गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ७)

असेच दोनतीन दिवस गेले.......

असेच दोन तीन दिवस गेले. माईंचा अबोला संपत नव्हता. सरला पण शिवणाच्या क्लास मध्ये गर्क झाली. शशांकच्या म्हणण्याप्रमाणे जास्त लक्ष न देण्याचं ठरवलं. अर्थात, दुर्लक्ष करणं तिला कठीण जात होतं. पण करणार तरी काय? आता स्वैपाकाची जबाबदारी तिने स्वतःकडे घेतली. एकदोन वेळा पूर्ण दूध उतू गेलं तरी माईचं लक्ष गेल नाही. अशा अवस्थेत तिच्यावर कोणतीच जबाबदारी न देणं बरं असं तिला आणि शशांकलाही वाटलं. जास्त खोलात शिरूनही माईंच्या या अवस्थेचं कारण त्यांना सापडत नव्हतं. सीताराम सारख्या लोकांना सांगण्यात अर्थच नव्हता. त्यानी लगेचच मांत्रिक आणला असता. स्वतः बाबासाहेब तर असल्या उपायांची भंबेरी उडवीत. कोणाला सांगायचं?..... तिला समजेना. तात्याला सांगाव का? तो नुकताच नाराज होऊन गेला होता. त्यानी लक्ष नाही दिल तर आपलीच पंचाईत व्हायची. मग तिला एकदम दरेकर डॉक्टरांची आठवण झाली. ती दुसऱ्याच दिवशी क्लासहून येताना म्हणजे साडेबारा एक चा सुमार असेल तेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यात शिरली. दवाखान्यात कोणीच नव्हतं. कंपाउंडर पण नव्हता. डॉक्टर आतल्या खोलीतल्या खिडक्या बंद करीत होते. बहुतेक दवाखाना बंद होण्याच्या वेळेला आपण आलो. असं वाटून ती थोडी शरमली. डॉक्टरांना मागे वळून पाहताच ती दिसली. ते म्हणाले " अरे सरला, ये. ये. काय ग इकडे कशी? आणि आजारी कोण आहे? बरं नाही का? " ती त्यांच्या समोरच्या खुर्चित बसली. प्रथम ती काहीच बोलली नाही. नक्की सांगावं तरी कसं? तिला उमजेना. मग ती म्हणाली, " डॉ. मी ठीक आहे, पण माई.... " असं म्हणून ती थांबली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. डॉ. घाबरून म्हणाले, " काय झालं माईना? बी. पी. वगैरे वाढलं का?.... " मग तिने माईच्या वागण्यातला बदल सांगितला. तिला आलेली शंकाही तिनी बोलून दाखवली. त्यावर गंभीर विचार करून डॉ. म्हणाले, " हे बघ सरला, खर तर ही माझ्या विषयातली केस नाही. पण अनुभवावरून एवढच सांगतो की माईंना अगदी मायनर पण वेडाचा झटका आला असावा. मी चुकतही असेन. पाहिल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही. पण त्यांना कसलतरी दडपण आलेलं असावं. मी उद्या येऊन बघून जाईन. मग बोलेन काय ते. " मग त्यांनी इतरही औपचारिक चौकश्या केल्या. ती घरी गेली.


