शर्मिलाला तर हे अजिबात आवडलं नाही. ती तर स्पष्टच म्हणाली, " आमच्यावर तर सूडच उगवलाय. आत्तापर्यंत आम्ही एवढं केलं, ". आतामात्र माई म्हणाल्या, " दिलं नाही कसं ग? दिलं की, तुला, तात्याला आणि मुलांनासुद्धा. तुला काय खोड काढायची सवय आहे का? आणि करण्यावद्दल म्हणशील तर, असं काय केलस ग? फक्त पैसे पाठवले ना? तेही कुरबुर करीत. " मग जीवनही म्हणाला, " बाबासाहेबांनी बरोबर मृत्युपत्रातून बाजूला ठेवलय. हे मृत्युपत्र खरं आहे की नाही, याचीच मला शंका आहे. आपण हे प्रकरण कोर्टात न्यावं. पाटील आणि वाडेकर यांनी मिळून हे केलेलं कारस्थान आहे. नाहीतर देवस्थानच्या विश्वस्तमंडळावर पाटलांचा सहभाग कसा आला? " मग मात्र तात्या चिडून म्हणाला, " तू वेडा आहेस का? विलवर बाबासाहेब्वांची सही आहे, ती मी ओळखतो. आणि वाडेकर वकिलाला काय मिळालं रे, कारस्थान करून? तुझं आपलं काहीतरीच, पाहिजे तर मी, मला मिळालेल्या वाटणीवरचा हक्क सोडून देतो. ते तू घे. मला कशाचीही गरज नाही. ".......
रात्रीची जेवणं झाली. माई आणि सरला अंथरुणं घालीत होत्या. वरच्या मजल्यावरच्या तिन्ही खोल्या बंद केल्या. तळ मजल्यावरची पण एक खोली बंद केली. माणसच नाहीत तर काय करणार? त्या एकमेकींशी फार बोलत नव्हत्या. माई तशा कुढ्या स्वभावाच्या. आणि बोलण्यासारखं काही नव्हतच म्हणा. अजूनही त्यांना वाटत होतं की आतून कुठूनतरी बाबासाहेब येतील आणि मोठ्या आवाजात म्हणतील, " अरे बोला काहीतरी, काय सुतक्यासारख्या बसलात? "...... पण तसं काहीही झालं नाही. दहा वाजत आले माईंना झोप लागली. हळूहळू बाहेरचे आवाज कमी झाले. रात्रीची खिन्न शांतता पडली. सरला जागीच होती. तिच्या मनात आलं. काही दिवसांपूर्वी घर कसं गजबजलेलं होतं. आजपर्यंत बाबासाहेबांच्या अस्तित्वामुळे तिला आजपर्यंत माईंचा मुखदुर्बळपणा जाणवला नव्हता. दिवस कसा तरी जातो, पण रात्र लवकर जात नाही. माणसाला आवाज हवे पण असतात आणि त्यांची भीती पण वाटते. नक्की माणसाला काय हवं असतं, कोण जाणे. कधी कधी आवाज त्याला गोंगाटासारखे वाटतात. आवाज तेच आणि तेवढेच असले तरी माणसाची प्रतिक्रिया दरवेळेला वेगवेगळी असते. असले दीडशहाणे रिकामे विचार तिच्या मनात येत होते..... शशांकही बुधवारशिवाय यायचा नव्हता. या विचारासरशी तिला जरा अस्वस्थ आणि एकटं वाटू लागलं. तिच्या मनाला अनामिक भीती क्रुरतडू लागली. जणू काही काहीतरी होण्याची तिला अपेक्षा होती. या विचारांमध्ये किती वेळ गेला तिला कळलं नाही. तेवढ्यात तिला झोप लागली. स्वप्न पडलं.......
...... बाबासाहेबांचा हात धरून स्वप्नात ती नदीजवळच्या भागात फिरत होती. ती लहान होती. बाबासाहेब कोणताही उंच भाग पाहून तिला उड्या मारून दाखवीत होते. ती हासत होती.. नदीवर वारा भयंकर सुटला होता. मग ती एका उंचवट्यावर उभी राहून उडी मारणार, इतक्यात बाबासाहेब दिसेनासे झाले. आणि दाराची कडी वाजत असल्याचा आवाज आला. ती स्वप्नातच होती. आणि ती स्वप्नातल्या स्वप्नात म्हणाली, " हे काय बाबासाहेब, मी घरी आले आणि तुम्ही बाहेर कसे राहिलात? लगेच आत नाही का शिरायचं? " आणि दार उघडायला म्हणून ती निघाली आणि धाडकन बिछान्यावर पडली. मग तिच्या लक्षात आलं, हे स्वप्न होतं. पण कडी मात्र वाजत होतीच. तिने हळूच अंथरूण चाचपून पाहिलं. ती बिछान्यावर असल्याची तिला खात्री झाली...... आता मात्र कडी जोरात वाजत होती. तिने बाजूलाच झोपलेल्या माईकडे पाह्य्लं. हिला कशी कडी ऐकू येत नाही? जरा वेळाने कडीचा आवाज थांवला.... भिंतीवरील घड्याळात एकाचा ठोका पडला....... पुन्हा कडी वाजू लागली. तिची छाती धडधडू लागली. घसा कोरडा पडला. दाराबाहेरची व्यक्ती अडखळत बोलत होती. शब्द नीट ऐकू येत नव्हते. ती आता पूर्ण जागी झाली होती. भीतीमुळे तिचं शरीर उठायला विरोध कतीत होतं. पण उत्सुकता स्वस्थ बसू देत नव्हती. कोण असेल एवढ्या रात्री? वेगवेगळी नावं तिनी घेऊन पाहिली. पण तिला अंदाज येईना.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा