गोष्ट जुनीच माणसं नवीन (भाग ६)

थोड्याच वेळात माझी आल्या.....

थोड्याच वेळात माई आल्या. त्यांचा पारा चढलेलाच होता. माईंची मुद्रा पाहून सरलाला जरा भीतीच वाटली. तरीही तिनी माईला पाणी हवय का विचारलं. त्यावर माई काहीच बोलली नाही. मग ती तात्याला म्हणाली, " इतका आतल्या गाठीचा निघशील असं वाटलं नव्हतं रे. बायकोच्या नादी लागून लगेच दावा दाखल केलास, काय? " तात्या खाली मान घालून म्हणाला, " माई, खरच, मला शर्मिला आणि जीवन असं काही करतील असं वाटलं नव्हतं. मला सुद्धा मागच्याच आठवड्यात कळलय. कसं सांगू तुला. हे.. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तात्या चिडून शर्मिलाला म्हणाला. त्यावर ती म्हणाली, " का मिळाली प्रॉपर्टी तर नको आहे का? मांजरासारखं चोरून दूध पिणारी मी नाही. वाईट पणा घ्यायला घाबरत नाही मी. माहीत नसल्याचा खोटा आव आणू नका. " तात्या त्राग्याने म्हणाला, " अगं!... काय बोलतेस काय? मला हे तू आणि जीवन असं काही कराल याची माहिती नव्हती. " आवाज चढवून ती म्हणाली, " माहिती नव्हतं? मृत्युपत्राचं वाचन झालं तेव्हाच तर बोलणं झालं होतं..... " तात्या काहिच बोलला नाही. ते पाहून ती कडवट पणानं म्हणाली, " असं करा, जे मिळालय ना ते देऊन टाका. आणि बसा हरी हरी करीत...... " ती हे म्हणाली, आणि तिरसटून तात्या म्हणाला, " त्यासाठीच तर आलोय. " मग त्याने आधीच तयार केलेला स्टॅंप पेपर काढला आणि तिला दाखवला. त्यात तात्याने मिळालेल्या सर्व मिळकतीवरचा हक्क सोडल्याचं लिहिलं होतं. तिने तो वाचला. तिचा चेहेरा रागाने लाल पिवळा झाला. ती काही न बोलता बसून राहिली. मग तो कागद तात्याने माईला दिला. पण माई अशी ऐकणार होती थोडीच.... तिने तो कागद परत करीत म्हंटलं, " तात्या बंद करा तुम्हा दोघांची ही नाटकं. दोघेही एकमेकाला सामील आहात. तू माहित नाही म्हणायचं, तिनी माहीती होतं म्हणायचं. मी मारतो तू रड, या पद्धतीचं तुमचं वागणं. बंद करा. आणि निघा आता....... आणि हो, ह्या वाड्याच्या चाव्या. इथे ठेवल्येत. पुढच्या महिन्यात आम्ही वाडाच काय, गावही सोडून जाऊ..... "


तात्या विव्हळून म्हणाला, " माई, अगं ऐक गं जरा. मला खरोखरीच काही नकोय. " त्याने माईचे पाय धरले...... तेवढ्यात पुढे होत शर्मिलाने मात्र त्या चाव्या उचलल्या. ते पाहून तात्याचा तोल सुटला, आणि त्याने शर्मिलाला कानफटात भडकावली. राग आणि शरम यानी लाल होत शर्मिलाने त्या चाव्या माईंच्या तोंडावर भिरकावल्या आणि तात्याकडे जळजळीत नजरेने बघत ती धावतच गाडीत जाऊन बसली. "

मग माई म्हणाली, " जा. बायकोचा गुलाम ना तू. जा तिच्यामागे आणि जाऊन मनधरणी कर तिची " आता मात्र तात्या काही न बोलता निघाला आणि थोढ्याच वेळात गाडी सुरू करून मागे न पाहता निघून गेला........ थोडा वेळ असाच निः शब्द शांततेत गेला. मग शशांक म्हणाला, " माई, तू असं करायला नको होतस. शर्मिला वाईट असली तरी तात्या केवढा सरळ मनाचा आहे. "

