गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ९)

घड्याळ टोले देण्याचं काम करीत होतं........

रात्रीचे जवळ जवळ आठ वाजत आले होते. त्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हतं. पोलिसांची गाडी तिला सोडायला आली हे कोणीच पाह्यले नाही. गाडीतून उतरून ती घराशी आली. आत शशांक अस्वस्थ पणे फेऱ्या मारताना दिसला. आल्या आल्याच तो म्हणाला, " सरला, अगं तुझा काय विचार काय आहे? तू रोज अशीच येणार आहेस का? " मग तिनी सगळंच त्याला सांगितलं. त्याबरोबर, तो उत्तेजित होऊन म्हणाला, " मी आत्ताच जातो आणि त्या पाटलाच्या पोराला बरोबर करूनच येतो. " त्याला अडवीत सरला म्हणाली, " नाही आत्ता अजिबात तिथे जाण्याची गरज नाही. लवकरच काहीतरी होईल. तो दुसरा प्रयत्न नक्की करील. " आता मात्र शशांक भडकून म्हणाला, " तुला आणखीन काही व्हायला हवय का?, मग असं कर माझ्यापेक्षा तूच त्याच्या घरी जा. " मग काकुळतीला येत ती म्हणाली, "तरीपण आत्ता नको जायला. पोलीस नक्की काहितरी करतील. " तिचा विरोध पाहून मग त्याने पण हेका सोडला. पाऊस मघाशीच थांबला होता. आता फक्त थोडा गारवा तेवढा राहिला होता. सुखद गारवा. पण ते दोघे इतके विचलित होते की त्या गारव्याचा अनुभव घेणं त्यांना शक्य झालं नाही........... थोड्या वेळानी शशांक म्हणाला, " माईनी काय केलय पाह्यलस? " स्वतःला कोंडून घेतलय बाथरूम मध्ये. मी सुद्धा दहा पंधरा मिंटांपूर्वीच आलो. कसेतरी दिवे लावले आणि बघतो तर माई कुठेच दिसेना. सहज म्हणून बाथरूम्चा दरावाजा लोटजून पाह्य्ला तर तो आतून बंद होता. म्हणून धक्के मारून पाह्य्ले पण उघडला नाही. काय याचा विचार करीत फेऱ्या मारीत होतो, तेवढ्यात तू आलीस. चल मला मदत कर. दोघे मिळून धक्का मारू. पण..... माईला आधी बाहेर कढायला हवं. "...... "हे तू आत्ता सांगतोयस? मग दोघेही बाथरूम कडे धावले. दरवाजा जोरात ढकलून त्यांनी माईला कशीतरी बाहेर काढली. आता दरवाजाची कडी तुटली होती. माईला उचलून मग त्यांनी बिछान्यावर ठेवली.............................