दुसऱ्या दिवशी साडेदहा अकराच्या सुमारास डॉ. आले. सरला आज घरीच थांबली होती. माई, भेटायला डॉ. आल्येत सांगितल्यावर बाहेर आली म्हणाली, " अरे, दरेकर आज इकडे कसे काय? " त्यावर ते सावध होऊन म्हणाले, " काही नाही सहजच, तुम्हाला भेटायला आलो. इकडे देसाईंकडे आलो होतो, म्हंटलं तुमची खबर घ्यावी. कशी काय तब्बेत आहे? ".... माई जरा चकित होऊन म्हणालया, " म्हणजे? मला काय झालय? " मग तिला यांना मुद्दाम तर बोलवलं नाही अशी शंका आली. थोडा रागही आला. आवाजात थोडी धार आणून ती म्हणाली, " तुम्हाला कशी दिसत्ये? " त्यांचे मोठाले डोळे पाहून डॉ जरा वरमले, घाम पुसण्याच्या निमित्ताने त्यांनी तोडावरच्या भावनाही पुसल्या. वरकरणी हसत म्हणाले, " काय आहे माई, गावातले जुने आणि प्रतिष्ठित लोक तुम्ही, तुमची चौकशी नको करायला, नाही तर म्हणाल, बाबासाहेब नाहीत तर डॉ. अगदी फिरकतही नाहीत्त. "माई आतल्या आत धुमसू लागल्या.

डाँक्टरांनी पाह्यलं वातावरण ठीक नाही आता आवरतं घ्यावं. मग तपासण्याचं दुरच राहिलं. तेवढ्यात, संभाषण रुळावर यावं असं वाटून सरला म्हणाली, " डॉ. चहा टाकते, बसा ना. " पण डॉ. अस्वस्थ दिसले आणि जाण्याच्या तयारीने ते उठले व म्हणाले, " चला माई, मी येतो, काही लागलं तर सांगा. सरला त्यांना मुख्य दरवाज्यापाशी सोडण्यासाठी गेली. दबक्या आवाजात डॉ. म्हणाले, " उद्या ये, गोळ्या देईन" सरला मूकपणे हो म्हणाली. ते गेल्यावर ती आत वळली, आणि माई एकदम तिच्या अंगावर येत म्हणाली, "काय ग कार्टे, दरेकरला तू मुद्दाम बोलावलस ना? आणि म्हणून तू आज घरी राह्यलीस? जाताना तो काय म्हणाला ग? " त्यावर सरला म्हणाली, " कुठे काय? " माईच समाधान होईना. ती म्हणाली, "तुम्ही मुद्दाम करता का ग? मला वेड लागलय असं वाटतं ना? " त्यावर सरला काही न बोलता स्वैपाकघरात गेली. माईंची स्वतःशीच बडबड चालू झाली. दिवस अतिशय वाईट गेला. माई जेमतेमच जेवल्या. दोन तीन दिवस असेच, ओढल्यासारखे गेले. सरला डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घेऊन आली. या गोळ्यांनी थोडीशी सुस्ती येईल असं ते म्हणाले. पण प्रश्न होता, त्या द्यायच्या कशा? सरला एक दिवस क्लास हून आली. दुपारचा एक वाजत होता. ती घरात आल्याचं माईंना कळलच नाही. ओटीवरून दिवाणखान्यात शिरताच तिला स्वैपाकघरातून मोठमोठ्यानी बोलण्याचा आवाज आला. "..... मी कोणाचं ही अक्षर ऐकून घेणार नाही. मी कोणचंही अक्षर ऐकून घे णार नाही...... मी कोणाचंही..... " माई स्वैपाकघरात दाणदाण पावलं आपटीत फेऱ्या मारीत होत्या आणि एकच एक वाक्य पुन्हा पुन्हा बोलत होत्या. माईंच्या फेऱ्या थांबत नव्हत्या. ते पाहून सरला ओरडली, " माई अगं थांब जरा. हे काय चाललय? अशानं चक्कर येऊन पडलीस तर? " पण माई ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. शेवटी ती माईंच्या मध्येच येऊन उभी राह्यली आणि तिला धरून रडवेली होत म्हणाली, " माई अगं काय झालय काय तुला? कोणाशी बोलतेस एवढं? इथे ऐकायला कोणीही नाही. हे बघ माई, ह्या गोळ्या मी आणल्येत, एक घे, म्हणजे बरं वाटेल. " असं म्हंटल्या बरोबर माई संतापून म्हणाली, " आण त्या गोळ्या इकडे, त्या डॉक्टरचं आणि तुझं हे कारस्थान आहे. कार्टे, तुला अनाथ म्हणून आम्ही वाढवली, आणि मला या गोळ्या खायला घालतेस? " असं म्हणून तिने दोन तीन गोळ्या तिच्या हातातून हिसकावून घेतल्या. आणि पटकन तोंडात टाकायला गेल्या. सरलाने त्यांचा हात मागे ओढला, म्हणून एकच गोळी तोंडात गेली. ती त्यांनी कडकडून चावून खाऊन टाकली. नंतर किती तरी वेळ त्या बडबडत बसल्या. निराशेने सरला खाली बसली. हळू हळू बडबड अचानक कमी झाली.

गोळीचा परिणाम होऊ लागला.................................


समोरच्या माठातलं पाणी त्यांच्या तोंडात ओतलं. त्यांचं शरीर आस्ते आस्ते ढिलं पडलं. आणि त्यांना एक प्रकारची सुस्ती आली. मग तिनी त्यांना कसतरी ओढत दिवाणखान्यात आणलं आणि सतरंजीवर झोपवलं....... आता तिनी सुटकेचा निश्वास टाकला. कपाळावर आलेला घाम पुसत ती थोडावेळ तिथेच बसली. मग तिला सांडलेलया गोळ्यांची आठवण झाली. स्वैपाकघरात जाऊन तिनी त्या गोळा केल्या. शशांक आल्यावर प्रथम तो तात्याला फोन करायला गेला. खरंतर सरलाला आवडल नाही, पण दुसरं कोणाला सांगण्यापेक्षा तात्याला सांगणं बरं असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी तिनी माईला समजावलं आणि स्वतःच्या हातानी जेवायला घालून गोळी दिली. माईनी झोपण्यापेक्षा भिंतीला टेकून बसणं पसंत केलं. त्या दिवशी माई अचानक शहाण्यासारखी वागली. म्हणजे ही सुधारू शकते अशी आशा सरलाला वाटू लागली. एक दोन दिवसानी ती डॉ. दरेकराकडे गेली. ते म्हणाले, " माझ्या ओळखीचे एक मनोवैज्ञानिक आहेत त्यांना मी एकदा बधून जायला सांगतो. म्हणजे आपल्याला हे किती गंभिर दुखणं आहे ते कळेल. ते उपायही सांगतील. त्यांचा विशेष म्हणजे ते विनाकारण औषधं देत नाहीत तर रोग्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचाही ते अभ्यास करून उपचार करतात. "..... त्यावर चार पाच दिवस गेले.

