गोष्ट छोटी डोंगराएवढी ( माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग )

Mazya Aayushyatil Avismrniy Prasng
कॉलेजचा शेवटच्या वर्षाचा शेवटचा पेपर. मस्त सर्व मैत्रिणींचा प्लॅन ठरलेला..आधी मूव्ही बघायची नंतर एखाद्या मॉल मध्ये आणि शेवटी हॉटेल.. पण पेपर झाल्या झाल्या बाहेर पडताच मोबाईल सुरू केला नि
वडिलांचे जवळजवळ 10 ते 12 मिस कॉल. बापरे! काय झालं असेल नेमकं? मोबाईल मध्ये वडिलांचा नंबर लावेपर्यंत शेकडो विचार येऊन गेलेले नि ते ही नकारात्मक.

“हॅलो बाबा”

“अगं ऐक न.. त्या मुलाचा निरोप होता. त्यांच्याकडून फोन आलाय. त्यांना आता बघायचा कार्यक्रम करायचा आहे. मी त्यांना सायंकाळी 7 ची वेळ दिलीय.”

“काय? मला न विचारता?”

“अगं, त्यात काय विचारायचे? तुझा शेवटचा पेपर न आज? म्हणजे तू मोकळीच की …“

“बाबा, तुम्ही काय बोलताय हे? तुमचं तुम्हाला तरी कळलं न तरी चालेल मला.”

डोक्यातली सर्व आग आता माझ्या बोलण्यात आली होती पण वडीलधाऱ्यांसमोर काहीही बोलायचे नाही याचे जणू बाळकडूच दिलं होतं मला. सारा राग, पुढचे बिघडलेले पूर्ण प्लॅनिंग, मैत्रिणींचा रुसवा या साऱ्यांना घेऊन घरी परतले नि सजून धजून तयारही झाले होते कारण माझा ब्रेनवॉश झाला होता.

“अगं, पहिल्याच बैठकीत कोण हो म्हणतं का?”

एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असं सगळं सुरू होतं.मला खात्री होती की मुलाकडून होकार येणार नाही नि आलाही तरी मी नाही म्हणणार म्हणजे प्रश्नच सुटला पण त्या विधात्यासमोर कुणाचे कधी चालले नाही नि चालणारही नाही. झालेही तसंच समोरून होकार आला. दोन्ही घरचं वातावरण एकदम आनंदी झालं. आजी, आईबाबा यांच्या चेहऱ्यावरील समाधानाने मी काहीही बोलू शकले नाही पण एक अट मात्र ठेवली

“मला त्याच्यासोबत बोलायचं..”

आज जरी ही सर्वसामान्य बाब असली तरी त्या वेळी सर्वांच्या कपाळावर आठ्या आणणारी ठरली पण माझा स्वभाव माहीत असल्याने घरच्यांनी हात टेकले नि ठरलं दोघांनी भेटायचं पण तेही घरीच. भेटायला मिळतेय हेच पुरेसे होते माझ्यासाठी. तो समोर येताच मी पूर्ण ब्लॅंक म्हणजे टोटली ब्लॅंक झाले होते. माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मी कोणताही प्रश्न न विचारताच तो देत होता. बस्स! त्या 10 मिनिटांच्या ओळखीत त्याने मला जिंकले होते कारण त्याने वचन एक वचन दिलं होतं.

“तुझ्या इच्छेविरुद्ध तुला कधीही काहीही करावं लागणार नाही..”