वा!, काय त्याचं ते सरळ मन? कोर्टाच्या तारखे आधीच येऊन नाही मग त्यानी सरळ मन दाखवलं? त्याची बाजू घेतोयस तू? पाहिजे तर तूही जा त्याच्याकडे. " मग शशांक म्हणाला, " काहीतरीच काय बोलतेस माई तू पण? माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाही. " माई काही न बोलता आत निघून गेल्या. सरला आणि शशांक यांना मात्र मोठ्ठी पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं. जणू काही आपल्याला काहीच भविष्य उरलं नाही अशी त्यांना भावना झाली. कशातच उत्साह वाटेना. तो दिवस असाच उदासवाणा गेला. रात्रीची जेवणं झाली. अंथरूणावर पडल्या पडल्या माईंना आणि शशांकला झोप लागली. सरलाला मात्र झोप लागेना. तिला सारखं तात्याच आणि शर्मिलाचं बोलणं आठवू लागलं. तसाच माईचा तऱ्हेवाईकपणाही आठवू लागला. माई हल्ली कशानं ही उत्तेजित होते आणि वाटेल ते बोलते. हिचा ताबा सुटत चाललाय की काय, असं तिला वाटू लागलं. पुढच्या अधांतरी आयुष्याची जाणीव असूनही माईला झोप कशी लागत होती, कोण जाणे. का तिनं काही ठरवलं होतं, आणि त्याप्रमाणे ती वागत होती. सरलाचं डोकं मात्र तेच तेच प्रसंग आणि संवाद घुमत असल्याने इतकं अस्वस्थ झालं की ती कधी दिवाण खान्यात फेऱ्या मारू लागली, तर कधी मागच्या पडवी मध्ये जाऊन बसू लागली. तिला नक्की असा मार्ग या सगळ्यावर पाहिजे होता. शेवटी ती कंटाळून अंथरूणावर पडली. आणि कधीतरी रात्री तिला झोप लागली...........

या प्रसंगाला आता महिना झाला. एक दिवस सकाळी सकाळी, म्हणजे सात साडेसातलाच पाटील आले. माई आणि ती ओटीवर बसून चहा घेत होत्या. अचानक आत शिरलेल्या पाटलांना पाहून माईंच्या कपाळावर आठ्या आल्या. पदर सावरून त्या औपचारिक पणे म्हणाल्या, " आज सकाळीच काय काम काढलंत? " घसा साफ करीत पाटील म्हणाले, " त्याचं काय आहे माई, न्हाई म्हनल तरी सरला आता लग्नाच्या वयाची आहे. काहीतरी बघाया पाह्यजे, न्हाई का? काल तालुक्याला गेल्तो. एक दोन स्थळं आहेत तुमच्यातलीच. न्हाई म्हनजे, तुमी ठरवायला मुख्त्यार आहात. पण सरला आम्हाला पोरीसारखी म्हनून........ " त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. माईंची प्रतिक्रिया अजमावण्यासाठी ते थांबले. सरला आत गेल्याचं पाहून, माई म्हणाली,, " पाटील हल्ली फार काळजी वाटायला लागली आमची? अं?..... म्हणजे चिरंजिवांनी मध्यंतरी जे तमाशे केले ते विसरलात वाटतं? रात्री बेरात्री येऊन वाड्यासमोर धिंगाणे घालायचे आणि बापानं येऊन स्थळं सांगण्याचा शहाजोगपणा करायचा. पटतं का हे तुम्हाला? आम्ही आमची काळजी करू. निघा आता. तरी पाटील म्हणाले, " आमाला आपलं वाटतं म्हनून आल्तो. काई लागलं तर मागं पुडं पाहू नका, एवडच. चला रामराम. " असं म्हणून पाटील वाड्याच्या पायऱ्या उतरू लागले. सरला त्यांच्यासाठी हातात चहा घेऊन उभी होती, तिनी विचारलं, " हे काय माई, पाटील गेले पण. अगं, मी त्यांच्यासाठी चहा आणायला आत गेले. " त्यावर माई तिरसटली. " का, फार प्रेम उफाळून आलय वाटतं? का त्यांची सून व्हायची इच्छा आहे? " माईचा खवचटपणा सरलाला आवडला नाही, पण तिनी सकाळीच वाद नको म्हणून उत्तर न देताच ती आत गेली.