माईचे भ्रमिष्टासारखे चाळे अधून मधून चालूच होते. तात्याचा काही निरोप नव्हता. किंवा येऊन जाण्याबद्दल फोनही नव्हता. जीवन आणि पियूष तर काय आपल्याला आई आहे याची जाणीवही ठेवत नव्हते. साधं चौकशी करणारं पत्रसुद्धा ते लिहित नव्हते, फोन तर दूरच. आता मात्र शशांक आणि सरलाला कोणाच्यातरी आधाराची फार गरज वाटत होती. आणि एक दिवस तात्याचा फोन आला. शशांक तो घेण्यासाठी गेला. नाही म्हणायला तात्यानी उपचारासाठी लागतील ते पैसे देण्याची तयारी दाखवली. दुसऱ्याच दिवशी सकाळी आठलाच दरेकर आले. ते येताना एका गृहस्थांना बरोबर घेऊन आले. त्यांनी सरलाशी ओळख करून दिली. " हे डॉ सोबती. ह्यांच्या सल्ल्याप्रमाणेच आपल्याला सगळं करायचं आहे. " असं म्हणून त्यांनी डॉ. सोबतीना बसायला सांगितलं. सोबती एक बुटकासा माणुस होता. चेहेरा खप्पड, जेमतेम पाच फूट उंची, काळसर वर्ण, किडकिडित बांधा असलेल्या डॉ. सोव्बतींचे डोळे मात्र चांगलेच तेजस्वी आणि भेदक वाटले. प्रथम सरलाला तो माणूस जादुगार आहे की काय असच वाटलं. त्यांना बसायला सांगून दरेकर सरलाला आत घेऊन गेले, आणि हलक्या आवाजात म्हणाले, " काय ग? कुठे आहेत माई. आज नीट वागतील ना? नाहीतर एवढं जुळवून आणलय ते विस्कटायचं. " त्यावर ती अजून झोपली असल्याचं सरला म्हणाली. सोबती आत आले आणि म्हणाले, " प्रथम मला तुम्ही सगळा वाडा दाखवा. " असं म्हंटल्यावर दरेकरांनी त्यांना दिवाणखाना मागची ओटी, स्वैपाक घर, छोटी आणि मोठी पडवी आणि विहिरीचा भाग दाखवला. बाग तिथेच असल्याने दाखवली. मग दरेकर म्हणाले, " वाडा तसा एवढाच आहे, म्हणजे वापरात असलेला भाग. ".... " अहो, पण या खालच्या मजल्यावरची खोली अशी बंद का ठेवली?, " उत्तराची अपेक्षा न करता ते म्हणाले, " चला आपण वरचा मजला पाहू. ". त्यावर सरला म्हणाली, "तिथे पाहण्यासारखं काहीच नाही. चार खोल्या आहेत पण त्या बंद आहेत. " त्यावर ते म्हणाले, " तरी पण मला दाखवा. " सरलानी मग किल्ल्या घेऊन वरच्या मजल्यावरच्या खोल्या एकेक करून उघडून दाखवल्या. डॉ सोबती स्वतः आत जाऊन खिडक्या वगैरे उघडून बाहेर वाकून पाहात होते. नंतर ते सगळेच खाली आले. त्यांनी माईंना पाह्यले. माई थोडी फार जागी होण्याच्या बेतात होती. मग सोबती म्हणाले, " मला सांगा यांनी न झेपणारी काही कमिटमेंट केल्ये का? " त्यावर सरला म्हणाली, " तसं मला काही आठवत नाही. " मग त्यांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि म्हणाले, " मी सांगतो तसं करा. या खोल्या अशा बंद करून ठेऊ नका. या पण उघडत चला, आणि सगळ्या खिडक्या पण उघडा. असं बघा, माईंना काही प्रमाणात त्यांचा आधार गेल्या सारखं वाटतय. त्यात त्या काहीतरी अशी गोष्ट बोलून बसलेल्या असाव्यात की जी त्यांच्याच्यानी होणारी नाही. तूम्ही नीट आठवा. तसच बाबासाहेब गेल्या पासून वाडयात असणारी गजबज नाहीशी झालेली आहे. त्यात तुम्ही खिडक्या आणि खोल्या बंद ठेवता. बाहेरची हवा आत येत नाही आतली कुबट हवा बाहेर जात नाही. या वातावरणाचा परिणामही त्यांच्यावर होत असणार. "....

"पण डॉ. सगळ्या खोल्या विनाकारण उघड्या ठेऊन साफ करणं कठीण आहे. " सरला मध्येच म्हणाली. डॉक्टर म्हणाले, " अगं असं नाही, अधून मधून त्या साफ करायच्या, नाहीतरी त्या बंद असताना खराब होतातच आहेत की. आपला हेतू एवढाच आहे की माईंना मोकळं वाटलं पाह्यजे. त्यांना सध्या कसं दुसऱ्याच्या घरात असल्यासारख्ं वाटत असावं. असो, तसं ही अवस्था थोडी गंभीरच म्हणायला हवी. त्या जर कोलॅप्स झाल्या तर त्यांना सावरणं आपल्याला कठीण जाईल. त्यांना एखादा वैचारिक धक्का देण्याची किंवा समजुतीनं घेण्याची गरज आहे. तू फक्त त्यांनी केलेली कमिटमेंट शोधून काढ. ती पूर्ण नाही झाली तरी चालण्यासारखं आहे, हे मग आपल्याला त्यांना पटवता येईल. कदाचित काही दिवस अजून त्या थोड्या भ्रमिष्ट पणानं वागतील.

