम नक्की कसं असतं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जणू ते सर्व जण आतुर झाले होते.

आत जाता जाता प्रत्येकाचं सभोवतालचा परिसर निहाळणं सुरू होतं. आश्रमाचं रोजचं कामकाज पाहणारे प्रमुख श्री. पाटील यांनी थोडक्यात सर्वांना आश्रमाची ओळख करून देऊन, आत आश्रमाचा कारभार पाहण्यासाठी घेऊन गेले. राहण्यासाठी काही सदस्यांना मिळून एक, अशी खोल्यांची व्यवस्था होती. आजारी, अधिक वयोवृद्धांसाठी वेगळी सोय... इतरही बऱ्याच सुविधा पाहताना प्रत्येकाच्या मनात विचार अक्षरशः धावत होते. कदाचित इथे ही वृद्धाश्रमाची भेट पार पडली असती. पण.... हो, वृद्धाश्रमाची खरी भेट, खरी ओळख होणं तर अजून बाकी होतं ना!

प्रत्येकासोबत मनस्वी संवाद साधण्याचा अनोखा विचार करूनच इथे यायचं ठरलं होतं. तिथल्या प्रत्येकाची कहाणी ऐकताना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. अचानक मीराने त्यापैकी एका बाईंना त्यांच्याबद्दल विचारणा केली. त्या म्हणजे देशपांडे बाई! आपुलकीच्या चौकशीने त्यांच्या तर डोळ्यांत अश्रू तरळले. पण तरीही स्वतःला सावरुन त्यांनी बोलायला सुरुवात केली.

“मी लतिका देशपांडे. साधारण २ वर्षांपूर्वीच या वृद्धाश्रमात दाखल झाले. इथे आमचा हा नवा परिवार इतका छान आहे, की दुःख कवटाळून बसायची वेळच येत नाही. आणि जरी जुन्या आठवणी ताज्या झाल्याच तरी इथे हक्काचे सोबती पण भेटलेत.”

“पण आई, तुमच्या घरी कोण कोण असतं? आणि तुम्हाला इथे का बरं यावं लागलं? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तरच‌ सांगा.” मीरा

चेहऱ्यावर एक दुखरं हसू घेऊनच देशपांडे बाईंनी मुलींकडे पाहिलं आणि सुरुवात केली... “आयुष्य ना बरंच काही शिकवतं. कोण आपलं, कोण परकं याची जाणीव वेळ आल्याशिवाय होत नाही.”
“माझं पण एक छान छोटंसं, सुखवस्तू कुटुंब होतं.‌ होतंच म्हणेन, कारण आता ते कुटुंबच माझं नाही राहिलं! चार वर्षांपूर्वी माझे मिस्टर वारले, आणि घरातला माझा हक्काचा खांदा हरवला. मला एक मुलगा होता, अनिकेत नाव त्याचं.. मला खूप जीव लावायचा. त्याचं पण चार वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. तो आणि त्याची बायको दोघेही चांगली नोकरी करणारे, घरीही मस्त खेळीमेळीचं वातावरण असायचं. एकूणच सगळं अगदी छान सुरू होतं.
तीन वर्षांपूर्वी मी, माझ्या आणि मिस्टरांच्या नावावर असणारं आमचं राहतं घर अनिकेतच्या नावावर केलं होतं. सगळं अगदी सुरळीत सुरू होतं. आणि कधी बाहेरच्या जगाशी मी फारसा संबंध ठेवायची वेळच आली नव्हती. म्हणजे नातेवाईक भरपूर आहेत तसे, तर तोच काय तो बाहेरच्या जगाशी जिव्हाळा असायचा. सगळं छान सुरू असताना जवळपास अडीच वर्षांपूर्वी अचानक आयुष्याची घडीच विस्कटून गेली. माझा एकुलताएक मुलगा अनिकेत, अपघाताचं निमित्त होऊन आम्हाला कायमचं सोडून गेला. सावरायला वेळ लागत होता, पण म्हटलं मी आणि सून आता एकमेकींना आधार होऊयात. मी माझा मुलगा गमावला होता, पण तिने पण तर नवरा गमावला ना! या वयात आलेल्या वैधव्यानी तिला काय वाटत असावं याचाच विचार मी करायचे. पण...” इतकं बोलून देशपांडे बाईंनी एक हताश सुस्कारा टाकला आणि पुन्हा पुढे बोलू लागल्या...

“मी जिथे इतका विचार करत होते, तिथे माझी सून मात्र माझ्यासाठी वेगळेच विचार करत होती. मुलगा जाऊन चार साडेचार महिनेच झाले होते. आणि एक दिवस सून येऊन म्हणाली, ‘मी तुम्हाला यापुढे सांभाळू शकत नाही. तुम्ही तुमची काय ती व्यवस्था पाहून घ्या.’ आधी तर मला वाटलं ही खर्चाबाबत काही बोलतेय. पण पुढच्याच क्षणी माझा भ्रमनिरास झाला. तिने अगदी सुनावण्याच्या आविर्भावात घर सोडून जायला सांगितलं. मनात पटकन विचार चमकून गेला की आपण आपल्याच घराला सोडून जायचं? पण पुन्हा आठवलं, हे घर आपलं राहिलंच कुठे आहे. अनिकेतच्या नावावर घर केल्यावर पुढे ते आपसूकच तिच्या नावावर झालेलं.”