तिच्या तोंडावर पाणी मारलं. तेव्हा ती थोडी शुद्धीवर आली. तिला चुचकारून सरलानी तिला पटकन कॉफी करून पाजली. माई चाचरत म्हणाली, " स... र.. ̮ला..... आलीस... तू? " सरलाच्या मनात आलं, डॉ. सोबतीना भेटायला हवं. पण आत्ता ती जाणार कशी? ते तर मुंबईला असतात, म्हणजे तात्याला माहिती असतील. म्हणजे तात्याला फोन करायला हवा. तिनी तो विचार झटकला....... माईचं जेवणही व्हायचं होतं. थोड्याच वेळात सरला स्वैपाकाला लागली. तिनी माईला बिछान्यावर पडल्या पडल्या भरवलं. माई आणखीनही काहीतरी बोलणार होती, पण सरलानी तिला न बोलण्याची खूण केली. तासाभरात त्यांची जेवणं झाली. माईला गोळ्या देण्यासाठी ती गोळ्या आणि पाणी आणायला स्वैपाकघरात गेली. परात येऊन पाहाते तो माईला झोप लागलेली दिसली. मग तिनी तिला गोळ्या न देण्याचं ठरवलं. पण तिला चैन पडेना................................. शशांक कसल्याशा कामात गुतला. तिला मात्र काही सुचेना. वसंताच्या अनुभवानी ती चांगलीच बिथरली. आता तिला खरोखरीच भीती वाटू लागली. इतक्या वेळात तिच्या डोक्यात आपल्याला घरी जायचय एवढच होतं. पण तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचं गांभिर्य तिला आता जाणवू लागलं. आणि शशांकचा रागही तिला समजू लागला. ती तशीच अंथरूण घालून लवंडली. तिला झोप लागणार नाही हे तिला आता समजलं. खर तर आत्ता जेमतेम साडेनऊ झाले होते. पडलेल्या माईच्या शांत चेहेऱ्याकडे तिची नजर गेली......... किती स्वस्थ झोपलीय ती. खरच किती निरुपद्रवी आहे. पण असा त्रास हिला का होतोय. तिच्या मनाने कोलांट्या उड्या मारायला सुरुवात केली. बाबासाहेब गेल्या पासूनचे सगळेच प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आले. माणसांची वागणी अशी विचित्र कशी? तिला कळेचना. तात्या आणि शर्मिलाची कमाल आहे. कोर्टात केस काय केली? गरज होती का? पण नाही... वाईट माणुस वाइट म्हणूनच जन्माला येतो हेच खरं. परिस्थितिचा वाटा माणसाची वृत्ती बदलण्यात फार थोडा असतो........ हळू हळू तिला तिच्या मनात एक विचार घर करू लागला. तो ती ओळखायचा प्रयत्न करू लागली. डॉ . सोबती म्हणालेच होते, माई काही अशक्या गोष्ट बोलल्या आहेत का? म्हणजे तिला अशक्य. आता तिनी तो विचार धरून ठेवला पिंडदानाचा दिवस तिला आठवला. पिंडाला कावळा शिवावा म्हणून कोणीच काही बोलायला तयार नव्हतं. तेव्हा माई पुढे झाली होती. ती सगळं नीट करील असं तिनी आश्वासन दिलं होतं. पण तिला शक्य झालं का? शशांकला नोकरी आहे पण खास नाही. आपण अजून काही कमवीत नाही. मग माई कोणत्या बळावर सगळं करणार आहे? तिला ताण येऊ शकतो. या वयात तिला ते सहन होत नसावं. तात्या आणि पियुशच्या पैशावर किती दिवस काढणार? तिला तेच डांचत असावं. शर्मिला हे जाणून आहे, आणि माईंची कोंडी करणं तिला शक्य आहे, हे माईला कळलं असावं. बाप रे! पण आपण काय करणार? किंवा माईला कोणतीतरी खात्री अथवा चांगली बातमीच सुधारू शकते. ती शशांकला सांगायला म्हणून उठली, पण शशांक पुस्तक वाचता वाचता लाईट तसाच ठेऊन झोपला होता. तिनी प्रथम लाईट बंद केला. त्याच्या अंगावर चादर टाकली. एरवी उशी साठी भांडणारा शशांक आज अगदी उशीशिवायच झोपला होता, तेही सतरंजीवर. तिला थोडं हसू आलं. बाहेर परत पावसाची रिपरिप चालू झाली. आज अमावास्या आहे की काय असं तिला वाटलं. तिनी अंगाभोवती पदर घट्ट लपेटला. आणि ती निद्राधीन झाली...............