हे सगळं फार हाताबाहेर गेलय असं समजण्याचं कारण नाही. या गोळ्या दे आणि मला एक आठवड्यानंतर कळव. तसच काही खास घडलं, तर आधी कळवलस तरी चालेल. असं म्हणून दरेकर आणि सोबती गेले.


मे महिना चालू झाल. उन्हाचे चटके चांगलेच वाढले. सरलानी तिचा क्लास संध्याकाळचा करून घेतला. त्यामुळे ती पाच वाजता जाऊन साडेसहा पर्यंत परत येऊ लागली. माई जवळ जवळ महिना दीड महिना घराबाहेर पडल्याच नव्हत्या. सरलाच्या मनात आलं तिला घेऊन बाहेर जावं. म्हणजे जरा बरं वाटेल. पण माई अजूनही तेवढी ठीक नव्हती जेवढी बाहेर जायला ठीक असायला हवी. शशांक एक दिवस तिला म्हणाला, " जून मध्ये कोर्टाची तारीख आहे. माई कशी काय जाणार? " त्यावर ती म्हणाली, " एवढं काय त्यात, जातील की वाडेकर, नाही तर आपण जाऊ. " सध्या शशांकचं बरं चाललं होतं. मनापासून काम करीत असल्याने तो आता त्याच्या मालकाचा आवडता झाला होता. हळू हळू त्याच्यावर ऑडिटची जबाबदारी टाकली गेली. ज्यानी त्याला लावला होता, त्याच्याकडून समजलं, की त्यानी जर असच काम केलं तर त्याला एक दोन महिन्यात पूर्ण वेळ कामावर ठेवलं जाईल, आणि अर्थातच त्याचा पगारही वाढेल.............