“पण मग तुम्ही काही तक्रार का नाही केली?” दिशा


“कसली तक्रार करू? ही गोष्ट जेव्हा नातेवाईकांना समजली, तेव्हा कोणीही काहीच बोललं नाही. मग एकटीच कोणासोबत आणि कोणासाठी भांडू बरं? खरं सांगू... खूप वाईट वाटलं होतं की ज्या सुनेला मुलीसारखं वागवलं, तीच मला घराबाहेर काढत होती. आणि माझ्या सख्ख्या नातेवाईकांनी ना तेव्हा काही दखल घेतली, ना अगदी आजपर्यंत त्यांना माझ्या अस्तित्वाची दखल घ्यावीशी वाटली.
पण हो, नशिबाने या आश्रमाचं कामकाज पाहणाऱ्यांपैकीच एक आरती ताईंची अशीच एकदा ओळख झालेली. त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे. नाहीतर बाहेर जाऊन मी काय करणार, हा प्रश्न मनाला पोखरत होता. पण आरती ताईंनी मात्र इथे आणण्यासोबतच, स्वतः सुरुवातीला काही महिने माझे महिन्याचे इथे द्यावे लागणारे‌ पैसे जमा केले. मग हळूहळू मात्र मी आश्रमात उपलब्ध असलेल्या कामकाजात सहभागी झाले आणि माझ्या त्या खर्चाची तरतूद करायला लागले. आणि आज इथे या माझ्या कुटुंबासोबत अगदी आनंदाने राहतेय.”

“तुम्हाला सांगते, परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवून जाते. ज्या माणसांना मी आपलं म्हणायचे त्यांनी साधं दया म्हणून सुद्धा माझा विचार नाही केला. आणि आज कोण‌ कुठली ही माणसं, त्या आरती ताई मात्र माझ्या मनाचा हक्काचा आसरा झालेत. माझं हक्काचं कुटुंब झालेत. या सगळ्यात ना, मला आपल्या-परक्यांचा फरक चांगलाच समजला. तुम्हाला एवढंच सांगू शकते की कोणावर आंधळा विश्वास कधीच ठेवू नका.” देशपांडे बाईंचं बोलणं ऐकून तिथे असणाऱ्या प्रत्येकाचं मन हळहळलं.


त्यांना सावरायला वेळ देऊन बाजूलाच बसलेल्या नवीनच आलेल्या आजींना प्रियानी प्रश्न विचारला, “तुम्ही केव्हापासून आहात इथे आजी?” 

आजी “मी आताच तीन दिवसांपूर्वी इथे आली आहे. या ताईंचं बोलणं ऐकून मी स्वतःला किती दुर्दैवी समजू, याचा विचार करतेय. त्यांनी मुलगा गमावला, म्हणून ही वेळ आली. पण मला तर एक मुलगा आणि एक मुलगी असूनही इथे यावं लागलंय.”

मीरा “असं का बरं? तुमची मुलगी पण काहीच बोलली नाही?”

आजी “ छे गं! मुलींची माया वेडी असते म्हणतात. पण माझ्या मुलीनं तर मला दारातूनच परतवलं. दोघांना एवढं शिकवून डॉक्टर आणि इंजिनिअर केलं. धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. पण आमचे हे गेले आणि मुलानी‌ मला घराबाहेर काढलं. घरदार, जमीनजुमल्याची तर आधीच वाटणी करून घेतली होती. हक्काची लेक म्हणून लेकीच्या घरी गेले तर तिनं आधीच स्पष्ट सांगितलं की मी नाही तुला माझ्या घरी ठेवून घेऊ शकत. बस्स! तिथेच सगळं संपल्यासारखं वाटलं. कोणी नाही तरी देव पाठीशी असतो म्हणतात ना. त्यालाच काय ती काळजी... ओळखीच्या एका ताईंच्या मदतीनी या आश्रमात आले. आता काय, यालाच आपलं घर समजून आयुष्य काढायचंय.”

मनातल्या भावनांचा आवेग सहन न होऊन दिशा आणि प्रिया बाहेर आवारात येऊन मन मोकळं करत होत्या. पोटची मुलं अशी वागू शकतात, हा विचारच त्यांना त्रास देत होता. पण सत्य नाकारू तर शकत नाही ना!


ज्या आश्रमात येताना सगळे अगदी उत्साहात होते, तेच सगळे तिथून निघताना मात्र भावना, अनुभवांचे विविध पैलू शिकून बाहेर पडत होते. कदाचित नवा दृष्टिकोन घेऊनच!
-©® कामिनी खाने.

( लघुकथा लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सत्यघटनेवर आधारित लिहिण्याचा हा प्रयत्न कसा वाटला नक्की कळवा.)