घड्याळ टोले देण्याचं काम करीत होतं. बरोबर दीडच्या सुमारास माईला जाग आली..... ती बिछान्यावरून उठली आणि कुठे तरी जाण्यासाठी म्हणून पाय खाली सोडून बसली. मग स्वतःशीच पण पुटपुटू लागली, " मला गेलच पाह्यजे, मी नाही काही करू शकत....... " असं म्हणून ती उठली आणि साऱ्या घरभर वेड्यासारखी फिरू लागली. तिला नक्की काय करायचं होतं काय माहीत? मग एकदम तिच्या मनात काय आलं कोण जाणे? ती तशीच उघड्या बाथरूम मध्ये शिरली. दरवाजा लावण्याचं भान तिला नव्हतं. माई आत शिरली आणि बालदीतलं पाणी तिनी अंगावर ओतून घेतलं. मग तिनी परत भरलेली बालदी अंगावर ओतून घेतली...... सरलाची झोप पाण्याचा आवाज आल्यानी चाळवली गेली. ती तशीच उठली. तिनी दिवा लावला, पाण्याचा तांब्या हातात घेणार एवढ्यात तिचं लक्ष माईच्या बिछान्याकडे गेलं. हातातला तांब्या तसाच ठेऊन ती बाथरूममध्ये डोकावली. ओल्या कपड्यात बसलेली माई तिला म्हणाली, "ये सरला, बरं झालं आलीस. टॉवेल आण, आणि माझा शालू पण घेऊन ये. आज मी "सती " जाणार. जा शशांकलाही उठव माझं शेवटचं दर्शन घ्या........... " तिच्या शब्दागणिक सरलाचा " आ " वाढतच गेला. आणि ती मोठ्याने चित्कारली, " मा.... ई!. " मग रडत रडत ती मिठी मारून माईला म्हणाली, " माई, तुझ्या कुशीत शिरून झोपायचं होतं ग मला आज. " मग समजावणी च्या सुरात माई म्हणाली, " रडू नकोस बाळ, ही वेळ केव्हा ना केव्हा येणारच होती....... " सरला डोळे विस्फारून माईकडे पाहात होती. माईची नजर दूरवर कुठेतरी काय पाहात होती, कोण जाणे. माईच्या उत्तराचे दोघींचे संदर्भ वेगवेगळे होते. सरलाच्या अर्थातच ते लक्षात आले. माईचा चेहेरा ओढल्यासारखा लांब आणि फिकट पडला होता. सरलाला त्यातलं गांभिर्य जाणवलं. तिनी पटकन जाऊन प्रथम टॉवेल आणला, आणि माईचं अंग पुसायला सुरुवात केली. आपण गोळी दिली असती तर बरं झालं असतं असं तिच्या मनात येऊन तिला अपराधीपणा वाटू लागला. सरलानी तिला टॉवेल गुंडाळून बिछान्यावर बसवली. ती शशांकला उठवायला गेली. तो डोळे चोळित म्हणाला, " काय ग? काय आहे? " तिनी मग माईची अवस्था सांगितली, त्यावर तो दिवाणखान्यात येऊन म्हणाला, " कुठे काय? ती तर बिछान्यावर बसलीय. " त्यावर सरला चिडून म्हणाली, " मूर्खासारखं बोलू नकोस. ती अशी टॉवेल गुंडाळून बसते का नेहेमी?....... मग त्याला भीती वाटली. " ओह, खरच..... अरे बापरे.... आत्ता हिनी अंघोळ कशी काय केली? नाहीतर आपल्याला जरा आडवेळी अंघोळ केली तर रागावते. " मग हळूवारपणे त्याने माईला जवळ जाऊन विचारलं, " काय झालं माई? ".... अरे ती सती जायचं म्हणत्ये, याचा अर्थ काय रे? सरला रडवेली होत ओरडली.... मला वाटतं तात्याला आपण डॉ. सोबतींना घेऊन उद्याच यायला सांगावं, आता तर काहीच शक्य नाही. आत्ता तिला गोळ्या द्यायला हव्यात. " असं म्हणून ती गोळ्या आणायला म्हणून दुसऱ्या खोलीत गेली. तेवढ्यात माई दिवाणखान्यातल्या कपाटाजवळ पोचली. आतून जुनाट शालू काढून ती नेसू लागली. त्यावरचा ब्लाऊजही तिनी घातला. शालू इतका जुनाट होता की त्याला एक प्रकारचा ठेवणीतला जुनकट वास येत होता. काही ठिकाणी तो झिरलाही होता. पण माईला त्याची पर्वाही नव्हती...........