एक दिवस अशीच सरला क्लासहून घरी येत होती. संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते. स्वतःच्याच विचारात असलेल्या तिला वातावरणातला बदल चटकन जाणवला नाही. तिच्या येण्याचा रस्ताच नदीच्या बाजूनी असल्याने नेहेमीच खेळती हवा असायची. आत्ता मात्र जरा जास्तच वारा खेळू लागला. रस्त्यावरची धूळ आकाशात उंच उडू लागली. आणि ठिक ठीकाणी लहानसे घुळीचे भोवरे तयार होऊ लागले. रस्त्यावरचा कचराही त्याबरोबर गोल फिरायचा वर जायचा आणि पुन्हा खाली बसायचा. तिच्या अंगावरचा दुपट्टा एक दोन वेळा उडून जाण्याच्याच बेतात होता. तिनी सावरला म्हणून बरं. वारा एवढा वाढला की तिला वाऱ्याचा धक्का जाणवू लागला. तिनी आकाशाकडे पाह्यलं. परमेश्वरानी स्वच्छतेची मोहिम हाती घेतली असावी. तिच्या समोरची हवा धुळीनी इतकी भरून गेली, की तिला कुठेतरी थांबावसं वाटलं. म्ह्नणून ती रस्ता सोडून नदीकिनाऱ्याजवळ असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली उभी राह्यली. तिला वाटलं, वादळी पाउस येतोय की काय म्हणून तिनी परत आकाशाकडे पाह्यलं. पण तसं तिला वाटलं नाही. अचानक रस्ता निर्मनुष्य झाला. आता ती झाडाखाली एकटीच होती. तिथून ती निघण्याच्याच विचारात होती, थोडं फार अंधारूनही आलं. रस्त्यावरचे दिवे अजून लागले नव्हते. झाडाला टेकून ती उभी होती. वादळ अजून कमी होत नव्हते. वाऱ्याचा घूं घूं.......... असा आवाजही वाढला. तिला एकदम बाबासाहेबांना याच रस्त्याने नेल्याची आठवण झाली. पण तिला पुढच्या रस्ता पाहण्याचा धीर झाला नाही. तिनी मान वळवली....... आता अंधार चांगलाच झाला होता. तिला घरी जाण्याची हुरहुर लागली. माई घरी एकटीच आहे.. म्हणून तिनी दुपट्टा घट्ट आवळून घेण्यासाठी ओढला, पण तो मागे कुठेतरी अडकला असावा म्हणून पाहण्यासाठी मान वळवली....... मागे पाटलाचा वसंता तिचा दुपट्टा हातात घट्ट धरून उभा होता. अचानक तिच्या अंगाला कापरं भरलं...... तिनी किंकाळी फोडण्यासाठी तोंड उघडलं, पण वसंतानी चटकन तिच्या तोंडावर हात ठेऊन तिला तशीच ओढली. तिचा तोल गेला. आता तो तिला, एखादं श्वापद जसं ओढून घेऊन जातं तसा तिला ओढू लागला. त्याच्या हातात आलेला दुपट्टा त्यानी ओरबाडून पहिल्यांदी काढून टाकला. तिचा छाती चा भाग उघडा पाहून तो जास्तच चेकाळला. तिला खाली पाडून तो तिच्या अंगावर बसला. अंधारामुळे सरलाला नीट दिसत नव्हतं. ती आता धक्क्यातून सावरली होती. वसंतानी तिचे केस धरले आणि तिच्या तोंडाशी तोंड आणण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या तोंडाचा दारूचा भपका येत होता. तिने मान वळवून तोंड बाजूला केलं. मग तिच्या लक्षात आलं, की आपला एक हात मोकळाच आहे........ " साली, शाणपणा करतेस काय? थांब तुला दाखवतोच....... असं म्हणून वसंता तिच्या कानफटात मारण्यासाठी हात वर करायला गेला. तेवढ्यात त्याची तिच्या केसांवरची पकड ढीली पडली. आपल्या मोकळ्या हातानी सरलानी हातात येईल तितकी माती घेतली आणि त्याच्या तोंडावर जिवाच्या आकांताने भिरकावली..... डोळ्यात धूळ गेल्याने वसंताने दोन्ही हात सोडले. तेवढयात सरलानी त्याला जोरात धका दिला..... तो बाजूला डोळे चोळीत भेलकांडला. ती त्वरेने उठली आणि पळत सुटली. पण बेभान पणामुळे घराची दिशा सोडून विरुद्ध दिशेला धावली. आता तिचे केस अस्ताव्यस्त उडत होते. वारा थांबायला तयार नव्हता. अंगावरती दुपट्टा नसलेल्या अवस्थेतच ती पळत होती. थोड्याच अंतरावर गेल्यावर तिच्या लक्षात आलं, आपण वेगळ्याच रस्त्याला लागलोय. तिनी पायातल्या चपला भिरकावून दिल्या. नकळत ती धावत ती पोलिस चौकीच्या रस्त्यावर आली...... तिला श्वास लागला होता. छातीत एकदम घुसलेल्या श्वासाने उठणारी कळ दाबून ती चौकीच्या दारात आली. आत पोलीस शिपाई वाकणकर आणि दुसरे दोघे बसले होते. अजून इन्स्पेक्टर आलेले नव्हते. ती अशा विचित्र अवस्थेत आल्याने वाकणकरलाही धक्का बसला. तिला कशी तरी बाकड्यावर बसवून त्याने बाजूच्याच मटक्यातून पेला भरून तिच्या पुढे केला........

(क्र म श:)

🎭 Series Post

View all