असेच काही दिवस गेले. शशांक आताशा तालुक्याला एका सी. ए. कडे अर्धवेळ कामाला जाऊ लागला. बेताचे का होईना पण त्याला पैसे मिळण्याची आशा निर्माण झाली. पण माई मात्र बरीचशी अबोल झाली. तिच्या मनात नक्की काय विचार चालू होते हे सरलाला कळत नव्हतं. रात्रीची माई बोलत असे ती पूर्णपणे बंद झाली. दिवसा ही ती जेवढ्यास तेवढ बोली. आजकाल ती पुजेला बसायची तीच मुळी दोन दोन तीन तीन तास. तर कधी ती दिवाणखान्याच्या खिडकीतून बाहेर अहेतुक पाहात बसायची. सरलाला मात्र तिच्या मनाला काही खातय की काय अस वाटे. तिच्या नजरेच्या टप्प्यात नजर मिळवून सरलानं काही वेळा खिडकीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला. पण खास असं तिला काहीच दिसत नसे. ही वेगळ्याच विश्वात जगत्ये की काय असं तिला वाटे. माई आतून ढेपाळल्ये की काय असंही तिला वाटलं. काही दिवसांनी माईनी स्वतःचं अंथरूण दूर घालायला सुरुवात केली. तिला ती विचाराय्ला गेली तर माई केवढी भडकली. " का ग कार्टे? तुला काय करायचय? माझ्या मनात शिरायचा प्रयत्न करू नकोस. " मग माईचे डोळे एकदम दृष्टिहीन झाल्यासारखे तिला दिसले. ती कुठेच पाहात नव्हती आणि सगळीकडे पाहात होती. असली सैरटासारखी नजर सरलानी प्रथमच पाहिली. आणि घाबरून जाऊन ती अंथरूणावर पडली. दिवस असेच उदास वाणे आणि वेडेवाकडे जात होते. आता तिला जाणिव होऊ लागली, की माई, माई राहिली नाही तर, झपाटल्यासारखी वागत्ये. माईला वेड लागलं असावं असं तिला वाटू लागलं. शशांकचा मात्र यावर विश्वास व्बसत नव्हता. " तू जास्त वेळ घरात असतेस ना त्याचा हा परिणाम आहे. नसेल माईला बोलायच्ं आपल्याशी. माझ्याशी तरी कुठे बोलते? तशीही ती फार बोलणाऱ्यांपैकी नाही. "......... पण शशांक चुकत होता. माईत बदल होत होता. असेच काही दिवस गेले. आणि एका शनिवारी माईला न्हायचं होतं. म्हणून पाणी घेऊन ती बाथरूम मध्ये गेली. सकाळी दहाला गेलेली माई बारा वाजेपर्यंत आतच होती. अचानक सरलाला विचित्र वाटलं म्हणून ती बाथरूमच्या दार जवळ आली. आणि तिला आतू न शब्द ऐकू आले. "........ मी म्हंटलं ना, असू दे. सगळं करीन मी. अगदी एकटीनी. काळजीच करू नका..... ही : हीः हीः " हासण्याचा आवाज आला म्हणून सरलानी दार वाजवण्याचा प्रयत्न केला तर, दार उघडलं. ओलेती माई तिच्याकडे डोळे वटारून म्हणाली, " काय ग सटवे? माईला अशी कध्बी पाहिली नाहीस की काय? " तरी घाबरलेली सरला धीर एकवटून म्हणाली, " तसं नाही माई, पण फार वेळ झाला ना. " संभाषण एवढ्यावरच थांबलं. सरला पूढच्या ओटीवर जाऊन बसली. तिला ही अवस्था पाहून घाम फुटला. आता नक्कीच डॉक्टरांना बोलावल पाहिजे. पण गावात कुठला मनोवैज्ञानिक? तिनी हळूच दिवाणखान्यातून बाथरूम कडे पाहिलं. दार उघडं होतं. आत माई नव्हती. ती कपडे बदलीत असावी. पण सरलाला तिला पाहायला जायचा धीर झाला नाही.

(क्र म शः)

🎭 Series Post

View all