ओले केस मोकळे सोडून तिनी कपाळावर कुंकवाचा पट्टा रेखला. ती म्हणाली, " झाली माझी तयारी. या रे मुलांनो माझ्या पाया पडा. आणि त्यांच्या पाया पडण्याची वाट न पाहता ती मागल्या ओटीवरून विहिरीवर जाण्याच्या उद्देशाने निघाली. माईचा सगळा प्रकार पाहू सरलाच्या हातातून गोळ्या गळून पडल्या. मग ती आणि शशांक पुढे झाले. तो तिला अडवून म्हणाला, "अगं माई सती बिती कसली जात्येस? कसले हे खुळचट विचार. आपण तिघे मिळून सगळं नीट करू. वाटेल तो ताण तू घेऊ नकोस. आणि कोणाला काही बोलायचं असेल ना तर बोलू दे. " त्यावर मंद स्मित करीत माई म्हणाली, " बाजूला व्हा बाळांनो, " असं म्हणून त्यांना हाताने बाजूला करून तिने मागची ओटी ओलांडली. पडवीतून बाहेर दिसणाऱ्या आकाशात चंद्राची मळकट कोर दिसत होती. थंड ओलसर वारा वाहात होता. सरला आणि शशांक, दोघेही धावले. तिला धरून ठेवीत सरला म्हणाली, "माई पुरे झाले तुझे हे वेडेचार. सहन होत नाहीत या गोष्टी. बस!.... ताबडतोब बंद कर. तुला ज्या जबाबदारीची भीती वाटत्ये ना ती घ्यायला आम्ही पण आहोत ना. प्लीज माई, हात जोडते मी " असं म्हणून सरलानी तिच्या पुढे हात जोडले आणि तिच्या पायांना घट्ट मिठी मारून बसली. शशांक म्हणाला, " मला वाटतं आपण सितारामला बोलवावं. ". " नाही नाही, नको रे, उगाच सबंध गावभर पसरेल. " असं सरला गडबडीनी म्हणाली. तेवढ्यात तिची माईच्या पायावरची मिठी सैल झाली. माई तिरासारखी विहिरीकडे धावत सुटली. ती रहाटाजवळ आली आणि खाली काय आहे हे न दिसल्याने ती कपडे धुण्याच्या शिळेला अडखळून पडली. मग तिला काय झालं कळलं नाही. तिला एकदम हुंदका फुटला. विहिरीतून तिला बाबासाहेब अवतरल्याचा भास झाला असावा. ते तिला ओरडून म्हणाले, " अगं माई वेडी का तू? सरला आणि शशांकचं सगळं व्हायचय. त्यावर माई म्हणाली, "हो, पण आता मला नाही जमत, मी येणार आता......... त्यावर बाबासाहेब म्हणाले, " अगं तू तर अजून प्रयत्न सुद्धा केला नाहीस, त्या आधीच हार मानतेस? नाही, माई असं करू नकोस, तू तुझी जबाबदारी अपुरी ठेऊ नकोस..... तू तुझी जबाबदारी अपुरी ठेऊ नकोस..... ".. आणि ते तिला दिसेनासे झाले. माईच्या तोंडून शब्द बाहेर आले, " अहो पण मी कसं करू हे सगळं.? "..... मग त्याच शिळेवर ती डोकं टेकून रडत राहिली.

सरला आणि शशांक पाहात राहिले. त्यांना एकदम माईजवळ जायचं धैर्य होईना.... हळू हळू शशांक पुढे झाला. त्यानी प्रथम तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि थोपटलं. मग अंदाज घेऊन पटकन पुढे होऊन तिच्या डोक्यावरून तो हात फिरवू लागला. लहान मुलाला उचलतात तसं त्यानी तिला उचलून बिछान्यावर आणून झोपवलं. मग ते दोघे तिच्या जवळ झोपले. ती मात्र एखाद्या लहान मुलासारखी पोटाशी पाय घेऊन मुसमुसत राहिली. मग शशांक बाहेर जाऊन पडला. झोप गेलीच होती. आणि सारखी माईची मळवट भरलेली मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर येत होती. त्याच्या मनात आलं, माईला एवढा धक्का कसा काय बसला?. किती वेळ असा गेला ते समजलं नाही. तिनाच्या ठोक्यांनी त्या गूढ वातावरणाला वास्तवतेचा छेद दिला. सरला भानावर आली. ती माईच्या पाठीवरून हात फिरवत बसली होती. मग ती तिच्याजवळच झोपली. खर तर माईनी तिला जवळ घ्यायला हवं होतं......

रात्र सरली, पहाट झाली.... सहा वाजले....... दिवस नेहेमीप्रमाणे फटफटला......

(क्रमश:)

🎭 Series Post

View all