माझा होकार येताच सगळं जग बदललं त्याचं नि माझंही.. आधी साखरपुडा नि 2 महिन्यात लग्न करण्याचं ठरलं. माझं पूर्ण आयुष्य बदलायला फ़क्त
3 महिने पुरेसे ठरले. नव्याचे नऊ दिवसही फुलपाखरासारखे उडाले. जबाबदारी आली आणि तीसुद्धा अचानक.. आणि त्यातच ती गोड बातमी कळली. सर्वात जास्त आनंद मला जणू मला स्वर्ग दोन बोटं! पण.. हा माझ्या आयुष्यात आलेला ‘पण..’ काही मला सोडायला तयार नव्हता. आम्हाला समजले की, माझ्या पोटात जुळे आहे. माझ्या तर आनंदाला पारावर नव्हता परंतु बाकी घरचे सदस्य खूप नाराज होते. मला काहीच कळेना.
यांना आनंद नाही का झाला? पण जेव्हा समजलं की, माझी तब्येत भलतीच नाजूक असल्याने जुळ्यांना मी समर्थपणे या जगात आणू शकेल की नाही याची सर्वांना काळजी वाटतं आहे तेव्हा तर अजूनच समाधान झाले. इतके प्रेम करणारे, काळजी घेणारे सासर मला मिळाले होते. जुळे राहिले, तेंव्हा माझं जेमतेम पस्तीस किलो वजन होतं. माझं मत विचारात न घेता गर्भपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी 2 महिन्याचे ते गर्भ असले तरी मी आई होती त्यांची.. प्रेम जडले होते माझे त्यांच्यावर.. लळा लागला होता मला त्यांचा नि
माझ्या विश्वासावर ते या जगात येणार होते. त्यांचा हा विश्वास तोडायचा नव्हता मला. त्यांच्यावर माझे प्रेम आहे हे दाखवून द्यायचे होते मला.

बस्स झालं! सासरी कधीही कुणाला उलट न बोलणारी मी अगदी पेटून उठले होते. ती माझ्यातली आई होती जी माझ्या बाळाच्या रक्षणाकरिता जागी झाली होती. त्यांचा विचार हा माझ्या चांगल्या साठी
जरी असला तरी मला तो नको होता. माझ्यातल्या आईसमोर त्यांनी शरणागती पत्करली होती. एका आईचा विजय झाला होता.

आणखीन एक पण माझ्या समोर आ वासून उभा होता. सर्व परिस्थितीवर मात करत मला 9 महिने काढायचे होते नि हेल्दी बाळांना जन्म दयायचा होता पण या सर्वांमध्ये चेहऱ्यावरचे हसू कुठेही हरवू दयायचे नव्हते. त्यावेळी मी माझ्या बाळांसाठी घरच्यांच्या विरुद्ध रणरागिणी बनून वगैरे युद्ध पुकारले होते पण त्या नऊही महिन्यात त्यांच्या इतकी काळजी, प्रेम उभ्या आयुष्यात मी अनुभवले नव्हते. सासूबाई नि नवऱ्याने तर इतकी काळजी घेतली की, माझ्या तोंडून फ़क्त शब्द निघायची वाट.. बस्स! तर मग पडत्या फळाची आज्ञा..

नऊही महिने जरी आनंदात घालविले असले तरीही ज्या गोष्टीची धास्ती घेतलेली होती, ती जवळजवळ येत होती पण माझे महाराज माझ्या सोबत आहे नि ते काहीही वाईट होऊ देणार नाही यावर. माझा विश्वास होता. डिलिव्हरीचा दिवस उजाडला म्हणजेच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव.. नऊ महिने ज्या दोन गोळ्यांना पोटात जोपासले, त्यांना आकार दिला, त्यांच्यावर गर्भसंस्कार केले, त्यांना चिरफाड करून या जगात आणायला मी नि यायला ते तैयार होते. सोळा टाक्यांचे सिझर करून आधी एका मुलीची नि दोन मिनिटांच्या फरकाने एका मुलाची मी आई झाली होती आणि ते ही दोन हेल्दी बाळांची आई… पण खरंच आज जर मी "तो निर्णय" घेऊन मागे वळून पाहिले असतं न तर स्वतः ला कधीही माफ करू शकले नसते. आयुष्यभर माझ्या बाळांची मी गुन्हेगार राहिली असते. आज माझे बाळ पंधरा वर्षाचे आहे नि बुद्धीला अगदी तल्लख. सर्व स्पर्धा - परीक्षा यांचा नंबर पहिलाच. अभिमानाने मिरवावे असे बाळ आहेत माझे. आजपर्यंतच्या माझ्या पूर्ण आयुष्यातील हा अविस्मरणीय अनुभव होय..

©®मीनल सचिन ठवरे