गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ८)

वाकणकरने दिलेलं पाणी पिऊन.......
वाकणकरनी दिलेलं पाणी पिऊन सरला जरा स्वस्थ झाली. विस्कटलेले केस तिच्या घामेजलेल्या चेहेऱ्यावर ठिकठिकाणी चिकटले होते.

अंगावर दुपट्टा नसल्याने ती अंग चोरून बाकड्यावर बसली होती.

वसंताबरोबरच्या झटापटीत तिच्या ड्रेसचा वरचा हूक तुटला. तिच्या ते लक्षात आलं आणि तिचा एक हात तो भाग झाकण्याचा प्रयत्न करू लागला.

वाकणकर गावातलाच असल्याने तिला ओळखत होता.

सरलानी त्यातल्या त्यात केस सारखे करून कपडे ठीकठाक केले. आता ती भानावर आली. एवढ्या सगळ्या धडपडीत तिची बारकीशी पर्स कुठे हरवली, तिलाच आठवेना. तिला फारच विचलित झालेली पाहून वाकणकर तिला म्हणाला, " काय ग काय शोधत्येस? काही हरवलय का? आणि घरी जायचं सोडून धडपडत पळत कुठे निघाली होतीस? " मग तो अचानक थांबला. आपण प्रश्नावर प्रश्न विचारतो आहोत, हे त्याच्या लक्षात आलं. पोलिस आहोत म्हणजे आपण सारखे प्रश्न विचारले पाहिजेत, असं नाही. असं त्याच्या मनात आलं. आलेल्या माणसालाही काही बोलून द्यावं, असा विचार करून तो थोडा लाजून थांबला.......... मग सरलानी त्याला सगळं सांगितलं. ते ऐकून तो म्हणाला, " एक बरं झालं. धावत सुटलीस पण नदीवरच फिरत राहिली नाहीस. चुकून का होईना तू इथे आलीस. साहेबांना कदाचित यायला उशीर होईल. तू पाहिजे तर नंतर ये.. " ती जरा वैतागूनच म्हणाली, " तुम्ही वसंताच्या विरुद्ध तक्रार नाही का नोंदवून घेऊ शकत? " त्यावर तो म्हणाला, " अगं, असं आहे बघ, हा बलात्कार नाही, तर साधा....... " तो पुढे बोलण्याच्या आतच ती त्वेषानी म्हणाली, " म्हणजे बलात्कार व्हायला हवा होता का? मग तुम्ही तक्रार नोंदवून घेतली असती, असच ना? " तशी समजावणीच्या सुरात तो म्हणाला, " हे बघ सरला, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नाही, हा बलात्काराचा प्रयत्न असू शकतो. माझं कायद्याचं ज्ञान फार नाही. तू पाहिजे तर साहेब येईपर्यंत वाट बघ. किंवा उद्या येऊन तक्रार नोंदवलीस तरी चालेल. पाहिजे तर मी त्रुला घरी सोडायला सांगतो. सांग काय करू ते. "

माई घरी एकटीच आहे. एक तर तिचं मन थाऱ्यावर नाही. त्यात हे असं. घरी गेलं तर घटना शिळी होते. नाही गेलं तर माईची काळजी वाटते. तिचं मन डळमळू लागलं. ती विचार करून म्हणाली, " मी एक अर्धा तास बसते. तुमचे साहेब आले तर ठीक, नाही तर जाईन घरी. " वाकणकर काहीच बोलला नाही. पुढची पंधरावीस मिनिटं अशीच गेली........ खेडेगावातली पोलिस चौकी. बाकी तिघे टोप्या आणि शर्ट काढून पत्ते खेळत बसले होते. बाहेरून आता मात्र थंड वारा आला. पावसाची रिपरिप चालू झाली. हळूहळू ती रिपरिप वाढली. अन मातीचा खमंग वास येऊ लागला. असला हा मादक गंध, एखाद्याचं चित्त कसं ठिकाणावर राहावं?, वाकणरच्या मनात आलं. पण तो तसा सभ्य होता आणि सीनियरही. बाकी तिघे वाकणकर आणि सरला यांचं अधून मधून निरिक्षण करीत होते. मग एकाचं लक्ष बाहेरच्या वातावरणाकडे गेलं आणि दबक्या आवाजात तो म्हणाला, " आयला, जया(जयसिंग नाव असावं) गड्या, भजी आणि बाटली पायजे बग. "........... वाकणकरने त्यांच्या कडे डोळे मोठे करून पाह्यलं. तेवड्यात जोरात फोन खणखणला. वाकणकरनी तो घेतला. आणि सायबाचा आवाज ओळखून एकदम ताठ होत तो म्हणाला, " सलाम... सलाम साहेब( जणू काही साहेब समोर बसला होता. ).. .. जी, जी साह्येब. " पलिकडून सायबाचा दणकट आवाज आला. सरला आणि इतरांनाही ऐकू येत होता..... अरे, तिकडं काय खबर?, ठिक ठाक आहे ना? " हां सायेब तंस काय इशेष नाही.... पण!.... " सांगावं की न सांगावं या विचारात असलेल्या वाकणकरवर सायेब गुरकावला, " अरे, पण काय?....... नेहेमीच असा अर्धवट सांगतोस, चल जाउ दे, मी पोचतोच आहे.... " असं म्हणून सायबानं फोन खाली ठेवला, तरीही वाकणकर ताठ होऊन "सलाम साहेब" म्हणाला....... मग त्याने भराभर आवराआवर केली. युनिफॉर्म ठिकठाक केला. डोक्यावरची टोपी नीट बसवली. वाकणकर चाळिशीच्या आसपास होता. मग त्याने खेळणाऱ्या तिघांना शिव्या हसडून तयार राहायला फर्मावलं. " ए, मुर्दाडानो. आवरा की तुमचा तो जुगार. सायेब येतोय पाच मिंटात. " मग खेळ बंद करून तेही वाकणकर प्रमाणेच तयार झाले. आपापल्या जागांवर खडे झाले.......... बाहेर किंचित वीज चमकल्यासारखा भास झाला. पावसाच्या टपोऱ्या थेंबांच्या आता धारा झाल्या. चौकीवरच्या पिवळ्या दिव्याभोवती पावसाळी पाखरांनी गर्दी केली. वाऱ्याचा जोर वाढला, चौकीची दारं आपटू लागली. पावसाची झडही आत येऊ लागली. पाऊस अगदी शाळेचं नवीन पुस्तक वाचण्यात दंग होणाऱ्या विद्यार्थ्याप्रमाणे सीरियसली पडू लागला...... ̮ लवकरच दारासमोर जीप येऊन धडकली. तिच्या दिव्यांच्या प्रकाशात सरलाचे डोळे दिपले. माहित असूनही झटका बसल्याप्रमाणे वाकणकर पुढे झाला. ताठ होत भर पावसात त्याने कडक सलाम ठोकला, आणि उजव्या बाजूला वळला. आतून पन्नाशीला आलेले, भरगच्च मिशा असलेले, जाड भुवयांचे, आपले सुटलेले पोट सांभाळित इन्स्पेक्टर अर्जुनवाडकर उतरले. आणि खाडखाड पावलं टाकीत ते आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले. प्रथम त्यांची नजर सरला कडे गेली.

तिला उग्र स्वरात त्यांनी विचारलं, " का ग, तू सरला ना, तुझं काय काम आहे पोलिस चौकी त? "ती गप्प पाहून ते पुन्हा म्हणाले, " काय ग?, काय विचारतोय? " शब्द जुळवीत ती म्हणाली, " मला तक्रार नोंदवायच्ये..... " वाकणकर मध्येच म्हणाला, " आपल्या पाटलांचा वसंता तिच्या मागं लागलाय...... " त्यांना बोलू न देता इन्स्पे. म्हणाले, " तिला तोंड आहे ना, मग तुम्ही तुमचं तोंड बाजूला ठेवा...... ( वाकणकरांचा चेहेरा पडला).... हां, बोल पुढे, वसंताचं काय? डांबरट लेकाचा. काय केलन त्यानी तुला? मग सरलानी सगळी कहाणी सांगितली. त्यावर ते खालच्या आवाजात म्हणाले, "(म्हणजे तशा मोठ्याच आवाजात) तुम्ही मुली पण ना विचित्र वागता. तुला कोणी सांगितलं तिथे वडाच्या झाडाखाली थांबाय्ला? बरं, ते जाउ दे. त्यानी तसं काही केलं नाही ना? तू तक्रार नोंदवलीस तर त्याचा गावात बभ्रा होईल. मला काय मी उद्या त्याला आणि पाटलांना बोलावून घेऊन समज देईन. पण या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांचं काय असतं की ते डूक धरून राहतात. आज तू पोलिस स्टेशनला आलीस ती योगायोगानं. पुन्हा अशी संधी नाही मिळाली तर? तरी पण काळजी करू नकोस. तू तक्रार लिहून दे, मी सध्या ती मी अधिकृत रित्या नोंदवून घेत नाही. उद्याच त्याला बोलावून चांगला दम देतो. जर काही कमी जास्ती झालं तर तुझी ही तक्रार कायदेशीर नोंदवून घेईन. म्हणजे मला कारवाईला बळकटी येईल. नाहीतरी त्याची गावातली पुंडाई वाढलीच आहे. आमच्या यादीत त्याचं नाव आहेच. वाकणकर हिच्म स्टेटमेंट घ्या आणि हिला गाडीनं घरी सोडा

(क्र म श:)

🎭 Series Post

View all